स्वामीजींची कृपा....

Submitted by निरंजन on 4 April, 2012 - 10:19

सतत अपमान सहन करण आणि तो सुद्धा खाली मान घालुन यासारख दूसर दुःख नाही. ज्या माणसाला कर्ज काढाव लागत तो त्या कर्जापेक्षा उपकाराच्या ओझ्याखाली सतत दबलेला असतो. मग तो माणूस त्याची बायको व मुलं सर्व या माणसाचे गुलाम होतात. मुलांचे तर हाल खुप वाईट असतात. त्यांना बिचार्‍याना हेच समजत नसत की आपला सतत अपमान व राग का होतोय ? पण तो होत असतो. त्यांच्या बालमनावर त्यामुळे नेमका कॊणता परिणाम होईल हे सांगता येत नाही. काही मुलं गुन्हेगार होतात तर काही गोगलगाय होऊन आला दिवस ढकलत असतात. त्यांना स्वतःच मनच उरलेल नसत. सतत कोणाचे तरी पाय धरायचे. होईल तो अपमान सहन करायचा हेच त्यांनी आपल्या मनाला वारंवार बजावलेल असत. एकदा मन मेल की मग कोणीही त्या माणसाला काहीही बोलाव, कोणतही काम सांगाव, तो ते करत असतो. मुकाट्यानी. माझी अवस्था काहीशी अशीच झालेली होती. माझ्या स्वतःच्या मनाचा कोणी विचारच केलेला नव्हता. लहानपणापासून कधी मी कोणाला काहीच मागितलेल नव्हत.

कर्जाचा बोझा वाढत गेला आणि एक दिवस बाबा रक्ताची उलटी होऊन खाली पडले. धावाधाव झाली. पण पडलेले बाबा उठलेच नाहीत. आमच्यावर येणार्‍या संकटांमधे एका फ़ार मोठ्या संकटाची भर पडली. खचलेल आमच कुटुंब पार खचुन गेल. कर्जदार समजुन चुकले की आपल कर्ज बुडाल. मी व माझ्यापेक्षा लहान सगुणा दोघांना पोटाशी घेऊन आई बसली होती. समोर बाबांच प्रेत पडलेल होत आणि आई लोकांचे पाय धरत होती. कळवळुन सांगत होती की मी व माझी मुलं पै न पै फ़ेडु तरी त्यावर कोणाचाच विश्वास नव्हता. बाबांच्या प्रेताकडे बघुन लोकं शिव्या देत होते. आणि आम्ही डोळ्यात अश्रु आणुन ते ऎकत होतो.

बाबा गेल्यानंतर एक दिवस आईला एका नातलगाच पत्र आल. त्यांच नाव आबासाहेब नामजोशी. पत्रात त्यांनी लिहिल होत की "तुझ्या दोन मुलांपैकी एकाची जबाबदारी मी घेईन. त्याला माझ्याकडे पाठव. यापेक्षाजास्त मी काही करु शकत नाही" आईला काय कराव समजत नव्हत. आबासाहेबांबद्दल ते खुप श्रिमंत आहेत, यापलिकडे तीला काही माहिती नव्हती. नामजोशांनी वडलांना कधी तरी कर्ज दिल होत. कर्जदारानी लिहाव अस ते पत्रच नव्हत. त्या पत्रात त्या कर्जाचा नामोल्लेखही नव्हता. आईला काय कराव हे समजत नव्हत. एका मुलाला कोणाकडेतरी पाठवायच हा निर्णय सोपा नव्हता.

ती आम्हाला दोघांना घेऊन जवळच्या गावाला गेली. त्या गावात आईचे गुरु होते, अंतरनाथ. स्वामी अंतरनाथांचाच आईला एकमेव आधार होता. स्वामी अंतरनाथांकडे पाहिल्यावर खुप बर वाटल. त्यांना आम्ही तिघांनी नमस्कार केला. त्यांनी आम्हा दोन्ही मुलांना जवळ घेतल. तोंडावरुन हात फ़िरवला. आई-बाबांशिवाय मला कोणी प्रेमानी जवळ घेतल नव्हत. बाबांची खुप आठवण आली. गळा अचानक दाटुन आला. डोळ्यातुन पाणी आल. स्वामी म्हणाले "रडु नकोस. आता तुझ्या घराला तुच परत वर आणणार आहेस." आईनी आबाकाकांच पत्र त्यांना दाखवल. पत्र हातात पडताच स्वामी एकदम गंभीर झाले. त्यांनी डोळे बंद केले आणि थोडावेळ शांत बसले. डोळे उघडुन माझ्याकडे त्यांनी पाहिल. माझ्या सर्वांगातुन एक सुखद लहर गेली. आपल्यात कसलातरी संचार होतोय अस वाटायला लागल. खुप खुप बर वाटल. त्यांचे डोळे प्रेमळ व शांत होते.

