कोविड१९ : दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ

Submitted by हेमंतकुमार on 26 April, 2021 - 07:02

लेखमालेतील मागचा धागा :
कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
https://www.maayboli.com/node/78455
..................................

दिनांक 16/ 3/ 2020 पासून आपण कोविड१९ धाग्यांवर महाचर्चा करीत आहोत. जगभरात अजूनही या महासाथीचा जोर कायम आहे. या साथीचा जनक म्हणजे करोना-सार्स २ हा विषाणू. गेल्या काही महिन्यात त्याने उत्परिवर्तन करून नवे अवतार जन्माला घातले. या अवतारांपैकी काही मानवी शरीरात नव्याने धुमाकूळ घालत आहेत. ते अधिक रोगप्रसारकही आहेत. गतवर्षी या आजाराचे प्रमाण वृद्ध आणि सहव्याधीग्रस्तांत जास्त होते. सहसा कुटुंबातील एखाददुसरी व्यक्तीच आजारी पडत होती. यंदा मात्र ही समीकरणे पूर्ण बदलली असून आता तरुण आणि एरवी निरोगी असणारी मंडळीही बऱ्यापैकी बाधित आहेत. एखाद्या कुटुंबात हा विषाणू घुसला की त्यातील सर्वांनाच गाठू पाहतोय.

भारतात या आजाराची दुसरी लाट चांगलीच उसळली आहे. रुग्णसंख्येच्या मानाने विविध रुग्णालय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यात रुग्णालयात छोटे-मोठे अपघात होऊन गंभीर घटना आणि त्यातून मृत्यू देखील उद्भवले आहेत. मेडिकल ऑक्सिजनचा अभूतपूर्व तुटवडा ही एक ठळक घटना. त्यातून उद्भवलेला सामाजिक उद्रेक आणि तापलेल्या राजकारणाने एप्रिलचे वातावरण अधिकच गरम झाले. जागतिक पातळीवरही ही लाट तेजीत आहे. महासाथीत आतापर्यंतच्या एकूण बाधित व मृत्यूंपैकी १/३ संख्या गेल्या ३ महिन्यांतील आहे.

दरम्यान या विषाणूविरोधातील बऱ्याच देश-विदेशी लसी आता उपलब्ध आहेत. लसीकरणानेही वेग घेतला आहे. जगाच्या विविध भागात ते कमीअधिक गतीने चालू आहे. अर्थात त्यामुळे मिळणारे संरक्षण कितपत आणि किती काळ मिळेल हे अद्याप सुस्पष्ट नाही. मात्र पूर्ण लसवंत व्यक्तींना भविष्यात हा आजार झालाच तरी तो गंभीर नसेल. उपचारांच्या आघाडीवर अजूनही विशिष्ट रामबाण औषधाची वानवा आहे. पूर्वीच्याच काही प्रस्थापित औषधांचा गरजेनुसार वापर चालू आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींतही संशोधन चालू आहे. अशा उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करीत मानवजात या विषाणूशी झुंजत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे ही आशादायक बाब.

लेखमालेच्या मागच्या धाग्याची पृष्ठसंख्या लवकर आणि बरीच फुगली. तसेच तिथली स्वसंपादनाची मुदतही लवकरच संपेल. या कारणास्तव हा नवा धागा काढतोय. उत्साही व जागरुक वाचकांच्या सहकार्याने उत्तम चर्चा होत आहे. मागील धोरणानुसार या धाग्याच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मूळ लेखाच्या शेवटी दिनक्रमे समाविष्ट करीत राहीन. नवनवीन वाचकांना त्याचा उपयोग व्हावा ही इच्छा.

