मराठी गझल

तुझ्याचसाठी

Submitted by वैभव फाटक on 25 July, 2012 - 23:56

तारेवरची कसरत सारी तुझ्याचसाठी
दुनियेसंगे मारामारी तुझ्याचसाठी

तसे कुणाचे तीळमात्रही ऐकत नाही
किती पचवले बोल जिव्हारी तुझ्याचसाठी

लाख चेहरे घुटमळणारे अवतीभवती
तरी फुंकली प्रीत तुतारी तुझ्याचसाठी

तुझ्या लोचनी अश्रू बघणे जमले नसते
मी दु:खाची दिली सुपारी तुझ्याचसाठी

तुझ्या सुखातच श्रीमंती मी मानित आलो
पत्करलेली किती उधारी तुझ्याचसाठी

------- ( वैभव फाटक - ५ जून २०१२) -------

गुलमोहर: 

भोवती माझ्या गळ्याच्या वास्तवाचा फास आहे!

Submitted by सतीश देवपूरकर on 25 July, 2012 - 07:40

गझल
भोवती माझ्या गळ्याच्या वास्तवाचा फास आहे!
मी कशाचे स्वप्न पाहू? सर्व काही भास आहे!!

एक नुसता चेहरा पण रंग पालटतो किती तो;
बिंब हृदयाचे म्हणू? की, फक्त तो आभास आहे!

केवढ्या घाईत माझी प्रेतयात्रा ही निघाली;
पाहिले नाही कुणी छातीत माझ्या श्वास आहे!

तूच चित्ती! तूच ओठी! माझिया स्वप्नातही तू!
तू अहोरात्री जिवाला लागलेला ध्यास आहे!!

कोंडवाड्यासारखी झाली स्थिती माझ्या उराची;
आजही वक्षात माझ्या कोंडलेला श्वास आहे!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

कधी कळलेच नाही

Submitted by विजय दिनकर पाटील on 24 July, 2012 - 13:05

भेट कुठली द्यायची ह्याला कधी कळलेच नाही
खुश कसे ठेऊ नशीबाला कधी कळलेच नाही

फेकलेली घाणही चुपचाप स्वीकारीत गेली
ह्या नदीचा जाहला नाला कधी, कळलेच नाही

पात्रतेसम नाव व्हावे...... राहिली अतृप्त इच्छा
कोण तू होतास कोणाला कधी कळलेच नाही

रंग कौमार्यातले कांतीवरी खुलणार तोवर
लागलीही हळद अंगाला कधी, कळलेच नाही

फक्त कोंडी फोडण्यासाठी जरा बोलून गेलो
आणि फुटले तोंड वादाला कधी, कळलेच नाही

-------

'कणखर'

गुलमोहर: 

मिटून डोळे बघावयाची त-हाच न्यारी!

Submitted by सतीश देवपूरकर on 24 July, 2012 - 09:49

गझल
मिटून डोळे बघावयाची त-हाच न्यारी!
जगास त्याची पहावयाची त-हाच न्यारी!!

घडीघडीला उभा रहातो पुढ्यात मृत्यू;
कलीयुगाची जगावयाची त-हाच न्यारी!

हयात गेली, न हुंदकाही कधीच आला
स्वत:स शिक्षा करावयाची त-हाच न्यारी!

लगेच येतो दिसून मी अन् शिकार होतो;
मुळात माझी बसावयाची त-हाच न्यारी!

जिवास भावेल त्यामधे मी वहात जातो!
कशामधेही रमावयाची त-हाच न्यारी!!

गुलमोहर: 

लाट मी झेपावणारी, तू समुद्राचा किनारा!

Submitted by सतीश देवपूरकर on 23 July, 2012 - 09:33

गझल
लाट मी झेपावणारी, तू समुद्राचा किनारा!
तू मला फेटाळ, पण दे पळभरासाठी निवारा!!

सोडली मी नाव माझी मध्यभागी सागराच्या;
काळजी घेण्यास माझी धावुनी येईल वारा!

ठेवुनी साक्षीस ज्याला घेतल्या प्रेमात शपथा;
आज माझ्या सोबतीला तोच आहे एक तारा!

आज माझे नाव येता, रंगते लोकांत चर्चा
मी बुडालो त्या क्षणी केला न कोणीही पुकारा!

एकटा दिसलो तरीही एकटा असतो कुठे मी?
भोवती माझ्या स्मृतींचा नेहमी असतो पसारा!

जाउनी हृदयास भिडते थेट हृदयातील गाणे;
का उगा फुलवू असा गीतात शब्दांचा पिसारा!

मी कधी येवू? कसा भेटू तुला?.... तेही कळेना;
भोवती तुझिया फुलांचा सारखा असतो पहारा!

