एक क्षण अभिमानाचा - सोनू.

Submitted by सोनू. on 28 August, 2025 - 06:54

माझी फ्रान्सच्या पश्चिम किनारपट्टीवर राहणारी मैत्रीण सिसील, हिच्याकडे मी पंधरा दिवस राहणार म्हणून तिने पूर्ण पंधरा दिवस सुट्टी घेतली होती. तसा विशेष काही प्लान ठरला नव्हता. खरंतर मी सुट्टीला गेले की प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम "गुगल कीप" मधे बनवून ठेवते आणि अगदी तसच्या तसं करायला नाही जमलं तरी ढोबळमानाने एवढंतरी करायचय हे हाताशी राहातं. पंधरा दिवस तिच्या घरीच राहायचं तर प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम ठरवण्यापेक्षा एकूण सुट्टीत कायकाय मजा करायची एवढच दोघींनी मिळून ठरवलं होतं. तिच्या हातचं फ्रेंच खाणं खायचं, चार दिवसांच्या जॅम्बॉ जत्रेत किमान दोन दिवस तरी खात पीत फिरायचं, तिच्या मित्रमैत्रिणींना भेटायचं, जवळपासचा भाग बघायचा आणि बाजूला असलेल्या स्पेनला भेट द्यायची एवढं नक्की होतं. बाकी जसं जमेल तसं.

सिसील पोलीस कॅप्टन आहे. कामानिमित्त पिस्तूल चालवतेच पण एक खेळ म्हणूनही तिला शूटिंग आवडतं. पोलीस शूटिंग मधे नॅशनल खेळणार आहे ती या वर्षी. तिच्या ऑफिसात जाऊन तिची बसायची जागा बघून आले. मी म्हटलं मला तुझं पिस्तूल बघायचय, तर म्हणाली सुट्टी असल्याने पिस्तूल घरीच आहे, घरीच दाखवते. पण मग पिस्तूल चालवून पण बघायचय का असं विचारलं. बापरे! पोलिसांचं पिस्तूल मी कसं चालवणार, मला काहीच कळलं नाही. मग तिने सांगितलं की तिचा शूटिंग क्लब स्पेनच्या अगदी बॉर्डरवरच आहे. दर रविवारी ती तिथे सराव करायला जाते. क्लबच्या कार्यकारी मंडळातही आहे. वर्षातून काहीवेळा तिला तिथे ऑफिसमधे बसून लोकांना सामान देणे, ठेवणे आणि इतर काही कामे करावी लागतात. अधेमधे कधी सभा असते त्यात भाग घ्यावा लागतो. तिथे इतर लोकही जाऊन शुटींग करू शकतात. मला काय, नेहमी नवीन काहीतरी करायची खुमखुमी असतेच, मी लगेचच हो म्हटलं.

तिच्या क्लबमधे गेल्यावर तिने विचारलं कशी पिस्तुल हवीय? मी म्हटलं मला काहीही गंध नाही याबाबत, तूच काय करायचं ते सांग. मग लहान बाळासारखं तिने विचारलं की झोपून शूट करायचय की उभं राहून, म्हटलं उभं राहून. मला मस्तपैकी तो ऑलिम्पिक मधला रुबाबात उभा राहिलेला तुर्कस्थानचा युसूफ डोळ्यासमोर दिसला. ओके, आता तिने विचारलं एका हाताने की दोन हातांनी चालणारी पिस्तूल हवीय? म्हणजे अशी पण वेगवेगळी असते? मला वाटलं की युसूफ एक हात खिशात ठेऊन होता ती त्याची स्टाईल होती पण नंतर कळलं की एका हाताची पिस्तूल अशीच धरायची असते आणि दुसरा हात असा पायावर दाबून ठेवायचा असतो, खिसा असेल तर खिशात हात घालून. ही थोडी हलकी असते. ती म्हणाली आज तुझी पहिलीच वेळ आहे तर दोन हातांनी पिस्तुल धरून कर. मग तिने 15 युरो भरून 22 long rifle pistol, 50 bullets, target board आणि बोर्ड लटकवायला चिमटे असं सगळं घेतलं. 25 मीटर दूर ते टारगेट ठेवायचं असतं.