ही जागतिक आपत्ती लवकर संपो आणि कोविडचर्चाही संपुष्टात येवोत या सदिच्छेसह नवीन धाग्यास प्रारंभ करू.
....................................................
चर्चेतील महत्वाचे :
२८/४/२१
Tocilizumab एक प्रकारची अँटीबॉडी असून मध्यम आणि तीव्र covid-19 रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सच्या बरोबरीने दिली जाते.
ती तीव्र दाह नियंत्रणात आणायला मदत करते. त्यामुळे फुफ्फुसांचा बचाव होतो.
सध्या हे औषध आयात करावे लागते आणि ते पेटंट कायद्याखाली आहे. म्हणून महाग आहे.
......................................
१/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार
सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.
अनेक प्रकारच्या फंगस पासून हा आजार होऊ शकतो. साधारणपणे हा आजार झालेल्या लोकांमध्ये मधुमेह बराच अनियंत्रित असतो आणि रक्ताची तपासणी केल्यावर न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या पेशी बऱ्याच कमी झालेल्या असतात.
या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.
...................................................................
१/५/२१
सामान्य जनतेने एकावर एक असे 2 मास्क किंवा N 95 वापरायची गरज नाही ( विषाणूचा नवा प्रकार आलेला असला तरीही). मास्कच्या प्रकारापेक्षाही तो व्यवस्थित लावणे आणि नाका-तोंडावर टिकवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
तो घट्ट विणीच्या कापडाचा असावा ही सूचना आहे.
...............................................................
४/५/२१
Procalcitonin (PCT) हे एक प्रथिन आहे. त्याची रक्तपातळी मोजणे हे विविध जंतुसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी उपयुक्त असते. विविध जंतूसंसर्गांमध्ये ही पातळी बरीच वाढते आणि जसा आजार वाढतो तशी ती अधिकाधिक वाढते.
तीव्र कोविड रुग्णांमध्ये ती मध्यम आजारापेक्षा चौपट असते. जर आजार पुढे गंभीर झाला तर ती पातळी आठपटपर्यंत सुद्धा वाढते.
............................
६/५/२१
या महासाथीत वर्षभरात बाधीत पिढीचे संक्रमण असे झाले :
वृद्ध व सहव्याधिग्रस्त >> मध्यमवयीन >> तरुण>> ?? मुले.
साथरोगशास्त्रात याला ‘डेमोग्राफिक शिफ्ट’ असे म्हणतात. हे तसे अपेक्षित असते.
हे असे का होते यासंदर्भात दोन मुद्दे :

१. विषाणूचे नवे अवतार (उदाहरणार्थ b117) : यामुळे जो आजार होतो त्यात रुग्णांच्या शरीरात विषाणू घनता पूर्वीपेक्षा जास्त आहे >> रोगप्रसार वाढतो>> अधिक वयोगट बाधित होतात.
२. लसीकरण ज्येष्ठांपासून लहानांकडे या क्रमाने होत जाते. त्यामुळे जेष्ठ लसवंत पिढीत नवे रुग्ण तुलनेने कमी निर्माण होतात. आता असंरक्षित वयोगटांमध्ये नवे रुग्ण दिसू लागतात.
...................................................
८/५/२१
भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आज दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते. मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.
..........................
१०/५/२१
१. एकूण रुग्णांच्या जेमतेम दोन टक्के गटात सिटीस्कॅन करायची गरज असते; सौम्य कोविडमध्ये त्याची अजिबात गरज नाही.
२. सिटीस्कॅनचा अनावश्यक वापर केल्यावर अजून एक त्रास वाढतो. स्कॅनची प्रक्रिया बंद वातानुकुलीत खोलीत होते. तिथे जितके जास्त रुग्ण आणले जातील तितका रुग्णाकडून संबंधित तंत्रज्ञांना होणारा रोगप्रसारही वाढतो.
..................................................
११/५/२१
कोविडकाळात दातांच्या समस्यांसाठी :
डेंटलदोस्त’ हा २५ दंतचिकित्सकांचा चमू आहे. ही निदानसेवा विनामूल्य २४ x ७ उपलब्ध आहे
दूरभाष क्रमांक 77975 55777
.....................................................
१४/५/२१
पहिल्या प्रकारच्या लसीनंतर दुसऱ्या डोसला दुसऱ्या प्रकारची लस देणे हा विषय सध्या प्रयोगाधीन आहे.
भारतात तरी याला अजून आयसीएमआरची मान्यता नाही.
....................................................
१६/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते.
..................................................
१८/५/२१
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
जरी केंद्रीय कृती दलाची या उपचाराला शिफारस नसली तरी स्थानिक डॉ त्यांच्या अनुभवानुसार तो वापरू शकतात. याला ‘ऑफ-लेबल’ वापर म्हणतात.
....................................
१९/५/२१
मुळात बुरशीजन्य आजार दुर्मिळ आहे. एरवी तो खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दिसू शकतो :
१. रक्ताचे कर्करोग
२. अवयव प्रत्यारोपण नंतर स्टिरॉइड्स आणि अन्य तत्सम औषधे दिलेले
३. तीव्र भाजलेले.
एरवी अशा रुग्णांचे एकूण समाजातील प्रमाण तसे कमी असते. त्यामुळे अशातील ज्यांना हा बुरशीजन्य आजार होतो त्यांचे प्रमाण अजूनच खूप कमी दिसते.
सध्या कोविडची महासाथ असल्याने प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या मूळ रुग्णांची संख्याच प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने बुरशीजन्य आजार अधिक दिसत असावा.
................................
२०/५/२१
१. या बुरशीजन्य आजाराचे शरीराच्या भागानुसार काही प्रकार असतात त्यापैकी एक म्हणजे त्वचेवर जखम होऊन त्यातून contamination मुळे हा जंतुसंसर्ग होतो.
२. आत्यंतिक कुपोषण हे सुद्धा एक कारण आहे.
३. काही अभ्यासांमध्ये कुठलेही कारण अथवा पूर्वीच्या सहव्याधी नसलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळलेला आहे
.............................................................
२१/५/२१
२ डी- ग्लुकोज या नव्या विकसित झालेल्या औषधाचे व्यापारी वितरण भारतात जूनच्या मध्यावर होईल असे संबंधित उद्योगाने जाहीर केले आहे.
......................
२३/५/२१
सौम्य ते मध्यम कोविडच्या (अधिक धोका असलेल्या रुग्णांच्या) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.
..................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी आज rt pcr test पॉसिटीव्ह आलीय. लस घ्यायचा कंटाळा केला आणि कोविड झालाच शेवटी. डॉक्तरने फॅबिफ्लू आणि अजून गावभरच्या गोळ्या दिल्यात. आठ दिवस असेच रेटले पण आता बघू कधी निगेटिव्ह होतोय रिपोर्ट.

