कोविड१९ : दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ

Submitted by हेमंतकुमार on 26 April, 2021 - 07:02

लेखमालेतील मागचा धागा :
कोविड१९ : खवळलेल्या विषाणूशी उपायांचे युद्ध
https://www.maayboli.com/node/78455
..................................

दिनांक 16/ 3/ 2020 पासून आपण कोविड१९ धाग्यांवर महाचर्चा करीत आहोत. जगभरात अजूनही या महासाथीचा जोर कायम आहे. या साथीचा जनक म्हणजे करोना-सार्स २ हा विषाणू. गेल्या काही महिन्यात त्याने उत्परिवर्तन करून नवे अवतार जन्माला घातले. या अवतारांपैकी काही मानवी शरीरात नव्याने धुमाकूळ घालत आहेत. ते अधिक रोगप्रसारकही आहेत. गतवर्षी या आजाराचे प्रमाण वृद्ध आणि सहव्याधीग्रस्तांत जास्त होते. सहसा कुटुंबातील एखाददुसरी व्यक्तीच आजारी पडत होती. यंदा मात्र ही समीकरणे पूर्ण बदलली असून आता तरुण आणि एरवी निरोगी असणारी मंडळीही बऱ्यापैकी बाधित आहेत. एखाद्या कुटुंबात हा विषाणू घुसला की त्यातील सर्वांनाच गाठू पाहतोय.

भारतात या आजाराची दुसरी लाट चांगलीच उसळली आहे. रुग्णसंख्येच्या मानाने विविध रुग्णालय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यात रुग्णालयात छोटे-मोठे अपघात होऊन गंभीर घटना आणि त्यातून मृत्यू देखील उद्भवले आहेत. मेडिकल ऑक्सिजनचा अभूतपूर्व तुटवडा ही एक ठळक घटना. त्यातून उद्भवलेला सामाजिक उद्रेक आणि तापलेल्या राजकारणाने एप्रिलचे वातावरण अधिकच गरम झाले. जागतिक पातळीवरही ही लाट तेजीत आहे. महासाथीत आतापर्यंतच्या एकूण बाधित व मृत्यूंपैकी १/३ संख्या गेल्या ३ महिन्यांतील आहे.

दरम्यान या विषाणूविरोधातील बऱ्याच देश-विदेशी लसी आता उपलब्ध आहेत. लसीकरणानेही वेग घेतला आहे. जगाच्या विविध भागात ते कमीअधिक गतीने चालू आहे. अर्थात त्यामुळे मिळणारे संरक्षण कितपत आणि किती काळ मिळेल हे अद्याप सुस्पष्ट नाही. मात्र पूर्ण लसवंत व्यक्तींना भविष्यात हा आजार झालाच तरी तो गंभीर नसेल. उपचारांच्या आघाडीवर अजूनही विशिष्ट रामबाण औषधाची वानवा आहे. पूर्वीच्याच काही प्रस्थापित औषधांचा गरजेनुसार वापर चालू आहे. वैद्यकाच्या अन्य उपचारपद्धतींतही संशोधन चालू आहे. अशा उपलब्ध सुविधांचा पुरेपूर वापर करीत मानवजात या विषाणूशी झुंजत आहे. बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे ही आशादायक बाब.

लेखमालेच्या मागच्या धाग्याची पृष्ठसंख्या लवकर आणि बरीच फुगली. तसेच तिथली स्वसंपादनाची मुदतही लवकरच संपेल. या कारणास्तव हा नवा धागा काढतोय. उत्साही व जागरुक वाचकांच्या सहकार्याने उत्तम चर्चा होत आहे. मागील धोरणानुसार या धाग्याच्या चर्चेतील महत्त्वाचे मुद्दे मूळ लेखाच्या शेवटी दिनक्रमे समाविष्ट करीत राहीन. नवनवीन वाचकांना त्याचा उपयोग व्हावा ही इच्छा.