स्वामी आईला म्हणाले. "दुर्गा तुला वाटतय तेव्हढ हे पत्र साध नाही. तू हे पत्र इथे आणलयच हे खुप चांगल झाल. आता या प्रकरणाचा आपल्याला शेवट करता येईल. तुझ्या या मोठ्या मुलाला हे सहज जमेल."

आई स्वामींच्या पाया पडली म्हणाली "स्वामी तुमचाच मला आधार आहे. तुमच्या मी शब्दा बाहेर नाही"

स्वामी म्हणाले "दुर्गे, मी कोणतीच जबरदस्ती करणार नाही. जरी हा तुझा मुलगा असला, तरी हा महत्वाचा निर्णय त्यानीच घ्यायचा आहे. तो लहान आहे पण विचारी दिसतोय"

माझ्याकडे पाहुन म्हणाले "नाव काय तुझ?"
"सोमेश, सगळे मला सोम्या म्हणतात"
"पण मी तुला सोमेशच म्हणेन. तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर मी ते सांगेन ते करशील ?"

मला का कोणाला माहिती पण स्वामींच्यावर खुप विश्वास वाटला. कदाचित आजतागायत माझ्याशी कोणीच नीट बोललेल नसेल, त्यामुळे वाटल असेल.

मी म्हणालो "माझा विश्वास आहे"

"हे बघ, तुला जे बोलावतायत ते कशाला बोलावतायत याची मला अद्याप नीटशी कल्पना आलेली नाही. पण ते तुला काही खुप चांगल्या कामासाठी व तुझ भल करायसाठी बोलावतयत अस वाटत नाही."

आईच्या तोंडुन लहानसा चित्कार आला. तोंडाला पदर लावुन ती रडायला लागली. आता हे एक नवच संकट तीला समोर दिसत होत. आई म्हणाली "स्वामी, अस असेल तर नाही याला मी पाठवणार"

"दुर्गे हे इतक सोप नाही. ते मुलाला ओढुन नेतील. पण तुम्ही घाबरु नका. मी आहे तुमच्या बरोबर. बघ सोमेश, मी सतत तुझ्या बरोबर असेनच. कदाचित एखाद वाईट काम तुझ्या हातुन करुन घेण्यासाठी ते तुला बोलावत असतील. बिलकुल घाबरायच कारण नाही. तरी सुद्धा अशा ठिकाणी जायच की नाही हे तू ठरवायच आहेस. "

स्वामींनी डोळे मिटले. आईचा चेहरा पांढरा फ़टक पडलेला होता. तीचा कृष चेहरा बघवत नव्हता. तीच्या मांडीवर बसलेली बारीक हातापायाची व मोठ्या पोटाची सगुणा दोघी माझ्याकडे बघत होत्या. या दोघींवर माझा बोझा मला टाकायचा नव्हता. स्वामींवर माझा विश्वास बसलेला होता. मनोमन खत्री पटत होती की स्वामी मला कोणत्याही संकटातुन तारुन नेतील.

मी स्वामींकडे पाहिल. एका दैवी तेजानी त्यांचा चेहरा उजळलेला होता. मी म्हणालो "स्वामी मी तयार आहे. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे"

स्वामींनी डोळे उघडले. आणि माझ्याकडे बघितल. त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवताच मी कोणत्यातरी प्रकाशाकडे खेचला जातोय अस वाटत होत. आत आत ओढला जात होतो. हे आत ओढल जाण हव हवस वाटत होत. अनेक घंटा एकावेळी वाजाव्यात असा आवाज झाला. मधुनच मला बासरीचे मधुर स्वर ऎकायला येत होते. स्वामींच्या डोळ्यात लागलेली माझी नजर दूर होत नव्हती व ती मला बाजुला करावीशी वाटत नव्हती. अस वाटत होत की मी जमिनीपासून वर उचलला जातोय. शरिर हलक होत होत. माझा श्वास खुप संथ झालेला जाणवत होता. अचानक घंटानाद थांबला. माझा श्वास चालु होता की बंद होता हे मलाच समजत नव्हत. श्वासावरच लक्ष दूर झाल. माझ्या शरिराच अस्तित्व मला जाणवत नव्हत. जणू माझ शरिर गळुन पडल होत. मी माझ्याच शरिराकडे बघतोय असा भास झाला. मन व शरिर वेगळे वेगळे झाले होते. हळुच मनात ॐ काराचा उच्चार झाला. हा अनुभव काही वेगळाच होता.