कोव्हीड, तत्सम संसर्ग असणारे रोग झाले तेव्हा पौष्टिक परंतु मिताहार चांगला की नेहमी एवढा आहार चांगला?
पौष्टिक मध्ये जीवनसत्व, इलेक्ट्रोलईट्स, खनिजे यावर भर देऊन उर्जे करता सुपाच्य कर्बोदके घ्यावीत की प्रथिनांवर नेहमीपेक्षा अधिक भर द्यावा?

पचनसंस्थेवरील ताण शरीराच्या विषाणूंशी लढण्याच्या कार्यात बाधा आणू शकतो का, की दोन्ही स्वतंत्र प्रक्रिया आहेत एकमेकांशी संबंध नाही.

जिद्दू
शुभेच्छा
..
मानव
अल्पकालीन संसर्गजन्य आजारात हे योग्य वाटते:
"पौष्टिक मध्ये जीवनसत्व, इलेक्ट्रोलईट्स, खनिजे यावर भर देऊन उर्जे करता सुपाच्य कर्बोदके"

दीर्घकालीन आजारात त्याच्या स्वरूपानुसार योग्य तो सल्ला असेल.

लसीमुळे मिळालेली प्रतिकारशक्ती आणि या आजारामुळे मिळालेली प्रतिकारशक्ती यात अधिक चांगले काय ?

या दोन प्रकारच्या प्रतिकारशक्तीमध्ये काही मूलभूत फरक आहेत :

लसीमुळे मिळणारी:
१. यात अँटीबॉडीज अधिक उच्चतम पातळी लवकर गाठतात
२. पण त्या अतिविशिष्ट प्रकारच्या असतात (उदाहरणार्थ विषाणूच्या टोकदार प्रथिनाविरुद्ध)

आजारामुळे मिळणारी:
१. ही व्यापक स्वरूपाची म्हणजेच संपूर्ण विषाणूविरोधी असते.
२. तिचे प्रमाण आजाराच्या तीव्रतेनुसार राहते

३. ती हळूहळू वाढत जाते आणि विकसित होते.
४. भविष्यात ती विषाणूच्या नव्या प्रकारांचाही मुकाबला करू शकते.

आजारामुळे मिळालेली प्रतिकारशक्ती लस घेतल्यानंतर निष्प्रभ किंवा कमी प्रभावी होऊ शकते का?

