शब्दाचे योग्य रूप कोणते?

Submitted by चिनूक्स on 20 April, 2009 - 09:29

एखादा शब्द कसा लिहायचा, याबाबत काही अडचण असल्यास कृपया इथे विचारा.

बरेचदा अशुद्ध लिहिले जातात असे काही शब्द -

चूक - बरोबर

१. नेतृत्त्व - नेतृत्व
२. स्वत्त्व - स्वत्व
३. तज्ञ - तज्ज्ञ
४. गणितज्ज्ञ - गणितज्ञ
५. महतम - महत्तम
६. लघुत्तम - लघुतम
७. प्रतिक्षा - प्रतीक्षा
८. गिरीष - गिरीश (गिरी + ईश)
गिरिश ( गिरीवर शयन करणारा)
९. समिक्षा - समीक्षा
१०. मनोकामना - मनःकामना
- मनःशक्ति
- मनःस्वास्थ्य
- मनश्चक्षु
११. पुनर्प्रसारण - पुनःप्रसारण
१२. पुनर्स्थापना - पुनःस्थापना
१३. सहस्त्र - सहस्र
१४. स्त्रोत - स्रोत
१५. क्रिडांगण - क्रीडांगण
१६. प्रसुति - प्रसूति
१७. धुम्रपान - धूम्रपान
१८. कंदिल - कंदील
१९. जिर्णोद्धार - जीर्णोद्धार
२०. उर्जा - ऊर्जा
२१. प्रतिक - प्रतीक
२२. वडिल - वडील
२३. पोलिस - पोलीस
२४. नागरीक - नागरिक
२५. मंदीर - मंदिर
२६. क्षितीज - क्षितिज
२७. जाहीरात - जाहिरात
२८. दृष्य - दृश्य
२९. जीवाष्म - जीवाश्म
३०. अजय (ज्याचा जय होत नाही असा) - अजेय (जो जिंकला जाऊ शकत नाही असा)
३१. अद्ययावतता - अद्ययावत्ता
३२. अनावस्था - अनवस्था
३३. अनावृत्त (पत्र) - अनावृत
३४. अंतस्थ - अंतःस्थ
३५. अपर (इंदिरानगर) - अप्पर
३६. अप्पर (जिल्हाधिकारी) - अपर
३७. अमूलाग्र - आमूलाग्र
३८. अल्पसंख्यांक - अल्पसंख्याक
३९. ऋषिकेश - हृषीकेश
४०. कार्यकर्ती - कार्यकर्त्री
४१. दत्तात्रय - दत्तात्रेय
४२. दुराभिमान - दुरभिमान
४३. देशवासीयांना - देशवासींना
४४. नि:पक्ष - निष्पक्ष
४५. नि:पात - निपात
४६. निर्माती - निर्मात्री
४७. परिक्षित - परीक्षित् (सभोवार पाहणारा), परीक्षित (examined)
४८. परितक्त्या - परित्यक्ता
४९. पारंपारिक - पारंपरिक
५०. पुनरावलोकन - पुनरवलोकन
५१. पौरुषत्व - पौरुष / पुरुषत्व
५२. प्रणित - प्रणीत
५३. बुद्ध्यांक - बुद्ध्यंक
५४. बेचिराख - बेचिराग
५५. मतितार्थ - मथितार्थ
५६. मराठीभाषिक - भाषक
५७. महात्म्य - माहात्म्य
५८. मुद्याला - मुद्द्याला
५९. विनित - विनीत
६०. षष्ठ्यब्दी - षष्ट्यब्दी
६१. सहाय्य - साहाय्य
६२. संयुक्तिक - सयुक्तिक
६३. सांसदीय - संसदीय
६४. सुतोवाच - सूतोवाच
६५. स्वादिष्ट - स्वादिष्ठ
६६. सुवाच्च - सुवाच्य
६७. हत्येप्रकरणी - हत्याप्रकरणी

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा नेहमीचा एक गोंधळ -

सांगितले, बघितले, मागितले
बरोबर? की,
सांगीतले, बघीतले, मागीतले
बरोबर?

माझ्यामते पहिले बरोबर पण बर्‍याच ठिकाणी दुसर्‍या वेलांट्याही पाहिल्या आहेत.

शब्दकोशाप्रमाणे व्यंगचित्र/त्रे हा शब्द बरोबर आहे...
व्यंग्यचित्र/त्रे हा शब्द चूक आहे.

