लष्कराच्या भाकऱ्या....

Submitted by कुमार१ on 30 June, 2020 - 22:35

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.

हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.

मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.

यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.

वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?

३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.

एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.

आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.

सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘रोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.

गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.

बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.

लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

+११ अगदी.
ही पाहा एक नवनिर्मिती :

मुंब्रा कळवा मतदारसंघाचे आमदार आणि गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ...
https://www.loksatta.com/thane-news/fire-at-private-hospital-in-thane-fo...
................
आणि हा एक नवाच शब्द !

"पंकजा मुंडेंचं बीडमधील रेमडेसिव्हिरच्या अवैद्य विक्रीवरून अजित पवारांना पत्र"

https://www.esakal.com/marathwada/pankaja-munde-and-ajit-pawar-remdesivi...

हा 'वैद्य ' चा विरूद्धार्थ आहे काय ?
Bw

ते तर काहीही चालू असतं.आपल्याला वाटतात तसे शब्द बनवायचे आणि इतरानी अंदाज लावत समजून घ्यायचे.
अमेरिकेची आढेबाजी असा अग्रलेख आहे. आढेबाजी हा शब्द असतो का?
आढ्यताखोरी ऐकला आहे.

आडीबाजी करणे म्हणजे अडवणूक करणे हा बोलीभाषेतील रूढ शब्द आहे. ( बोकिलांच्या शाळेतील सुऱ्या म्हात्रे वापरतो हा शब्द बहुतेक) त्या प्रभावात असावा वार्ताहर.

मी मायबोलीवरील अनेक प्रतिसादात 786 हा आकडा इथेच नव्हे तर इतरत्र ही लिहिलेला पाहिले आहे. हा आकडा मुस्लिमांचा आहे याचा अर्थ In the Name of Allah (i.e. God) the Compassionate the Merciful असा आहे. हा आकडा हिंदूंनी का लिहावा हा प्रश्न आहे. त्यांना याला योग्य असे मराठीत वाक्य माहीत किंवा सापडत नाही का?

<< हा आकडा हिंदूंनी का लिहावा हा प्रश्न आहे. >>
786 हा आकडा मुस्लिमांचा आहे. शाहरुख खान मुस्लिम आहे आणि त्या नियमाने त्याच्या चाहत्याने 786 हा आकडा इथे लिहिला तर चूक कसे काय?

+११११११ !!
'चुका मोजा' अशी स्पर्धा घेता येईल.....

हल्ली भाषा आपण सोडूनच देतो.
पण निदान समाजशास्त्राची माहिती तरी नीट असावी ना ?
हे पाहा:
बंगाल व गोव्याला विधान परिषद असल्याचा नवा शोध !

आता ममता पुन्हा मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्या तरी त्यांना सहा महिन्याच्या आत विधान परिषदेवर निवडून जावं लागणार आहे.

....गोव्यात पार्सेकरांना सहा महिन्यांच्या आत डच्चू
त्यानंतर सहा महिन्यांमध्ये भाजपाने पार्सेकरांना विधान परिषदेवर न पाठवता
https://www.loksatta.com/explained-news/west-bengal-election-2021-mamata...

भारताच्या संसदेने पाकिस्तानला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम रद्द केल्याचा शोध नुकताच लोकसत्तेने लावला आहे. त्याबद्दल सर्व भारतीयांचे अभिनंदन!

delete.PNG

हा हा !
थोरच ....
....
मध्ये हे पण एक भारी होते :

ढाका- पश्चिम बंगालचे परराष्ट्रमंत्री एके अब्दुल मोमिन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे.
https://www.esakal.com/global/bangladesh-minister-abdul-momin-criticize-...

Screenshot_20210514-195520.png

नवीन चक्रीवादळाची माहिती घ्यायला लोकसत्ता उघडला.
खाली संबंधित बातम्या बघताना मे महिन्यात परतीचा पाऊस बघून आश्चर्याने बातमी उघडली तर ऑक्टोबर महिन्यातली जुनी बातमी!
मूळ बातमीत 'वादळी वादळासह वादळी वारे होण्याची शक्यता' अशी अगम्य वाक्यरचना आहेच.

वादळी वादळासह वादळी वारे होण्याची शक्यता >> उपसंपादकांच्या झोकांड्या Lol Lol

कधी कधी वाटतं की खूप काही वाटावं, कधी कधी वाटतं की काहीच वाटू नये, सरळ मिक्सरमध्ये डुर्रर्र करून काढावं - ह्यापेक्षा लोकसत्ताचं वरचं वाक्य भारी आहे!

कधी कधी वाटतं की खूप काही वाटावं, कधी कधी वाटतं की काहीच वाटू नये, सरळ मिक्सरमध्ये डुर्रर्र करून काढावं - Lol

एखाद्या इंग्लिश शब्दाचा नीट उच्चार करता येणार नसेल तर तो चुकीच्या मराठीत लिहिण्याऐवजी सरळ इंग्लिशमध्ये लिहिलेला परवडतो.
ही एक घोडचूक बघा :

राजीव सातव यांना संसर्ग झालेला सायटोमॅजिलो विषाणू

https://www.loksatta.com/maharashtra-news/mp-rajeev-satav-death-after-cy...

विषाणूच्या मूळ नावात megalo (मेगालो) शब्द आहे आणि त्याचा अर्थ ‘मोठा’ असा आहे. आता याचे 'मॅजिलो' असले विचित्र मराठी रूप छापण्यात काय मतलब आहे ?
आजच्या छापील सकाळ मध्येही अगदी हीच चूक केलेली आहे.

अशाने सामान्य माणूस हाच चुकीचा आणि अर्थहीन उच्चार करू लागतो आणि विनाकारण अपभ्रंश रूढ होतात.

विषाणूच्या मूळ नावात megalo (मेगालो) शब्द आहे आणि त्याचा अर्थ ‘मोठा’ असा आहे. आता याचे 'मॅजिलो' असले विचित्र मराठी रूप छापण्यात काय मतलब आहे ?

नशीब "मी गं आलो" (me g alo) असं नाही केलं.

दिव्या भारती केस दुःखद असली तरी निधनानंतर निधन जरा हाईट आहे.
Screenshot_2021-05-18-18-47-39-741_com.android.chrome.jpg

+ १

परवा स्मिता पाटील यांच्याबद्दल बातमी होती तेव्हा "दोन वडिलांचा बाप" असा उल्लेख राज बब्बर यांच्याबद्दल केला होता. एकदा नाही, दोनदा हे वाक्य छापलं होतं. स्क्रीनशॉट घ्यायचं सुचलं नाही मला कारण आधी नक्की काय छापलंय हे समजायला २ मिनिटं लागली.

Pages