नाही.
उलट आजार होऊन गेलेल्यानी नंतर लसीकरण केले तर ते अधिक फायदेशीर ठरते.
अशाप्रकारे मिळणार्‍या दुहेरी प्रतिकारशक्तीला संकरित (हायब्रीड) असे म्हटले जाते.

https://www.nature.com/articles/d41586-021-02795-x

Faheem Younus, MD
@FaheemYounus
·
COVID: Nu Variant

What is: “Ban flights from Africa”
What should be: Send resources (vaccines, funding, therapeutics) into Africa
Just 4% of Africans are vaccinated
Please. Think big

गरीब मागास देशांना लस न देता लशींचे साठे अडवून ठेवून आणि आपल्या नागरिकांना तिसरा डोस देऊन आपण सुरक्षित राहू असा श्रीमंत , प्रगत देशांचा विचार आहे.

तिकडे प्रेसिडेंट बिडेन लशीवरचं पेटंट रद्द करायचा विचार करताहेत त्याला वर्ष होईल.

+११

कर्नाटकमधील धारवाड येथील एसडीएम कॉलेज ऑफ मेडिकल सायन्समध्ये १८२ विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे. गुरुवारी हा आकडा केवळ ६६ इतका होता. धक्कादायक बाब म्हणजे करोनाचा संसर्ग झालेले विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी करोना लसींची दोन्ही डोस घेतले होते.

https://www.loksatta.com/desh-videsh/karnataka-medical-college-party-cor...

South Africa मध्ये लसींची कमी नाही. उलट त्यांनी फायझर आणि जॉन्सन या कंपन्यांना 'आता आणखी लसी पाठवू नका' असं सांगितलं आहे.
https://www.bloomberg.com/news/articles/2021-11-24/s-africa-wants-j-j-pf...

भारतानेही साऊथ आफ्रिकेला 1 मिलियन कोविशील्ड लसी अगदी 2021 च्या सुरुवातीलाच पाठवल्या होत्या. पण त्या effective नसतील असं म्हणून त्यांनी वापरल्याच नाहीत. सीरम इन्स्टिट्यूटने पेमेंटचा refund दिला होता.
https://www.livemint.com/companies/news/serum-institute-of-india-fully-r...

अमेरिका युरोप भारतासारखे देश आता जगाला लसी पुरवायला समर्थ आहेत. पण उपलब्ध असूनही लस घेणार नाही असा बाणा असल्यास कोणी काही करू शकत बही.

WHITEHAT >> +१

साउथ अफ्रिकेत युरोपचा प्रभाव खूप आहे. अनेक पिढ्या साउथ आफ्रिकेत राहणारे युरोपिअन्स (जास्त करून इंग्रज) मूळ देशातही आपले हितसंबंध, नाती, बिझनेस, पैसा, घरं वगैरे बाळगून आहेत. मूळ देश ते साउथ आफ्रिका येणे जाणे खूप प्रमाणात व सतत असते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेत युरोपिअन लोकांचा भरपूर प्रभाव आहे. लस न घेणे वगैरे प्रकार युरोपातून इकडे आले आहेत. सरकारने भरपूर प्रयत्न करूनही लस न घेणे थांबलेले नाही. देशाकडे लशींचा साठाही भरपूर आहे.

तसंच साउथ आफ्रिकेत नविन वेरीएंट सापडला आहे असं मिडीया सगळीकडे ओरडतीए, त्या वेरीएंटचे पेशंटस ब्रिटनमधे सा आ पेक्षा जास्त आहेत. ब्रिटन्/युरोपमधून तो वेरीएंट सा आ मधे आला असल्याची शक्यता दाट आहे. सा आ ची 'चूक' एवढीच झाली की लगेच पावले उचलून सिस्टीमॅटीकली त्या लोकांना वेगळं काढून आवश्यक ती प्रीकॉशन्स घ्यायला सुरूवात केली. WHO ला ताबडतोब कळवले. त्याचे फळ म्हणजे ब्रिटनने तातडीनं सा आ विमानांवर बंधनं घातली. त्यांचा कित्ता इतर देशांनी गिरवला. आता सा आ चिडले आहे, 'आम्ही जे उपाय केले त्याची शिक्षा मिळाली' असा सूर उमटतो आहे. या बंदीमुळे आता नविन वेरीएंट सापडले तरी कुठले देश जाहिर करणार नाहीत किंवा लपवतील.

तिसरी लाट येणार वाटत आता फेब्रुवारी मध्ये Uhoh
ही असेच चालु राहणार का फेबु मध्ये लाट येण्यास सुरवात ती ऑगस्ट,सप्टेंबर मध्ये जाणार म अक्टूबर नोव्हेंबर मध्ये निवांत.

वरचं ट्वीट आफ्रिका खंडाबद्दल आहे. द. आफ्रिका या देशाबद्दल नाही.
आफ्रिकेत फक्त २५% वैद्यक कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालं आहे.

