सखी
सावळ गालावरी उमलली प्राजक्तासम मृदू फुले
नभि नक्षत्रे जशी उगवली मुखावरी ते हास्य खुले
सावळ तरिही सतेज कांती जाईची जणु वेल झुले
पदन्यास तो दिसे मनोरम रसिकाला करतोच खुळे
रेखिव भिवई किंचित उडवुन नजरेला ती नजर मिळे
हृदयी वाजे सतार झिणझिण नजर फिरूनी तेथ खिळे
मनी उमटती शब्द कितितरी ओठावरती अडखळले
विलग अधर होताच तरी ते नि:श्वासी संपुन गेले
श्रावण सरी
श्रावण सरी गमतीच्या...... गमतीच्या
ऊन्हातंच नहायच्या....... नहायच्या
श्रावण ऊन्हं उनाड फार....... उनाड फार
इंद्रधनुवर होती स्वार्.... होती स्वार
श्रावण सरी अल्लडशा........ अल्लडशा
उड्या मरिती पोरी जशा........ पोरी जशा
श्रावण थेंब नाजुक गं...... नाजुक गं
पाचू चमकती भवती गं...... भवती गं
श्रावण फुले इवलाली...... इवलाली
बाळाच्या गाली खळी....... गाली खळी
श्रावण अपुला सखा जरि...... सखा जरि
निघून जाई स्वप्नापरि...... स्वप्नापरि
कविता म्हणजे ...१
मन-संवादी श्रोता होता
कविता शब्दांवाटे उमटता
काव्यतुषार रसिका रिझविती
कवीचे सारे कौतुक करीती
कविता अलगद होते पार
या हृदयींचे त्या हृदयी थार
कवितेचे हे नाते गहिरे
जीवलगांहून ते न्यारे
सुचते काही, अनाम दुःखाहून खोलसे,
परंतु लिहितो सगळ्यांना जे रुचते-पटते।
इमान नाही दुःखांशीही, शब्दांशीही,
इमान माझे उरले नाही माझ्याशीही ।
कुठे तळाशी मनात आता, अतीव निश्चल
सुचलेली ती अनाम दुःखे, शब्द तयांचे...
वरवर असते रिमझिम कविता, अतीव चंचल,
आवडते जी सगळ्यांना, अन् शब्द तिचेही ।
ह्यांच्या मध्ये बोथटलेली जाणिव माझी-
-गोठुन असते, युगायुगांच्या अंधारासम !
वागवते ती ओझे केवळ त्या कवितांचे,
जपते बहुदा त्या दुःखांचा अनाम ठेवा ।
(एखादी नविन कविता सूचत असताना आपल्याल सुध्दा असच वाटत असणार)
सार बाजूला पडदा मधला
धीर येथवर बराच धरला
वाट पहाया लावू नको ग
पुन्हा जगू दे माझा मजला...
नव्हतीस तू, तरिही होते
सूर्य-चंद्र अन तारे-वारे
आलीस तू अन स्तब्ध जाहले
जणू जागेवर विश्वच सारे
भूल तुझी ही दूर सरू दे
पुन्हा चालू दे माझा मजला...
आलीस तू ओठांवर अलगद
विसरून गेलो टोच जगाची
पुन्हा होतसे भेट नव्याने
जुनी, सखे ग तुझी नी माझी
आलिंगन दे मुक्त मनाने
पूर्ण फुलू दे आता मजला...
उन्मळून पडलेल्या झाडावर बसलेला पक्षी
निरखित होता मुळांवरील मातीची नक्षी
वरवर दिसतोस खासा पानाफुलांनी भरलेला
पायाकडे असा कसा मातीने बरबटलेला
खिन्नपणे वृक्ष हसला
कलती मान सावरीत बोलला
उडत रहा आकाशी
शीळ घाल मुक्तपणे
मात्र, बाळा अंतरात जाणीव ठेवणे .....
पंखातले बळ अन कंठातले गाणे
मातीचेच देणे अन मातीचेच लेणे
माणूस.....
कसं विचित्र द्वंद्व चालू असते....
...आपल्या आतच ....
एकीकडे स्वतःला विज्ञानवादी म्हणवतो
पण गाडीची डिलिव्हरी "अमावस्येला" नको म्हणतो
का शनिवारी काही देवळांसमोर लांब रांगा लागलेल्या
एका हाती ब्लॅकबेरी, दुसर्या हाती तेल घेतलेल्या
कुठून आलो या जगात ठाव काही लागत नाही
कुठे जाणार शेवटी ते ही ठाऊक नाही
कुणी म्हणो विज्ञानवादी कुणी म्हणो दैववादी
माणूस अखेर माणूसच .....
कळसूत्री बाहुल्यासारखा .....
दृश्य - अदृश्याच्या दोर्यांवर ....सदैवच लोंबकळणारा !!!!
स्वप्नींचे बन
वार्यावर निवांत डोलतंय फूल
पिंपळ सळसळ घालतीयं भूल
झर्याचा नाद, पाखरांची धून
डोंगरपायथ्याशी विसावलंय ऊन
अशा या रानात
स्वप्नींच्या बनात
एकटेच उडूया ......... भूर भूर
सोडून काळज्या
झटकून चिंता
टाकून निराशा ...... दूर दूर
मनातल्या मनात
स्वप्नात तर स्वप्नात
होऊन राहू .......... चूर चूर
भक्त महिमा
केवळ मित्राच्या आग्रहावरून,
पंढरीच्या विठ्ठलासमोर
छातीवर हात बांधून उभे राहिलेले
ते..........
विचारवंत, साहित्यिक..... वगैरे
बहुतेक.......
विठ्ठलाचीही छाती दडपलेली असणार !
त्याच्यापायी लीन होणार्यांकडे तुच्छतेने ,
आणि ताठ मानेने त्या पाषाणमूर्तिकडे पहात....
जरा गुर्मीतच ......
....... या दगडासमोर मीही या मेंढरांसारखे वाकायचे ?
............
गर्दीतून अचानक उमटलेले शब्द ......
"अरे हेच ते .....
..... परवा साहित्यिक दिंडी वाहून नेणारे थोर......"
विचारवंतांनाही विचार करायला लावणारे शब्द
का असे माझ्याकडे हटकून येते?
दु:ख सुद्धा माणसे पाहून येते
मी दिवसभर कोरडा असतो तसा पण
सांज ढळली की मळभ दाटून येते
रोज अश्रूंचा सडा परसात माझ्या
रात्र विरहाच्या कळ्या घेऊन येते
सज्ज ठेवूया चला पंचारतींना
वेदना सांगा कधी सांगून येते?
बोलणे माझे कसे कोणा रुचावे?
बोलतो मी तेच जे आतून येते
शोधतो मी चांदणे केवळ तिच्यातच
ती जरी कायम उन्हे नेसून येते
चंद्र तार्यांची नको देऊ हमी... तू
पापण्या मिटताच अंधारून येते
ह्याचसाठी काढतो खपल्या जुन्या मी
रोज ती फुंकर नवी होऊन येते