सुवर्णमध्य (पंचचामर)

Submitted by स्वामीजी on 19 August, 2014 - 13:24

बघून स्वप्न ते जगावया मिळो अशी तृषा
असून भागते कुठे, कृतीस ना तशी दिशा ?
प्रयास होत ना म्हणून अर्धस्वप्न भंगते
मलूल खिन्न रात्र ती मनामनात खंतते ॥

भरारतात पंख जे नभास साद घालण्या
तिथे न कुंपणे समर्थ हो तयास रोखण्या ।
उगाच का मनात बोल राहती उदासुनी
कशी न येत उत्तरे मुखामधून ठासुनी ?

असेल स्वावलम्ब भिस्त आपुल्या बळावरी
तया कशास सान्त्वना हवी दुज्या स्मितापरी ?
कसे बनायचे अधीन, सोबती कुणी हवे ?
पुढे चला नि आपसूक साथ धावती थवे !

असेल सौख्यलालसा तशी मिळेल यातना
म्हणून मूढ भावहीन थांबणे उपाय ना ।
मधेच भव्य उच्च लक्ष्य का कसे मिळायचे ?
पलायनास का सुवर्णमध्य नाव द्यायचे ?

- स्वामीजी १९-८-१४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रणाम स्वामीजी

पंचचामर वृत्ताची ओळख तुमच्यामुळेच झाली होती. तुमच्या पोतडीत बरंच काही आहे.
या वृत्तामधे एक आशयपूर्ण काव्य चपखल झाले आहे.

उगाच का मनात बोल राहती उदासुनी >>> हे खूप आवडले.