त्याच वेळी स्वामींचे शब्द कानावर आले. हे शब्द त्यांनी उच्चारले होते का, ते माझ्या कानानी ऎकले की मनातच त्याचे तरंग उठले हे सांगण खुप कठिण आहे. स्वामी म्हणाले "आता मी तुला मंत्र सांगतोय तो मंत्र लक्षात ठेव" त्यांनी मंत्र सांगितला. सोपा साधा मंत्र. माझ्याकडुन तो तीन वेळा म्हणून घेतला. मला डोळे बंद करुन त्याचा जप करायला सांगितला. हळू हळू मला शरिराच अस्तित्व जाणवायला लागल. जणू मी परत माझ्या शरिरात येत होतो.

स्वामींनी आईकडे पाहिल म्हणाले "आत जा. साखर आहे व दूध आहे. त्याचा नैवेद्य दाखव. आपण सगळेच दूध घेऊ"

आई व सगुणा आत गेले. स्वामी माझ्याशी हलक्या आवाजात बोलायला लागले. "आत्ता तुला दिलेला मंत्र दूसर्‍या कोणालाही सांगायचा नाही आणि सतत मनात तोच म्हणत राहायचा. तो मंत्र तू म्हणतोयस तो पर्यंत जगातली कोणतीच शक्ती तुला त्रास देऊ शकणार नाही. घाबरायच नाहीस. कोणतही संकट आल तरी मी तुझ्याबरोबर आहेच."

मी मान डोलावली. माझ शरीर अद्याप एका अनामिक आनंदानी थरथरत होत. मी स्वामींना विचारल मला आलेला हा अनुभव काय होता ? स्वामी फ़क्त हसले. म्हणाले "हा अनुभव कोणालाच सांगु नकोस. तसच यापुढे तुला येणारे कोणतेच अनुभव दूसर्‍याला सांगु नकोस. कारण हे अनुभव फ़क्त तुलाच येतील. दूसर्‍याला ते खरे वाटणार नाहीत. आणि जर तू दूसर्‍याला सांगितलेस तर ते अनुभव परत येणार नाहीत." मी मान डोलावली.

आई दूध घेऊन आली. स्वामीनी त्यांच्या देवापुढे ते ठेवायला सांगितल. त्या दूधाचा नैवेद्य दाखवला. आईला व सगुणाला दूध प्यायला दिल. सगुणाला तीच्या आठवणीत इतक दूध पहिल्यांदाच मिळाल. स्वामींनी मला जवळ बोलावल. स्वतःच्या हातानी त्यांनी मला दूध पाजल. इतक कोणीच माझ्यावर प्रेम केलेल नव्हत. मला रडु येत होत. आमच दूध पिऊन झाल्यावर स्वामींनी त्यांचा कप तोंडाला लावला व दूध प्यायले.

आईला म्हणाले "दूर्गा, डाळ, तांदूळ, भाजी सर्व आत आहेच. स्वैपाक कर आणि तुम्ही सर्व जेऊन घ्या. मी माझ्या खोलीत जातोय. संध्याकाळी मी बाहेर येईन तेव्हा तुमच्याशी पुढे काय करायच हे बोलु. तुम्ही जेऊन आराम करा. रात्रीचा स्वैपाक कर. आज इथेच रहा. घरा बाहेर जाऊ नका. मी रात्री फ़क्त दूध पिणार आहे. माझा स्वैपक करु नकोस"
अस म्हणून स्वामी त्यांच्या खोलीत आत गेले.

मला व सगुणाला उकिडव बसायची सवय लागलेली होती. कोणता तरी कोपरा वा भिंतीला चिकटुन आम्ही बसत होतो. तासन तास बसायची सवय लागलेली होती. तसेच आम्ही बसलो होतो. दिवस तसा वेगळाच गेला. मी एका आनंदात तरंगत होतो. कमीच बोलायची सवय होती मला. आता दिलेला जप करायची मनाला सवय लागली. मधेच जप थांबायचा. परत सुरु व्हायचा. सगुणा व आई मधुन मधुन बोलत होत्या. अनेक दिवसांनी पोटभर खायला मिळालेल होत. डुलक्या येत होत्या. आई व सगुणा फ़रशीवरच आडव्या झाल्या आणि झोपुन गेल्या. मी तसाच बसलो होतो. अचानक वातावरणातला बदल जाणवायला लागला. खुप चांगला सुगंध यायला लागला. जो बदल होतोय तो चांगला होता हे नक्की. अचानक माझ्या कानात स्वामी बोलल्यासारखे वाटले "सोमेश, उठ आत खोलीत ये" मला कळॆ ना स्वामी खरच बोलावतायत, का हा मनाला झालेला भास आहे ? परत स्वामींचे तेच मृदु शब्द आले. "सोमेश, उठ आत खोलीत ये" मी उठलो आणि खोलीच दार अलगद उघडुन आत गेलो. स्वामींचा परत आवाज आला "दार आतुन बंद कर. आणि तसाच पुढे ये" मी दाराला आतुन कडी लावली व आत गेलो. एका आसनावर स्वामी ध्यानस्थ बसलेले होते. त्यांच्या आजु बाजुला निळा प्रकाश दिसत होता. मी त्यांच्या समोर गेलो. त्यांनी दूसर्‍या आसनाकडे बोट केल म्हणाले "बस"