ही जागतिक आपत्ती लवकर संपो आणि कोविडचर्चाही संपुष्टात येवोत या सदिच्छेसह नवीन धाग्यास प्रारंभ करू.
....................................................
चर्चेतील महत्वाचे :
२८/४/२१
Tocilizumab एक प्रकारची अँटीबॉडी असून मध्यम आणि तीव्र covid-19 रुग्णांमध्ये स्टिरॉइड्सच्या बरोबरीने दिली जाते.
ती तीव्र दाह नियंत्रणात आणायला मदत करते. त्यामुळे फुफ्फुसांचा बचाव होतो.
सध्या हे औषध आयात करावे लागते आणि ते पेटंट कायद्याखाली आहे. म्हणून महाग आहे.
......................................
१/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार
सध्याच्या लाटेत वरील आजाराचे काही रुग्ण आढळत आहेत. त्याची कारणमीमांसा :
मधुमेह/ सहव्याधी >> कोविड होतो (मध्यम ते तीव्र) >> रुग्णालयात स्टिरॉइड्स किंवा Tocilizumazb चे उपचार >> कोविड बरा होतो पण प्रतिकारशक्तीचे खच्चीकरण होते >> बुरशीजन्य आजार.
अनेक प्रकारच्या फंगस पासून हा आजार होऊ शकतो. साधारणपणे हा आजार झालेल्या लोकांमध्ये मधुमेह बराच अनियंत्रित असतो आणि रक्ताची तपासणी केल्यावर न्यूट्रोफिल्स या पांढऱ्या पेशी बऱ्याच कमी झालेल्या असतात.
या आजाराची सुरुवात नाक व सायनसेस मध्ये होते. तिथून तो डोळे वा अन्यत्रही पसरू शकतो.
म्हणून कोविड बरा झाल्यानंतर सहव्याधीग्रस्त रुग्णांचे बारकाईने निरीक्षण करणे महत्त्वाचे.
...................................................................
१/५/२१
सामान्य जनतेने एकावर एक असे 2 मास्क किंवा N 95 वापरायची गरज नाही ( विषाणूचा नवा प्रकार आलेला असला तरीही). मास्कच्या प्रकारापेक्षाही तो व्यवस्थित लावणे आणि नाका-तोंडावर टिकवणे हे अधिक महत्त्वाचे आहे.
तो घट्ट विणीच्या कापडाचा असावा ही सूचना आहे.
...............................................................
४/५/२१
Procalcitonin (PCT) हे एक प्रथिन आहे. त्याची रक्तपातळी मोजणे हे विविध जंतुसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल झालेल्यांसाठी उपयुक्त असते. विविध जंतूसंसर्गांमध्ये ही पातळी बरीच वाढते आणि जसा आजार वाढतो तशी ती अधिकाधिक वाढते.
तीव्र कोविड रुग्णांमध्ये ती मध्यम आजारापेक्षा चौपट असते. जर आजार पुढे गंभीर झाला तर ती पातळी आठपटपर्यंत सुद्धा वाढते.
............................
६/५/२१
या महासाथीत वर्षभरात बाधीत पिढीचे संक्रमण असे झाले :
वृद्ध व सहव्याधिग्रस्त >> मध्यमवयीन >> तरुण>> ?? मुले.
साथरोगशास्त्रात याला ‘डेमोग्राफिक शिफ्ट’ असे म्हणतात. हे तसे अपेक्षित असते.
हे असे का होते यासंदर्भात दोन मुद्दे :

