Submitted by तुष्कीनागपुरी on 28 August, 2026 - 14:18
गहुरंग सोनसाजिरा जन्म बावरा पाहुनी झाला
श्रीरंग जसा बासरी वाजवुन करी मुग्ध जगताला
.
डोळ्यांचे काजळकाठ डोह घनदाट परतणे नाही
बुडणेच अता आवडे नकोसा पुढे छंद कसलाही
.
हरवून जायची भीती दिशा चकविती दाहीच्यादाही
वाजवी खुणेची शीळ जाणता तीळ खुणावत राही
.
देहात कडकडे वीज जलद काळीज धडधडे आत
जाणीव उरे एक ती लोपती मिती खोल वेगात
.
(विरणार कधी ना प्रीत तुझे संगीत तुझा जप चाले
शपथेवर माझी हमी प्रेम हे कमी कधी ना झाले)
.
एकेक आठवण तिची साठवण तिची सावली होई
रणरणले जरि विश्वात हळुच पंखात झाकुनी घेई
.
आधार तिचा लाभला म्हणाली मला सदा मी आहे
कविताच जीव पोसुनी लक्ष ठेवुनी काळजी वाहे
.
तुष्की नागपुरी
शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६, २२:००
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
सुंदर!
सुंदर!
जबरदस्त सुंदर आहे. अ ति शय
जबरदस्त सुंदर आहे. अ ति शय गेय