शब्दाचे योग्य रूप कोणते?

Submitted by चिनूक्स on 20 April, 2009 - 09:29

एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.

बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -

चूक - बरोबर

१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजा कोण त्यावर अवलंबून आहे. Wink राजकारणातला असेल तर पक्षाची मानगूट पकडली.जोक सोडा.
दुसरं वाक्य बरोबर आहे. पक्ष्याची.

राहते.>> ?
उदा.१)मी मुंबईमध्ये रहाते.
२) मी मुंबईमध्ये राहते.

पहिले योग्य वाटते.कृपया खुलासा कराल का?

दस्तावेज हिंदीमध्ये वापरतात.तर दस्तऐवज मराठीत.दस्त हा शब्द मात्र फार्सी(पर्शियन) आहे.

देवकीताईंनी माझं कन्फ्युजन वाढवलं आहे राहणे बाबत. आता 'रहायला' हे योग्य की 'राहायला' हे योग्य?सांगा..

राहणे - राहत, राहून, राहायला, राहा.

रहात, रहायला ही रूपं चुकीची आहेत, कारण 'रहाणे' हे क्रियापद नाही.

आज्ञार्थी राहा हे योग्य, 'रहा' हे रूप वापरलेलं चालतं कारण ते रूढ झालं आहे.

हेच वाहणे, पाहणे या क्रियापदांनाही लागू आहे.

अमुक राहणार अमुकतमुक ठिकाणी हे बरोबर आहे.पण राहते हे जरा खटकतंय.'राहणे 'या क्रियापदावरून 'राहते' असं आहे का?

अरे , मी टाईप करताना तुमची पोस्ट आली.धन्यवाद चिनूक्स! पुढच्यावेळी हे शब्द उच्चारताना/ लिहिताना
काळ्जी घेईन.

खुलासा कसला हवा आहे? चिनूक्स यांचा प्रतिसाद पहा.

'तिला' या अर्थी जेंव्हा तीस हा शब्द वापरला जातो तेंव्हा सद्य व्याकरण नियमांनुसार त्यावर अनुस्वार द्यायचा की नाही ? म्हणजे आज तारखेला तीस लिहायचे की तींस?

कारण ते रूढ झालं आहे. <<, रूढ बोली भाषेत्/उच्चारात जे झालंय ते तसंच वापरतो आपण.बरोबर.
पण पहायला असं म्हणतो तर रहायला नेहमीच्या उच्चारात येतं.
ते पाहायला असा उच्चार केला पहीजे तर राहायला असं बरोबर वाटेल.

राहते,राहतो,पाहतो,वाहतो हे योग्य आहे पण जीभेला पडलेलं वळण रहाते/रहातो,पहातो,वहातो असं पडलंय.ते वेगळं करायचं म्हणजे मेंदूलापण काहीतरी चूकीचं करतोय असं वाटणार.थोडक्यात ते सवयीचं झालं आहे.

तुम्ही 'राहते' असं वापरण्याऐवजी 'मी मुंबईला राहायला आहे' असं म्हणा.हाय्ब्रीड.. Happy

रहात , रहायला हे वापराने रूढ झाले (आहेतच) की यथावकाश स्वीकार्य होतील बहुतेक.
(हा प्रतिसाद चिनूक्स यांच्या प्रतिसादाच्या प्रतिवादासाठी नाही.)
शुद्धलेखनाच्या बदलत्या नियमंच्या संदर्भाने आहे.
असाच एक नियम एकारान्त नामांच्या सामान्यरूपांसदर्भात आहे. एकान्त नामाचे सामान्यरूप याकारान्त (गोखल्यांना/फडक्यांना) करावे असा नियम असला तरी "फडकेंना, गोखलेंना अशी रूपे अलीकडे रूढ झाली आहेर्त. ती चूक मानू नयेत." इति. पाठ्यपुस्तक.

तुम्ही 'राहते' असं वापरण्याऐवजी 'मी मुंबईला राहायला आहे' असं म्हणा.हाय्ब्रीड..>> Happy

ते पाहायला असा उच्चार केला पहीजे>>>. मी नेहमी पाहते, पाहा असाच ऐकला आहे. जेव्हा शंका असेल तेव्हा मराठी गाणी ऐकावी - "तुला पाहते", "तिथे तुझी मी वाट पाहते" इ इ

तुम्ही 'राहते' असं वापरण्याऐवजी 'मी मुंबईला राहायला आहे' असं म्हणा.हाय्ब्रीड..>> नाही काळ बदलतो. मला मराठी व्याकरण येत नाही पण Present tense and Present continuous are different.

जिथे सागरामध्ये वाट 'पहाते; असेच ऐकू येतेय. Uhoh

जगाच्या पाठीवरमधलं 'तुला पाहते रे तुला पाहते' यात पाहते, राहते, नाहते, साहते, वाहते असे आहे.

आधी ऐकूनच लिहिलंय. माझ्या कानांना पहातेच ऐकू येतंय. विशेषतः दुसर्‍यांदा फक्त वाट पहाते म्हटलंय तिथे. पहिलं संदिग्ध आहे.

Happy मयेकर, "झाल्या तिन्ही सांजा" ऐका. त्यात ती 'पहाते' म्हणते. ते ठीक आहे कारण तो ग्रामीण सिनेमा आहे.

मुद्दा एवढाच की "पाहते" आणि "पहाते" फरक माझ्या कानाला जाम खटकतो. (व्याकरण- शाळा फार शिकले नाही पण कशा सिनेमात कशी भाषा लागते एवढ मात्र समजत).

शुद्धलेखनाचे शासकीय नियम प्रमाणभूत मानावेत, या मताचा मी आहे. उच्चार व्यक्तीपरत्वे बदलतात. हे उच्चार जर व्याकरणाला धरून नसतील, तर योग्य रूपं सोडून ती केवळ इतर उच्चार तसा करतात म्हणून वापरावेत, असं मला वाटत नाही. 'मग'चा उच्चार अनेकदा 'म' असा केला जातो. पण आपण लिहितो 'मग'. अंजली कीर्तने यांच्यासारख्या लेखिका 'म' लिहितातही. पण 'मग' असा शब्द टाळण्याचं 'उच्चार' याशिवाय दुसरं कारण नसल्याने मला ते पटत नाही. 'आम्ही उच्चार करतो तसं लिहिणार, हे प्रत्येकानं ठरवलं, तर कठीण परिस्थिती उद्भवेल. Happy

Pages