काव्यलेखन

रंगागार

Submitted by पुरंदरे शशांक on 2 September, 2026 - 04:47

रंगागार

कसे कोवळे स्पर्श हे रेशमाचे
उन्हा पावसाची मिठी आगळी
क्षणा दो क्षणांची जरी गाठ येथे
कमानी उभारे नभी रंगली

झुले पात रानी तुरे भोवताली
सडे रंगले हालती डोलती
झरा निर्झराचे खुले गीत गाजे
निनादे कपारी भुई सोबती

मना मोहवि देखणा रंगगारा
दिठी स्वैर धावे तया संगती
उठे एक उर्मी जरा सावळीशी
त्वरेने रिती हो नभासारखी

व्हॉटसॅप मेसेज

Submitted by तुष्कीनागपुरी on 29 August, 2026 - 13:42

कागदावर हाताने लिहून
छोटसं असलं तरी पूर्ण करायला
एखादा दिवस लागतोच पत्राला
मग
तसे पत्र मिळाल्यावर
तुझे पत्र आले आहे यातच
तुझं माझं असणं भरघोस मिळतं मला
तुझं अस्तित्व
शब्दात
जे शब्द लिहिले त्यांच्या निवडीत
कागदात
शाईत
बाजुला सोडलेल्या समासात
काढलेल्या चित्रांमधे
लिफाफ्यावर लिहिलेल्या पत्यात
मायन्यात आणि सहीत
सोडलेल्या रिकाम्या जागेत
पत्र लिहायचा विचार मनात आल्यापासून
ते पोस्ट होईपर्यंत तू दिलेल्या वेळेत
मिळतं मला
.
व्हॉटसॅप मेसेज
काही क्षणात करता येतो

सोनसाजिरा

Submitted by तुष्कीनागपुरी on 28 August, 2026 - 14:18

गहुरंग सोनसाजिरा जन्म बावरा पाहुनी झाला
श्रीरंग जसा बासरी वाजवुन करी मुग्ध जगताला
.
डोळ्यांचे काजळकाठ डोह घनदाट परतणे नाही
बुडणेच अता आवडे नकोसा पुढे छंद कसलाही
.
हरवून जायची भीती दिशा चकविती दाहीच्यादाही
वाजवी खुणेची शीळ जाणता तीळ खुणावत राही
.
देहात कडकडे वीज जलद काळीज धडधडे आत
जाणीव उरे एक ती लोपती मिती खोल वेगात
.
(विरणार कधी ना प्रीत तुझे संगीत तुझा जप चाले
शपथेवर माझी हमी प्रेम हे कमी कधी ना झाले)
.
एकेक आठवण तिची साठवण तिची सावली होई
रणरणले जरि विश्वात हळुच पंखात झाकुनी घेई
.

वेळ यावी लागते : स्वच्छंदी

Submitted by 'स्वच्छंदी on 24 August, 2026 - 11:40

काच दंभाची फुटावी लागते
'आपली' किंमत कळावी लागते

येत नाही शक्यतो ओठांवरी
वेदना समजून घ्यावी लागते

'आपले' मानून ना मिळते कुणी
रेघ.....हातावर असावी लागते

नेम जर असला पुढे चुकवायचा
एक मुंगी वाचवावी लागते

भेटते शेरास नंतर वाहवा
जखम आधी खोल व्हावी लागते

टेबलावर काम असते आपले
छान! मग खुर्ची म्हणावी लागते

चालणारे थांबते पाऊलही
साद हृदयातून यावी लागते

माणसाचे मूल्य कळते यारहो!
...एक व्यक्ती दूर जावी लागते

'दगड' ही बनतो जगाची देवता
फक्त त्याची वेळ यावी लागते

शब्दखुणा: 

शूर आम्ही सरदार आम्हाला (विडंबन)

Submitted by ओबामा on 22 August, 2026 - 06:54

शूर आम्ही सरदार आम्हाला (विडंबन)

शूर आम्ही नवरोबा आम्हाला काय कुणाची भीती
पर्स, साडी अन् सँडलपायी कर्ज काढलं जास्ती ।।ध्रु।।

लग्नाच्या मंडपात उमगली संसाराची रीत,
अमेझॉनशी नातं जुळलं, जडली सेलशी प्रीत!
लाख टोमणे झेलून घेईल अशी पोलादी छाती!
पर्स, साडी अन् सँडलपायी कर्ज काढलं जास्ती

शूर आम्ही नवरोबा आम्हाला काय कुणाची भीती
पर्स, साडी अन् सँडलपायी कर्ज काढलं जास्ती ।।ध्रु।।

