सांजसंध्या

Submitted by सारंग भणगे on 24 January, 2014 - 15:50

गिरीवरावरी विराट सूर्यबिंब टेकले
तमा वरी कुणीतरी सुरम्य चित्र रेखले

चितारली नभांगणात दिव्य रंगसंगती
जणू निळ्या जलाशयात रंग ते तरंगती

हळूच मालवे प्रकाश ज्योत शांत होतसे
निवांत सूर्य झोपता क्षितीज देखणे दिसे

दिमाखदार तारका नभात पाय टाकता
गुलाब गालिचे शशांक अंथरेल स्वागता

समीर संथ थंड गार घालताच फुंकरा
उन्हात तापली धरा निवू बघे जराजरा

भराभरा घराकडे गुरे खुरे पिटाळती
रुणूझुणू रुणूझुणू जणू नुपूर बोलती

खगास आस कोटरास जायची खुणावते
प्रिये समीप जावया अधीरता दुणावते

निराश मित्र मावळे प्रिया न त्यास लाभते
वधू बनून श्यामला शशी घरी प्रवेशते

जना मनास भावते कवीसही विभाव ही
निवांत सांज सावळून जन्मते विभावरी
==========================
सारंग भणगे. (जानेवारी २०१४)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काव्य वाचताना असे वाटल्र की जणू प्रत्यक्ष सर्वकाही पाहतोय। अतिसुन्दर काव्य सारंगजी । जादू आहे शब्दात ।

छान चित्रदर्शी वर्णन.

हळूच मालवे प्रकाश ज्योत शांत होतसे
निवांत सूर्य झोपता क्षितीज देखणे दिसे

या ओळी सर्वात छान वाटल्या.