France_Pistol.jpg

दोघींनी कानाला तिचे voice cancelling headphones लावून तिचं बोलणं मला ऐकायला येईल असं setting करून आम्ही शूटिंगच्या भागात आलो. तिथे आल्यावर आधी सुरक्षेचे नियम. पिस्तूलाची नळी कायम आणि कायम टार्गेट च्या दिशेने ठेवायची. पिस्तुल बॉक्स मधून बाहेर काढून, उघडून त्याच्या नळीत तिथे दोऱ्याला बांधून ठेवलेली प्लास्टिक दोरी घालून ठेवायची वर फोटोत लाल दोरी दिसतेय पिस्तूलाच्या नळीत. मग बुलेट्स आणि एक चार रंगांच्या रिफिली असलेला पेन बाजूला ठेवायचा. टार्गेट बोर्ड लावायला, बघायला तिकडे जायचं असेल तेव्हा सगळ्यांना विचारायचं त्यांचं झालय ना आणि त्यांची पिस्तूलं टेबलावर आहेत ना. मग तिथलं बटण दाबायचं ज्यामुळे लाल दिवा लागतो. हा सुरू-बंद होत असतो, डेंजर सिग्नल सारखा. मग सगळे तिकडे 25 मीटरवर जातात, तो टार्गेट बोर्ड कपडे सुकत घालायचे चिमटे असतात तशा चार चिमट्यांनी वरच्या आणि खालच्या दोरीला लटकवतात आणि परत येतात. सगळे आले याची खात्री झाली की तो जिवाच्या आकांताने फडफडणारा लाल दिवा बंद करायचा. मग पिस्तूल कसं धरायचं, revolver revolve कसं करायचं, एका वेळी फक्त पाच बुलेट भरून एक खण सुरक्षिततेसाठी रिकामा ठेऊन, तो बरोब्बर वर आणून लॉक कसं करायचं, उभं कसं राहायचं, हात कसे ठेवायचे, ट्रिगर कसा दाबायचा, पूर्ण ट्रिगर दाबणं जड जात असेल तर एक छोटा दट्या मागे ओढून कसं वापरायचं वगैरे दाखवलं. मग टार्गेट बघायचं कसं ते आकृती काढून दाखवलं.

Shooting_U.jpg

बुलेटच्या सिलेंडर जवळ एक बघायची खाच असते, सरळ रेषांचा यू आकार किंवा वरून उघडा चौकोन म्हणावी अशी. तिने मला फ्रेंच नावे सांगितली पण या मागच्या खाचेला rear sight म्हणतात. आणि मग नळीच्या टोकाला एक वर टोक आल्यासारखा भाग असतो, ती front sight. मागच्या खाचेच्या दोन बाजूची टोकं, त्यातून पुढचं टोक बरोबर मधात दिसलं पाहिजे आणि तीनही टोकं एका उंचीची दिसली पाहिजेत आणि मधल्या टोकासमोर ते टार्गेट दिसलं पाहिजे असं सगळं जमलं की गोळी झाडायची. मग दट्ट्या मागे ओढून पुढची गोळी. थिअरी मधे सगळं सोपं वाटलं पण एवढ्या लांबच्या एवढ्याशा पुठ्यावर गोळी खरच लागेल असं काही वाटलं नाही. ह्या पिस्तूलाची तिला सवय नसल्याने आधी मी मारून बघते म्हणाली आणि तिथे ठेवलेल्या एका बोर्ड वर सगळ्या मारलेल्या भोकांवर पेनाने मार्क करून तो बोर्ड लावून तिने पाच गोळ्या झाडल्या. मग त्या कशा लागल्या, कुठे निशाणा धरला पाहिजे वगैरे परत समजावलं. माझ्यासाठी माझा नवा कोरा बोर्ड लावला. मग सगळे परत आल्यावर पिस्तूल उघडून आत राहिलेले गोळ्यांचे अवशेष बाहेर कसे काढायचे आणि गोळ्या परत कशा भरायच्या दाखवून तिने पिस्तूल मला दिली. काही लोकांकडे दुर्बीण होती त्यामुळे त्यांना लगेचच दिसत होतं त्याची गोळी कुठे लागलीय ते.