मी त्या आसनावर बसलो. बसुन काय करायच हे कुठे माहिती होत ? मी मनात तोच जप करत बसलो होतो. अचानक स्वामींच्या नीळ्या प्रकाशातला काही प्रकाश माझ्या तोंडावर पडला. मी त्या प्रकाशात ओढला जायला लागलो. त्यानंतर काहीच आठवत नाही. स्वामींनी मला आठ दिवस ठेऊन घेतल. रोज असाच अनुभव यायचा. आता माझ व स्वामींच मनानीच बोलण होऊ शकत होत. मी कुठेही असलो तरी स्वामी बरोबर आहेत हे जाणवत होत. ते बरोबर असायचे की माझ्या शरिरात असायचे हे सांगण कठिण आहे.

आई मला म्हणाली "पडेल ते काम कर बाळा. आपल्यावर वेळच तशी आलेली आहे. स्वामीच आपल्याला वाचवतील" मला जवळ घेतल.

मी जेव्हा नामजोश्यांकडे गेलो तेव्हा १४ वर्षाचा होतो. दारातच आबाकाका उभे होते. एक बुटके व जाडगेले गृहस्थ. त्यांच्याकडे पाहिल तरी भिती वाटायची. मी माझ नाव सांगितल. आबाकाका नुसतेच माझ्याकडे बघत होते. त्यांना ऎकायला आल आहे का नाही समजत नव्हत. त्यांच्या नजरेत एक धार होती. मला म्हणाले "कोण आहे तुझ्या बरोबर ?" आवाज चिरत जाणारा होता. असच मागे पळुन जावस वाटत होत. मी काहीच उत्तर दिल नाही. ते जळजळीत नजरेनी एकटक बघत राहिले. मी नजर खाली ठेवली होती. तरी त्यांची नजर माझ्या सर्वांगावरुन फ़िरते याची जाणिव होत होती.

तेच म्हणाले "कोणी का असेना बरोबर, ये आत" मी आत गेलो. त्यांनी माझी शांताकाकुंशी ओळख करुन दिली. शांताकाकुंची नजर मेलेलीच वाटत होती. त्यात कोणतेच भाव नव्हते. त्यांनी माझ्याकडे बघितल. मला म्हणाल्या "कशाला आलास इथे?"

आबाकाकाच मोठ्यानी ओरडले "हे काय बोलण झाल ? त्याचे वडील गेले. घरी कोण सांभाळाणार ? मीच बोलावुन घेतल. माझ्या कामात तो मदत करेल. तुम्ही आत जा" शांताकाकु आत गेल्या.

काम अस काहीच नव्हत. दिवसा नोकर काम करायचे व जायचे. सर्वांच्या कामावर आबाकाकांच बारीक लक्ष असायच. या घरात एकच होत कोणीच बोलायच नाही. एकदाच मला एका मोलकरणीनी नाव विचारल. आणि म्हणाली जमल तर इथुन पळुन जा. अर्थात मला घरा बाहेर जायची परवानगी नव्हतीच. एकदाच मी आकाशात आलेल हेलिकॉप्टर बघायला बाहेर गेलो. आबाकाकांना ते कस समजल माहिती नाही. ते लगेच बाहेर आले व मला आत यायला लावल.

