रवा अर्धा की.
मैदा ५० ग्रॅम
तूप ५० ग्रॅम
मार्गारीन ७५ ग्रॅम
साखर १५० ग्रॅम
दुध २०-३० मिली
बेकिंग पावडर दिड टिस्पून
मिठ चिमुटभर
वेलची पावडर, केशर व सुका मेवा आवडीनुसार.
मार्गारीन न वापरता फक्त तूप वापरणार असाल तर २०० ते २५० ग्रॅम घ्यावे.
* रवा व मार्गारीन एकत्र करून घ्यावे. रवा दोन्ही हाताने मार्गारीन सगळीकडे लागेल असा चोळून घ्यावा.
* बेकिंग पावडर, वेलची पावडर, केशर, सुक्या मेव्याचे तुकडे, मिठ हे सगळे रव्यात व्यवस्थित कालवून घ्यावे.
* एका दुसर्या भांड्यात तूप व साखर चांगली फेटून घ्यावी. त्यात वरीलप्रमाणे एकत्र केलेले मिश्रण घालावे.
* सगळे मिश्रण एकत्र केल्यावर अगदी थोडे थोडे गरज वाटेल तसे दुध घालून मिश्रण मळून घ्यावे.
* मिश्रण मळतानाच हाताने गोळा होतोय का ते पहावे. गोळा होत असेन तर दुध घालणे थांबावे.
* अर्धा ते एक तास हे मिश्रण भिजू द्यावे.
* बेकींग ट्रे ला तुपाचा हात लावून घ्यावा व त्यावर मोठ्या सुपारीच्या आकाराचे गोळे जरा चपटे करून अंतरावर ठेवावेत.
* १८० डी. से. तापमानाला २०-२५ मिनिटे भाजावेत.
* ट्रे बाहेर काढून जरा थंड होवू द्यावे.
* लगेच खायला सुरवात करावी
किंवा डब्यात भरून ठेवावेत.



टेस्टर

ईद साठी बेकरीत रोट बनायला सुरवात झाली की काकू १-२ पायल्या (५-१० की) गव्हाचा रवा काढून घ्यायची. लागणारे साहित्य घेवून बेकरीत जावून थांबायला लागायचे. माझा नंबर येई पर्यंत मी तिथून हलत नसे. खरतर दिलेल्या सामानातून त्यांनी काही काढून घेऊ नये म्हणून मी रखवालदारी करायचे.
बर्याच वर्षांपासून रोट बनवणे पण बंद झाले. सणाच्या वेळी अजुनही ओळखीतल्यांकडून रोट येतात पण तेव्हा तिथे नसल्याने रोट खायला जमाना होऊन गेला.
अर्धा रवा, अर्धा मैदा घेऊन प्रयोग करून झाले पण ते काही यशस्वी झाले नाही. मैदा कमी करू का म्हणून दिनेशदादाला विचारून घेतले. मग विचार केला की काकूलाच विचारू की रोट करायला आपण काय आणि किती सामान द्यायचो ते.
बेकरीत द्यायला लागते ते प्रमाण १ की रवा, पाव की मैदा, अर्धा की वनस्पती तूप, अर्धा की साखर, आपल्या आवडीचा सुकामेवा.
ह्या प्रमाणात मी घरचे तूप वापरून एक वाटी रव्याचे रोट करून पाहिले. झाले छान पण जरा जास्तच कडक झाले.
मग प्रमाण बदलून वरच्याप्रमाणे हे रोट काल करून पाहिले.
रोट तसेही खायला छानच लागतात पण जरा कोमट दुधात भिजवून खाल्ले तर एकदम भारी लागतात.