व्यंग आणि व्यंग्य हे दोन वेगळे शब्द आहेत.
व्यंग या शब्दाचा संबंध अपंगत्वाशी आहे.
व्यंग्य = satire, sarcasm

हिंदीतही व्यंग्य, व्यंग्यकार, व्यंग्यचित्र, व्यंग्यात्मक, व्यंग्यपूर्ण असे शब्द रूढ आहेत, आणि मराठीतही तसाच वापर व्हायला हवा. मराठीत रूढ असलेले व्यंगचित्र, व्यंगचित्रकार हे शब्द वापरू नयेत, कारण या शब्दांच्या अर्थाशी संगती लागत नाही.

राजहंस व्यावहारिक मराठी शब्दार्थकोशाप्रमाणे व्यंग ह्या शब्दाची पुढील रुपे आणि त्यांचा अर्थ दिलाय.
व्यंग (न.)- उणेपणा, न्यून.
व्यंगकाव्य (न.)- विडंबनात्मक कविता.
व्यंगचित्र (न.)- १. थोड्या रेषांनी मूळ व्यक्तीचे वैषिष्ट्य दाखवणारे विनोदी चित्र. २. उपहास करणारे/टीका करणारे चित्र.
व्यंगचित्रकार (पु.)
व्यंगार्थ (पु.)- उणेपणा दाखवणारा अर्थ.
व्यंगार्थाने (क्रि.वि.)
व्यंगोक्ती (स्त्री.)- व्यंग उघड करणारे/टोचणारे भाषण,उपरोधिक भाषण.
राजहंसच्या ह्या शब्दकोशात मला तरी कुठेही 'व्यंग्य' असा शब्द आढळलेला नाहीये....मीही आजवर व्यंग आणि त्याची विविध रूपे वाचत/वापरत आलोय...मला तरी कुठे व्यंग्य असा शब्द दिसलेला नाहीये.
हिंदीत कदाचित तसा शब्द वापरतही असतील पण हिंदी आणि मराठी ह्या दोन्ही वेगवेगळ्या भाषा असल्यामुळे असे काही शब्द वेगवेगळ्या पद्धतीने लिहिले/वाचले/वापरले जात असावेत....तस्मात हिंदीप्रमाणे मराठीत बदल करावा/वापरावे ह्या मताला मी पाठिंबा देऊ शकत नाही.

हिंदीप्रमाणे बदल करावा, असं मी कुठे म्हटलंय?

व्यंग या शब्दाचा मराठी अर्थ फार वेगळा आहे. कार्टून हे कुठल्याही व्यंगाचं चित्र नसतं. ते व्यंग्यार्थ सूचित करणारं चित्र असतं. कार्टून कधीही व्यंग उघड करत नाही.

हा मराठी शब्दकोशातला व्यंग्य या शब्दाचा अर्थ - (R)(H)(E) व्यंग्य - वक्रोक्ती, उपरोधक, सूचक भाषण - एखाद्याचा उपहास करण्यासाठी बोलले गेलेले छद्मी वचन "आजकालचे पुढारी एकमेकावर व्यंग्य करण्यातच वेळ घालवतात. (http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php)

याच कोशात व्यंग्यचित्र, व्यंगचित्र, कार्टून - एखाद्या व्यक्ती वा परिस्थितीवर व्यंग्यार्थाने टीका करणारे किंवा त्यांना हास्यास्पद करणारे रेखाचित्र "आर. के लक्ष्मण ह्यांचे व्यंग्यचित्र खूप प्रभावी होते." असंही नोंदवलं आहे.

मराठीत व्यंग्यचित्र या शब्दाचा वापर व्यवस्थित होतो.
या लिंका पाहा -
http://www.majhapaper.com/content/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%B8%E0%A5%81%...

http://article.wn.com/view/WNAT6b22213f633eb5ce85feea0d58da4d8f/

व्यंग याचा अर्थ 'न्यून'.

व्यंग्य हा शब्द माझ्याकडे असलेल्या मराठी->इंग्रजी कोशात आहे. (कोशकार प्रा माधव देशपांडे, सुविचार प्रकाशन मंडळ, १९६८)
व्यंग्य= implied, suggestiive. व्यंग्यार्थ हा शब्द मी यापूर्वी ऐकला/वाचला आहे.

पण याच शब्दकोशात व्यंगचित्र = caricature असाही अर्थ दिला आहे.

caricatureचा विकीच्या म्हणण्यानुसार मूळ अर्थ a loaded portrait तर प्रचलित अर्थ A caricature is a portrait that exaggerates or distorts the essence of a person, animal or object to create an easily identifiable visual likeness. In literature, a caricature is a description of a person using exaggeration of some characteristics and oversimplification of others
पहिल अर्थ 'व्यंग्यचित्र' असा शब्द सुचवतो तर दुसरा 'व्यंगचित्र' असा.