आबाकाका हाक मारत ती इतक ओरडुन की मी दर वेळेस दचकायचो. छातीत धडधड व्हायची. मी मनातच सतत देवाच नाव घ्यायचो. चाळाच लागला होता तो. त्यांच्या खोलीत कोणालाच प्रवेश नव्हता. त्यांची कामही करताना उगाचच भिती वाटायची. काम तरी काय तर शांताकाकु एका ताटात भाताच्या तीन चार मुदी वाढायची. एकावर दही, एकावर वरण तर एकावर आणखिन काही काही. मग हे ताट घेऊन आबाकाकांच्या खोलीबाहेर जायच. काकांना लगेच समजायच मी आलोय. ते ताट घ्यायचे व आत जायचे. खुप वेळानी मला हाक मारायचे. आणि ताट द्यायचे. त्या भातावर बरच काही टाकलेल असायच. त्या ताटाकडे बघण कठिण जायच. इतक भयानक दिसायच ते. मग ते स्वतः माझ्याबरोबर यायचे. आणि खुप लांब आम्ही ते स्मशानात ठेवायचो. पहिल्यांदा खुप भिती वाटली. मनात स्वामींना हाक मारली आणि स्वामी माझ्या बाजुलाच मला दिसले. मला म्हणाले घाबरु नकोस. तो म्हणतोय ते कर. अद्याप वेळ आलेली नाही.

असा मी आबाकाकांबरोबर बर्‍याचवेळा स्मशानात गेलो.

एकदा त्यांनी स्मशानात रात्री नेल. खुप भिती वाटत होती. मिट्ट काळोख होता. मी, आबाकाका , वाहणारा गार वारा व त्यावर झुलणार प्रचंड पिंपळाच झाड. या पलिकडे कोणतच जिवंतपणाच लक्षण दिसत नव्हत. आबाकाकांनी त्यांच्या सामानातुन एक बाटली बाहेर काढली. काही बाहुल्या काढल्या एका ठिकाणी विचित्र रांगोळी काढली. त्या बाटलीत रक्त होत ते त्यांनी जमिनीवर ओतल एक मोठ वर्तुळ तयार केल. नंतर काही अंतरावर झाडाच्या मागे एक राखेच वर्तुळ तयार केल. मला जमिन खणायची हत्यारं दिली व म्हणाले की मी रक्ताच वर्तुळ तयार केलेल आहे, त्याच्या मध्यभागी थोड खण व इथे या राखेच्या वर्तुळात येऊन उभा रहा. तू या वर्तुळात असलास की तुला काही त्रास होणार नाही. नंतर मी जे करीन ते पाहु नकोस पाठ करुन उभा रहा. थोड खणल्यावर मला म्हणाले थांब. मग मला लांब राखेच्या वर्तुळात उभ राहायला सांगितल व स्वतः सावकाश खणायला लागले. मी बघायच नव्हत पण उत्सुकता होतीच मी चोरुन बघत होतोच. स्वामीजींचा आवाज आला "सोमेश, हा प्रकार पाहुन घाबरु नकोस"

आबाकाका आतुन काही काढत होते. मी बघितल ते एका लहान मुलाच प्रेत होत. आबाकाकांनी त्या लहान मुलाच्या कपाळावर, डोळ्यांवर तोंडावर व छातीवर भाताचे गोळे ठेवले. एक मेणबत्ती काढुन त्याच्या समोर लावली, चार बाहुल्या त्याच्या चारही बाजुंना ठेवल्या व काही मंत्र पुटपुटत होते. ते लहान मुल थोड हलल. आबाकाकांनी त्याला उचलल आणि त्याच्या शरिराचे मिळेत त्या ठिकाणी लचके तोडुन खायला लागले. ते मुल जिवंत मुलासारख कळावळुन रडायला लागल. मला हे दृष्य बघवेना. मी दोन्ही हातानी माझ तोंड झाकुन घेतल. थोड्या वेळानी पाहिल तर आबाकाका तो खड्डा बुजवत होते. काम झाल्यावर ते मागे फ़िरले. मी काहीच पाहिल नाही अस दाखवल. त्यांनी मला परत घरी आणल. या दिवसापासून मला आबाकाकांची एक वेगळीच भिती वाटायला लागली.

एकदिवस मला शांताकाकुंनी जवळ घेतल. पण काहीच बोलल्या नाहीत. त्यांच्या डोळ्यात मला प्रेम दिसल. पण थोडाच वेळ, परत ती नजर दगडी झाली. त्यादिवशी पहिल्यांदाच मला आबाकाकांनी त्यांच्या खोलीत बोलावल. मी घाबरतच आत गेलो. आतला प्रकार भयानक होता. एका रेषेत सहा लहान मुलांच्या कवट्या ठेवलेल्या होत्या. त्यापुढे लाल रंगाची रांगोळी काढलेली होती. प्रत्येक कवटीच्या पुढे एक काळी बाहुली ठेवलेली होती. या सर्वाकडे तोंड करुन आबाकाका उघडे बसलेले होते. त्यांच्या कपाळाला रक्ताचा टिळा होता. खोलीत एक दुर्गंधी सुटली होती. कसली ते समजत नव्हत. मला आबाकाकांनी समोर बसायला सांगितल. मला म्हणाले आज आमावास्या आहे. आपल्याला रात्री स्मशानात जायच आहे. मी काही पूजा करीन. आणि भूताला प्रसन्न करीन. त्यानंतर तू तीन वेळा "मम स्वाहाः" अस म्हणायचस. मी मान डोलावली. माझ्याकडुन "मम स्वाहाः" अस आबाकाकांनी वदवुन घेतल. माझे उच्चार नीट आहेत हे पाहुन ते खुष झाले. मला म्हणाले "आता तू जाऊन झोप. मी तुला रात्री उठवीन" मी विचारल "मम स्वाहाः म्हणजे काय ?" आबाकाका मोठ्यानी ओरडले. "तुला काय करायच आहे. मी सांगतो ते कर"

