पावले माझीच होती एकट्याची!

Submitted by सतीश देवपूरकर on 26 July, 2012 - 04:45

गझल
पावले माझीच होती एकट्याची!
वाट ती घनदाट होती जंगलाची!!

कूसही बदलू दिली नाही शवाला;
केवढी घाई चितेला पेटण्याची!

भेटला प्रत्येक लाटेला किनारा;
लागली वर्णी न माझी एकट्याची!

राहिली माणूसकी नाही कुठेही;
माणसे उरली न आता काळजाची!

सोबतीला माझिया असलीस तू की..
रात्र होते पौर्णिमेच्या चांदण्याची!

तू अशी येतेस इतक्या लगबगीने..
सर जशी येवून जावी श्रावणाची!

थांबला वणवा घराच्या उंब-याशी
जाहली हिम्मत न त्याची जाळण्याची!

-------प्रा.सतीश देवपूरकर
भूशास्त्र व खानिज तेल तंत्रद्न्यान विभाग,
नौरोसजी वाडिया महाविद्यालय, पुणे.
फोन नंबर: ९८२२७८४९६१

गुलमोहर: 

तू अशी येतेस इतक्या लगबगीने..
सर जशी येवून जावी श्रावणाची! ... .. सुरेख पण -

कूसही बदलू दिली नाही शवाला;
केवढी घाई चितेला पेटण्याची! ....... याचे आशय स्पष्टीकरण करता आले नाही.सर.

" राहिली माणूसकी नाही कुठेही;
माणसे उरली न आता काळजाची! " छान!

"कूसही बदलू दिली नाही शवाला;
केवढी घाई चितेला पेटण्याची! " हा शेर जरा कळला नाही.

कूसही बदलू दिली नाही शवाला;
केवढी घाई चितेला पेटण्याची! "

बेहतरीन शेर ............खरा कामयाब शेर ..आमद का शेर ...!!:हहगलो:

क्ष.य.ज्ञ. | 26 July, 2012 - 11:28 नवीन
कूसही बदलू दिली नाही शवाला;
केवढी घाई चितेला पेटण्याची! "

बेहतरीन शेर ............खरा कामयाब शेर ..आमद का शेर ...!!
sahi

देवपूरकर सर

छान आहे गझल. शेवटचा शेर झेपला नाही मला. हल्ली गझल वाचताना तुटकपणा खूप जाणवतो. भिन्न भिन्न प्रकृतीचे पण रदीफ आणि काफिया अलामती सांभाळणारे शेर असलेली गझल आता सुखावत नाही.

कूसही बदलू दिली नाही शवाला;
केवढी घाई चितेला पेटण्याची!

चिता पेटवणे हे गझलेचे आद्य कार्य आहे का ? शव असेल तर ते कूस कसं बदलेल ?

ऑर्फिअसजी, गणेशजी, क्षयज्ञजी, कमलाकरराव व किरणजी!
सगळ्यांना धन्यवाद! आपल्या प्रतिसादाबद्दल.
कूस बदलण्याच्या शेरावर थोडासा खुलासा करतो..........
शेर असा आहे...........

कूसही बदलू दिली नाही शवाला;
केवढी घाई चितेला पेटण्याची!

यात वापरलेल्या शब्दांचा/प्रतिमांचा शब्दश: अर्थ पाहू...........
चिता...... म्हणजे प्रेतदहनासाठी रचलेला लाकडांचा ढीग.
कूस.........म्हणजे शरीराची एक बाजू
कूस बदलणे किंवा कुशीस होणे.........म्हणजे एका बाजूवर निजणे, वळणे.
कूसचा लाक्षणिक अर्थ आहे.........जागा वा अवकाश, भरलेली जागा, साधलेली संधी इत्यादी.

आता या शेरातील शब्दयोजनेतील प्रतिमांची गुंफण वा एकंदर प्रतिमासृष्टी पाहू या...........
प्रथम मी नमूद करू इच्छितो की, या शेरात वापरलेले शब्द उदाहरणार्थ कूस, कूस बदलणे, शवाने कूस बदलणे, चितेला पेटण्याची घाई होणे......ही प्रतिमांची भाषा आहे, जी आम्हाला वा आमच्यासारख्या अनेकांना जीवनात आलेल्या कटू अनुभवांवर शब्दांच्या पलीकडे जावून भाष्य करते.

