सांजवेळ ..... (सुमन्दारमाला)

Submitted by स्वामीजी on 5 August, 2014 - 05:45

दिवा लावताना जरी सांजवेळी उजेडास आमन्त्रणे धाडली
मनाने करावे भयाचे इशारे, स्वत:चीच नाचे तिथे सावली ।
भले हात जोडून देवासमोरी मुखे प्रार्थना ती दिव्याची असे
मनी फक्त काहूर दाटून येते, कुशंका इडेची पिडेची वसे ॥१॥

निशा दाटुनी येत चोहीकडूनी, नभी चांदण्यांचा सडा घातला
अजूनी नसे चन्द्र आला समोरी, तमाचा पसारा मनी दाटला ।
किडे किर्किरोनी टिपेच्या स्वराने हवेतील अस्वस्थता वाढते
तुटूनी कशी अंगणातील झाडावरूनी सुकी काटकी वाजते ॥२॥

घरातील कोणी अजूनी न आले म्हणूनी प्रतीक्षा सुरू होतसे
उशीराच येणे जरी नित्यचे हे, मना चिंतण्याला पुरेसे असे ।
कडी वाजता मांजरीच्या उडीने उरी एक ठोका चुके धक्कसा
कशी आज व्याकूळता वाढलेली, मना प्रश्न ऐसा करी थक्कसा ॥३॥

किती शौर्य गाम्भीर्य खंबीरतेचे धडे धीर देण्या मनी आठवा
तरी फोल वाटे, उगा कण्ठ दाटे, उडे पापणीपाखरांचा थवा ।
घरातील कोणी जरा शिंकल्याचा बहाणा मनी काळजी साठवी
अशा घालमेलीमुळे हो नव्याने चुका हातुनी गोंधळा वाढवी ॥४॥

कुणा मोकळी सांगता येत नाही मनाची व्यथा कोंडलेली उरी
वरूनी भला आव आणून मोठा दुज्या दाद देऊन झाली तरी ।
पुन्हा येरझारा, दिव्या तेल थोडे, पुन्हा वात सारूनिया पाजळे
दिव्याचाच आधार हा सांजवेळी कसा ना मिळाला, न आता कळे ॥५॥

- स्वामीजी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

किती छान. एकदम मराठी पाठ्यपुस्तके आठवली. छान कविता असायच्या त्यात अशा. आताशा सगळीकडे गझलीच फार असतात. एकदम सुंदर कविता!