शब्दाचे योग्य रूप कोणते?

Submitted by चिनूक्स on 20 April, 2009 - 09:29

एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.

बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -

चूक - बरोबर

१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'मध्ये' लावलेल्या शब्दात अनुस्वार येणे आवश्यक आहे. ते जर अनेक वचनी असेल तर. वरचेच उदाहरण द्यायचे झाले त. 'वेदामध्ये' म्हटल्यास एकाच कुठल्यातरी वेदात असा अर्थ होईल मात्र 'वेदांमध्ये' म्हटल्यावर अनेक वचन (दोन कि.वा अधिक वेदांमध्ये ) दर्शविले जाते. त्यात खरे तर शंका घेण्यासारखेही काही नाही.
सत्रांमध्ये , युगांमध्ये काही चूक नाही हे चिनूक्सचे म्हणणे बरोबर आहे. ते अनेक वचनी वापरले असले तर...

हो, 'देवळांमध्ये', 'नद्यांमध्ये' वगैरे आपण सगळीकडेच वापरतो. तू अनुस्वार द्यावा असे लिहिलेस, ते मला वाटले वर्षा यांच्या "युगांत बरोबर की युगांमध्ये बरोबर" या प्रश्नाला "युगांत" बरोबर असे म्हणतो आहेस.

(युगांत लिहिले तर 'युगाचा अंत' असा अर्थ निघेल तेव्हा अनेकवचनाकरता "युगांत लिहावे की युगांमध्ये" असे त्या विचारत आहेत असा मी अर्थ काढला.)

गजानन, तुम्ही म्हणत आहात तेच मी विचारले होते.
मलाही अनेकवचनासाठी 'मध्ये' प्रत्यय लावावा असेच वाटते परंतु हल्ली सर्रास 'गावांत', 'सत्रांत' असे शब्द वापरलेले पाहिले खासकरुन वृत्तपत्रांमध्ये (वृत्तपत्रांत? :))
धन्यवाद सर्वांना

'गावांत', 'सत्रांत' ही रूपं योग्यच आहेत. अनेकवचन दर्शवण्यासाठी अनुस्वार द्यायचा असतो. आता 'युगांत' हा शब्द 'युगांमध्ये' आहे की 'युगान्त' असा आहे, हे संदर्भानुसार लक्षात घ्यावं लागेल. Happy

स्मिता गद्रे:

>वृषाली मधे व च्या खाली जे चिन्ह देतो किंवा प्र मधे आलेला र , किंवा राष्ट्र मधे ट च्या खाली आलेल चिन्ह त्याला मराठीत काय म्हणतात ?

वृषाली : ऋकार
प्र, श्र, ट्रः रकार
कार्य, आर्तः रफार

>>मलाही अनेकवचनासाठी 'मध्ये' प्रत्यय लावावा असेच वाटते परंतु हल्ली सर्रास 'गावांत', 'सत्रांत' असे शब्द वापरलेले पाहिले खासकरुन वृत्तपत्रांमध्ये (वृत्तपत्रांत? ) <<

ही रूपे (सप्तमी अनेकवचनासाठी लिहिली असतील, तर) योग्यच आहेत. 'युगांत - युगान्त', 'वेदांत - वेदान्त' वगैरे शब्दरूपांमध्ये गोंधळ होऊ नये, म्हणून एक संकेत पाळला जातो, तो असा की वैदिक संदर्भामध्ये लिहिताना 'वेदान्त' लिहितात; सप्तमी अनेकचनाच्या संदर्भात लिहिताना 'वेदांत' लिहितात.

बटाट्याचा (कोणत्याही भाजीचा ) कीस की खिस? मला तरी 'कीस' हेच बरोबर वाटते पण सध्या अनेक लोकांच्या तोंडी 'खिस' असे ऐकायला मिळते. तसेच काही ठीकाणी 'खिस' असे लिहिलेले सुद्धा वाचले आहे.

कीस.

भारतीय संस्कृतीमध्ये उपदेश फार सहज केल्या जातो.
भारतीय संस्कृतीमध्ये उपदेश फार सहज केला जातो.
या दोन्ही पैकी काय बरोबर ? कि दोन्हीही ? असा वाक्यप्रयोग अनेकदा वाचला म्हणून ही शंका.

कर्मणी प्रयोग ना?
उपदेश केला जातो.
चकली केली जाते
चकल्या केल्या जातात.

