कोविड१९ : दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ

Submitted by हेमंतकुमार on 26 April, 2021 - 07:02

लेखमालेतील मागचा धागा :
कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
https://www.maayboli.com/node/78455
..................................

दिनांक 16/ 3/ 2020 पासून आपण कोविड१९ धाग्यांवर महाचर्चा करीत आहोत. जगभरात अजूनही या महासाथीचा जोर कायम आहे. या साथीचा जनक म्हणजे करोना-सार्स २ हा विषाणू. गेल्या काही महिन्यात त्याने उत्परिवर्तन करून नवे अवतार जन्माला घातले. या अवतारांपैकी काही मानवी शरीरात नव्याने धुमाकूळ घालत आहेत. ते अधिक रोगप्रसारकही आहेत. गतवर्षी या आजाराचे प्रमाण वृद्ध आणि सहव्याधीग्रस्तांत जास्त होते. सहसा कुटुंबातील एखाददुसरी व्यक्तीच आजारी पडत होती. यंदा मात्र ही समीकरणे पूर्ण बदलली असून आता तरुण आणि एरवी निरोगी असणारी मंडळीही बऱ्यापैकी बाधित आहेत. एखाद्या कुटुंबात हा विषाणू घुसला की त्यातील सर्वांनाच गाठू पाहतोय.

भारतात या आजाराची दुसरी लाट चांगलीच उसळली आहे. रुग्णसंख्येच्या मानाने विविध रुग्णालय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यात रुग्णालयात छोटे-मोठे अपघात होऊन गंभीर घटना आणि त्यातून मृत्यू देखील उद्भवले आहेत. मेडिकल ऑक्सिजनचा अभूतपूर्व तुटवडा ही एक ठळक घटना. त्यातून उद्भवलेला सामाजिक उद्रेक आणि तापलेल्या राजकारणाने एप्रिलचे वातावरण अधिकच गरम झाले. जागतिक पातळीवरही ही लाट तेजीत आहे. महासाथीत आतापर्यंतच्या एकूण बाधित व मृत्यूंपैकी १/३ संख्या गेल्या ३ महिन्यांतील आहे.

दरम्यान या विषाणूविरोधातील बऱ्याच देश-विदेशी लसी आता उपलब्ध आहेत. लसीकरणानेही वेग घेतला आहे. जगाच्या विविध भागात ते कमीअधिक गतीने चालू आहे. अर्थात त्यामुळे मिळणारे संरक्षण कितपत आणि किती काळ मिळेल हे अद्याप सुस्पष्ट नाही. मात्र पूर्ण लसवंत व्यक्तींना भविष्यात हा आजार झालाच तरी तो गंभीर नसेल. उपचारांच्या आघाडीवर अजूनही विशिष्ट रामबाण औषधाची वानवा आहे. पूर्वीच्याच काही प्रस्थापित औषधांचा गरजेनुसार वापर चालू आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींतही संशोधन चालू आहे. अशा उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करीत मानवजात या विषाणूशी झुंजत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे ही आशादायक बाब.

लेखमालेच्या मागच्या धाग्याची पृष्ठसंख्या लवकर आणि बरीच फुगली. तसेच तिथली स्वसंपादनाची मुदतही लवकरच संपेल. या कारणास्तव हा नवा धागा काढतोय. उत्साही व जागरुक वाचकांच्या सहकार्याने उत्तम चर्चा होत आहे. मागील धोरणानुसार या धाग्याच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मूळ लेखाच्या शेवटी दिनक्रमे समाविष्ट करीत राहीन. नवनवीन वाचकांना त्याचा उपयोग व्हावा ही इच्छा.

