१.मोकळा शिजवून घेतलेला भात,
२.भरपूर मोहरी, हिंग आणि लाल मिरच्या घालून कढवलेल्या फोडणीचं तेल,
३.प्रत्येकी १ माप चणाडाळ, उडीदडाळ, मटकी (अख्खी), मूगडाळ आणि तूरडाळ.
१. प्रत्येकी १ माप चणाडाळ, उडीदडाळ, मटकी (अख्खी), आणि मूगडाळ रात्रभर पाण्यात भिजवून दुसर्या दिवशी सकाळी उपसून ठेवावी.
२. तासभर निथळली की प्रत्येक डाळ आणि मटकी 'वेगवेगळी' शक्य तितक्या कमी पाण्यात जमेल तितकी बारीक वाटावी. (वेगवेगळी वाटणं महत्त्वाचं.)
३. सगळी वाटणं एकत्र करून यात एक माप 'न भिजवलेली' तूरडाळ फक्त धुवून मिसळावी.
४. यात आता हिरव्या मिरच्या, आलं लसूण यांचं वाटण, धणेजिरे पावडर, हळद, तिखट, मीठ घालावं.
५. भरपूर कोथिंबीर आणि कढीलिंबाची पानं चिरून घालावी.
६. आता कडकडीत गरम तेलात भरपूर हिंग घालून, अगदी गॅसवर उतरवल्या उतरवल्या पिठात घालावं.
७. सगळे मसाले, मोहन, कोथिंबीर, आलं-लसणाचे वाटण व्यवस्थित एकत्र करून घ्यावं.
हे झालं वड्यांचं पीठ तयार!
-------------------------------------
८. कढईत तेल धूर येईपर्यंत गरम करून या मिश्रणाचे छोटे, चपटे, मध्यभागी मेदुवड्यासारखं भोक पाडलेले
वडे तळायला सोडावे.
९. एका घाण्याचे वडे तेलात सोडल्यावर आच मध्यम करून खरपूस तळावे.
१०. पहिल्या घाण्याच्या वड्याची चव घेऊन; तिखट, मीठ कमी-जास्त होतंय का ते बघून घ्यावं. (जास्त झालं असल्यास तांदळाचं पीठ घालता येतं.)
----------------------------------------------------------
वडा-भात तयार करायला:-
११. ताटात भात वाढून घेऊन त्यात वडे कुस्करून घालावे. मीठ फक्त वड्यांपुरतं असल्यामुळे भातात जरासं मीठ वरून घालावं लागतं.
१२. कडकडीत तेलाची फोडणी वरून ओतावी. (हवं तर जेवणानंतर / आधी ५ मैल पळून यावं, पण तेलात कंजूषी करू नये.)
१३. वडा-भात कालवून पोटभर हाणावा. निवांत झोपायला पुढले २-३ तरी मोकळे असावे. हा भात चढतो!
१४. सगळ्यात महत्त्वाचं! भात अगदी वाटीभर घ्यावा आणि त्यात फारतर १-२ वडे कुस्करावे. लागल्यास आणखी वडे घालता येतात. पण आधीच भात खूप घेतला आणि त्यात भक्कम वडे घातले तर अनावर ढीग तयार होतो.
१५. जोडीला गरम कढी किंवा मठ्ठा मस्त!!
--------------------------------------------------------
वडाभात:

फक्त वडे आणि फोडणी:

प्रस्तुत पाकृ मृण्मयीने जशी मला लिहून पाठवली तशीच इथे पेस्ट केली आहे. मी फक्त रेसिपीप्रमाणे प्रयोग करून फोटो पोस्टले आहेत इतकच! पारंपारीक आणि सुप्रसिद्ध ’वडाभात’ पाकृ शेअर केल्याबद्दल मृण्मयीचे मन:पूर्वक आभार!
[मी पहिल्यांदाच वडे, तळण वगैरे उपद्व्याप स्वहस्ते केले आहेत. वड्यांचे रंग-रूप, आकार ... कृपया सांभाळून घेणे!
चवीला अफलातून झाला होता वडाभात!]
धन्यवाद!



म्हणून मी घरी होता तोच किंचित पांढुरका राजमा वापरला. तुम्ही कोणी प्रयोग केला तर नेहमीचा टपोरा काळा राजमा (काला मोती? 