ही पिस्तूल खरच थोडी जड असते, दोन्ही हातांनी नीट पकडूनपण हातांना नीट जमेल का अशी शंका वाटली. पहिली गोळी झाडली, ठो आवाज झाला. पुठ्यावर लागली की नाही कोण जाणे! हात जास्त हलला किंवा मागे आला नाही. पाय व्यवस्थित जमिनीत रुतल्यासारखे स्थिर होते. नीट जमलं म्हणाली तरी!

France_shooting.jpg

एक वेगळाच, अतिशय सुंदर असा अनुभव होता तो माझ्यासाठी. आई मला छोटीशी बंदूक दे ना, बंदूक घेईन सैनिक होईन, शत्रूला मारेन ठो ठो ठो अशी एक कविता होती ती आठवली. तसं कधी कुणाला मारायचं नव्हतं मला पण बंदूक चालवायची होती. कॉलेजला असताना मुलींसाठी असलेल्या राज्यस्तरीय adventure camp मधे निवड झाली होती, तिथे एका संध्याकाळी शूटींग होतं आणि तेव्हा रायफल हातात धरली होती. गोळी झाडल्यावर बंदूक खांद्यावर आपटलेली आठवतेय पण नेम पण तसा बाकीच्यांच्या मनाने चांगला लागलेला.

पहिल्या गोळीचा आनंद, आश्चर्य आणि अनुभव साजरा करुन मग अजून चार गोळ्या झाडल्या. मग तिने सांगितल्याप्रमाणे गोळ्यांचे अवशेष काढून, नव्या गोळ्या भरून परत पाच गोळ्या. मग आमची पिस्तूल at rest position मधे ठेऊन आम्ही वाट बघत बसलो बाकीच्या लोकांचं कधी होतय.

मग तो खरा निकालाचा क्षण आला. थोड्या गोळ्या पुठ्याला लागलेल्या दिसत होत्या पण किती, नेमक्या कुठे ते बघायचं होतं. लाईट पेटताच आम्ही पेन घेऊन धावलो. 10 पैकी चक्क 8 गोळ्या पुठ्यावर होत्या. एक तर सात च्या, काळ्या वर्तुळात होती. पहिल्याच वेळी इतका छान निशाणा लागेल असं वाटलं नव्हतं. 10 पैकी आठ गोळ्या पण भारीच माझ्यासाठी! बऱ्याचशा वरच्या उजव्या भागात लागल्या होत्या म्हणजे मला खालच्या डाव्या बाजूला निशाणा धरायला हवा आता. तिने निळ्या शाईच्या पेनाने सगळी भोकं मार्क करून ठेवली.

आता निशाणा बदलून परत सुरू केलं. दुसऱ्या आणि तिसऱ्या राउंडला दहापैकी 9 लाल पेनाने मार्क केल्या तर तिसऱ्या राउंडला परत 8 गोळ्या बोर्डावर हिरव्या पेनाने मार्क झाल्या. तीन 7 च्या वर्तुळात आणि चक्क एक 9 च्या वर्तुळात. 9 बघून मी तिथे उड्याच मारल्या. पहिल्याच प्रयत्नात 9 लागेल असं वाटलं नव्हतं. पुठ्यावर लागल्या तरी बास असं वाटत होतं पण 8 नी 9 म्हणजे माझ्यासाठी खूपच अभिमानाचा क्षण होता. सिसिल सुद्धा म्हणाली I am proud of you Sonu, very good for the first timer. आता ती ते केवळ माझी मैत्रीण म्हणून म्हणाली की शूटिंगमधल्या अनुभवामुळे, कोण जाणे!