आफ्रिका खंडात 50+ देश आहेत. त्यांच्यावर सरसकट ट्रॅव्हल बॅन लावलेला नाही. बायडनच्या नवीन बॅनमध्ये साऊथ आफ्रिका हा मोठा देश आणि इतर 6-7 शेजारचे छोटे देश आहेत. नवीन स्ट्रेन साऊथ आफ्रिकेत सापडला आहे. तिथे vaccine ची कमतरता नाही.
एकूणच आफ्रिका खंडात WHO च्या मते hesitancy ची समस्या मोठी आहे.
https://www.business-standard.com/article/international/who-says-vaccine...

तसंच साउथ आफ्रिकेत नविन वेरीएंट सापडला आहे असं मिडीया सगळीकडे ओरडतीए, त्या वेरीएंटचे पेशंटस ब्रिटनमधे सा आ पेक्षा जास्त आहेत. ब्रिटन्/युरोपमधून तो वेरीएंट सा आ मधे आला असल्याची शक्यता दाट आहे.//

शक्य आहे. आता साऊथ आफ्रिकेवर बॅन आला असला तरी लवकरच सगळे देश एकमेकांना बॅन करू लागतील अशी चिन्हे दिसत आहेत. कारण व्हिसा होल्डर बॅन केले तरी सिटीझनना बॅन करता येत नाही आणि त्यांच्याकडून नवीन स्ट्रेन जगभर पसरणार. Nobody is safe till everybody is safe. Large scale hesitancy by any nation/community will not only impact them but also others due to new mutants.
लसी प्रभावी ठरल्या तर प्रश्नच नाही अन्यथा world is back to square one.

दक्षिण आफ्रिकेतून उगम पावलेला नवा प्रकार ओमायक्रॉन

त्याबद्दल विविध बातम्या येऊ लागल्या आहेत. तूर्तास त्याच्यावर अभ्यास चालू आहे आणि खात्रीशीर वैज्ञानिक काहीच जाहीर झालेले नाही. या उपप्रकारामुळे काय परिणाम होतील याचा अभ्यास तीन आघाड्यांवर चालू आहे :

१. त्याची प्रसारक्षमता
२. आजार अथवा लसीमुळे मिळालेल्या प्रतिकारशक्तीवर तो मात करू शकतो का ?
३. त्याच्यामुळे होणाऱ्या संभाव्य आजाराची तीव्रता

जशी अधिकृत माहिती मिळेल तशी या मुद्द्यांमध्ये भर घालेन.

तूर्तास अधिकृत सूत्रानुसार या प्रकारामुळे निर्माण झालेल्या नव्या केसेसचा खात्रीशीर आकडा असा आहे :
जगभरात एकूण 113

(दक्षिण आफ्रिका 99
बोटस्वना 6
इंग्लंड व HK प्रत्येकी २
इतर 4)

करोनाचे काही फायदेही आहेत. कोविडमुळे मस्त सुट्ट्या भेटल्या आणि त्या छपरी लस घ्यायचा ताण वाचला. आजाराची ताजी इम्युनिटी वर्षभर तरी पुरेल मला आता Proud

कोविडमुळे मस्त सुट्ट्या भेटल्या आणि त्या छपरी लस घ्यायचा ताण वाचला.
प्रतिसाद गमतीनी लिहिलेला आहे हे माहीत असूनही पचायला थोडा जड आहे.

तूर्त वृत्तमाध्यमातील बातम्या, अंदाज आणि सनसनाटी याकडे दुर्लक्ष केलेले बरे होईल.
जशी अधिकृत वैज्ञानिक माहिती बाहेर येईल तसे अधिक सांगता येईल.

>> जशी अधिकृत वैज्ञानिक माहिती बाहेर येईल तसे अधिक सांगता येईल.

ओमिक्रॉनची चर्चा दिवसेंदिवस वाढत आहे. नवनवीन खुलासे होत आहेत. मला वाटतंय कुमार सरांनी कोविड१९ मालिकेत पुढचा धागा ओमिक्रॉनवर काढून अद्यायवत माहिती सर्वाना दिली तर उपयुक्त होईल.

महाराष्ट्र टाईम्स मधली कालची बातमी:
तब्बल 32 म्यूटेंटने मिळून बनला कोरोनाचा नवा भयंकर B.1.1.529 व्हेरिएंट

Pages