शर एक आला.... ->

Submitted by Meghvalli on 21 August, 2026 - 12:06

शर एक आला नी श्रावणाचा प्राण घेऊनी गेला,
इतिहास पुढेच घडला, दशरथाचा राम घेऊनी गेला।

शापाने केली दोघांची ताटातूट, रामास वनवास ठोठावून गेला,
पुत्रवियोग न साहवे दशरथाला, प्राण त्याचा देह सोडून गेला।

किती कठोर होती नियती, श्रावण बाळाची,
तितकीच कठोर होती नियती दशरथाची।

एक पिता रडला वनी, आपल्या पुत्राच्या शोधात,
एक पिता रडला राज्यी, आपल्या पुत्राच्या वियोगात।

एक क्षणाचा अपराध, आयुष्याची शिक्षा देऊन गेला,
शर एक, दोन पिढ्यांचा अंत करवून गेला।

पासंग

Submitted by अनन्त्_यात्री on 20 August, 2026 - 04:34

अभंग भंगेल
ओवी ओठंगेल
लावणी लोपेल
लौकरच

उत्स्फूर्त निमेल
उत्कट आटेल
चाकोरी उरेल
लौकरच

काव्य, शिल्प, चित्र
एका प्रॉम्प्ट वर
होतसे हजर
अहर्निश

मानवी सृजना
कृबुचा पासंग
युद्धाचा प्रसंग
रात्रंदिन

घेतोस श्वास सध्या, ती फक्त भीक आहे

Submitted by बेफ़िकीर on 20 August, 2026 - 04:07

घेतोस श्वास सध्या, ती फक्त भीक आहे
लक्षात ठेव मित्रा, मृत्यू नजीक आहे

देहात कोंडलेला, आत्मा स्वतःस सांगे
भलत्यासवेच झाली ही सोयरीक आहे

रडती मनामधे अन हसती जगापुढे ह्या
त्या सर्व माणसांची तब्येत ठीक आहे

आम्ही तुम्हास बघणे, ठरते इथे चुकीचे
तुम्ही वळून बघणे, ठरते सटीक आहे

होत्या किती अपेक्षा दुनियेकडून माझ्या
तीही पडीक आहे, मीही पडीक आहे

कित्येक जन्म अजुनी असतील खास चटके
तू भोगतोस सध्या, ती कोवळीक आहे

जो 'बेफिकीर' नसतो, तो हे विधान करतो
"माझेच शेत आहे, माझेच पीक आहे"
=====

-'बेफिकीर'!

कोल्होबांची शाळा

Submitted by मिरिंडा on 16 August, 2026 - 11:32

एक होता ससा
शाळेत जाऊन हसला
कोल्होबा होते मास्तर
त्यांनी मारला डस्टर

ससोबाने मारली उडी
गुटख्याची पडली पुडी
कोल्होबा फारच रागावले
छडी घेऊन मागे लागले

" गुटखा खातोस
तंबाखू खातोस ?
आईवडलांना घेऊन ये
पेनल्टीचे पैसे घेऊन ये "

शाळेतून नावं काढून टाकीन
परीक्षेत नापास करीन
खालच्या वर्गात बसवून ठेवीन
वर्गाबाहेर उभा करिन "

ससा मग घाबरला
आईवडील मारतील म्हणाला
शिक्षा थोडी कमी करा
पेनल्टी लावू नका

शब्दखुणा: 

बालपण

Submitted by निरंजन कुलकर्णी on 14 August, 2026 - 04:24

बाकी काही नको देवा
पुन्हा एकदा बालपण दे
नको मोठी गाडी नको मोठा बंगला
मनसोक्त भटकायला मोकळं रान दे
पुस्तकात ठेवायला एखादं वाळक पान दे
नको ती नोकरी नको ते पॅकेज
वाऱ्यावर तरंगणारे म्हातारीचे केस दे
फुगे उडवायला साबणाचा फेस दे
वाढदिवशी घालायला एखादा नवीन ड्रेस दे
नको प्रतिष्ठा नको पैसा
सापाची कात दे, चांदणी रात दे
काजव्यांचा उजेड दे, लाजाळूचं पान दे
नको तो मोबाईल नको तो लॅपटॉप
पोपाय च स्पिनेच दे, डेक्स्टर ची लॅब दे
भूतांच्या गोष्टी दे, गोष्टीतली परी दे
खेळता खेळता पडल्यावर कपाळाला खोक दे,

प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - काव्यलेखन