तिच्या 5 आणि माझ्या 30 इतक्याच गोळ्या संपल्या पण मग वेळही संपली. आम्हाला यायला थोडा उशीर झाला होता आणि दुपारी बारा ला क्लब बंद होत होता. परत येऊ पुढच्या आठवड्यात सांगून आम्ही उडत उडत निघालो तिथून.

गोळीबार आवडला म्हणून हा प्रकार पुन्हा ट्राय करायचा असं ठरवलं होतं. बकेटलिस्ट बनवणं आणि त्या पूर्ण करणं हेच काम करायला घेतलय खरं तर नोकरी सोडल्यापासून. पण शूटिंग रेंज असलेल्या भारतातल्या भागात राहायचं तर मोठ्या शहरात राहावं लागेल जे मला नकोय. म्हणजे एकूणच हा बकेटलिस्ट आयटम खाली तळात, खोलात कुठेतरी रुतून बसणार आणि खुपत राहणार हे नक्की!

पण कोणा महान माणसाने म्हणून ठेवलच आहे की किसी चीज को दिलसे चाहो तो पूरी कायनात... त्या कायनातशी काय नातं आहे माझं कोण जाणे की मी जिथे हल्ली सर्वात जास्त दिवस वस्तीला असते त्या छोट्याशा गावात रायफल शूटिंग शिकवतात असं बहिणीला कळलं. इथल्या सैनिक स्कुलमधे विद्यार्थ्यांना शिकवतातच, इतर लोकही शिकू शकतील बहुदा, विचारुया म्हणाली. गेल्या महिन्यात झालेल्या राज्य शूटिंग स्पर्धेत इथल्या मुलांनी बरीच बक्षिसं मिळवली. मी जाऊन चौकशी करून आले मला पण शिकवतील का म्हणून, तर ही कोण बाई या गावात शिकायला आलीय म्हणून कधी कोणते खेळ खेळलीस का असं विचारलं त्या पूर्वाश्रमीच्या कर्नल असलेल्या शाळेच्या चेअरमननी. मी दोरी मल्लखांब आणि व्हॉलीबॉल जिल्हास्तरावर जिंकलेय पण ते 30-35 वर्षांपूर्वी असं सांगितलं. म्हटलं आता ते खेळ नाही जमत पण स्कुबा डायविंग आणि पॅराग्लायडिंग बऱ्यापैकी हल्लीचं आहे. कर्नल म्हटले की अजूनपर्यंत या गावात खेळाची आवड असलेल्या स्त्रिया खूपच कमी पाहिल्यात त्यामुळे सविस्तर माहिती विचारली. शिवाय या खेळाला हातात खूप ताकद लागते, ट्राय करा म्हणाले. पाच पेलेट्स देऊन, कसं उभं रहायचं, कसं दहा मीटर लांबच्या टारगेटवर नेम धरायचा आणि कशी गोळी सोडायची ते दाखवलं. 4, 5, 6, 8 आणि 9 अशा गोळ्या लागल्या. पहिल्यांदा प्रयत्न करणाऱ्या माणसासाठी 50 पैकी 32 म्हणजे फर्स्ट क्लास झालाच की! त्यांनी कोच सरांची ओळख करून दिली आणि या म्हटले पुढच्या आठवड्यापासून.

Shooting10m_range.jpg

रीतसर रजिस्ट्रेशन, फी वगैरे झाल्यावर कोचनी शिकवायला सुरुवात केली. पहिल्या दिवशी उभं रहायच्या आणि नेम धरायच्या प्रकारात मला काहीच जमत नव्हतं. इथे गाल टेकवा, कमरेत डावं कोपर खुपसून बंदूक नीट धरा म्हणजे हलणार नाही, दुसरा डोळा बंदं करण्याऐवजी चष्म्यावर कागद ठेऊन आत डोळा उघडाच ठेवा, काय नि काय, झेपतच नव्हतं. खूपच इकडे तिकडे गोळ्या लागल्या, 4, 5 अशा. खूप कमी गोळ्यांनी 7 चा काळा भाग भेदला. पण खरं ट्रेनिंग सुरू झालं होतं त्यामुळे काय चुकतं कशाने बरोबर येतं ते कळायला लागलं होतं.