मी येऊन माझ्या खोलीत झोपलो. झोप येतच नव्हती. एक डुलकी लागली. स्वप्नात स्वामीजी आले. म्हणाले "सोमेश, आता वेळ आलेली आहे. आजच आपल्याला काही करायच आहे. स्मशानात मी तुझ्याबरोबर आहेच. आबा सांगेल ते कर. मी तुला वेळोवेळी काही सुचना देईन त्या पाळ बस. घाबरु नकोस. मनात सतत जप कर. त्यामुळे आपण एकमेकांशी सतत संपर्कात राहु. आता थोड्यावेळानी आबा येऊन तुला उठवेल. झोपेच सोंग कर. जाग व्हायला वेळ लाव. अर्थात आबा तस सोडणार नाहीच."

थोड्यावेळात खोलीच दार उघडुन आबाकाका आलेच. त्यांनी हाक मारली. मी जागाच होतो. पण झोपेच सोंग करुन डोक्यावरुन पांघरुण घेऊन पडलो होतो. हळुच पांघरुण बाजुला करुन बघत होतो. आबाकाकांनी परत जोरानी हाक मारली. जवळच्या पिशवीतुन थोडे तांदुळ काढले व माझ्या अंगावर फ़ेकेले. अंगावर गरम पाणी फ़ेकल्यासारख झाल आणि मी धडपडात उठलो. "सोम्या चल" मी झोपेतुन जाग झाल्याच नाटाक केल आणि त्यांच्या मागोमाग निघालो. शांताकाकुंनी भात, भाजा तीळ वगैरे असलेली पिशवी माझ्याजवळ दिली त्या खुप रडलेल्या वाटत होत्या. माझ्या डोक्यावरुन त्यांनी प्रेमानी हात फ़िरवला. त्यांच्या डोळ्यात मला फ़क्त व फ़क्त दुःख दिसल. दोन क्षणच. लगेच त्यांची नजर पूर्ववत झाली. त्या मागे फ़िरुन निघुन गेल्या. मी त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे बघत होतो. या काही तासात त्या खुप म्हातार्‍या झाल्यात अस वाटत होत.

आबाकाका पुढे व मी मागे असे आम्ही स्मशानाकडे निघालो. आमावास्येचा काळॊख होता. आबाकाकांच्या सवयीची वाट होती ते झपाझप चाललेले होते. मी त्यांच्या मागोमाग. वार्‍याबरोबर एक उद्र वास येत होता. राख उडालेली दिसत होती. जस स्मशान जवळ येत होत तसा हा वास जास्तच वाढला. स्मशानाच दृष्य भयानक होत. तीन चिता अर्धवट जळलेल्या होत्या. एका चितेमधे अर्थवट बाईचा जळलेला देह दिसत होता. कोणातरी अनाथ बाईच्या देहाला भडाग्नी देऊन प्रेत संपूर्ण जळॆपर्यंतसुद्धा कोणी थांबलेल नव्हत. आबा त्या चितेपुढे दोन मिनीट उभे राहिले, त्यांनी डोळे मिटले. दोनच मिनीटांनी ते उघडले आणि मोठ्यानी हासले. त्या चितेच्या प्रकाशात त्यांचा चेहरा खुप क्रुर व भेसुर वाटला आणि त्या हासण्यानी अंगावर सरसरुन काटा आला.