१. विषाणूचे नवे अवतार (उदाहरणार्थ b117) : यामुळे जो आजार होतो त्यात रुग्णांच्या शरीरात विषाणू घनता पूर्वीपेक्षा जास्त आहे >> रोगप्रसार वाढतो>> अधिक वयोगट बाधित होतात.
२. लसीकरण ज्येष्ठांपासून लहानांकडे या क्रमाने होत जाते. त्यामुळे जेष्ठ लसवंत पिढीत नवे रुग्ण तुलनेने कमी निर्माण होतात. आता असंरक्षित वयोगटांमध्ये नवे रुग्ण दिसू लागतात.
...................................................
८/५/२१
भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आज दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते. मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.
..........................
१०/५/२१
१. एकूण रुग्णांच्या जेमतेम दोन टक्के गटात सिटीस्कॅन करायची गरज असते; सौम्य कोविडमध्ये त्याची अजिबात गरज नाही.
२. सिटीस्कॅनचा अनावश्यक वापर केल्यावर अजून एक त्रास वाढतो. स्कॅनची प्रक्रिया बंद वातानुकुलीत खोलीत होते. तिथे जितके जास्त रुग्ण आणले जातील तितका रुग्णाकडून संबंधित तंत्रज्ञांना होणारा रोगप्रसारही वाढतो.
..................................................
११/५/२१
कोविडकाळात दातांच्या समस्यांसाठी :
डेंटलदोस्त’ हा २५ दंतचिकित्सकांचा चमू आहे. ही निदानसेवा विनामूल्य २४ x ७ उपलब्ध आहे
दूरभाष क्रमांक 77975 55777
.....................................................
१४/५/२१
पहिल्या प्रकारच्या लसीनंतर दुसऱ्या डोसला दुसऱ्या प्रकारची लस देणे हा विषय सध्या प्रयोगाधीन आहे.
भारतात तरी याला अजून आयसीएमआरची मान्यता नाही.
....................................................
१६/५/२१
कोविडोत्तर बुरशीजन्य आजार एव्हाना सर्वांच्या परिचयाचा आहे. कोविडमुळे प्रतिकार शक्तीचे खच्चीकरण होते आणि त्यानंतर अन्य प्रकारचे सूक्ष्मजंतूही पेशींवर हल्ला करू शकतात. अशाच जंतूपैकी Cytomegalovirus हा विषाणू गंभीर आजार घडवू शकतो. सुरुवातीस तो फुफ्फुसांना इजा करतो परंतु आटोक्यात आला नाही तर शरीरातील बहुतेक महत्त्वाच्या अवयवांना इजा करतो आणि परिस्थिती बिकट होते.
..................................................
१८/५/२१
करोना उपचारांमधून प्लाझ्मा थेरपीला वगळण्यात आलं; केंद्र सरकारचा मोठा निर्णय.
जरी केंद्रीय कृती दलाची या उपचाराला शिफारस नसली तरी स्थानिक डॉ त्यांच्या अनुभवानुसार तो वापरू शकतात. याला ‘ऑफ-लेबल’ वापर म्हणतात.
....................................
१९/५/२१
मुळात बुरशीजन्य आजार दुर्मिळ आहे. एरवी तो खालील प्रकारच्या रुग्णांमध्ये दिसू शकतो :
१. रक्ताचे कर्करोग
२. अवयव प्रत्यारोपण नंतर स्टिरॉइड्स आणि अन्य तत्सम औषधे दिलेले
३. तीव्र भाजलेले.
एरवी अशा रुग्णांचे एकूण समाजातील प्रमाण तसे कमी असते. त्यामुळे अशातील ज्यांना हा बुरशीजन्य आजार होतो त्यांचे प्रमाण अजूनच खूप कमी दिसते.
सध्या कोविडची महासाथ असल्याने प्रतिकारशक्ती खच्ची झालेल्या मूळ रुग्णांची संख्याच प्रचंड आहे. त्यामुळे तुलनेने बुरशीजन्य आजार अधिक दिसत असावा.
................................
२०/५/२१
१. या बुरशीजन्य आजाराचे शरीराच्या भागानुसार काही प्रकार असतात त्यापैकी एक म्हणजे त्वचेवर जखम होऊन त्यातून contamination मुळे हा जंतुसंसर्ग होतो.
२. आत्यंतिक कुपोषण हे सुद्धा एक कारण आहे.
३. काही अभ्यासांमध्ये कुठलेही कारण अथवा पूर्वीच्या सहव्याधी नसलेल्या रुग्णांमध्येही हा आजार आढळलेला आहे
.............................................................
२१/५/२१
२ डी- ग्लुकोज या नव्या विकसित झालेल्या औषधाचे व्यापारी वितरण भारतात जूनच्या मध्यावर होईल असे संबंधित उद्योगाने जाहीर केले आहे.
......................
२३/५/२१
सौम्य ते मध्यम कोविडच्या (अधिक धोका असलेल्या रुग्णांच्या) उपचारासाठी casirivimab and imdevimab या दोन प्रतिपिंडाच्या मिश्रणाच्या औषधाला भारतीय औषध नियंत्रकांनी नुकतीच मान्यता दिलेली आहे. आता सिप्लातर्फे हे औषध भारतात टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.
..................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिज्ञासा,
होय. डेल्टा प्रथम भारतात सापडला होता. नंतर तो जगभर पसरला.

आता डेल्टा प्लसची वैशिष्ट्ये पाहू :
त्यामध्ये डेल्टा मध्ये नसलेले अजून एक उत्परिवर्तन झालेले आहे. त्याचा परिणाम विषाणूच्या टोकदार प्रथिनावर झाला आहे. त्याच्यामुळे झालेल्या आजाराची वैशिष्ट्ये अशी राहतील:

१. अधिक रोगप्रसार
२. हा प्रकार फुफ्फुसाच्या पेशींना अधिक घट्ट चिकटतो.
३. सध्याच्या अँटीबॉडी उपचारांचा यावर उपयोग कमी आहे.

https://www.gavi.org/vaccineswork/theres-now-delta-plus-variant-covid-19...
लाटेबाबत आताच काही बोलणे योग्य नाही.

डेल्टा प्लस मध्ये असलेला जनुकीय बदल हा पूर्वीच्या बीटा व गॅमा प्रकारांमध्येही होता.
सध्या डेल्टा प्लस अकरा देशांमध्ये धुमाकूळ घालतो आहे.

