लष्कराच्या भाकऱ्या....

Submitted by हेमंतकुमार on 30 June, 2020 - 22:35

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.

हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.

मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.

यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.

वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?

३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.

एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.

आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.

सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘रोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.

गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.

बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.

लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< आपल्याकडे एकाचं एक नाव पुरत नाही. पाळण्यात घालतानाच किमान पाच नावे >>
अगदी अगदी. आणि नंतर आयुष्यभर लोकं अजून नावं ठेवणार ते वेगळंच Lol

IMG-20210416-WA0002.jpg

(लोकसत्ता ॲप)
नक्की काय म्हणायचं आहे यांना?

ची ऐवजी चे हवे.
त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे आणि मृत्यूचे प्रमाणही कमी होते.

पुढे, मार्च २०२० च्या मृत्यूदराची आताच्या मृत्यूदराशी तुलना करणे बरोबर नाही असे मला वाटते. किती कमी आकडा होता मार्च २०२० मध्ये. त्याची तुलना आताच्या एवढया मोठया आकडेवारीसोबत नाही होऊ शकत.

+१
गेल्या महिन्याभरात कोविडसंबंधीच्या अनेक बातम्यांमध्ये बरेच घोळ, संदिग्धता आणि चुकीचा अर्थबोध होईल अशी शीर्षके, असे बरेच काही वाचनात आले.
असो

पण लक्षणं नसलेल्या वा लक्षणांची तीव्रता कमी असलेल्या रुग्णांचं प्रमाण कमी असेल, तर रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांचं प्रमाण जास्त असलं पाहिजे ना? आणि मृत्यूचं प्रमाणही जास्त?

पण लक्षणं नसलेल्या वा लक्षणांची तीव्रता कमी असलेल्या रुग्णांचं प्रमाण कमी असेल, तर रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांचं प्रमाण जास्त असलं पाहिजे ना? आणि मृत्यूचं प्रमाणही जास्त? >> good catch! उगीच कठीण वाक्यरचना करण्याच्या नादात चुकीचे लिहिले आहे.

हो ना.. उगाच कशाला कठीण वाक्यांच्या फंदात पडले? साधी साधी वाक्यंही चुकलेली असतात एरवी.

आताच आकाशवाणीवरच्या मराठी बातम्या ऐकल्या.
त्यातील एक वाक्य :
" दर शंभर पैकी वीस चाचण्यांचे अहवाल सकारात्मक येत आहेत".

माझ्याकडूनही या आधी एकदा सकारात्मक हा शब्द लिहिला गेला आहे. पण नंतर मी नीट विचार केला तेव्हा मला तो अयोग्य वाटला. त्याऐवजी होकारात्मक असे म्हणावे असे वाटते.
काय वाटते ?

चाचणी केलेल्या दर शंभरपैकी वीस नमुन्यांमध्ये/ व्यक्तींमध्ये कोविड संसर्ग झाल्याचे आढळून येत आहे असं म्हटलं तर चालेल का?

वावे,
अगदी योग्य आहे.
फक्त 'चाचणी +/- असे म्हणताना मराठीत योग्य प्रकारे कसे म्हणावे हा विचार मनात आला

दर शंभर पैकी वीस चाचण्यांचे अहवाल सकारात्मक येत आहेत".>>>>

सकारात्मक म्हणजे चांगले हे इतके डोक्यात बसलेय की मला वाटले 100 तले 20 लोक कोविड पासून वाचले. मी मनातल्या मनात अशी सकारात्मक बातमी देणार्यांचे कौतुक पण केले.

सकारात्मक म्हणजे चांगले हे इतके डोक्यात बसलेय >>> आणि ते बरोबरही आहे.
positive चा तो एक अर्थ आहे.

positive: सकारात्मक, होकारार्थी, धन, निश्चित /नक्की/ठोस आणि अस्तित्वदर्शक.
वैद्यकीय चाचणी बाबत ते अस्तित्वदर्शक अर्थाने वापरल्या जाते, सकार /होकार अर्थाने नाही.

वावेंनी सांगितलेले अधिक योग्य वाटते.

युद्धजन्य परिस्थिती म्हणजे युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती असा माझा समज आहे. यांना युद्धसदृश म्हणायचं आहे.
Screenshot_20210419-125057.png

'अभुतपुर्व' मधली शुद्धलेखनाची चूक आहेच.

+१
युद्धसदृश बरोबर.

त्याहीपेक्षा
'सद्य परिस्थिती युद्धपातळीवर हाताळावी ' असे योग्य वाटते.

"गावागावात रुग्णांत वाढ; सावंतवाडीत थम सिस्टीमची भिती"

https://www.esakal.com/kokan/thumb-system-is-dangerous-sindhudurg-covid-...

.. या बातमीदाराला 'थंब' असेच म्हणायचे असावे ना ?
बातमीत इतक्या वेळा थम शब्द आहे की मलाच गोंधळायला झाले.
काही वेगळा अर्थ असल्यास कोणी सांगावा Bw

तेही थंब असेल अनु Proud
ऐकेकाळी मी फार चुका काढायचे पण फारच सहनशील झालेयं आता !
हे बघा.
Screenshot_20210427-140319_Gallery.jpg

ऑस्करची जी छोटी मूर्ती/पारितोषिक असते . ते 'मुद्राराक्षसाचा ऑस्कर' म्हणून द्यायला हरकत नाही किंवा भारतरत्न सारखे 'मुद्राराक्षसरत्न' . तुम्ही दर महिन्याला पहिले तीन वगैरे निवडू शकता. Lol

Pages