तेव्हा चित्र पाहून ते व्यंगचित्र की व्यंग्यचित्र हे ठरवावे झालं Wink

आजकाल एक प्रकार पाहायला मिळतो

जसे 'हे लिहिले गेले आहे' असे वाक्य सामान्यपणे मी म्हणायचो , वाचायचो वगैरे, त्याजागी आता:

'हे लिहिले गेल्या आहे'

'ते वाचले जाईल' ऐवजी 'ते वाचल्या जाईल'

हे कुठून आणि का आले आहे आणि ते अयोग्य नाही का?

भूषणराव,लिहिल्या जाते,वाचल्या जाते इत्यादि ते वैदर्भी मराठी आहे...तिथे तसे बोलले जाते आणि बहुदा लिहिलेही जात असावे असे बर्‍याचशा नागपुरी/वैदर्भिय/मराठवाडी मित्रांशी बोलतांना मला आढळून आलेले आहे...जरी प्रमाण मराठी भाषेत ते योग्य वाटत नसले तरी तिथले लोक ते सर्रास वापरतात...आणि साधारणपणे आपण जसे बोलतो तसे लिहितो ह्या न्यायाने ते लेखनातही उतरलेले दिसते.
अजूनही काही कानांना खटकणारे शब्द आहेत....आत्ता चटकन आठवत नाहीयेत...पण आठवल्यावर सांगेन.

चिनुक्स, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे व्यंग्य आणि त्याची तशीच रूपे जर शब्दकोशात असतील तर नक्कीच प्रमाण मानावी लागतील ह्याबाबत दूमत नाही....तरीही ते शब्द सर्वसाधारण लोकांच्या(त्यात मीही आलोच) वापरात का आले नसावेत ह्याबद्दल मला असे वाटतंय...व्यंग्य....एकाच शब्दात दोन जोडा़क्षरं आल्यामुळे बहुदा हा शब्द उच्चारायला बोजड वाटत असावा आणि म्हणूनच जनमानसात व्यंग्यऐवजी व्यंग असा शब्द रुजला असावा.....राजहंसच्या 'व्यावहारिक' शब्दार्थकोशात तो त्याच कारणामुळे दिला असावा असे माझे अनुमान आहे.

भरत मयेकर,

>> तेव्हा चित्र पाहून ते व्यंगचित्र की व्यंग्यचित्र हे ठरवावे झालं

अनुमोदन!

व्यंग = वि + अंग = विपरीत असे अंग

व्यंग्य हे व्यंग या शब्दाचे विशेषणीकरण वाटते. (व्यंग्यच्या ऐवजी व्यंगनीय हा शब्दही चालू शकेलसे वाटते. य, तव्य, अनीय हे प्रत्यय संस्कृतप्रमाणे मराठीतही लागू पडतात का ते तपासावे लागेल.)

त्यामुळे
करिकेचर = अर्कचित्र = व्यंग्यचित्र = मुद्दामून दाखवलेल्या व्यंगाचे उपहासात्मक चित्रण
तर,
कार्टून = व्यंगचित्र = सहजगत्या विसंगती टिपणारे मार्मिक चित्र
असे म्हणावेसे वाटते.

प्रत्यक्षात दोघांत ठळक रेघ मारणे अवघड आहे.

आ.न.,
-गा.पै.

आजकाल एक प्रकार पाहायला मिळतो

जसे 'हे लिहिले गेले आहे' असे वाक्य सामान्यपणे मी म्हणायचो , वाचायचो वगैरे, त्याजागी आता:

'हे लिहिले गेल्या आहे'

'ते वाचले जाईल' ऐवजी 'ते वाचल्या जाईल'

हे कुठून आणि का आले आहे आणि ते अयोग्य नाही का?

बेफिकीर,

प्रमोद देव यांनी म्हटल्याप्रमाणे ते वैदर्भिय मराठी आहे. पूर्वी ते त्यांच्या पुरतेच आपापसात सीमित होते. सुमारे दोन वर्षांपूर्वी, एका मराठी संस्थळात खांदेपालट झाली आणि सूत्रे एका वैदर्भिय व्यक्तीकडे गेली. तेव्हापासून ही विशिष्ठ शैली त्या स्थळाच्या अधिकृत घोषणांमधेही वापरली जाऊ लागली. गैर-वैदर्भियांनी सुरुवातीला थट्टा म्हणून तीचा स्वीकार केला. तेच अद्याप सुरू आहे.

त्यात अयोग्य वा अशुद्ध असे काही नाही. एक वेगळी शैली इतकेच.