आबाकाकांनी मला स्मशानातल्या नळावरुन पाणी आणायला सांगितल. ते पाणी त्यांनी चितेवर फ़ेकुन चिता विझवली. ते अर्धवट जळलेल प्रेत त्यांनी तंगड पकडुन फ़राफ़रा खेचुन बाहेर काढल. त्याच चितेच्या राखेच एक वर्तुळ त्या प्रेताभोवती केल. बाकी दोन चिता अर्धवट जळलेल्या होत्या. त्याही पाणी टाकुन विझवल्या आणि त्यातली राख काढुन या अर्धवट जळलेल्या प्रेताच्या बाजुला टाकुन, स्वतःच्या हातानी त्या राखेच्या चितारुन दोन माणसांच्या आकृत्या बनवल्या. त्यानंतर त्यांनी रक्ताची बाटली काढुन रक्ताच मोठ वर्तुळ केल. या रक्ताच्या वर्तुळावर त्यांचा फ़ार विश्वास होता. ते म्हणत या रक्ताच्या वर्तुळाला छेदुन कोणतीच शक्ति आत नाही येणार.

थोड्या अंतरावर त्यांनी राखेच वर्तुळ केल आणि त्यात मला बसायला सांगितल. मी आत बसलो. त्यांनी चार लहान मुलांच्या कवट्या बाहेर काढल्या आणि या वर्तुळा बाहेर चार दिशांना ठेवल्या. स्वतः जाऊन रक्ताच्या वर्तुळात बसले आणि त्यांची विचित्र पुजा सुरु झाली. सर्व प्रथम माझ्या जवळच्या कवट्या हलायला लागल्या. मी घाबरलो. मनातुन आपोआप जप होत होता. स्वामींचा आवाज आला. "घाबरु नकोस, मी आहे. तू आता झोपेच सोंग घे. तू ’मम स्वाहा’ हे म्हणायच नाहीस. आबा तुला जाग करेल तेव्हा तू ’काय म्हणायच आहे हे विसरुन गेलो’ अस सांग."

स्वामीची धुसर आकृती माझ्या बाजुला मला दिसली, केव्हढा दिलासा मिळाला मला. आबाकाकांची पूजा सुरु होती. थोड्याच वेळात ते अर्धवट जळलेल प्रेत उठुन उभ राहिल. अर्धवट जळलेली ती बाई नाचायला लागली आणि तीच्याबरोबर आणखिन दोन आकृत्या नाचायला लागल्या. त्यांच्या भेसुर आरोळ्यांनी स्मशान दणाणुन गेल. मी झोपेच सोंग घेतल पण डोळ्याच्या कोपर्‍यातुन बघत होतो. आबांनी पूजा पुर्ण करुन हातातले तीळ त्या प्रेतावर व आकृत्यांवर फ़ेकले त्याबरोबर ते नाचायचे थांबले.

आबाकाका म्हणाले "सोमेश बोल ’मम स्वाहा’". त्यांचा स्वर खुप उतावळा होता. बस मी हे तीन वेळा म्हणल्यावर त्यांना जगाच राज्य मिळणार होत जस काही. मी झोपेच सोंग घेतल. आबांनी परत मोठ्यानी ओरडुन हाक मारली "सोम्या, ’मम स्वाहा म्हण’" आणि हातातले तांदुळ माझ्या दिशेनी फ़ेकले. चाबुक मारल्यासारख झाल. मी खाडकन उभा राहिलो. पण स्वामींचे शब्द आठवले आणि मी म्हणालो "आबाकाका काय म्हणायच मी विसरलो. झोप लागली होती" आबा काका खुप चिडले "गाढवा, ’मम स्वाहा’ म्हण"

आबाकाकांनी स्वतःच उतावीळपणे चुकीनी तीन वेळा "मम स्वाहाः" म्हणल होत. ते अर्धवट जळलेल प्रेत व त्याच्या बरोबर त्या दोन आकृत्या आबाकाकांकडे सरकायला लागल्या. आबाकाकांना आपली चुक समजली. मला म्हणाले "मला हे तीघ काहीच करु शकणार नाहित. रक्ताची रेषा त्यांना ओलांडता येणार नाही. त्यांना संपवतो मग तुला बघतोच"

त्यांनी तांदुळ हातात घेतले मंतरले व त्या प्रेतावर फ़ेकले. काहीच परिणाम झाला नाही. ते तिघ संथ गतीनी पुढे येतच राहिले. आबाकाकांनी एक कवटी घेतली तीला जमिनीवर ठेवल व मंत्र म्हणला. कवटी हलायला लागली त्या कवटिला त्या प्रेतावर फ़ेकल. ती कवटी प्रेत व आबाकाका यांच्यामधे तरंगत राहिली. त्या प्रेतानी फ़क्त एक हात जोरात फ़िरवला आणि त्या कवटीला पार लांब फ़ेकुन दिल. आता ते तिघही रक्ताच्या वर्तुळापर्यंत आले होते. तीघेही तीथे येउन थांबले. आबाकाका भेसुर हासले. पण ते हास्य फ़ारच थोड्यावेळ टिकल. ते प्रेत व त्यापाठोपाठ दोन आकृत्या रक्ताच वर्तुळ ओलांडुन आबाकाकांवर झेपावले.

