पनीर

मिर्चीवाले पनीर

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पनीर : २०० ग्रॅम
हिरव्या मिरच्या पेस्ट करून : ८-१० (कमी घेतल्या तरी चालतील)
लाल सुक्या मिरच्या भिजवून पेस्ट करून : २-३
कांदे : २ बारीक चिरून
टोमॅटो : २ बारीक चिरून
आले-लसूण पेस्ट : १ ते २ टीस्पून
गरम मसाला : १ टीस्पून
जिरे : १ टीस्पून
तेल : २ टेबल स्पून
हळद : अर्धा टीस्पून
मीठ : चवीप्रमाणे
कोथिंबीर, लिंबाच्या फोडी वरून सजवायला.

क्रमवार पाककृती: 

पनीरचा झणझणीत काहीतरी प्रकार करावा असे बर्‍याच दिवसांपासून डोक्यात होते. काल रात्री माझ्या रेसिपीज उतरवून घेतलेल्या वहीत सात-आठ महिन्यांपूर्वी आंतरजालावरून उतरवून घेतलेली एक तिखट झणझणीत पनीर रेसिपी सापडली. आज तीच करून पाहिली. मस्त झाली होती. अगदी नाकाडोळ्यांतून पाणी काढण्याइतपत! फिदीफिदी

कृती :

तेलावर जिरे तडतडवा. त्यात आले-लसूण पेस्ट, हिरव्या व सुक्या मिरच्यांची पेस्ट घालून परता. नंतर कांदा घालून तो गुलाबीसर होईपर्यंत परतत रहा. टोमॅटो घालून पुन्हा परता. तेल सुटू लागेल. पनीरचे तुकडे, हळद, गरम मसाला, मीठ घालून परता. आवश्यक वाटले तर थोडे पाणी घाला. मंद आंचेवर आठ-दहा मिनिटे शिजू द्या. वाढताना वरून कोथिंबीर पेरा, लिंबाच्या चकत्या/ फोडी सोबत ठेवा. ही भाजी अंगासरशी होते. पोळी/फुलका/पराठा/पुलावाबरोबर छान तोंडीलावणे.

वाढणी/प्रमाण: 
तीन ते चारजणांसाठी
अधिक टिपा: 

- मिरच्यांचे प्रमाण कमी करता येईल. किंवा हिरव्या मिरच्यांची पेस्ट न करता त्या उभा छेद देऊन वापरता येतील.
- फार तिखट वाटले तर थोडे पाणी/ दही घालून चव अ‍ॅडजस्ट करता येते.
- मूळ कृतीत व्हेरिएशन करायचे तर ह्या भाजीत सिमला मिरचीही वापरता येईल.
- सोबत पाण्याचा ग्लास ठेवायला विसरू नका. डोळा मारा

माहितीचा स्रोत: 
आंतरजाल

पंच फोडण वापरून पनीर-बटाटा-टोमॅटो भाजी

लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

२ मध्यम आकाराचे बटाटे उकडून, साली काढून व फोडी करून
२ कांदे बारीक चिरून
२ टोमॅटो बारीक फोडी करून
१०० ग्रॅम पनीर बारीक तुकडे करून
३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून

मसाला

पंच फोडण : मोहरी, जिरे, मेथ्या (मेथी दाणे), बडिशेप, कलौंजी ह्यांचे मिश्रण : १ टीस्पून
गरम मसाला : अर्धा ते एक टी स्पून

अन्य घटक

१ तमालपत्र
गरज वाटल्यास लाल तिखट
चिमूटभर हिंग
पाव ते अर्धा टीस्पून हळद
मीठ
२-३ टेबलस्पून दही

फोडणीसाठी तेल/ तूप

क्रमवार पाककृती: 

मध्यंतरी इथे मायबोलीवर पंच फोडण वापरून बटाटा-टोमॅटोची भाजी (बेडवी पुरी साग) करण्याची कृती वाचल्यावर मी लगेच तशी भाजी घरी करून पाहिली. पंच फोडणचा स्वाद बेहद्द आवडला! मग हाच मसाला वापरून इतर कोणत्या भाज्या करता येतात याचा आंतरजालावर शोध घेतला असता मला एक कृती मिळाली. त्यात माझ्या सोयीनुसार फेरफार करून भाजी केली. अप्रतिम चव आली होती! शिवाय झटपट होणारी व सोप्पी कृती असल्याने हा आचारी एकदम खुश! स्मित

तर ती कृती अशी :

पंच फोडण नुसतेच कोरडे भाजून घ्यावे. कलौंजी व मोहरी - जिरे तडतडू लागले की मस्त खमंग दरवळ सुटेल. गॅस बंद करावा. एका पॅनमध्ये तेल/ तूप घेऊन ते गरम झाल्यावर त्यात हे भाजलेले पंचफोडण घालावे. आता ते तडतडणार नाही हे गृहित धरून त्यात तमालपत्र, हिंग, हळद, मिरच्या घालून व्यवस्थित परतावे. ह्या मिश्रणात कांदा घालून तो गुलाबीसर परतल्यावर उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घालून परताव्यात. त्यानंतर पनीरचे तुकडे घालून परतावेत. टोमॅटो फोडी घालून परतावे. टोमॅटो शिजत आला की दोन वाट्या (किमान) पाणी घालून जरा बटाटा व्यवस्थित मऊ होऊ द्यावा. बटाटा ठेचला गेला पाहिजे. अशा पध्दतीने काही बटाटा फोडी ठेचाव्यात. चवीप्रमाणे गरम मसाला, लाल तिखट, मीठ घालावे. सर्वात शेवटी दोन ते तीन टेबलस्पून फेटलेले दही घालावे व जरा उकळी आली की लगेच गॅस बंद करावा.

