काव्यलेखन

गाव माझा हरवला

Submitted by अनिल आठलेकर on 3 March, 2013 - 15:23

हरवली संवेदना अन भाव माझा हरवला,
मखमली सारे बिछाने, गाव माझा हरवला............!

कोण मी आहे कुठे? सोडून गेले का कुणी?
कोणता हा देश आहे,ठाव माझा हरवला...............!!

आजही तेथून आलो, वाट होती पोरकी
का कळेना ओळखीचा, वाव माझा हरवला.............!!!

देउनी पंखात बळ त्यांनीच केले वारही
सांग तू खेळू कसा मी ? डाव माझा हरवला...........!!!!

साकडे घालू कुणा? कोड्यात आहे देवही
आसुरी आनंद त्यांना, घाव माझा हरवला...........!!!!!

___अनिल आठलेकर....०८/११/१२...11.50 pm

आराधना

Submitted by Sangeeta Kulkarni on 3 March, 2013 - 12:00

--आराधना --

गोफ हळव्या भावनांचा
अनुराग आहे..

प्रेम काळजाने छेडलेला
राग आहे..

जीवनाला देई सुर अशी
संवेदना आहे..

बासरीचा सुर सांगे
प्रेम राधा शाम आहे..

मीरेच्या मुखी
मोहनाचे नाम आहे..

प्रेमभक्ती प्रेमशक्ती
प्रेम आहे प्रार्थना..

प्रेम आहे साधना
प्रेम हिच आराधना..

शब्दखुणा: 

।।माझी शाळा।।

Submitted by राजीव मासरूळकर on 3 March, 2013 - 08:30

।।माझी शाळा।।

माझी शाळा माझी शाळा
मज आवडते माझी शाळा ।।धृ।।

छोटुकल्यांना लळा लाविते
धाटुकल्यांचा मळा फुलवते
अज्ञानाच्या झळा पळविते
झुळझुळते निर्मळा।।१।।

फुलामुलांच्या गोष्टींमधुनी
प्राणी पक्षी सृष्टीमधुनी
गुरूजनांच्या दृष्टीमधुनी
दिसती जीवनकळा।।२।।

सुंदर सवयी अंगी बाणवी
पशूस जगणे देई मानवी
नष्ट कराया वृत्ती दानवी
झिजते ही प्रेमळा।।३।।

गाव राज्य अन् देशासाठी
विश्वाच्या समृद्धीसाठी
प्रेम दया मानवतेसाठी
स्फुर्ती दे तिळतिळा।।४।।

- राजीव मासरूळकर

पाखराना कोणतीही जात नाही

Submitted by SADANAND BENDRE on 3 March, 2013 - 08:30

पाखरांना कोणतीही जात नाही
कुंपणाची हद्द आकाशात नाही

वेगळे आकार केवळ देवळांचे
खुद्द तो कुठल्याच गाभाऱ्यात नाही

पाडल्या भिंती मठाच्या काल कोणी
खंत एकच, त्यात माझा हात नाही

घेत मी नसलो तरी धुंदीत आहे
त्यातला नसलो तरी तुमच्यात नाही

मी कुठे जावे ठरवणे फार सोपे
यार माझा एकही स्वर्गात नाही

कालचे हे दुःख आता घे तुझे तू
दे नवे काही शिळे मी खात नाही

हात हाती घेउनी चालू जरासे
मंझिलावर पोचणे हातात नाही

खंजिराला पाठ द्यावी मी खुषीने
एवढा विश्वास या नात्यात नाही

दे जखम रक्ताविना तू आज किंवा
दे कबूली बाण तो भात्यात नाही

पाळतो बेशिस्तही शिस्तीत थोडी

चिखलमातीत पडल्याने जरी डागाळले होते

Submitted by मृण_मयी on 3 March, 2013 - 08:20

चिखलमातीत पडल्याने जरी डागाळले होते
जरा प्रेमात न्हाल्यावर पुन्हा तेजाळले होते

किती वचने दिली होतीस प्रणयाराधनेसाठी
नि मी स्वाधीन होताना कुठे पडताळले होते?