वाचल्या गेले इ. प्रकार आतापर्यंत कुठे वाचायला/ऐकायला मिळत नव्हते आणि आता सर्रास, पण फक्त जालावर, वाचायला मिळतात याचे हे कारण इंटरेस्टिंग आहे. वैदर्भीय मराठीत 'केल्या गेले' हा शब्दप्रयोगही अशाच कुणा क्रांतिकारकामुळे रुजला असेल की काय असे वाटून गेले.
प्रमाण भाषेत लिहिताना व्याकरणाच्या नियमांत न बसणार्‍या गोष्टी शैली म्हणून खपवायचा प्रकारही पाहायला मिळतो. जसे 'मी आलीय' (एलदुगो मध्ये राधाबाई असा प्रयोग किती वेळा करतात ते मोजायला हवे).

वैदर्भीय मराठीत 'केल्या गेले' या सारख्या आणखी बर्‍याच गोष्टी आहेत. जसे 'काय करून राहिला?' त्याही प्रमाण मराठीत लिहिताना घ्याव्यात.
इथे वैदर्भीय मराठीचा किंवा विदर्भकरांचा अवमान करायचा हेतू नाही. प्रत्येक प्रांतातील भाषेची खासियत असतेच. पण व्याकरणाचे आणि शुद्धलेखनाचे नियम सगळ्यांना सारखेच लागू होतात.

वैदर्भीय मराठीत एक क्रियापद कसे वापरतात ते पाहा...माझे निरीक्षण असे आहे की इथेही काही सदस्य अधूनमधून तसे लिहितात..
उदा.आपण असे म्हणतो..
....तोच काय ते तुला सांगेल.

तर वैदर्भीय मराठीत....सांगेल ऐवजी सांगेन, असे म्हणतात.
म्हणजे असे.... तोच तुला काय ते सांगेन.

वास्तविक सांगेन हे रूप आपण आत्मनैपदी स्वरूपात वापरतो....मी सांगेन.
पण वैदर्भीय ते परस्मैपदी स्वरूपात वापरतात.

अशी उदाहरणे बरीच सापडतील...परस्मैपदी वाक्यातल्या क्रियापदात जिथे आपण ल वापरतो तिथे वैदर्भीय न वापरतात.

विकीमध्ये ही माहिती मिळाली. बरोबर आहे का?

संस्कॄत आणि मराठीतील फरक

"संस्कृतात 'ह्' युक्त सर्व जोडाक्षरात 'ह्' हा प्रथम येतो. जसे : ब्रह्म,ब्राह्मण,चिह्न,ह्रस्व,जिह्वा,प्रह्लाद पण मराठीत या ह चा उच्चार प्रारंभी न करता वर्णंची अदलाबदल म्हणजे वर्णविपर्यय करून पुढील व्यंजनांचा उच्चार अगोदर करतात व त्याचप्रमाणे लिहिण्याचा प्रघात आहे. जसे : ब्रम्ह,ब्राम्हण,चिन्ह,र्‍हस्व,जिव्हा,प्रल्हाद."

यातले शेवटचे चार शब्द मराठीत असेच लिहिलेले दिसले आहेत, पण पहिले दोन शब्द दोन्ही प्रकारे लिहिलेले दिसतात.

माझ्या माहीती प्रमाणे, <<ब्रह्म,ब्राह्मण,चिह्न,ह्रस्व,जिह्वा,प्रह्लाद>> हेच शब्द बरोबर आहेत. पण कालानुरूप लिहिण्यास सोपं जावं म्हणून जो उच्चार आधी येतो तो लिहितात. यात टायपिंगला सोपं जातं हा पण फायदा आहेच. जाणकार लोक हे बदल नक्की केव्हापासून वापरात आहेत ते सांगू शकतील.

"मधे" बरोबर की "मध्ये"?
उदा. परिस्थितीमधे/मध्ये?
माझ्या मते मध्येच बरोबर आहे.
प्लीज कोणीतरी कन्फर्म करा.

लुत्फ की लुफ्त??
माझ्यामते पहिले बरोबर. खरे काय ते कुठे समजेल?
लुत्फ: मोल्सवर्थवर शब्द सापडला नाही. दाते-कर्वे शब्द सापडला परंतु ज्य प्रचलित अर्थाने - 'ची मजा लुटणे' 'चा आस्वाद घेणे' इ. अर्थांनी वापरला जातो तसा अर्थ नाही..
लुफ्त फक्त मसंवर टंकलेला सापडला. शब्दकोषांत नाही.

ब्रम्ह,ब्राम्हण,<<<
हे दोन्ही चूक. ब्रह्म आणि ब्राह्मण बरोबर.

चिन्ह,र्‍हस्व,जिव्हा,प्रल्हाद <<<
चिह्न, ह्रस्व, जिह्वा, प्रह्लाद असे उच्चार करून पाह्यले. ते कधी ऐकले नाहीयेत. सवयीचे नसल्याने बरोबर वाटत नाहीयेत. तज्ञांनी प्रकाश टाकावा.

Pages