पण आजकाल सरसकट प्रत्येक ठिकाणी केल्या जातात असा प्रयोग रूढ होऊ लागलाय Sad

चुकले का?
सॉरी. सुधारते हाँ.

मराठीत passive वाक्यरचना बर्‍याचदा घोळात पाडते. विशेषत: इंग्रजीतून भाषांतर करायचे असल्यास. इंग्रजीत passive केवढ्यांदा वापरले जाते.

एका मोकळ्या प्लॉटवर फलक पाहिला. "मातोश्री वृद्धाश्रमाची नियोजित हॉस्पिटलची जागा".
ही वाक्यरचना बरोबर आहे?
की "मातोश्री वृद्धाश्रमासाठी नियोजित हॉस्पिटलची जागा" असे असले पाहिजे?
(दुसरे वाक्यही चुकत असेल तर कृपया योग्य सुचवावे)

मला एखाद्या गोष्टीसाठी 'मधे' का 'मध्ये' वापरायच ते समजत नाही. उदा. भाजीमधे मीठ घालणे की भाजीमध्ये मीठ घालणे?

मला असं वाटतं, मध्ये हा शब्द मध्य वरून आला आहे. मध आणि मध्य मध्ये फरक आहे. सप्तमी विभक्ती ठिकाण दाखवण्यासाठी वापरतात. सप्तमीचे प्रत्यत 'त', 'इ', 'आ' हे आहेत. त्यात मध्य + इ = मध्ये तयार झाला असावा.
मध्ये हेच बरोबर आहे, मधे नाही.

जागा नियोजित आहे ती हॉस्पिटलसाठी-
त्यामुळे 'साठी' हॉस्पिटल ला जोडून आलं पाहिजे.

'मातोश्री वृद्धाश्रम' त्या जागेचे मालक असल्याने, चा, ची, चे या षष्ठी-प्रत्ययाचा वापर योग्य वाटतो.
(तसे नसेल, तर मात्र विचार करायला हवा)

योग्य वाक्य (माझ्या मते) मातोश्री वृद्धाश्रमाची हॉस्पिटलसाठी(ची) नियोजित जागा.

@ चैतन्य ~~
'मातोश्री वृद्धाश्रम' कार्यावर जिल्हाधिकारी यांचे कार्यालय लक्ष ठेवून असते त्यामुळे नियोजित हॉस्पिटलची जागा जरी त्या आश्रमासाठी (च) असली तरी त्याची मालकी शासनाकडेच आहे. त्यामुळे वृद्धाश्रमाच्या संचालकांनी ती जागा 'आपली' मानावी का असा प्रश्न त्या बोर्डमुळे उदभवला आहे.

सर्वांचे शतश: (की शतःश?) आभार.

आजकाल पुन्हा पुन्हा पडणारा प्रश्नः दृष्टिकोण की दृष्टीकोन ?

माझ्या मते, दृष्टीचा कोन म्हणून 'दृष्टीकोन' असावा. पण व.पुं. च्या सगळ्याच पुस्तकांत, किंवा प्रवीण दवणेंच्या बर्‍याच पुस्तकांत 'दृष्टिकोण' असाच उल्लेख असतो.

अजून एक मदत हवी आहे!
दृष्टितला 'दृ' किंवा बर्‍याचमधला 'र्‍या' इथे कसे लिहायचे? मी सध्या तरी copy-paste चा आधार घेत आहे.

विशेषणं लिंगविरहीतच असतात असे नाही. उदा. निळा खडू, निळी शाई.

तोतया नक्की विशेषण आहे का? विश्चासरावांचा तोतया असा शब्द्प्रयोग सहसा वापरतात. त्यानुसार ते नाम होते. तोतया पुरूष आणि तोतया स्त्री असेही म्हटले जाते.

तोतया शब्दाचे मूळ बहुधा कथकलीत आहे. त्यात कथकली सुरू होताना एक किंवा दोन पात्रांचे स्वतःत देवांच्या 'संचारण्या'चे सादरीकरण होते त्याला तोतया म्हणतात अशीही माहिती आहे.. म्हणून तोतया हा शब्द ' सोंग काढणे, घेणे' या अर्थाने वापरीत असावेत. ते बहुधा निधर्मीसारखे निर्लिंग असावे Proud

Pages