सुमंदारमाला

पहाटे पहाटे तुझी याद येते ( सुमंदारमाला)

Submitted by माउ on 25 March, 2019 - 21:23

पहाटे पहाटे तुझी याद येते तुझा भास होतो जसा गारवा
अजूनी तमाच्या रित्या ओंजळीतुन तुझा स्पर्श वाहे जसा चांदवा

तुझ्या पावलांचे ठसे शोधताना कुठे स्वप्न गेले कळेना मला
सुन्या अंतरी फक्त दाटून आहे तुझा श्वास गंधीत श्वासातला..

मला ध्यास होता अनावर नभाचा नभाला मनाचे कुठे आकळे ?
उरे वेदनाही अशी सोनवर्खी जसे ऊन सांजेमधे विरघळे...

किती दूर तू अन किती दूर मी पण कुठे पाळती अंतरे आर्जवे
तुला साद देते निसटत्या क्षणाला मनी लाउनी आसवांचे दिवे..

कधी केशरी होउनी शुभ्र आकाश घालू पहाते धरेला मिठी
असा सोहळा पाहुनी चित्रगंधी तुझी सावली गाठते शेवटी..

शब्दखुणा: 

सांजवेळ ..... (सुमन्दारमाला)

Submitted by स्वामीजी on 5 August, 2014 - 05:45

दिवा लावताना जरी सांजवेळी उजेडास आमन्त्रणे धाडली
मनाने करावे भयाचे इशारे, स्वत:चीच नाचे तिथे सावली ।
भले हात जोडून देवासमोरी मुखे प्रार्थना ती दिव्याची असे
मनी फक्त काहूर दाटून येते, कुशंका इडेची पिडेची वसे ॥१॥

निशा दाटुनी येत चोहीकडूनी, नभी चांदण्यांचा सडा घातला
अजूनी नसे चन्द्र आला समोरी, तमाचा पसारा मनी दाटला ।
किडे किर्किरोनी टिपेच्या स्वराने हवेतील अस्वस्थता वाढते
तुटूनी कशी अंगणातील झाडावरूनी सुकी काटकी वाजते ॥२॥

घरातील कोणी अजूनी न आले म्हणूनी प्रतीक्षा सुरू होतसे
उशीराच येणे जरी नित्यचे हे, मना चिंतण्याला पुरेसे असे ।

Subscribe to RSS - सुमंदारमाला