दुसऱ्या दिवशी कोच नी सांगितलं की व्यायाम करून बंदूक धरायची प्रॅक्टिस फक्त करा. जितकी जास्तवेळ बंदूक धरता येईल तितका नेम चांगला लागेल. जेवढा वेळ नेम धरून उभं रहाता येईल तितकं रहायचं आणि दमलात की समोरच्या ऊशी सारख्या गोष्टीवर बंदुकीचं फक्त टोक टेकवायचं पण बंदूक हातातच धरून उभं रहायचं. पाय हलवायचे नाहीत. चाळीस मिनिटं केलं मी दर एक-दोन मिनिटांनी थांबत थांबत. यावेळी नेम नीट धरता येत होता. बंदूक हलत होती पण टार्गेट दिसत तरी होतं दोन्ही खाचांतून. वरच्या फोटोतली "कमरिया लचके रे" पोझिशन नीट जमायला अजून महिनाभराचा सराव करावा लागेल.

मग त्यांनी दहा पेलेट्स दिल्या. 7, 8 असे नेम लागले आणि मस्त वाटलं. चला, काळा गोळा भेदता येतोय, पण मग लगेच 6 लागला. गर्वाचे घर पांढऱ्यात! मग परत कोपर कंबरेच्या खोबणीत खुपसून तयार झाले आणि काय आश्चर्य, 8, 9 करत दोन गोळ्या 10 च्या वर्तुळाला पण लागल्या. कोच च्या चेहऱ्यावर फक्त "हं" एवढेच भाव होते त्यावरून त्यांनी असे हजारो 10 बघितले असतील हे कळलं, पण माझ्यासाठी पहिलेच 10. आपण जबरा खूष! पहिली स्कुबा डाईव, पहिली पॅराग्लायडिंग ची डाईव, तसे हे पहिले 10! ते ही फक्त तिसऱ्याच दिवशी. स्वर्गीय! 100 पैकी 85 गुण मिळाले. सहाव्या दिवशी 87. नंतर माझ्या मोठ्या भटकंतीमुळे थांबलय पण जेव्हाजेव्हा गावात असेन तेव्हा नक्की सराव करणार आहे मी.

Shooting_85.jpg

अशीच जास्तीत जास्त बंदूक धरून उभं राहायचा सराव करा मग चांगले नेम लागत जातील असं म्हणालेत सर. बघू मला अजून काय दिवे लावता येतात ते! कोच कडक शिस्तीत माझ्याकडून सगळं करवून घेणारे वाटताहेत. आतासे फक्त सहाच दिवस झालेत आणि दिवसेंदिवस निशाणा चांगला होत जातोय. कर्नल सर तर मला स्पर्धेत घेऊन जायचं म्हणताहेत. कोण जाणे स्पर्धेत उतरेन की नाही कारण हे मी फक्त छंदं म्हणून करतेय. स्पर्धा वगैरे म्हणजे रोज सराव, व्यायाम, सगळं व्यवस्थित करावं लागेल. मी दर महिना - दोन महिन्यांनी 10-12 दिवस आणि दर 8-10 महिन्यांनी 1-2 महिन्यांच्या मोहीमेवर कुठेतरी जात असते. या सगळ्या माझ्या पसाऱ्यात एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं कठीण आहे, खरंतर करायचं नाहीय कारण मला नुसतच मजा म्हणून सगळं करायला आवडतं! Jack of all, master of none. एकच गोष्ट निष्ठेने करत राहायचं माझं वय राहीलं नाही, मग जगभराचे अनुभव गोळा करायला वेळ मिळणार नाही अर्धी लाकडं मसणात असताना असं मी स्वतःला सांगत असते कायम Wink . बघू कसं होतं ते!

