माझी पावले

Submitted by वैभव फाटक on 30 July, 2012 - 23:46

आली तुझ्या मागावरी चालून माझी पावले
रक्ताळली, पण चालली हासून माझी पावले

आश्चर्य याचे वाटले, सीमा कशी ओलांडली ?
प्रत्येकदा मी टाकली, मोजून माझी पावले

मी शोधला रस्ता नवा, नेईल जो विजयाकडे
नंतर किती गेले तिथे, पाहून माझी पावले

फासे पलटले प्राक्तनी, लाथाडले ज्यांनी कधी
मागे पुढे घोटाळले, वंदून माझी पावले

जादूभरी ताकद तिच्या होती मृदू शब्दांमधे
कित्येकदा आलो पुन्हा वळवून माझी पावले

बांधील होती आजवर, आला तुझा होकार अन..
सरसावली बेड्या जुन्या तोडून माझी पावले

------- वैभव फाटक ( २६ जुलै २०१२) -------

http://vaibhavphatak12.blogspot.in/2012/07/blog-post_30.html

गुलमोहर: 

मी शोधला रस्ता नवा, नेईल जो विजयाकडे
नंतर किती गेले तिथे, पाहून माझी पावले

जादूभरी ताकद तिच्या होती मृदू शब्दांमधे
कित्येकदा आलो पुन्हा वळवून माझी पावले<<

शेर व गझल छानच आहे

गझलेत एक मूड सांभाळल्यासारखे जाणवत आहे

अनेक शुभेच्छा