प्रथम आपण कूस बदलणे ही शब्दयोजना पाहू........
कूस म्हणजे शरीराची एक बाजू. आपण जेव्हा झोपतो, ज्या स्थितीत झोपतो त्याच स्थितीत रात्रभर रहात नाही. झोपेत देखिल आपण थोड्या थोड्या वेळाने एका अंगावर, मग दुस-या अंगावर वळतो. कधी पाठीवर झोपतो.
असे करण्याने आपण आपल्या झोपेतही स्वत:स सुखावह करून घेतो व आपली झोप व्यवस्थित पार पडते. एका अंगाला रग लागल्यावर, भार पडल्यावर मग आपण दुस-या अंगावर वा कुशीवर वळतो. त्यानेही सुखकर नाही वाटले तर पाठीवर झोपतो.
या सर्व स्थित्यंतरामागे आपण स्वत:ला comfortable करतो व आपल्या झोपेचा आस्वाद घेत असतो. हरेक वेळेस कूस बदलणे म्हणजे नव्या जोमाने गाढ झोप सुरळीत ठेवण्याचा एक प्रयत्न असतो. (हिंदी गाण्यात करवट बदलना असा शब्दप्रयोग शायर वारंवार करत असतात.)

आता शेराच्या लाक्षणिक अर्थाकडे वळू..............
(This is how the couplet sounds)…………

इथे आम्ही स्वत:ला वा आमच्या आयुष्याला शवाची उपमा दिली आहे.
जगताना आमची अवस्था एखाद्या शवाप्रमाणे, प्रेताप्रमाणे झाली होती.
आम्ही मृतवत् जगत होतो. निश्चल झालो होतो. किंबहुना जगाला आम्ही शववतच वाटू लागलो होतो!

आम्हाला या प्रेतवत जगण्यातही कूस बदलायला, स्वत:ला comfortable करायला, त्यातल्या त्यात जगण्यात जरा तरी जोम यायला या जगाने अवसरच दिला नाही. आमच्या जिवंतपणीच जगाने जणू आमची चिता तैनात ठेवली होती. आमच्या मरण्याची देखिल वाट पहायला जग तयार नव्हते. जिवंत असतानाच आम्हाला एखादे प्रेत समजून आमच्या अंत्यविधीची तयारी जगाने आगाऊच केली होती. आम्हाला श्वास घ्यायला देखिल वा कूस बदलायला देखिल अवसर मिळालाच नाही. स्थिरस्थावर व्हायलाही संधी मिळाली नाही. जणू जगाला आमचे अंत्यसंस्कार करण्याची घाई झाली होती, किंवा जगाने रचलेल्या आमच्या चितेलाच पेटण्याची घाई झाली होती. जणू आमची चिता आमच्या शववत् आयुष्याला कूस बदलायला देखिल किंचित अवसर द्यायला तयार नव्हती. कारण या जगातल्या लोकांना त्यांनी आमच्यासाठी रचलेल्या चितेला एकदाचे पेटवून आम्हाला संपवायचे होते.

हा शेर उपहासात्मक आहे. समाजात अनेक लोक स्वभावाने, वर्तनाने शांत जीवन जगत असतात. इतके शांत की, जणू एखाद्याला ते स्मशानी वा शववत् जीवन वाटावे. पण, ही पाषाणहृदयी दुनिया अशा माणसासही थोड्याश्या वा त्यातल्या त्यात जोमाने जगावयाची परवानगी देत नाही.
जणू शवाने कूस बदलायच्या आतच त्या शवाच्या चितेने पेट घ्यावे व एकदाचे बेचिराख व्हावे म्हणजे लोकांना जणू काही आपले कर्तव्यकर्म करून श्वास घ्यायला मोकळे वाटावे.
..................................................................................................
किरणजी!
चिता पेटणे, शवाने कूस बदलणे ही काव्याची भाषा झाली. यात गझलेचे कार्य/भूमिका वगैरे प्रश्न येतात कुठे?
शव म्हणजे प्रेत, निश्चेतन गोष्ट. मग ती कूस कसे बदलेल? असा प्रश्न केव्हा पडेल जेव्हा आपण या प्रतिमा वा त्यांची गुंफण लक्षात घेत नाही वा समग्र शेराचा अर्थ, त्याचा मूड त्याचा ध्वन्यार्थ लक्षातच घेत नाही.
इथे शवाने वा प्रेताने शब्दश: एका कुशीवर होणे असा अर्थ मुळी नाहीच.

शवाला कूसही बदलू दिले न जाणे, चितेला पेटण्याची घाई होणे......ही एक काव्यातील प्रतिकांची भाषा आहे, जी बरेच काही शब्दांच्या पलीकडचे बोलून जाते. असो.

शेवटचा शेर किरणजी आता आपल्याला पटावा व झेपावा! (रुचावाच असे म्हणत नाही, कारण रुचणे हे आपापल्या पिंडावर अवलंबून असते).