डेल्टा प्लस चा उगम आपल्याकडेच झाला असे नाही म्हणता येणार.

धन्यवाद कुमार सर! भारतात काही ठिकाणी डेल्टा प्लसचे रूग्ण सापडत आहेत अशा बातम्या वाचल्या आहेत.
आपल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लशी या व्हेरिअंट विरूद्ध किती परिणामकारक आहेत हे अजून कळलेलं नसणार. अशावेळी बहुधा आंतरराष्ट्रीय प्रवासांवर निर्बंध घालणे आणि नेहमीची काळजी घेत राहणे हा सर्वात upstream करण्याचा उपाय वाटतो आहे. थोडक्यात काय तर पिक्चर अभी बाकी है! सगळीकडे गोष्टी पुन्हा सुरू होत असताना हे लक्षात ठेवण्याची फार गरज आहे! दुसऱ्या लाटेआधी आपण अति गाफील राहीलो होतो असं आता वाटतंय. पुन्हा तीच चूक व्हायला नको!

>>सध्या डेल्टा प्लस अकरा देशांमध्ये धुमाकूळ घालतो आहे.<<
हो, इकडे हवा टाइट होण्याचा मार्गावर आहे. सिडिसी मास्क रिलॅक्सेशन वर बंदि आणेल परत एकदा. डेल्टा वेरियंटवर फायझर वॅक्सीन फक्त ४०% इफेक्टिव असल्याची बातमी आहे.

भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला पुढील टप्प्यातील चाचणीस मंजुरी देण्यात आली आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/nasal-vaccine-developed-by-bha...

खास करुन लहान मुलांचे लसीकरण या लसींच्या माध्यमातून करणे शक्य होणार आहे. या लसी सध्याच्या लसींपेक्षा अधिक स्वस्त, परिणामकारक आणि हाताळण्यास सोप्प्या असतील असं सांगितलं जात आहे. ग्रामीण भागांमध्ये सुई टोचून घेण्याची असणारी भीतीचा प्रश्न सुद्धा ही लस घेताना निर्माण होणार नाही.

>>> भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या लसीला पुढील टप्प्यातील चाचणीस मंजुरी देण्यात आली आहे>>>
आजवर अनेक रामबाण उप्पाय भारतीय वर्तमानपत्रात जाहिर झाले अन विलिन होऊन गेले.... एक ५ ते १० लोकांवर चाचणि यशस्वी झाल्याचे सांगतात अन मग ठण्ठणपाळ ..... एक संकलित यादी कोणीही देत नाहीत अन हे प्रेसवाले तर.... त्यांच्या हातातील कोलित घेऊन टीआरपी शोधतात.... लशी शिवाय काय बदललय?
ही घ्या यादी...
1) पहाडमूळ (म्हणजेच व्हेलव्हेटलीफ) नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वनस्पतीचा सार्स -२ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फायदा होऊ शकतो.
- भारतामधील केंद्र सरकाच्या अखत्यारित असणाऱ्या औद्योगिक आणि वैज्ञानिक संशोधन परिषदेचे संशोधन चालू.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-plant-extract-used...
2) लाळ वापरुन करता येणार करोना चाचणी
https://maharashtratimes.com/international/international-news/coronaviru...
सोपे होइल मग.
3) डॉक्टर, त्या विराफीन औषधाविषयी काही अधिक अद्ययावत बातमी आहे का ?
म्हणजे शासनाने त्याला परवानगी दिल्यानंतर कोविड रुग्णांसाठी त्याचा वापर व त्याला मिळालेला प्रतिसाद यासंदर्भातील वैद्यकीय वर्तुळातील काही अपडेट?
4) पूरक उपचार : ताजी बातमी
भारतीय INMAS-DRDO यांनी विकसित केलेल्या 2- D-ग्लुकोज या औषधास आपल्या औषध नियंत्रकांनी आपात्कालीन मान्यता आजच दिलेली आहे. हे औषध फक्त विषाणूबाधित पेशिंमध्येच जाते आणि तिथे विषाणूंची वाढ थांबवते.
मेडिकल ऑक्सिजनचे उपचार चालू असलेल्या रुग्णांसाठी हा एक चांगला पूरक उपचार आहे.
5) २ डी- ग्लुकोज या नव्या विकसित झालेल्या औषधाचे व्यापारी वितरण भारतात जूनच्या मध्यावर होईल असे संबंधित उद्योगाने जाहीर केले आहे.
6) आयुर्वेदिक औषध आयुष-६४ करोनावर उपयुक्त
https://www.cnbctv18.com/healthcare/ayush-64-drug-useful-in-treating-mil...
7) टेक महिंद्राने करोनावर नवे औषध शोधले असून त्याच्या पेटंटसाठी प्रक्रिया सुरू
121050200662_1.html#:~:text=IT%20company%20Tech%20Mahindra%20is,to%20a%20senior%20compa

रेव्यु
सहमत आहे तुमच्याशी.

