समुद्रायन

Submitted by सांज on 25 November, 2020 - 18:11

समुद्रायन..

निसटणाऱ्या वाळूत घट्ट रोवलेले पाय जरासे सैल करत मी स्वत:ला, माझ्याकडे धावत येणाऱ्या त्या फेसाळत्या शुभ्र लाटेच्या स्वाधीन केलं.. ती आवेगाने येऊन बिलगली पायांना.. मी डोळे मिटले.. क्षणभर, अगदी क्षणभरच तिच्यावर तरंगत असल्याचा फील आला.. ती अवस्था मनात साठवेतो लाट निघूनही गेली परतून.. आणि माझे पाय पुन्हा वाळूत रुतले.. समोर मावळतीचा सूर्य त्याचा तो क्षितीजावरचा रंगसोहळा मिरवत होता.. शांत, नीरव किनारा.. फारशी गर्दी नसणारा.. तिथली माझी खडकाजवळची ती आवडती जागा.. आणि लाटांसोबत चालू असलेला आवडीचा खेळ!
येणाऱ्या प्रत्येक लाटेगणिक शहारणारी आणि जाणाऱ्या लाटांनी हलकी हलकी होत जाणारी मनाची अवस्था..
मन अजून अजून खोल जात राहतं. सरणाऱ्या वाळूवर मागे राहणारे शिंपले खुणावतात.. तो ओल्या वाळूचा कॅन्व्हास बोलावत असतो.. पण, त्यावर काही रेखावसं वाटत नाही. निमिषात ते पुसून जाणार असतं.. fading things often make me sad.. मी तशीचं पाहात ऊभी राहते..
A E Housman च्या ओळी आठवतात.. सार्वकालिक खऱ्या!

Shall it be Troy or Rome
I fence against the foam,
Or my own name, to stay
When I depart for aye?

Nothing: too near at hand,
Planing the figure sand,
Effacing clean and fast
Cities not built to last
And charms devised in vain,
Pours the confounding main.

मागे काहीचं उरणार नसतं.. हे जे काही आत्ता आपण अनुभवतोय, तेही विरून जाणार आहे याची जाणीव होते. शब्दांत न मावणारे, रंगांत चितारता न येणारे, कॅमेऱ्याच्या लेन्स मधूनही सुटून जाणारे हे क्षण साठवावे कसे मग?
येणारी एक अजस्त्र लाट मग कानांपर्यंत उडी घेऊन म्हणते, ‘साठवायचे नसतातच ते, जगायचे असतात!’
खरंच की..
आणि मग आठवते करंदीकरांची शाळेत वाचलेली कविता,

घननिळ सागराचा घननाद येतो कानी,
घुमती दिशा दिशांत लहरीमधील गाणी,

चौफेर सूर्य ज्वाला वारा अबोल शांत,
कोठे समुद्र पक्षी गगनी फिरे निवांत,

ती लाट, मी, समुद्र, मावळणारा सूर्य सारंकाही एक झाल्यासारखं वाटायला लागतं मग.. गार वारा अंगावरुन वाहत असतो.. समुद्राचा खर्जातला सूर अव्याहत छेडलेला असतोच.. आणि ती भारलेली अवस्था!
नकळत मनात रामरक्षा उमटायला लागते..

... कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये ॥..

आता तरंगण्यासाठी लाटेची आवश्यकता उरलेली नसते.. मन अल्लद हवेवर तरंगत असतं!
लाटांचा आवाज.. पायाला जाणवणारा समुद्राचा अंश.. समोर जवळपास मावळलेला सूर्य.. आणि मनाची ती मुग्ध अवस्था घेऊन मी परत फिरते..
त्यादिवशीपुरतं माझं समुद्रायन संपलेलं असतं..
आणि मग माझ्या मनाला ओढ लागते पुन्हा एका नव्या सूर्यास्ताची..

~ संजीवनी
www.chaafa.blogspot.com

Group content visibility: 
Public - accessible to all site users