गझल हा आकृतिबंधच मुळात असा आहे की, एका गझलेतील विविध शेर हे विविध विषयांवर भाष्य करतात. इथे या शेरांचा एकमेकांशी संबंध नसतो, व तसा तो जोडायचाही नसतो.
तेव्हा तुटकपणा येण्याचा प्रश्नच नाही. कारण एका गझलेचे सर्व शेर हे cut piecesच असतात. प्रत्येकाची चव, मूड, आशय, अभिव्यक्ती, रुची वेगवेगळी असतात.
गझलेचे हे मूलभूत व्याकरण जर ध्यानात ठेवले तर कामयाब गझल आपल्याला निश्चितच सुखावेल, अशी माझी खात्री आहे.
आपल्या मनावर गीतांचा किंवा अगझल कवितांचा पगडा असावा असे वाटते. असो.
इथेच थांबतो! पुनश्च सर्वांस धन्यवाद!
..........प्रा.सतीश देवपूरकर
..................................................................................................

प्रा. सतीश देवपूरकरजी

मला आपल्याबद्दल वैयक्तिक आकस नाही. तुम्ही उलगडून दाखवलेला शेर हा प्रतिमांच्या सहाय्याने गूढार्थ मांडणारा आहे. याबद्दल गझलकारांमधे सहमती होईल का ? कारण अशा प्रकारच्या शेरांवर गझलकारांचे अभिप्राय प्रतिकूल येतात हे मी पाहिलेले आहे. शेर दुर्बोध नसावा असे ब-याच जणांचे म्हणणे आहे. अर्थात वेगळी वाट शोधणा-याला त्यात कितीसा वाव आहे याबद्दल कल्पना नाही. तसा परवाना असल्यास वेगळे प्रयत्न करणा-या गझलेचे अभिनंदन !

तुटकपणाची तक्रार ही वैयक्तिक आहे. ती गझलांच्या महापूर योजनेतून आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुठलीही कलाकृती आनंद देण्यासाठीच असते. मात्र एक शेर उपहासात्मक, एक भावनात्मक असं कॉम्बिनेशन स्विकारायला रसिक म्हणून मला तरी जड जातंच जातं. एका विशिष्ट मूडभोवती, एका रसाभोवती गुंफलेले शेर स्वतंत्र कविता म्हणून अस्तित्व कायम ठेवूनही भावतात. कधीतरी वेगवेगळ्या मूडचं पॅकेज नक्कीच चांगलं वाटतं. मात्र पहिला शेर उर्दू शेरामधली नजाकत सांभाळणारा.. अत्यंत उत्कट प्रणय मांडणारा तर दुसरा भ्रष्टाचारावर, तिसरा सरकारी कार्यालयातल्या अकार्यक्षमतेवर हे हल्ली पहायला मिळतंय. काहीतरी समान धागा.. उदा. प्रचंड विरोधाभास इ. असं काहीच त्यात नसतं. जे रुचत नाही आणि झेपतही नाही. यात काही गंमत असेल तर ती अनुभवायला मी असमर्थ आहे असं म्हणायला लागेल. कदाचित अजूनही मला नेमकं सांगता आलेलं नाही असं वाटतंय. असो. सारांश सांगायचा झाल्यास पहिल्या शेराचा परिणाम जितका मनावर रेंगाळतो तसा तो इतर शेरांमधे ब-याचदा जाणवत नाही.

कदाचित गझल हा प्रकार फुरसतसे, तबियतसे लिहीण्या - वाचण्याचा असावा ज्यात घाईगडबडीला स्थान नसावं. म्हणूनच घाईत वाचणे ही वाचकाची चूक होत असावी तर घाईत गझला पूर्ण करणे ही गझलकाराची चूक होत असावी.

एक सामान्य वाचक म्हणून मत दिलं होतं. आपापले विचार आहेत. आपण माझ्या म्हणण्याचा सखोल विचार केलात आणि मनापासून दखल घेतलीत याबद्दल मनापासून आभार.

नको रे किरण नको !! ........ तू उगाचच तुझा वेळ वाया घालवतोय्स बघ !!

अरे मित्रा इथे मी कशाला अहे मग ???

कूसही बदलू दिली नाही शवाला;
केवढी घाई चितेला पेटण्याची!

