लष्कराच्या भाकऱ्या....

Submitted by हेमंतकुमार on 30 June, 2020 - 22:35

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.

हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.

मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.

यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.

वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?

३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.

एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.

आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.

सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘रोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.

गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.

बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.

लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा हा!
अंधेरीला नगरदास रोडवर एक छोटेसे हॉटेल होते.
तिथे भिंतीवर मेन्यु बोर्ड लावला होता त्याची आठवण झाली.
असे लक्षात आले की प्रत्येक पदार्थांत एक तरी चूक होती.
चाह
उछळ पाव
अंडा बुरीजी

एवढे आठवतेय आता.

आणि कलकत्त्यात "Motor Paneer".

Proud

2B945483-142F-4C33-A4E0-A5D602DB2E2A.jpeg

हे एक भाषांतर !
अगरचे तुम समझ सको मुझे भी समझाना Happy

जिलेट ब्लेड काय आहे? जस्ट डायलवरचा किंग जॉर्ज सभागृहाचा मजकूर वेगळाच आहे.
वरच्या मजकुराचं गुगल ट्रान्सलेट We at King George Hall understand the importance of your event whether it is a corporate event or a social event
we, you make sure you have a gorgeous experience every moment you share with us
मधले काही शब्द वगळून एवढं कळलं.

हं. हे वाचलं नव्हतं. अमितादीदी आणि मुंबईच्या रेल्वे स्थानकांतलं चेंडू आठवतंय.

'शहीद किंवा हुतात्मा शब्दांचा वापर चुकीचा ; वीर जवानांसाठी 'या' शब्दांचा करा वापर'; भारतीय लष्कराची माहिती
https://marathi.abplive.com/news/india/indian-army-said-against-the-use-...

नको असलेल्या त्या शब्दांसाठी लष्कराने जे हिंदी व इंग्लिशमध्ये पर्याय सुचवले आहेत ते लांबलचक वाटतात.
सुटसुटीत छोटे मराठी शब्द शोधणे हे आव्हान आहे.

मला वाटतं बातमी चुकीची आहे.
आक्षेप फक्त martyr या इंग्रजी शब्दाला आहे. शहीद , हुतात्मा या शब्दांचा अर्थ martyr पेक्षा वेगळा आहे.

बरोबर भरत. मी पण ही बातमी Martyr शब्दावर आक्षेप अशा अर्थाने वाचली होती.
पण शहीदचा अर्थ पण martyr प्रमाणे धर्माखातर प्राण देणे असा होतो असे दिसते. त्यामुळे आता शहीद व martyr दोन्ही नको असे म्हटले असेल.

हुतात्माचा अर्थ सुद्धा धर्माखातर बलिदान असा होतो का?

जालशोध घेतला असता जवळजवळ सहा ठिकाणी अशी मराठी बातमी प्रकाशित झालेली आहे.
मूळ (हिंदी किंवा इंग्लिश) लष्कराचा आदेश शोधणे आले

https://mmcnewsnetwork.com/2022/02/use-of-term-martyr/
https://www.mahamtb.com/Encyc/2022/2/28/Fallen-soldiers-not-martyrs-says...

'because of their religious or political beliefs' असं लिहिलंय त्यात (त्यांच्याच शब्दात). सैनिकांना political beliefs मुळे बलिदान द्यावं लागतं ना? मग काय चूक आहे ह्या शब्दात?

मानव, वरती कुमारांनी दिलेल्या पानावर शहीदचा एक अर्थ हुतात्मा आणि तिसरा अर्थ 'स्वधर्मार्थ किंवा स्वमतार्थ मेलेला वीर'. पण त्यामुळे हुतात्मा = स्वधर्मार्थ किंवा स्वमतार्थ मेलेला वीर असं काही म्हणता येणार नाही. एका शब्दाचे अनेक (चपखल समानार्थी नसणारे) अर्थ असू शकतात.

The six terms suggested are: killed in action, laid down their lives, supreme sacrifice for the nation, fallen heroes, Indian Army braves and fallen soldiers.
युद्धात / चकमकीत मरण पावलेले, आपले आयुष्य वाहिले / प्राणांचे बलिदान दिले , देशासाठी सर्वोच्च त्याग , धारातीर्थी पडले , वीर

वरील शब्दांपासून विशेषणे देखील बनवावी लागतील. जसे वीरमृत श्री अमुक किंवा बलिदानी, कामी आलेले, प्राण वेचलेले श्री अमुक ह्यांना श्रद्धांजली वगैरे.

तसं हीरा यांनी सांगितलेला शब्द बलिदानी हा हिंदीत आहे. संगीन पे धरकर माथा सो गए अमर बलिदानी| जो शहीद (?) हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी|

Pages