ही जागतिक आपत्ती लवकर संपो आणि कोविडचर्चाही संपुष्टात येवोत या सदिच्छेसह नवीन धाग्यास प्रारंभ करू.
....................................................
चर्चेतील महत्वाचे :
२८/४/२१
Tocilizumab एक प्रकारची अँटीबॉडी असून मध्यम आणि तीव्र covid-19 रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सच्या बरोबरीने दिली जाते.
ती तीव्र दाह नियंत्रणात आणायला मदत करते. त्यामुळे फुफ्फुसांचा बचाव होतो.
सध्या हे औषध आयात करावे लागते आणि ते पेटंट कायद्याखाली आहे. म्हणून महाग आहे.
......................................
१/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार
सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.
अनेक प्रकारच्या फंगस पासून हा आजार होऊ शकतो. साधारणपणे हा आजार झालेल्या लोकांमध्ये मधुमेह बराच अनियंत्रित असतो आणि रक्ताची तपासणी केल्यावर न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या पेशी बऱ्याच कमी झालेल्या असतात.
या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.
...................................................................
१/५/२१
सामान्य जनतेने एकावर एक असे 2 मास्क किंवा N 95 वापरायची गरज नाही ( विषाणूचा नवा प्रकार आलेला असला तरीही). मास्कच्या प्रकारापेक्षाही तो व्यवस्थित लावणे आणि नाका-तोंडावर टिकवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
तो घट्ट विणीच्या कापडाचा असावा ही सूचना आहे.
...............................................................
४/५/२१
Procalcitonin (PCT) हे एक प्रथिन आहे. त्याची रक्तपातळी मोजणे हे विविध जंतुसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी उपयुक्त असते. विविध जंतूसंसर्गांमध्ये ही पातळी बरीच वाढते आणि जसा आजार वाढतो तशी ती अधिकाधिक वाढते.
तीव्र कोविड रुग्णांमध्ये ती मध्यम आजारापेक्षा चौपट असते. जर आजार पुढे गंभीर झाला तर ती पातळी आठपटपर्यंत सुद्धा वाढते.
............................
६/५/२१
या महासाथीत वर्षभरात बाधीत पिढीचे संक्रमण असे झाले :
वृद्ध व सहव्याधिग्रस्त >> मध्यमवयीन >> तरुण>> ?? मुले.
साथरोगशास्त्रात याला ‘डेमोग्राफिक शिफ्ट’ असे म्हणतात. हे तसे अपेक्षित असते.
हे असे का होते यासंदर्भात दोन मुद्दे :

१. विषाणूचे नवे अवतार (उदाहरणार्थ b117) : यामुळे जो आजार होतो त्यात रुग्णांच्या शरीरात विषाणू घनता पूर्वीपेक्षा जास्त आहे >> रोगप्रसार वाढतो>> अधिक वयोगट बाधित होतात.
२. लसीकरण ज्येष्ठांपासून लहानांकडे या क्रमाने होत जाते. त्यामुळे जेष्ठ लसवंत पिढीत नवे रुग्ण तुलनेने कमी निर्माण होतात. आता असंरक्षित वयोगटांमध्ये नवे रुग्ण दिसू लागतात.
...................................................
८/५/२१
भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आज दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते. मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.
..........................
१०/५/२१
१. एकूण रुग्णांच्या जेमतेम दोन टक्के गटात सिटीस्कॅन करायची गरज असते; सौम्य कोविडमध्ये त्याची अजिबात गरज नाही.
२. सिटीस्कॅनचा अनावश्यक वापर केल्यावर अजून एक त्रास वाढतो. स्कॅनची प्रक्रिया बंद वातानुकुलीत खोलीत होते. तिथे जितके जास्त रुग्ण आणले जातील तितका रुग्णाकडून संबंधित तंत्रज्ञांना होणारा रोगप्रसारही वाढतो.
..................................................
११/५/२१
कोविडकाळात दातांच्या समस्यांसाठी :
डेंटलदोस्त’ हा २५ दंतचिकित्सकांचा चमू आहे. ही निदानसेवा विनामूल्य २४ x ७ उपलब्ध आहे
दूरभाष क्रमांक 77975 55777
.....................................................
१४/५/२१
पहिल्या प्रकारच्या लसीनंतर दुसऱ्या डोसला दुसऱ्या प्रकारची लस देणे हा विषय सध्या प्रयोगाधीन आहे.
भारतात तरी याला अजून आयसीएमआरची मान्यता नाही.
....................................................
१६/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते.
..................................................
१८/५/२१
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
जरी केंद्रीय कृती दलाची या उपचाराला शिफारस नसली तरी स्थानिक डॉ त्यांच्या अनुभवानुसार तो वापरू शकतात. याला ‘ऑफ-लेबल’ वापर म्हणतात.
....................................
१९/५/२१
मुळात बुरशीजन्य आजार दुर्मिळ आहे. एरवी तो खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दिसू शकतो :
१. रक्ताचे कर्करोग
२. अवयव प्रत्यारोपण नंतर स्टिरॉइड्स आणि अन्य तत्सम औषधे दिलेले
३. तीव्र भाजलेले.
एरवी अशा रुग्णांचे एकूण समाजातील प्रमाण तसे कमी असते. त्यामुळे अशातील ज्यांना हा बुरशीजन्य आजार होतो त्यांचे प्रमाण अजूनच खूप कमी दिसते.
सध्या कोविडची महासाथ असल्याने प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या मूळ रुग्णांची संख्याच प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने बुरशीजन्य आजार अधिक दिसत असावा.
................................
२०/५/२१
१. या बुरशीजन्य आजाराचे शरीराच्या भागानुसार काही प्रकार असतात त्यापैकी एक म्हणजे त्वचेवर जखम होऊन त्यातून contamination मुळे हा जंतुसंसर्ग होतो.
२. आत्यंतिक कुपोषण हे सुद्धा एक कारण आहे.
३. काही अभ्यासांमध्ये कुठलेही कारण अथवा पूर्वीच्या सहव्याधी नसलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळलेला आहे
.............................................................
२१/५/२१
२ डी- ग्लुकोज या नव्या विकसित झालेल्या औषधाचे व्यापारी वितरण भारतात जूनच्या मध्यावर होईल असे संबंधित उद्योगाने जाहीर केले आहे.
......................
२३/५/२१
सौम्य ते मध्यम कोविडच्या (अधिक धोका असलेल्या रुग्णांच्या) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.
..................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फायझर व मॉडर्नच्या कोविडविरोधी लसी या एम- आरएनए तंत्रज्ञानावर आधारित आहेत हे सर्वज्ञात आहे. या तंत्रज्ञानावर सुमारे 40 वर्षांपासून संशोधन चालू आहे. आधी त्याचा इन्फ़्लुएन्ज़ा व आता करोना विरोधात त्याचा वापर केला गेला आहे. हे संशोधन खूपच कष्टाचे ठरले आहे.

पुढील महिन्यात यंदाचे नोबेल पुरस्कार जाहीर होतील. यंदा वैद्यकातील पुरस्‍कार एम-आरएनए तंत्रज्ञान संशोधकांपैकी कोणाला तरी मिळेल अशी जोरदार हवा आहे. त्यामुळे या संशोधनाचे मुख्य श्रेय कोणाला मिळावे हा वैज्ञानिक वादाचा मुद्दा झाला आहे. संबंधित वैज्ञानिकांचे या बाबतीतील मतभेद चव्हाट्यावर आलेले आहेत :

https://www.nature.com/articles/d41586-021-02483-w

+१
सरसकट सर्वांना वर्धक मात्रेचा प्रस्ताव अमेरिकेत अमान्य
अन्न व औषध प्रशासनाच्या समितीने केलेल्या या शिफारशीमुळे बायडेन प्रशासनाला धक्का बसला आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/in-general-the-proposal-to-inc...

अमेरिकेतील ओरेगॉन राज्यातील एक ठळक घडामोड.
तिथल्या एका डॉक्टरांनी या महासाथी दरम्यान स्वतः मास्क बिलकुल वापरला नाही. एवढेच नाही तर त्यांनी त्यांच्या रुग्णांनाही तो वापरू नका असा ठाम सल्ला दिला. या डॉक्टरांच्या मते सतत मास्क वापरल्याने स्वतः बाहेर सोडलेल्या कार्बन डाय ऑक्साईडचे पुन्हा श्वसन होऊन आपल्याला विषबाधा होते.

महासाथी दरम्यान सर्वांनी मास्क वापरावेत हा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियम आहे. त्याचा भंग केल्याबद्दल आधी या डॉक्टरांना दहा हजार डॉलरचा दंड ठोठावण्यात आला. तरीही त्यांनी त्यांच्या व्यवसायात आपला हेका चालूच ठेवला.

यापुढे जाऊन त्यांनी दमा व अन्य श्वसनविकाराच्या रुग्णांना असा सल्ला दिला, की मास्क वापरलात तर तुमचा आजार वाढेल किंवा तुम्हाला हृदयविकाराचा झटका पण येऊ शकेल.

या सगळ्याची दखल घेऊन अखेर संबंधित राज्य वैद्यकीय मंडळाने या डॉक्टरांचा व्यावसायिक परवाना रद्द केला आहे.

1. https://www.businessinsider.in/international/news/a-doctor-from-oregon-w...

2. https://omb.oregon.gov/Clients/ORMB/OrderDocuments/c1d122d1-5459-4d6f-88...

सध्याच्या महासाथी दरम्यान या आजाराचा विविध अंगांनी अभ्यास चालूच आहे. आतापर्यंत काही लाख रुग्णांचा विदा बऱ्याच संशोधन केंद्रांमध्ये जमा झालेला आहे. या आजाराच्या रुग्णांमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आढळलेली लक्षणे कोणती, याचाही एक शास्त्रशुद्ध अभ्यास झाला आहे.

त्यानुसार खालील ७ लक्षणे दिलेल्या प्राधान्यक्रमाने बहुसंख्य प्रौढ रुग्णांमध्ये आढळतात :
1. चवीची संवेदना कमी होणे
2. वासाची संवेदना कमी
3. ताप येणे
4. नव्याने आलेला व टिकून राहणारा खोकला
5. थंडी वाजून येणे
6. भूक मंदावणे
7. स्नायूदुखी
…..
वरील माहितीशी तुलना करता 5 ते 17 या वयोगटातील मुलांच्या बाबतीत एकच फरक त्यात जाणवला आहे. तो म्हणजे वरील क्रमांक ४ या ठिकाणी डोकेदुखी हे महत्त्वाचे लक्षण दिसून आलेले आहे.
बाकी सर्व प्रौढांच्या प्रमाणेच.

चव आणि वास संवेदना कमी होणे ही कोविड १९ ची महत्त्वाची लक्षणे मानता येतील. सहसा ही लक्षणे या आजारासारख्या अन्य श्वसनरोगांमध्ये दिसत नाहीत.

चव आणि वास संवेदना कमी होणे ही कोविड १९ ची महत्त्वाची लक्षणे>>>

या एप्रिल महिन्यात मला कोविड झाला होता तेव्हा चव आणि वासाची संवेदना कमी झाली नव्हती परंतु बिघडली होती. म्हणजे त्या काळात घरात सतत एक विचित्र केमिकलसारखा वास जाणवायचा (sanitizer चा नाही, त्यात सुगंध घातलेला असतो.) त्या काळात एकदा ओळखीच्यांनी जेवणाचा डबा पाठवला त्यात अळूवडी होती. जेवणानंतर ती खाल्ली तर अ ति श य बेक्कार चव लागली, शेवटी टाकून दिली. (बेकार म्हणजे जणू काही ती अळूवडी गाडीच्या इंजिन ऑईल मध्ये तळली की काय असे वाटावे इतकी बेकार चव आणि वास)

बेकार म्हणजे जणू काही ती अळूवडी गाडीच्या इंजिन ऑईल मध्ये तळली की काय
>>> वर्णन छान केलेत.
पण तेव्हा मात्र तुम्हाला जबरी विचित्र वाटले असणार !

कुठे विचारावं कळलं नाही म्हणून इथेच विचारतेय.
सोमवारी ग्रामपंचायतीकडून लसीकरण केले गेले. मी आणि माझ्या बाबांनी पहिली लस घेतली. रेजिस्ट्रेशन झाल्याचा मेसेज दोघांनाही आला. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्याचा मेसेज फक्त बाबांना आला अणि सर्टिफिकेट मिळालं पण. मला ना मेसेज आला ना सर्टिफिकेट. वेबसाइटवर पण माझं स्टेटस not vaccinated असंच आहे.
असं होतं का? सर्टिफिकेट नसेल तर दुसरा डोस मिळेल का? आणि लांब प्रवास करायचा झाल्यास कसा करणार?
लस घेऊन फुकट गेल्यासारखं वाटतंय. २ दिवस सडकून ताप अंगदूखी सहन केलेय.

वाट बघण्यापलिकडे काही करता येईल का? Cowin चा हेल्पलाइन नंबर १०७५ अत्यंत कुचकामी आहे. चुकीचा आहे असं सांगतात. बाकीकुठे काही मदत नाही.

असं झालं की खरंच त्रासदायक होते.
तुम्ही जिथे लस घेतली तिथे जाऊन त्यांना सांगून पाहिले का?
कदाचित त्यांनी नीट एन्ट्री केली नाही/चुकीची एन्ट्री केली असेल.
जर त्यांनी नीट करूनही असे झाले असेल तर मग हे तंत्रिकी विभागाचे काम आहे असे सांगतात, आणि तांत्रिकी विभाग दाद देत नाही अशा बऱ्याच तक्रारी पाहिल्यात.

तुम्हाला दुसरी लस घेता येईल पण कागदोपत्री ती पहिली लस असल्याचे दिसेल. तुम्ही दोन्ही लस घेतल्याचे प्रमाणापत्र मिळणार नाही. त्यामुळे जिथे पूर्ण लसीकरण झालंय याचे।प्रमाणपत्र लागते तिथे अडचण होईल.

त्या केंद्रातल्या लोकांना विनंती काही करता येईल का ते बघा.

मला ना मेसेज आला ना सर्टिफिकेट. वेबसाइटवर पण माझं स्टेटस not vaccinated असंच आहे.>>>पहिल्या लशी च्या वेळी माझ्या सासूबाई चा सेम प्रॉब्लेम झाला होता, जवळ जवळ महिनाभर वाट पाहिली, मग आधार कार्ड,मोबाईल घेऊन जिथे लस घेतली तिथे जाऊन, लस घेतल्याची तारीख सांगितली,तर तिथल्या रजिस्ट्रेशन करणाऱ्या माणसाने,पुन्हा एकदा आधार/मोबाईल no नोंदणी केली आणि महिन्यापूर्वीच्या तारखेचे रेकॉर्ड चेक केले,तर तिथे(त्या कॉम्प्युटर मध्ये) नोंद होती,मग तिथल्या तिथे मेसेज आणि सर्टिफिकेट चं काम झालं

केंद्रात तुझ्या लस नंतर नोंदणी राहिली असेल
लस घेतल्यावर बाहेर आल्यावर त्या कम्प्युटर धारी लोकांना 'लस घेतली' सांगितल्यावर ते 'मेसेज आला का चेक करा' सांगतात.ही सर्व कामे 30 मिनिट रिकव्हरी ला बसलेले असताना होऊ शकतात.एकदा लसीकरण स्लॉटस चालू असताना त्या लोकांना जाऊन विचारावे लागेल.
जर टेक्निकली आता नोंदणी शक्य नसेल तर परत अपॉइंटमेंट घेऊन त्या तारखेला लस न घेता घेतल्याची नोंदणी होईल का असेही चेक करावे लागेल
(यातले कायद्याच्या चौकटीत काय बसते याची माहिती आरारा किंवा ब्लॅक कॅट देऊ शकतील.)

दुसरीकडे ज्यांनी लस घेतलीच नाही, त्यांना लस दिल्याचे मेसेजेस येतात. बिहारचा माणूस मुंबैत असतो. पण त्याचं लसीकरण बिहारमध्ये होऊन जातं.
१८ वर्षांखालच्या मुलांचं लसीकरण झाल्याचा मेसेज येतो.
उगीच नाही ब्रिटन आपल्या सर्टिफिकेटवर संशय घेत.

तुम्ही जिथे लस घेतली तिथे जाऊन त्यांना सांगून पाहिले का?
कदाचित त्यांनी नीट एन्ट्री केली नाही/चुकीची एन्ट्री केली असेल.
जर त्यांनी नीट करूनही असे झाले असेल तर मग हे तंत्रिकी विभागाचे काम आहे असे सांगतात, >>>>असंच झालंय. त्यामुळे गोंधळ झालाय.

रजिस्ट्रेशन कोणाच्या फोनवरून केलं होतं ते पुन्हा एकदा तपासून बघा. ज्या फोनवरून केलं आहे तिथे दोन्ही सर्टिफिकेटस् मिळायला हवीत. मी माझ्या फोनवरून आमचं दोघांचं केलं होतं. त्याच्या ऑफिसमध्ये लस घेतली त्यामुळे बाकी सगळे डीटेल्स त्याचे होते, पण कोविन रजिस्ट्रेशन नंबर माझा दिला कारण तोच होता. मला दोघांच्या लसीकरणाची नोटिफिकेशन्स आली आणि सर्टिफिकेट सुद्धा मी माझ्या फोनवरून डाऊनलोड करून घेतलं. हे दोन्ही डोसच्या वेळी.

रेजिस्ट्रेशन करायला कॉलेजमधली मुलं बसवली होती फोन घेऊन. त्यातलं कुणीच ओळखीचं नाही. त्यातल्यात्यात ओळखीच्या नर्सबाई आहेत त्या बघते म्हणाल्या.

मी आणि माझ्या बाबांनी पहिली लस घेतली. रेजिस्ट्रेशन झाल्याचा मेसेज दोघांनाही आला. सर्टिफिकेट डाऊनलोड करण्याचा मेसेज फक्त बाबांना आला अणि सर्टिफिकेट मिळालं पण.>> तुम्हा दोघांच्या आधी आणि नंतर ज्यांनी लसीकरण केले असेल त्यांना मेसेज गेला आहे का ते चेक करावं लागेल. चुकून आधीच्या व्यक्तीचा फोन नंबर टाकल्याने असा घोळ झाल्याची चार उदाहरणे पाहिली आहेत. हे जिथे लसीकरण केले आहे त्या केंद्रातच जाऊन होईल.

नर्सबाईंनी "adjust" करून आजच्या तारखेचं सर्टिफिकेट मॅनेज करून दिलं. माझ्या लक्षात आलं म्हणून मी विचारलं तरी. गावातल्या कितीतरी म्हातार्या बायका लस घ्यायला आल्या होत्या. त्यांचं लसीकरण रजिस्टर्ड झालंय की नाही कुणास ठाऊक. मुळात एवढा भोंगळ कारभार व्हायला शेकडोंची वगैरे गर्दी नव्हतीच. मोजून ७०-८० लोक होते. तरी ही परिस्थिती.

मुंबई विमानतळ की लोकल ट्रेनचं स्टेशन? प्रवाशांची तुफान गर्दी, करोना नियमांचा उडाला फज्जा!

https://www.loksatta.com/mumbai/mumbai-airport-sees-heavy-rush-as-people...

कोवीडमधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये बुरशीजन्य आजार होऊ शकतात हे एव्हाना माहीत आहे. यापूर्वीचा mucormycosis वाचकांना परिचित आहे.

सध्या अजून एक वेगळा बुरशीजन्य आजार Aspergillus osteomyelitis सापडला आहे. यामध्ये पाठीचे मणके आणि फासळ्या यांच्यावर विपरीत परिणाम होतो.

संबंधित बातमी:
https://www.loksatta.com/pune/aspergillus-vertebral-osteomyelitis-fungus...

मुंबैत ४० मेडिकल स्टुडंट्सना लशीचे दोन्ही डोस घेऊनही करोना झालाय.
दक्षिण मुंबैत दोन्ही डोस मिळालेली आणि व्हेकेशनची मजा करून परतलेली कुटुंबे करोनाग्रस्त निघाली‌
अशाने आकडे कधीच खाली यायचे नाहीत Sad

मुंबईत कोविड बधिताच्या एकही मृत्यूची नोंद आज झाली नाही. कोविड काळात 20 मार्च 2020 नंतर शून्य कोविडमृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

https://www.esakal.com/mumbai/mumbai-corona-update-no-corona-patient-dea...
छान.

कोविड लसीच्या सक्तीकरणाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्या संदर्भातील न्यायालयीन तपशील इथे आहे :
https://awakenindiamovement.com/counter-affidavit-filed-by-mohfw/

त्यातील महत्त्वाचे :
या सुनावणीदरम्यान भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे एक प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले गेले. त्यानुसार कोणत्याही नागरिकाला त्याच्या इच्छेविरुद्ध ही लस देता येणार नाही. तसेच, ही लस घेतलेले आणि न घेतलेले या दोन प्रकारच्या नागरिकांमध्ये सरकारला समाजजीवनात भेदभाव करता येणार नाही.

गेल्या आठवड्यात युरोप मध्ये कोविडमुळे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत म्हणे. रशिया आणि चायना मध्ये पण नवीन लाट धुमाकूळ घालत आहे. जगभरात चाललेला तांडव पाहता आपल्याकडे ही वादळापूर्वीची शांतता तर नव्हे ना अशी शंका येते.

https://www.hindustantimes.com/world-news/europe-had-most-number-of-covid-cases-deaths-last-week-who-expresses-concern-101635386771486.html

AY.4.2 हा नवीन राक्षस आहे

Pages