माझी फ्रान्सच्या पश्चिम किनारपट्टीवर राहणारी मैत्रीण सिसील, हिच्याकडे मी पंधरा दिवस राहणार म्हणून तिने पूर्ण पंधरा दिवस सुट्टी घेतली होती. तसा विशेष काही प्लान ठरला नव्हता. खरंतर मी सुट्टीला गेले की प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम "गुगल कीप" मधे बनवून ठेवते आणि अगदी तसच्या तसं करायला नाही जमलं तरी ढोबळमानाने एवढंतरी करायचय हे हाताशी राहातं. पंधरा दिवस तिच्या घरीच राहायचं तर प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम ठरवण्यापेक्षा एकूण सुट्टीत कायकाय मजा करायची एवढच दोघींनी मिळून ठरवलं होतं.
मागे मायबोली गणेशोत्सव उपक्रमात माझ्या बकेटलिस्ट बद्दल लिहिलं होतं. खूप लोकांनी ते आवडल्याचं आवर्जून सांगितलं होतं आणि त्यात शेवटी लिहिलेल्या माझ्या फ्रान्सभेट या इच्छेची लवकर पूर्तता व्हावी असा आशीर्वादही दिला होता. हा भाग दोन वाचण्यापूर्वी पहिला भाग नक्की वाचा.
https://www.maayboli.com/node/80116
मागच्यावेळी करोना सुरू असताना गोव्यात राहात होते असा बकेटलिस्टचा शेवट होता. आता तिथून पुढे -
शिक्षण झाल्यानंतर मी जी नोकरीत चिकटले ती अक्षरशः चिकटूनच राहीले. लहानपणी व्हॉलीबॉल आणि मल्लखांबाचा सराव आणि स्पर्धा, गिर्यारोहण शिबीरे यांमधून कसाबसा अभ्यास सांभाळणारी मी, घाण्याच्या बैलासारखी नुसतं काम नी काम करत होते. सकाळी लवकर ऑफिसला जाऊन रात्री उशीरा परत यायचं, आठवड्याची राहिलेली झोप शनिवारी पूर्ण करायची आणि रविवारी घरातली कामं आवरायची, बस इतकच चाललं होतं. आणि मग एक दिवस चण्डिगढच्या ऑफिसला नेमणूक झाली. दुपारी २ ते रात्री ११ च फक्त काम असल्याने रोज झोप पूर्ण होत होती आणि शनिवार जागेपणात जात होता. ऑफीसने दिलेल्या गेस्टहाऊस मधे राहत असल्याने घरची कामं करायचा राविवारही मोकळाच.