लष्कराच्या भाकऱ्या....

Submitted by हेमंतकुमार on 30 June, 2020 - 22:35

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.

हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.

मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.

यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.

वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?

३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.

एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.

आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.

सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘रोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.

गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.

बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.

लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला,
अशा विनोदी प्रकारांमुळे या धाग्यावरील नेहमीचे सक्रिय असणारे आपण सगळे एकत्र भेटतो हा ही एक छान योग !

इंग्रजी बातमीत ancestral village हा शब्दप्रयोग आहे. ancestral घर, मालमत्ता असेल तर वडिलोपार्जित हा शब्द बरोबर आहे. पण वडिलोपार्जित गाव? मूळ गाव असं लिहिलं पाहिजे ना?!
Screenshot_20211225-122351.png

सामान्य भाषेनुसार मूळगाव हे बरोबर वाटते.

पण जरा संशोधन केले असता खालील माहिती मिळाली :
वडिलोपार्जित वतन
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B2%...
आणि
वतन् = जन्मभूमि
https://bruhadkosh.org/words?shodh=%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A4%A8

त्यामुळे वडिलोपार्जित गाव हे चुकीचे आहे का, हे मला तरी समजत नाही.

वडिलोपार्जित या शब्दातल्या 'अर्जित' चा अर्थ 'कमावलेले' असा आहे ना? मग मालमत्ता, घर ही कमाई असते तशी 'गाव' ही कमाई नसते असं मला म्हणायचं आहे.

बरोबर वावे. वडिलोपार्जित गाव, हे जर अख्खे गाव पूर्वजांनी विकत घेतले/मिळवले असेल तर म्हणता येईल. अन्यथा मूळ/अधिवासी गाव किंवा त्या अर्थी काही शब्द असेल तर.

रच्याकने: अर्जित आणि उपार्जित हे अनुक्रमे earned आणि acquired या अर्थी आहेत काय? अर्जित म्हणजे स्वकष्टाने कमावलेले, उपार्जित म्हणजे वारसा हक्काने मिळालेले.
त्यामुळे वडिल + उपार्जित = वडिलोपार्जित.

सहमत.

हा प्रतिसाद एका वृत्तातील चूक वगैरे दाखवण्यासाठी नसून एका शब्दाच्या विविध अर्थांच्या संदर्भात लिहित आहे.
साधारणपणे ‘स्तब्ध’ असे म्हटले की आपल्याला त्याचा ‘थांबलेला’ असा एकच अर्थ पटकन नजरेसमोर येतो.

आता लोकसत्तातील एक खालचे वाक्य बघा :
अलीकडेच त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यावर ते काहीसे स्तब्ध झाले होते.

https://www.loksatta.com/sampadkiya/vyakhtivedh/profile-pratap-motiram-v...
वाचताना एकदम वेगळे वाटले. पण ‘स्तब्ध’चे खालील अनेक अर्थ पाहिल्यावर छान उलगडा झाला
स्तब्ध
वि. १ थांबलेला; गति बंद पडलेला; स्थिर; अड- थळा झालेला किंवा केलेला; निश्चल; उगा; निशब्द; खोळंबून राहिलेला. २ मनाचा कणखर; निश्चयी; न नमणारा. ३ ताठर- लेला; अवटरलेला. ४ मन, शरीर यांची गति, शक्ति कुंठित झालेला. [सं. स्तंभ् = रोध करणें] ॰णें-अक्रि. १ थांबणें; स्थिरा- वणें; बंद पडणें. २ उभें राहणें; निश्चल असणें.
दाते शब्दकोश

. त्या वाक्यात अर्थ क्रमांक ४ लागू होतोय.

दोन डोस मोफत
सर्व बंधू आणि नागिनीनी नोंद घ्यावी

असा बोर्ड लागलाय म्हणे

सध्या काही कोविड रुग्णांच्या बाबतीत सखोल पातळीवर जी चाचणी केली जाते त्याचे शास्त्रीय नाव genome sequencing हे असून त्यासाठी जनुकीय क्रमनिर्धारण हा मराठी शब्द आजच्या छापील 'सकाळ' मध्ये वाचला.

तो आवडला.