ह्या भाजीत मी पाणी बेताचेच घातले आहे. ज्यांना भाजीला थोडा जास्त रस हवा असेल त्यांनी जरा जास्त पाणी घालावे.

वाढणी/प्रमाण: 
चार माणसांसाठी
अधिक टिपा: 

ह्या भाजीचा मसाला जेवढा मुरतो तेवढा तिचा स्वाद अधिक खुलतो. ताजी गरम भाजी स्वादिष्ट लागतेच, पण सकाळी केलेली भाजी सायंकाळी अधिक लज्जतदार लागते. (तेवढ्याचसाठी मी सकाळी जरा जास्तच भाजी केली!!डोळा मारा) फक्त भाजीत दही घातले असल्यामुळे तिला सारखे सारखे गरम करु नये. फुलका/ भाकरी/ पोळी/ ब्रेड/ भाताचे प्रकार / नान/ पुरी/ पराठा यांबरोबर खायला मस्त! स्मित

माहितीचा स्रोत: 
आंतरजाल व स्वतःचे प्रयोग

पनीर जालफ्रेझी

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पनीर १२ oz
मोठे कांदे २
टोमॅटो प्युरी ६ oz
हिरवी सिमला मिरची २
लाल सिमला मिरची १
बटर ३-४ चमचे. ( हेल्थ कॉन्शस नसाल तर मनसोक्त!)
४-५ लवंगा
६-७ मिर्‍याचे दाणे
दालचिनी पूड
वेलदोडा पुड चिमुटभर
थोडेसे bay leaves ( =तमालपत्र का?)
कसुरी मेथी
थोडा ठेचलेला लसूण
तिखट, मीठ चवीप्रमाणे.
मी थोडा तंदुर मसाला सुद्धा घातला चवीपुरता.
लाल खाण्याचा रंग हवा असल्यास. (प्युरीमुळे रंग येतोच, त्यामुळे नसला तरी चालेल.)

क्रमवार पाककृती: 

सर्वात प्रथम कांदा बारिक चिरून बटरमध्ये परतून घ्यावा.
व नंतर मिक्सर मध्ये वाटून त्याची पेस्ट करावी.
एकीकडे दुसरा कांदा व लाल-हिरव्या सिमला मिरच्या उभट चिरून घ्याव्यात.
पनीर मायक्रोवेव्हमधून थोडे शिजवून घ्यावेत व त्याचे आवडीप्रमाणे तुकडे करावेत. पनीर तळून सुद्धा घालता येतील पण नुसते असेच पांढरेशुभ्र सुद्धा छान दिसतात/लागतात!
खलबत्त्यात लवंग, मिरे, बे लिव्हज, कसुरी मेथी नीट पूड करून घ्यावेत.

बटर तापवून त्यात चिरलेला कांदा, लाल-हिरवी सिमला मिरची परतून-शिजवून घ्यावी.
ठेचलेला लसुण, कांदा व टोमॅटो प्युरी घालून नीट परतून घ्यावे.
पनीरचे तुकडे मिसळावेत.
त्यात लवंग-मिरे-बे लिव्हज-कसुरी मेथी पुड तसेच दालचिनी,वेलदोडा पुड घालावी
तिखट, मीठ व (असल्यास) थोडा तंदुर मसाला घालावा.
थोडसं एकत्र हलवून किती कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे पाणी घालून शिजवून घ्यावे.

एका डिशमध्ये पनीर जालफ्रेझी व पराठा/फुलका घेऊन आधी त्याचा फोटो काढावा, मग मनसोक्त हादडावे! स्मित


वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी पुरावी.
माहितीचा स्रोत: 
संजीव कपुर, तरला दलाल, व इंटरनेटवरील ब्लॉग्स वाचुन बनलेली माझी रेसिपी. :)

पालक पनीर रोल

लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धी जुडी पालक, १०० ग्रॅम पनीर, एक मध्यम आकाराचा ब्रेड [१०-१२ स्लाईस], ५ हिरव्या मिरच्या, ५ लसुण पाकळ्या, मीठ चवीनुसार, तळायला तेल.

क्रमवार पाककृती: 

ब्रेड स्लाईस च्या कडा सुरीने काढुन टाकाव्या,
पनीर चे साधारण दिड ईंच x अर्धा ईंच असे तुकडे करुन घ्यावे,
धुतलेल्या पालकाची पाने, हिरमी मीरची, लसुण मिक्सर मधे बारीक करुन घ्यावे,
त्यात चवी प्रमाणे मीठ आणि अर्धा कप पाणी घालावे,
हिरव्या रंगाच्या या मिश्रणात कडा काढलेल्या स्लाईस एक - एक करुन भिजवाव्या,
हाताने मळुन त्या मिश्रणाचा गोळा तयार करा [साधारण थालपिठाच्या पिठा सारखा गोळा तयार होतो],

छोटा गोळा घेउन तळव्यावर गोल चकती करावी, पुरीच्या आकाराची, त्यावर पनिर चा एक तुकडा ठेउन,
तो तुकडा पुर्ण झाकला जाईल अशाप्रकारे गुंडाळावी.

तापलेल्या तेलात तळावे, सॉस बरोबर खाण्यास द्यावे.

DSC02675.JPG

वाढणी/प्रमाण: 
प्रत्येकी दोन ... :)
माहितीचा स्रोत: 
बहुदा ई टीव्ही मराठी किंवा झि टीव्ही मराठी :)