Shooting87.jpg

असो, ही मुलगी कधी काय करेल याचा काही नेम नाही म्हणणारांना आता मी सांगू शकते की माझे नेम चांगले लागतात हो!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा मस्तच की.
किती वेगवेगळे अनुभव घेऊन बघता तुम्ही!

आला आला.. लोकांचे अभिमान गळवून पाडणाऱ्या बाईंचा धागा आला Happy

जोक्स द अपार्ट,
मला या खेळाबद्दल फक्त सांड की आख चित्रपटातून थोडीफार माहिती होती.. त्यात तुम्ही आज बरीच भर टाकली Happy

अरे मस्त!
खूप दिवसांनी! तुझा लेख बघुन आता काही तरी एकदम हटके असणार खात्रीच होती.
>> नेम नाही म्हणणारांना आता मी सांगू शकते की माझे नेम चांगले लागतात >> Lol

भारी!!
तुमचं नाव वाचून अपेक्षेने उघडला धागा, आणि नेहमीप्रमाणेच थक्क झाले! Happy

सर्व प्रतिसदांबद्दल आभार. काही ना काही करत असते मी आणि वेळोवेळी लिहून ठेवत असते. असा काही उपक्रम आला की प्रकाशित करते झालं. आवर्जून प्रतिसाद दिलात त्याने खरच भरून पावलं.

मस्त लिहिलय!

वाचताना बरेच ठिकाणी " अरे वा! ". वाटून गेलं!
विशेष करून बकेट लिस्ट पूर्ण करत/ करण्यासाठी अनेक अनुभव घेताय .

पुढच्या मिशन साठी शुभेच्छा!

एकदम हटके अनुभव. आणि अर्थातच अभिमानाचा.

बकेट लिस्ट पुर्ण होऊदे म्हणजे आम्हाला काहीतरी छान हटके वाचायला मिळेल.

तुमचा काही नेम नाही हेच खरं!

ऑलिंपिक पाहून three position shooting इ. प्रकार कळले होते. पण एका हाताने आणि दोन हातांनी धरायचं पिस्तुल हा फरक कळला नव्हता. मला वाटायचं हे अंतरातले (distance) मधले फरक असतील.

दोन श्वासांच्या मधल्या वेळात गोळी चालवायची असं काही असतं का?

अजूनही गंभीरपणे घेतलं तर ऑलिंपिकमध्ये दोन तीन पदके मिळवाल. पहिल्या फोटोतल्या बोर्डावर तुमचा फोटो झळकेल.
इथे तर वयातर्ही अडथळा येत नाही ना? तो युसुफही पन्नाशीपल्याडचा होता.

तुमचा काही नेम नाही हेच खरं!>>>अगदीच खरं आहे. दर वेळी तू नवे काहीतरी करत असतेस. ज्या गोष्टी करून बघायचा आम्ही बहूतेक स्वप्नातही विचार करत नाही, त्या तुझ्या करून झालेल्या असतात.
बकेट लिस्टीतल्या नव्या ॲडिशन्स साठी बेस्ट लक.

भारी!!! वाटलचं होतं काहीतरी हटके वाचायला मिळणार! जबरदस्त!
अशीच तुमची बकेट्लिस्ट पुर्ण होतं राहो..

वरच्या सगळ्यांना मम आणि तुला वेलकमं. किती दिवसांनी दर्शन झालं.
मी पण तुला शुभेच्छा देते तुझी बकेट लिस्ट पूर्ण होवो, जेणेकरून आम्हाला ते वाचायला, अनुभवायला मिळेल. जियो सोनू Happy

आभार नवीन प्रतिसादांकरिता.

