सांज

कशासाठी?

Submitted by सांज on 27 November, 2020 - 06:30

कोणीतरी विचारलं,
कशासाठी ‘लिहत’ असतेस तू?
कोणी वाचतं का हल्ली!
मी हसून म्हटलं,
कशासाठी ‘जगता’ तुम्ही?
कोणी विचारलंय तुम्हाला कधी!
मी लिहते माझ्यासाठी!
तुम्ही सांगा तुम्ही ‘जगता’ का?
तुमच्यासाठी?
.
.
त्यादिवशी पासून ते गप्प आहेत.
आणि मी मात्र लिहतेच आहे,
पूर्वीसारखी..!

~ सांज https://chaafa.blogspot.com/?m=1

शब्दखुणा: 

यमीचं लग्न!

Submitted by सांज on 26 November, 2020 - 10:52

भाग-१

“यमे, आवर गं लवकर.. पाहुणे अर्ध्या तासात पोचतायत!”

“अहो.. तुम्हाला वेगळं सांगायला हवय का! आणि हे काय? आधी तो बनियन बदला बरं.. शर्ट मधून आतली छिद्र दिसतायत!”

“नलू ताई चार कांदे घ्या चिरायला.. मी पोहे भिजवते.”

सुमन काकूंची प्रचंड धांदल उडालेली होती. त्यांच्या कन्येला, म्हणजेच ‘बीएश्शी फश्ट क्लास’ यमीला पहायला आज मंडळी येणार होती. घरातले सगळेच एकदम जय्यत तयारीत होते. ठेवणीतले पडदे, बेडशीट्स, आभ्रे, पायपुसणं सगळं काही आज बाहेर आलं होतं. पायपुसणं सुद्धा ठेवणीतलं असू शकतं याची कल्पना फक्त मध्यमवर्गीय गृहीणींनाच असते. असो.

शब्दखुणा: 

निळाई

Submitted by pranavlad on 9 May, 2020 - 03:39

पौर्णिमेला दिसे चंद्र पूर्वेकडे,
अंगणी पुन्हा चांदण्यांचे सडे
ही अशी सांज दारावरी ठेपली,
युगांची प्रतीक्षा आता संपली

आवरावा मनाचा सारा पसारा
वाहावा तुझ्या दिशेनेच वारा
गंध या फुलाचा तुजला मिळावा
मनाचा मनाशीच संवाद व्हावा
तुझी धून, आतुर कानी पडावी
क्षणाचीच या वाट मी पाहिली
ही अशी सांज...

फिरवलेस ना रे मोरपीस तू ही?
शहारल्या बघ पुन्हा तारकाही
तुझे स्मित मंद या नभी उमटले,
नक्षत्र बघ इथे पुन्हा लाजले
बुडाली तव स्वप्नात ही चांदणी,
विसरले भान, मग मंदावली
ही अशी सांज...

ओली सांज

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 5 February, 2014 - 06:37

सांज उतरती ओली
का लावुन हुरहुर जाते
मन गाभा-यात कशाचे
काहूर पेटवुन जाते

अर्घ्यातुन पागोळ्यांच्या
सुखसर्वस्वाचे दान
चुकविती बापुडी कौले
कुठल्या जन्मीचे ऋण

संन्यस्त घरांच्या भिंती
निथळती, गळती संथ
गतवैभव स्मरुनी सारे
ढाळती आसवे मंद

काळोखाचा विळखा मग
अधिकच काळा होतो
वाटते निसटले सारे
अन्‌ जीव घाबरा होतो

उदरातुन काळोखाच्या
उमलावा प्रेमपिसारा
स्पर्शातुन उमजत जावा
जगण्याचा अर्थ निराळा

जयश्री अंबासकर

सांजसंध्या

Submitted by सारंग भणगे on 24 January, 2014 - 15:50

गिरीवरावरी विराट सूर्यबिंब टेकले
तमा वरी कुणीतरी सुरम्य चित्र रेखले

चितारली नभांगणात दिव्य रंगसंगती
जणू निळ्या जलाशयात रंग ते तरंगती

हळूच मालवे प्रकाश ज्योत शांत होतसे
निवांत सूर्य झोपता क्षितीज देखणे दिसे

दिमाखदार तारका नभात पाय टाकता
गुलाब गालिचे शशांक अंथरेल स्वागता

समीर संथ थंड गार घालताच फुंकरा
उन्हात तापली धरा निवू बघे जराजरा

भराभरा घराकडे गुरे खुरे पिटाळती
रुणूझुणू रुणूझुणू जणू नुपूर बोलती

खगास आस कोटरास जायची खुणावते
प्रिये समीप जावया अधीरता दुणावते

निराश मित्र मावळे प्रिया न त्यास लाभते
वधू बनून श्यामला शशी घरी प्रवेशते

जना मनास भावते कवीसही विभाव ही

शब्दखुणा: 

सांज खुलली

Submitted by jyo_patil25 on 31 December, 2011 - 01:04

सांज खुलली
तुझे नि माझे
भावरंग लेऊनी आली
सांज खुलली
तुझे नि माझे
गुपित सांगून गेली
सांज खुलली
तुझी नि माझी
भेट घडवून गेली
सांज खुलली
तुझे नि माझे
जीवन गाणे गाऊन गेली

गुलमोहर: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - सांज