गुलमोहर: 

कळपात माणसांच्या. . .

Submitted by इस्रो on 22 July, 2012 - 05:18

काहीतरीच माझे! हे काय बोलतो मी ?
कळपात माणसांच्या, माणूस शोधतो मी

नाते नवे असो की, ओळख जुनी पुरानी
होणार लाभ जेथे, तेथेच गुंततो मी

नाही अता भरोसा, कुठल्याच माणसाचा
राखण करावयाला, श्वानास नेमतो मी

मी सांगतो तयांना, आहे खरेखुरे जे
कोणास बोचतो मी, कोणास टोचतो मी

म्हणतात लोक काही, लिहितोस छान 'नाहिद'
सुचते सहज मला जे, शब्दात मांडतो मी

-नाहिद नालबंद
[भ्रमणध्वनी : ९९२१ १०४ ६३०,
ईसंपर्क : nahidnalband@gmail.com]

गुलमोहर: 

समुद्रातील लाटांनी दिला पत्ता किना-याचा!

Submitted by सतीश देवपूरकर on 22 July, 2012 - 05:04

गझल
समुद्रातील लाटांनी दिला पत्ता किना-याचा!
किनारा गाठण्यासाठी, मिळाला हात वा-याचा!!

दिशा सा-याच काळोख्या दिसाया लागती तेव्हा......
हवा आधार धरणीला, नभाच्या एक ता-याचा!

कितीदा भंगला गेलो! कितीदा सांधला गेलो!
मलाही वाटते माझा असावा पिंड पा-याचा!!

करावा कोंदणाने का हि-यापेक्षा अधिक तोरा?
*(फुलांपेक्षा अधिक तोरा फुलांच्या, आज गज-याचा!)

जगा! हा रोजचा झाला, तुझा भडिमार प्रश्नांचा!
मलाही लागला आहे लळा ह्या आज मा-याचा!

किती आवेश हा मोठा, किती देतात ते नारे!
समजला अर्थ कोणाला खरा एकेक ना-याचा?

पिताना गोड चखणा का , कुणी घेवून बसलेला?

गुलमोहर: 

वास्तवाला स्विकारु जसेच्या-तसे !

Submitted by सुप्रिया जाधव. on 21 July, 2012 - 13:41

शब्द नव्हतेच कळले तसे फारसे...
'प्राण झोपेत गेले' म्हणे कायसे !

प्रेम होते जिवापाड माझे-तुझे...
हातच्या कंकणाला नको आरसे !

साथ सच्ची दिली आसवांनी अशी ...
सौख्य-दु:खातले मित्र पक्के जसे !

काहिली जीवनाची शमावी कशी...
विरह आणी ॠतू हे झळांचे असे !

त्राण नाही नवे स्वप्न गुंफायचे...
वास्तवाला स्विकारु जसेच्या-तसे !

राजरस्त्यावरी चालणे हे बरे...
वाट पडताळण्याची नको साहसे !

-सुप्रिया.

गुलमोहर: 

जगणे म्हणजे कटकट नुसती

Submitted by सुधाकर.. on 21 July, 2012 - 12:32

जगणे म्हणजे कटकट नुसती
मरणा भवती खटपट नुसती

कोणी हसते कोणी रुसते
प्रत्यकाची ही वटवट नुसती.

पैका पैका जोडण्यास ही,
नाती तुटती तटतट नुसती

देण्या केवळ प्रेमास प्रेम
हलती हृदये लटलट नुसती

भासां मागे रोज धावते
पायांची ही फ़टफ़ट नुसती

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

माझ्याकडून काही, दैवाकडून झाले!

Submitted by सतीश देवपूरकर on 21 July, 2012 - 03:25

गझल
माझ्याकडून काही, दैवाकडून झाले!
सारे हिशेब माझे चुकते करून झाले!!

कैफात जीवनाच्या घडले बरेच काही.....
काही सुजाणतेने, काही चुकून झाले!

आयुष्य खर्च झाले, हातात काय आले?
माती विकून झाली, सोने विकून झाले!

डोळे मिटावयाची, बघतात वाट डोळे!
नव्हते बघावयाचे, तेही बघून झाले!!

होता तिचा जरी मी एकांत व्यापलेला;
दर्शन तिचे मलाही अगदी दुरून झाले!

याहून वेगळी तू संजीवनी मला दे......
मदिरा पिऊन झाली, अमृत पिऊन झाले!

पाहू तरी मला दे.....नशिबात काय माझ्या?
म्हटलेस तेवढ्यांदा पत्ते पिसून झाले!

आणू कुठून अश्रू आता रडावयाला?
दु:खा! सुखात सारे अश्रू झरून झाले!

गुलमोहर: 

Pages

Subscribe to RSS - मराठी गझल