दोन श्वासांच्या मधल्या वेळात गोळी चालवायची असं काही असतं का? >> हो, श्वास घेत वा सोडत असताना गोळी चालवली तर बंदूक हलते. ती बंदूक धरून ठेवायची प्रॅक्टिस करताना श्वास रोखून ठेवला तर जास्त चांगलं. मला प्राणायाम / मेडीटेशन वगैरे करा म्हणाले तिथले मुख्याध्यापक. मी म्हटलं मला फ्री डायविंग शिकायचं होतं त्यामुळे दीड मिनिटं श्वास रोखून ठेवायची सवय आहे, त्याहून जास्त लागेल का, तर म्हणे नाही, तेवढं खूप झालं.
ऑलिम्पिक वगैरे काही नाही पण आमचे कर्नल साहेब म्हणाले की राज्यस्तरीय स्पर्धेत तुम्ही सहज जाऊ शकता. बघू, पुढच्या जुलै पर्यंत सातत्य राहिलं तर! मग पुढच्या गणपतीत अजून एक धागा घेऊन येईन स्पर्धेबद्दलचा Wink

वा अगदीच अभिमान वाटावा असा प्रवास आहे तुमचा. आधीचे लेख सुद्धा वाचलेले आहेत. हे आता अगदीच नवीन काही तरी केले आहे. फारच भारी.

पुढच्या गणपतीत अजून एक धागा घेऊन येईन स्पर्धेबद्दलचा >> असा धागा नक्की येऊ दे या शुभेच्छा देतो Happy

आईशप्पथ! काय जबराट वाटलं असेल!! हे वाचून माझ्या बकेट लिस्ट मधला हा आयटम आता बाहेर काढावाच असं वाटायला लागलं आहे. तू प्रचंड इन्स्पायर केलं आहेस मला.

मस्त लेख.

मस्तच.. i know the feeling!
म्हैसूरच्या एका रेंजवर बरीच प्रॅक्टिस केली आहे. नीट instruction ऐकल्या आणि 10 पैकी 10 pallet, 8 काळ्या वर्तुळात, पैकी तीन सात आठ आणि नऊच्या रिंगणात..
दुसऱ्या राउंडला श्वासावर लक्ष दिलं आणि गृपिंग मस्त आलं.. 1 bulls eye!
तिसऱ्या राउंडला हुकला पण सगळे शॉट 6 च्या वरच आले

नन्तर जेवढ्या वेळा गेलो तेवढ्या वेळा 2-3तरी 10 पॉईंटर घेतले.. म्हैसूर रेंज स्वस्त होती, रिटायर्ड आर्मी मॅन instructor होता, जो स्वतः चॅम्पियन पण होता..

पुण्याला आलो तेव्हा 2 वेळा गेलो रेंजवर एका पण नंतर खिसा नाही म्हटला

हा लेख आणि अजिंक्यराव यांचा प्रतिसाद वाचून इथे अर्ध्या पाऊण तासांच्या अंतरावर आणि खिशाला परवडेबल रेंज आहे का शोधतो.
एनसीसीत फायरिंग शिकवायचे, तेव्हा 303 ही रायफल होती. ती पालथे पडुन चालवायची. त्यात चांगली नेमबाजी होती. स्कोअर वगैरे आठवत नाही.

अजिंक्यराव, मस्तच!
मानव, तुम्ही हैदराबाद मधे रहाता ना? तिथे बर्याच रेंजस् आहेत. घराजवळ आणि परवडेबल मिळून जाईल. मला त्या लांब पडतात कारण मी तिथून दिडशे किलोमीटर वर रहाते. आता सुट्टी संपवून मंगळवारी हैदराबादेत उतरेन आणि मग तिथून पुढे घरी. बुधवारपासून पुन्हा सराव सुरू होईल.
इथे शाळेत विद्यार्थ्यांना जेवढी फी आहे तेवढीच मला द्यायला सांगितलीय "तुमच्या येण्यामुळे ईतर मुली / स्त्रियांना प्रेरणा मिळेल" म्हणे. हा फायदा असतो छोट्या गावात राहायचा, वासरात लंगडी गाय Wink