ओली सांज

Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 5 February, 2014 - 06:37

सांज उतरती ओली
का लावुन हुरहुर जाते
मन गाभा-यात कशाचे
काहूर पेटवुन जाते

अर्घ्यातुन पागोळ्यांच्या
सुखसर्वस्वाचे दान
चुकविती बापुडी कौले
कुठल्या जन्मीचे ऋण

संन्यस्त घरांच्या भिंती
निथळती, गळती संथ
गतवैभव स्मरुनी सारे
ढाळती आसवे मंद

काळोखाचा विळखा मग
अधिकच काळा होतो
वाटते निसटले सारे
अन्‌ जीव घाबरा होतो

उदरातुन काळोखाच्या
उमलावा प्रेमपिसारा
स्पर्शातुन उमजत जावा
जगण्याचा अर्थ निराळा

जयश्री अंबासकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदरातुन काळोखाच्या
उमलावा प्रेमपिसारा
स्पर्शातुन उमजत जावा
जगण्याचा अर्थ निराळा<<<

मस्त!

(ह्या कडव्यापासून एक नवीन कविता सुरू होत असल्यासारखेही वाटत राहिले) Happy

आ हा हा...
अर्घ्यातुन पागोळ्यांच्या
सुखसर्वस्वाचे दान
चुकविती बापुडी कौले
कुठल्या जन्मीचे ऋण...

बापरे... कस्लं जीवघेणं लिहिलयस...

जयूबाई, अस्तेस कुठे? का इतकी अवचितच येतेस?

बेफिकीर, अन्विता, श्रीयू, दाद, उल्हासजी ..... धन्यु Happy

बेफी......शेवटच्या कडव्यापासून नवी कविता सुरु होतेच आहे Wink

दाद......तुझी दाद.......मेरा दिन बन गया यार Happy
अगं आजकाल जरा कमीच झालाय वावर. कधीतरी येते, वाचते.

किती अलवार!!.....................

संन्यस्त घरांच्या भिंती
निथळती, गळती संथ
>> व्व्वा!! निथळती, निखळती असंही सुचलं... Happy

अशीच एक कविता आहे माझी... संध्यासावल्या, काळोख, घाबराघाबर... Happy

आनंदयात्री....... संध्याकाळ मधे काहीतरी गूढ आहे हे नक्की. काहीतरी कावरंबावरं करणारं.... घाबरवणारं.... !!