चांगलं मराठीकरण आहे.
सिक्वेंसिंग पेक्षा वेगळा शब्द आवडला असता पण काय ते लक्षात येत नाहीये आता.

मग ते ...
क्रमनिहाय जनुकअभ्यास असं लांब होईल

श्रेणीनिहाय: अर्थ वेगळा होईल असं वाटतं

या माहितीत (https://www.loksatta.com/mumbai/corona-lata-mangeshkar-admitted-to-breac...)
दरम्यान लता मंगेशकर यांनी पद्मभूषण, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके याशिवाय राष्ट्रीय तसंच अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे...

भारतरत्न न लिहिणे हे अक्षम्य आहे.
बाकी "यांनी" बद्दल तर सोडूनच देऊ.

त्याच बातमीतून
लता मंगेशकर यांनी आपल्या सात दशकांच्या कारकिर्दीत तब्बल एक हजाराहून अधिक हिंदी गाणी गायली आहेत.

त्याच बातमीतून आणखी:

यश चोप्रा यांचा २००४ मध्ये आलेल्या ‘वीर-झारा’ चित्रपटात त्यांनी शेवटचं गाणं गायलं होतं. ३० मार्च २०२१ ला हा चित्रपट रिलीज झाला होता.

"शरद पवार घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणी अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात?,” असा सवालही त्यांनी विचारला आहे.
घटनाबाह्य संविधान???
लोकसत्ता बातमी.
ही लिंक https://www.loksatta.com/maharashtra/bjp-ram-kadam-ncp-sharad-pawar-shiv...

नुकतेच ‘पद्मगंधा’ प्रकाशनाचे संस्थापक अरुण जाखडे यांचं आकस्मिक निधन झालं. निर्दोष लेखन व छपाईबाबत ते आग्रही असायचे. या संदर्भातील सध्याच्या शोचनीय स्थितीबद्दल त्यांनी पूर्वी एका मुलाखतीत व्यक्त केलेले मत इथे आहे : https://www.aksharnama.com/client/article_detail/5744

त्यातील हा वेचा :
प्रश्न :एखादं स्क्रिप्ट येतं. ते वाचणं, त्यावर बारकाईनं संपादकीय संस्कार करणं, मुद्रितशोधन करणं, या सगळ्या प्रक्रियेतून ते स्क्रिप्ट जाणं आणि मग शेवटी ते मुद्रित पुस्तकापर्यंत येणं- हा जो एके काळाचा शिरस्ता होता, तो आता हळूहळू मोडीत निघू लागलेला दिसतोय. तुमचा याबाबतीतला कटाक्ष मी पाहिलेला आहे. काय सांगाल याबद्दल?

अ.जा. : याला प्रकाशक-लेखक दोघंही कारणीभूत आहेत. लेखकालाही स्क्रिप्ट दिलं की, पुस्तक लवकर हवं असतं. काहींचं असंही म्हणणं असतं की- तुम्ही फार खोलात जाऊ नका, आम्ही केलंय ते बरोबर केलंय. जे लिहिलंय ते अंतिम आहे. फार लक्ष नका घालू. आपण जर एखाद्या लेखकाला ‘हे जरा काळजीपूर्वक बघायला पाहिजे’ असं म्हटलं तर त्यांना कमीपणाचं-अपमानकारक वाटतं.

.....लेखक-प्रकाशक दोघांनीही या गोष्टी करणं, त्यांना वेळ देणं आवश्यक आहे. ....दुसरी गोष्ट म्हणजे आपण मुद्रितशोधक, संपादक आदी घटकांना पूर्वी समाधानकारक मानधन आणि प्रतिष्ठा देऊ शकलो नाही. त्यामुळे नवनवीन तरुण लोक इकडे यायला उत्सुक नसतात. .....

संबंधित घटकांना अपुऱ्या मानधनावर समाधान मानून घ्यावं लागतं....

हा हा!
अंधेरीला नगरदास रोडवर एक छोटेसे हॉटेल होते.
तिथे भिंतीवर मेन्यु बोर्ड लावला होता त्याची आठवण झाली.
असे लक्षात आले की प्रत्येक पदार्थांत एक तरी चूक होती.
चाह
उछळ पाव
अंडा बुरीजी

एवढे आठवतेय आता.

Pages