लष्कराच्या भाकऱ्या....

Submitted by हेमंतकुमार on 30 June, 2020 - 22:35

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.

हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.

मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.

यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.

वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?

३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.

एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.

आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.

सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘रोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.

गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.

बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.

लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकसत्तेत 'उद्धव ठाकरेंविरोधात विश्वासदर्शक ठराव' अशी वाक्यरचना वाचून मला वाटलं की हे चुकीचं आहे. म्हणून बातमी नीट बघितली तर राज्यपालांच्या अधिकृत पत्रात 'trust vote against the CM' असंच आहे.
अगेन्स्ट म्हणजे विरुद्ध, पण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विश्वासदर्शक ठराव की बाजूने? विरुद्ध असेल तर अविश्वास ठराव पाहिजे ना? आणि बाजूने असेल तर विश्वासदर्शक?

वावे, त्यांचं बरोबर वाटतं आहे. 'विरोधात अविश्वास' हे दोन नकार होतील ना? विश्वासदर्शक ठराव - त्यांच्या बाजूने किंवा विरुद्ध असं जास्त बरोबर वाटेल.

बाजूने असेल तर विश्वासदर्शक हे बरोबर
.....
असे अन्यत्र आहे :
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी पत्र पाठवले आहे. राज्यपालांनी विधीमंडळ सचिवांनाही पत्र पाठवले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आ

बाजूने असेल तर विश्वासदर्शक हे बरोबर हो! पण विरुद्ध असेल तरी विश्वासदर्शकच कसं काय?
ह.पा. , 'विरोधात अविश्वास' हे दोन नकार होतील हो ना. मुख्यमंत्र्यांवर/ सरकारवर अविश्वास किंवा विश्वास अशी वाक्यरचना केली तर जास्त बरं होईल.

+१

१ जुलै रोजी या धाग्याला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.

इथल्या चर्चेत नियमित सहभागी होणाऱ्या सर्व जागरूक प्रतिसादकांचे मनापासून आभार !

पहिल्यांदाच एखाद्या धाग्याबद्दल चांगल्या अर्थाने असं वाटतं की हा धागा बंद पडेल तो सुदिन. परंतु सध्याच्या वृत्तांकनांची घसरती पातळी पाहता लष्कराच्या भाकऱ्यांचं काम कमी होण्याची शक्यता नाही. Sad

ह पा Happy
....
हे पाहा :
https://www.esakal.com/lifestyle/there-is-only-one-postmaster-in-the-hig...
... २१व्या शतकातील संपूर्ण जग इंटरनेटने जवळ आणले आहे आणि भारत देखील यापासून लांब नाही. ई-मेल आणि मजकूर संदेशांच्या साखळीत जग अडकले आहे आणि कोणीही पत्रांबद्दल बोलू इच्छित नाही. पण या पत्रांची प्रासंगिकता आजही देशाच्या कानाकोपऱ्यात आहे.

.... जगातील सर्वात उंच पोस्ट ऑफिस सहज उपलब्ध आहे. जे लोक ट्रेक करण्यास प्राधान्य देतात ते काझा येथून बस पकडू शकतात आणि मोटरेबल रस्त्याने हिक्कीमला पोहोचू शकतात. लक्षात ठेवा की बस दिवसातून एकदाच दुपारी २ वाजता सुटते.
????
.............
लई गोंधळायला होतंय वाचताना ...

२१व्या शतकातील संपूर्ण जग ....... देशाच्या कानाकोपऱ्यात आहे. >>> अरे देवा !
सहज उपलब्ध >>> easily available चे तंतोतंत भाषांतर.
लक्षात ठेवा की बस दिवसातून एकदाच दुपारी २ वाजता सुटते. >>> आजकाल बातम्यांमधे हे असं सूचना असल्यासारखे फार लिहितात, जे अयोग्य आहे. आम्ही का लक्षात ठेवावी बसची वेळ, आम्हाला कोणतं पत्र टाकायचंय म्हणून . .. Happy

------
बाकी धागा अमर आहे .

मै पल दो पल का जागरूक हुं.......
क्यूँ कोई मुझको याद करे, क्यूँ कोई मुझको याद करे
मशरूफ जमाना शुले के लिये क्यूं वक्त अपना बरबाद करे
गात पुढे जायचं.

Screenshot_2022-07-06-21-20-13-021_com.android.chrome.jpg

भाषांतर केल्यावर

IMG-20220707-WA0009.jpg

लोकसत्ता app.
वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा अशा या नद्या आहेत! इतर वृत्तपत्रांमधल्या बातम्या वाचून खात्री केली.

वळणगंगा Lol
प्रण अवतरण चिन्हांत आहे. म्हणजे फडणवीस तसंच बोलले असतील.