असा वाचून गेला प्रीत तो डोळ्यांतली माझ्या
जणू आटोपत्या ग्रंथास वर वर चाळले होते

तुझ्यावर सूड घेण्याची जरी मज लाभली संधी
कशी विसरू, कधी काळी तुझ्यावर भाळले होते?

कुणाला घालता भीती चितेच्या ग्रीष्म ज्वाळांची
किती वर्षे वियोगाने जिवाला जाळले होते...

नसे ही आत्महत्या; हे स्वयंवर मृण्मयीसाठी
तुला झिडकारुनी अग्नीस मी कवटाळले होते

चित्र

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 3 March, 2013 - 01:50

हलके हळवे
धूसर धुकट
चित्र उमटते
पुसट पुसट .
चित्र लडिवाळ
मधाळ लाजरे
चित्र नखरेल
नाजूक नाचरे .
चित्र थिरकते
लयीत फिरते
चित्र मनातील
गझल बोलते .
कधी उन्हातील
ओले रिमझिम
कधी जलातील
शारद चमचम .
कधी श्वासातील
धगधग उष्ण
कधी वेळूतील
तगमग कृष्ण .
प्रियतम तरी
जाते निसटत
रंग नभातील
डोही हरवत .

विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

SOLO IMPOTENCE

Submitted by हरवलेल्या जहाजा... on 2 March, 2013 - 15:18

कॅफेटेरियात
वारुळ ढोसत
बसलेली नागडी माणसं
कसल्याशा कुंपणांनी,
गोंदवत बसलीयत
आपली उघडी शरीरं.

'तु अजुन कपडे काढ.
मी माझेही काढतो.
त्वचा उतरवुन ठेव
मी माझीही ठेवतोच.
तुझा कोथळा उतरव
आणि मला दे.
माझा तुझ्या हातात घे.
आपल्या,
पेशीपेशींमधल्या मरणफुलांचा
गुच्छ बनवु आणि
सात जणात
सुखासमाधानाने
गिळुन खाऊ.
रक्त पचवु.
धागे उपसु.

नाहीतरी,
जगुन झालेल्या पारदर्शक रक्ताने,
प्रत्येक पेशींमधले मेंदु सैरभैर आहेत,
होणारी प्रत्येक नवी मांडणी
विटाळत नाहीये एकसंधपणे.
शरीरविरहीत जग बनुन,
चिडिचुप वखवखलेपण घेऊन,
केवळ मनं का सडत नाहीत??
भग्नतेची शिल्प होऊन,

द्वंद्व..

Submitted by अनिल आठलेकर on 2 March, 2013 - 14:06

'सखा' कुणाचा कधी न होतो कधी न झालो
कुणास ठाऊक? व्यर्थ तरीही? उगाच भ्यालो.....

रिता मनाशी कधी तरी मी खुशाल झालो
कुणास कळले?गुपीत माझे?उगाच भ्यालो..........!!

कधी न केली प्रतारणा मी कधी न ढळलो
कधी न फसलो प्रलोभनांना कधी न चुकलो....

दुजे कुणी ना...तरी कळेना....कशास भ्यालो.....?
किती सोहळे तुझ्या रुपाचे? उगाच भ्यालो.......!!

_____अनिल आठलेकर, पुणे

दूर ढगांना पाहून . . .

Submitted by राजीव मासरूळकर on 2 March, 2013 - 11:45

दूर ढगांना पाहून . . .

किती दिवसांनी आज ऐकू आला गाजावाजा
दूर ढगांना पाहून सुखावला बळीराजा !

माना टाकलेली पिके, मेथी, पालकाची भाजी
दूर ढगांना पाहून झाडे झाली ताजी ताजी !

उल्हासली गुरेढोरे, कुरणातली कोकरे
दूर ढगांना पाहून आली भरात पाखरे !

आता वाजविल पावा वारा होऊनिया कान्हा
सरींवर सरी येता नद्या सोडतील पान्हा !

सांज मंजुळेल आता गार होईल दूपार
आणि कष्टाचाच घाम सुख देईल अपार !

आणि कष्टाचाच घाम सुख देईल अपार !

- राजीव मासरूळकर

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन