जुना कायदा
हा जुना कायदा, आजही चालतो,
इंग्रजांचा बरहुकूम, आजही चालतो;
न्याय मिळण्यापरी, जीव घेणे सुकर,
फोलसा शब्दछल, जन्मभर चालतो
कोटवाले इथे नोटवाले इथे,
कागदी अश्व अन् पोटवाले इथे,
न्यायदेवते कडून, न्याय झाला जरी,
कारभार केवढा आंधळा चालतो!
कायदा पाळणे हाच ठरतो गुन्हा,
कायदा मोडणाराच सुटतो पुन्हा;
पाप धुण्यात माहिर न भागिरथी,
पापियांचे धुणे कोर्ट सांभाळतो!
पिडितांचे मढेही निघाले पुढे,
तरी साक्षिविना न्याय रेंगाळतो;
असत्यास दत्तक दिले जाऊनी,
सत्य फोडून टाहो पोरका राहतो!
हा जुना कायदा, आजही चालतो..!