आबाकाकांची भयंकर किंकाळी आसमंतात घुमली. प्रेतानी आबाकाकांचा एक हात उपटुन काढला आणि रक्त प्यायला सुरवात केली. त्या आकृत्यांनी मिळेत त्या ठिकाणी लचके तोडुन खायला सुरवात केली. आबाकाका ओरडत होते. पण त्या तिघांना बिलकुल दया नव्हती. नंतर त्यांनी आबाकाकांना चक्क पिळायला सुरवात केली व पडणार रक्त भराभर पिऊन टाकल. माझी काय स्थिती होणार होती ते मला दिसत होत. शेवटी ते तिघेही आपापल्या चितेमधे निघुन गेले. स्वामीजी माझ्याजवळ प्रकट झाले. मला जवळ घेतल म्हणाले मोठ काम झाल. त्यांनी मंत्र म्हणून माझ्या वर्तुळाच्या जवळाच्या चारही कवट्या निकामी केल्या. म्हणाले आता लवकर घरी चल.

आम्ही धावतच घरी आलो. दारात शांताकाकु आडावी तिडवी पडलेली होती आणि तीच्या छाताडावर बसुन एक आकृती तीचा गळा आवळत होती. स्वामीजी पुढे धावले व मंत्र म्हणून त्या आक्रुतीच्या दिशेनी त्यांनी दोन्ही हात केले त्याबरोबर ती आकृती हवेतच जळुन गेली. शांताकाकु धडपडत उठली. मला बघताच तीला खुप आनंद झाला. मला मिठी मारुन म्हणाली "कसा रे आलास तू". स्वामी म्हणाले आबाच्या खोलीच चल. खुप काम आहे. आम्ही खोलीत गेलो. खोलीत अनेक कवट्या जिवंत झालेल्या होत्या. काही प्रेतात्मे व आकृत्या दिसत होत्या. स्वामीजी डोळे मिटुन उघे राहिले. त्यांनी गंभीर आवाजात काही मंत्र म्हणायला सुरवात केली. हळू हळू एक एक कवटी, आकृती व प्रेतात्मे शांत होत गेले.

रात्रीच त्या सर्व सामानाला आम्ही स्मशानात नेल व अग्नी दिला. आल्यावर स्वामीजींनी शांताकाकुंना बोलतं केल. त्या कोण कुठल्या ?

शांताकाकूंनी सांगितल "मी अनाथ बाई. या माणासानी माझ्याशी लग्न केल व मला इथे आणल. मला बाहेर जायची व बोलायची परवानगी नव्हती. मी फ़क्त यांच्या सांगण्याप्रमाणे वागायच इतकच. अनेक मुलांना यांनी आणल व स्मशानात नेऊन मारलय. हा एकच मुलगा परत आलाय."

स्वामी म्हणाले "मांत्रिकांमधे अनेक पंथ आहेत. आबासाहेब ज्या पंथाचे मांत्रिक होते तो एक फ़ार जुना पंथ आहे. या पंथाचा उल्लेख पार वेदांमधेही मिळतो. त्यात मुलांचा बळी दिला की त्या मुलांच आयुष्य व नवीन चेतना व ताकत मांत्रिकाला मिळते असा समज आहे. आबासाहेब याच कारणासाठी हा विधी करत असावेत. त्यासाठी ते लहान मुलांना शोधुन इथे आणत असावेत. असो. आता हे घर संपूर्णपणे शुद्ध झालेल आहे. यात रहायला काहीच हरकत नाही. तरी शांताबाई तुम्ही निर्णय घ्या"

शांताकाकु म्हणाल्या "हा मुलगा माझ्या जवळ रहाणार असेल तर मी इथे राहिन"
स्वामींनी मला त्या घरात रहायला सांगितल.

आबाकाकांची संपूर्ण प्रॉपर्टी कायद्यानी शांताकाकुंकडे आली. त्यांनी मला दत्तक घेतल व आता आबाकाकांच्या घरात मी, शांताकाकु, आई व सगुणा राहतो. गावात मी एक किराणामालाच दुकान सुरु केलय. मस्त चालत. बाबांनी घेतलेल कर्ज मी केव्हाच सव्याज फ़ेडल.

स्वामीजींची कृपा आहेच. साधना सुरुच आहे.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

खासच Happy

Happy अस काहि नाही हो. पुढच्यावेळी बदलतो. पण खलनायकाचही नांव कस भारदस्त असाव. आबासाहेब, बाबासाहेब ही नांव कशी भारदस्त वाटतात.