१. २-DG या औषधाबद्दल ६ जुलैची नाशिक मधली बातमी आहे इथे
https://timesofindia.indiatimes.com/city/nashik/four-covid-patients-trea...

चार रुग्णांवर त्याचा प्रयोग यशस्वीरित्या झाला आहे. परंतु ते औषध त्यांना हैदराबादहून मागवावे लागले होते. अद्यापही ते औषधाच्या दुकानांमध्ये उपलब्ध नाही अशी औषध विक्रेत्यांची तक्रार आहे.

2. Virafin वापरात नाही असे मुंबईतील कोविड केंद्राकडून समजले.

WHO च्या सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटलं आहे की, भारतात कोरोना महामारी ही Endemic Stage म्हणजेच स्थानिक टप्प्यात पोहोचण्याच्या मार्गावर आहे.
https://www.esakal.com/desh/india-may-be-entering-endemic-stage-of-covid...

लसीकरण घेतलेल्यांना संसर्ग झाला तर त्या़च्याकडून इतरांना होणाऱ्या संसरृगाबद्दल संशोधन झाले आहे का?
संसर्गाचे प्रमाण, तीव्रता कमी होते. विषाणू कमजोर पडतात, इ. ?

भरत,
या प्रश्नाचे उत्तर मागील पानावर (१६) येथे दिले आहे :

Submitted by कुमार१ on 13 August, 2021 - 12:24

अमेरिकी औषध प्रशासनाने फायझर कंपनीच्या कोविड लसीला पूर्ण मान्यता नुकतीच दिली (सोळा वर्षावरील वयोगटांसाठी)

https://www.fda.gov/news-events/press-announcements/fda-approves-first-c...

कोविड - 22 असा नवा variant ??
>>>
विषाणूच्या संभाव्य प्रकाराला असे नाव देणे चुकीचे आहे. प्रा. साई रेड्डी यांच्या एका मुलाखतीचा चुकीचा अर्थ काढून माध्यमांनी हे पसरवले आहे.
प्राध्यापक रेड्डी यांनी खालील खुलासा इथे केलेला आहे :

https://www.google.com/amp/s/inews.co.uk/news/world/covid-22-new-variant...

“To make it clear my statement meant to convey that I believe Covid in 2022, particularly the early part of the year (January – March) has a chance to be worse than this year, Covid in 2021"

दोन महिन्यांपूर्वी इस्रायलने कोविडवर चांगला विजय मिळवला होता आणि तिथली बरीच बंधने हटवली होती .सध्या मात्र तिथे चौथी लाट जाहीर केलेली आहे.

https://www.google.com/amp/s/www.theweek.co.uk/news/science-health/95394...

डॉक्टर,

लस घेतल्यानंतर हात खूप दुखत असेल तर तो गरम पाण्याने शेकला तर चालते का की बर्फाने शेकावे ?( इथे काही वेगळा शब्द असतो का ? बर्फाने शेकावे ऐवजी??)

शेकणे मना असते
शेकणे वगैरे करू नका
फारतर २ दिवस दुखेल मग बरे होईल

बरोबर
अगदीच सहन होत नसेल तर पहिल्या दिवशी कापडात गुंडाळलेला बर्फ मधून मधून लावायला हरकत नाही
(बर्फाने नमविणे असा शब्दप्रयोग मला सुचतो आहे).

मग जिथे शेकणे अपेक्षित आहे तिथे गरम पाण्याच्या पिशवीने शमवणे हा शब्दप्रयोग सुद्धा योग्य होईल.

सध्याच्या महासाथीमुळे अन्य तीन महत्त्वांच्या रोगांवरील नियंत्रणही बरेच ढिले पडले आहे. हे तीन आजार म्हणजे एड्स, क्षयरोग आणि मलेरिया. यासंदर्भात सुमारे १०० गरीब देशांचा अभ्यास करून काही निष्कर्ष निघाले आहेत :
https://www.nature.com/articles/d41586-021-02469-8

सद्य महासाथीमुळे सर्व आरोग्य सुविधा व संसाधने covid-19 वर केंद्रित झाल्यामुळे वरील तीन आजारांकडे कमालीचे दुर्लक्ष झालेले असून त्याचे काही दुष्परिणाम दिसून येत आहेत.

Pages