लोकसत्ता: अंकुश चौधरीच्या पत्नीचं छोट्या पडद्यावर पुनरामन, दिसणार मुख्य भूमिकेत
लोकमत: अंकुश चौधरीची बायको करतेय छोट्या पडद्यावर कमबॅक, मराठी कलाविश्वातील ती आहे प्रसिद्ध अभिनेत्री

नुकताच झी मराठी वर नव्याने सुरु होणाऱ्या 'तू चाल पुढं' मालिकेचा प्रोमो आलाय आणि ज्यात दीपा परब अनेक वर्षांनी मराठी मालिकांमध्ये पुनरागमन करत आहे (काही दिवसांपूर्वी ती स्टार प्लस वरील 'शौर्य और अनोखी कि कहाणी' ह्या हिंदी मालिकेत दिसली होती.

दीपा परबने अनेक प्रसिद्ध मराठी व हिंदी मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे. किंबहुना एक ते दीड दशकांपूर्वी ती मालिका व चित्रपट विश्वातील एक ठळक चेहरा होती. मग तिची अंकुश चौधरीची बायको म्हणून ओळख करून द्यायला काय अर्थ आहे, ह्या सगळ्यात दीपाची स्वतंत्र ओळख आहे की! त्यात लोकसत्ता व लोकमत सारख्या महत्वाच्या वृत्तपत्रांनी अश्या मथळ्यासह बातम्या छापणे मला काही पटले नाही.

एक मजेशीर मार्मिक परिच्छेद:

हल्ली सोशल मीडियावर मराठी मजकुराचं इंग्लिश भाषांतर येतं, ते फार चुकीचं असतं म्हणतात, पण त्यात नंदा खरे यांचं भाषांतर ‘Nanda is True’ असं येतं…. अन् ते सत्य आहे.

https://www.aksharnama.com/client/article_detail/6196

लेख आवडला कुमार सर.
नंदा खरे यांचं काहीच वाचलेलं नाही, वाचलं पाहिजे असं परत एकदा वाटलं.
( भाषांतरावरून आठवलं. 'तांदळाचे आणि नाचणीचे घावणे' याचं भाषांतर ' rice and dancing wounds' असं झालं होतं म्हणे!)

rice and dancing wounds' असं झालं होतं म्हणे!)
>>>>
Happy Happy
....
घावणे>>> हा
घावन /ना ... यांचाच तिसरा पर्यायी शब्द समजायचा ना?

हो.
आम्ही 'घावन' म्हणतो, पण घावणेपण म्हणतात बरेच जण.

घावन म्हणजे तांदुळाची धिरडी (असा मी लावलेला अर्थ आहे.) आमच्या घरी तांदुळाचे सोडून बाकी कसले घावन करण्याची पद्धतच नव्हती.
पुण्यात तांदळाच्या धिरड्यालाही धिरडंच म्हणतात, घावन नाही.

कन्नडात अक्की म्हणजे तांदूळ (आणि अवलक्की म्हणजे पोहे). पण अक्की डोदोश्यापेक्षा मंगळूरकडचा नीर दोसा जास्त घावनाच्या जवळ जातो. किंबहुना तो जास्तच (नीरु - पाण्यासारखा) पातळ असतो. घावन आणि नीर दोसा - दोन्ही कोकणातलेच पदार्थ असल्यामुळे जास्त साधर्म्य असावे. एक आताच्या कर्नाटकातल्या कोकणात तर एक आताच्या महाराष्ट्रातल्या.

ता.क. - अक्की दोश्यात बाकीचा जो मसाला घालतात तो नीर दोश्यात नसतो. नीर दोश्यात (आणि कोकणातल्या घावनातही) नारळाचं दूध हा एक महत्त्वाचा घटक आहे. अक्की दोश्यात (आणि देशावरच्या धिरड्यात) कदाचित फक्त पाणी घालतात.

>>>धिरडे>>
याला आंबोळी पण म्हणतात

आंबोळीचं पीठ ठराविक असतं. तांदूळ, डाळी, मेथीदाणे वगैरे.
धिरडं हा जास्त जनरल शब्द आहे असं मला वाटतं.

https://www.esakal.com/desh/draupadi-murmu-congress-leaders-apology-on-n...

"Draupadi Murmu: राष्ट्रपत्नीच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याचा माफीनामा, स्मृती इराणी आक्रमक"

बातमीचे शीर्षक चुकले आहे.

लेखक, संपादक यासारख्या शब्दांचीही स्त्रीलिंगी रूपे करू नयेत असे एका भाषाविषयक लेखात मागे वाचले होते.

लोकमत च्या कालच्या अंकात
हडपसर मध्ये 350 वक्षांची लागवड असे हेडिंग छापून आले आहे

प्रूफ रीडर ही संकल्पना नाहीशी होत चालली आहे काय

Pages