या शेरातून ज्या गोष्टी सूर्याप्रकाशासाराख्या स्वच्छपणे प्रकट होतात त्या अशा

हा शेर एका मेलेल्या माणसाने लिहिला असावा /जिवंत माणसाने दुसर्याच्या प्रेतयात्रेला गेल्यावर तिथे काय झाले याचे वृत्तान्तकथन केले असावे

शेरात शव आहे चिता आहे (दोन्ही निर्जीव ) जाळणारे जग (लोक जे जिवंत आहेत अजून ) घाई करत आहे
गम्मत म्हणजे अशात शवाला कूस बदलायची इच्छा झालीय (गम्मत>>>उपरोध/उपहास की काय म्हणतात ना ते....इथे मात्र फजिती या अर्थाने )

(केवळ या एका "गमतीदार" कविकल्पनेसाठी ; ..जी प्रा. साहेबाना नेहमीप्रमाणेच आमदभरी,कामयाब वगैरे वाटली असणार ...नक्की ...तिच्या मोहापायी , फक्त आणि फक्त टाळ्या मिळाव्यात या अपेक्षेने त्यांनी हा शेर लिहिला असावा ...जो नेमका फसला असावा ...भरवशाच्या म्हशीला टोणगा तशातला प्रकार !!)

एकूणच काय शेरातली एकही प्रतिमा,एकही गोष्ट ही रोमांचक , आल्हाददायी ,प्रासादिक , गझलीयतभरी ,शक्यतेच्या कसोटीवर उतरू शकेल अशी , लिहिणार्याने स्वत:अनुभवली असावी याची जराही शक्यता नसलेली ,वगैरे वगैरे वगैरे आहे

तात्पर्य :शेर प्रचंड गंडला आहे .............प्रा. साहेबही गंडलेत (तरी ते अजून नको नको ते फालतू तर्क-वितर्क लढवून आम्हाला( ...वाचकाना ) गंडवू पाहात आहेत नहमीप्रमाणे!!)

वैवकु!
आपल्या अगाध ज्ञानाला, तरल संवेदनशीलतेला, अणकुचिदार काव्यबोधाला, स्वर्गीय सौंदर्यबोधाला, दुर्मिळ कल्पनाशक्तीला व अचाट तार्किक बुद्धीला
कोप-यापासून नमस्कार! वरील आपले गुणविशेष आपल्या गझलेत उतरोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना! एका उंचीच्या रेघेपुढे दुसरी अधिक उंच रेघ काढण्याने माणसाची उंची कधीच वाढत नसते! रोखठोक बोलावे अन्यथा तोंडाची वाफ दवडू नये या मताचा मी तरी आहे!
टीप: कंपूंना, कळपांना, हांजी हांजी करणा-यांना माझ्या लेखी किंवा कुठल्याही हाडाच्या कलाकाराच्या लेखी किंमत शून्य असते! याउपर आपणासाठी माझ्याकडे फावला वेळ नाही. गझलेतून, शेरातून बोललात तर जरूर शेरातच उत्तर देईन!
नसता आणलेला आव हा जगाला कळतो! कर्णा घेवून शंखनाद करायची आवश्यकता नसते!
..........प्रा.सतीश देवपूरकर

शेरातून बोललात तर जरूर शेरातच उत्तर देईन!>>>>>>>>

हे घ्या....................................

______

कोणत्या दुसर्‍या भटांची शायरी शिकलास तू
आमुची पहिल्या भटांना विठ्ठलासम तोलते

______

तुझे ही शेर पर्यायी भ्रमाचे दाखले देती
तयांच्या सावलीतुन होच मित्रा मुक्त थोडेसे
____________

किती निर्भिडपणे पूर्वी गझल पाडायचो आम्ही
कुठुन हे देवसर आले नि अमुची ही दशा झाली

विजा घेवून येणार्‍या पिढ्यांचे स्वप्न सरणावर
चितेची राख करण्यास्तव पडा की देवसर खाली

गझल फडतूस असते रे तिची सोडून दे इच्छा
गुरू कर देवसर सुचतिल तुलाही शेर पर्यायी

कुणाच्या सर्टिफिकिटांची मला नव्हती तमा तेंव्हा
म्हणाले देवसर "हा शेर गोटीबंद का नाही ?
"

(या जमीनीवरचा शेर = मक्ता जमेल त्याने सुचवावा........ही गझल त्याची!! मक्त्यात "देवसर" हा शब्द येणे अनिवार्य ...जसा वरील प्रत्येक शेरात आला आहे तसा!!...गझलेचे शीर्षक "देवसर" असे निश्चित करण्यात आले आहे याची नोन्द घ्यावी ही विनन्ती तसेच; "विजा घेवून..."हा शेर अगोदरच हासिलेगझल जाहीर करण्यात येत आहे मागाहून स्वतःच्या शेरासाठी हा किताब द्यावा अशी किरकीर करू नये )
________

_/\_

उत्तर द्याच

आता गझलेतही सवाल-जवाब व्हायला लागले वाटतं?
त्याऐवजी गझलियतवर लक्ष केंद्रित करा मित्रांनो....उगाच चकल्या पाडल्यासारख्या गझला पाडू नका.