लष्कराच्या भाकऱ्या....

Submitted by हेमंतकुमार on 30 June, 2020 - 22:35

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.

हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.

मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.

यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.

वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?

३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.

एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.

आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.

सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘रोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.

गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.

बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.

लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकीकडे साध्या शब्दात टायपो करायच्या आणि दुसरीकडे मुद्दाम अवघड शब्द वापरायचे हे पेपरांचं धोरण अतिफनी आहे.>>+1
पण त्यामुळे आपल्याला नवीन नवीन शब्द माहिती होतात ना! Happy
कॅन्टोन्मेंट बोर्डाला मराठीत 'कटक मंडळ' असं म्हणतात हे ज्ञान मला असंच झालं अलीकडे.

पण एकीकडे साध्या शब्दात टायपो करायच्या आणि दुसरीकडे मुद्दाम अवघड शब्द वापरायचे हे पेपरांचं धोरण अतिफनी आहे.
Submitted by mi_anu on 19 October, 2021 - 14:24
>>
अतिफनी म्हणजे शेतात तिफनी न वापरता काढलेल्या बातम्यांच पीक का?
#ask_like_marathi_patrakar

टायपो, अतिफनी, प्रिंट आणि असेच अनेक गरज नसताना वापरलेले इंग्रजी शब्द लिहिणार्‍या लोकांनी प्रस्थापित पत्रकारांच्या चुका काढणे बरोबर आहे का ??
मायबोलीवर अनेक वर्ष राहून सुद्धा लोक नीट मराठी लिहीत नाहीत आणि इतरांच्या चुका काढण्यात मात्र तत्पर असतात.

साद, एकच छोटे विधान करून माझे भाषण पूर्ण करते Happy

प्रिंट, अतिफनी हे शब्द लिहिताना वापरणारेही तितकेच चूक.पण जिथे मुलांना वर्षानुवर्षे आपण 'पेपर मधल्या बातम्या वाचून न कळलेले शब्द डिक्शनरीत बघून भाषा सुधारा' सांगतो तेथे पेपर मध्ये 'मृत्युमुखी पडलेल्यांची भेट घेतली' वगैरे व्याकरण आणि अर्थ डोक्यावर आपटलेल्या, काहीतरी वेगळाच शब्द कुठेतरी वेगळ्या अर्थाने लिहिलेल्या बातम्या वाचूनही सात्विक संताप करून घ्यायचा नाही काय?

मला वाटते की पत्रकारांच्या चुका काढणे ह्यात काही चुकीचे नाही. आपण सर्वच चुका करतो हे मान्यच आहे; पण ज्यांना त्याच कामाचे पैसे मिळतात (आपल्याच खिशातून जातात), ज्यांना त्या कामाचे प्रशिक्षण मिळाले आहे (किंवा तसे अपेक्षित आहे), आणि ज्यांना त्या कामासाठीच निवडले गेले आहे, त्यांनी तरी ते काम इतर आपल्यासारख्या, त्या लेखन-व्यवसायात नसलेल्या लोकांपेक्षा जास्त चोख करणे अपेक्षित आहे.

स्वतःला स्वयंपाक नीट येत नसूनही, जेव्हा एखाद्या उपाहारगृहात पैसे देऊन खरेदी केलेला पदार्थ निकृष्ट दर्जाचा असतो, तेव्हा आपण नावे ठेवतोच ना? २०० जणांच्या प्रेक्षागृहासमोर अतिशय सुमार दर्जाचे नाटक करणार्‍या नटांवर (स्वतःला चार लोकांपुढे नुसते उभे राहायची भिती वाटणार्‍या) प्रेक्षकांनी टीका करूच नये की काय? ह्या सर्व उदाहरणांत स्वयंपाक, अभिनय, आणि लेखन हे केवळ छंद नाहीत, तर ती त्या लोकांची व्यावसायिक कौशल्ये आहेत. मायबोलीवर लिहिणे हा छंद आहे. छंद म्हणून ह्या कला जोपासणार्‍यांच्या मर्यादा आपण समजूच शकतो. पण व्यवसायाच्या दृष्टीने काही एक किमान पातळी असणे आवश्यक आहे.

लाखो लोकांच्या नजरेखालून जाणाऱ्या लोकसत्तासारख्या प्रतिष्ठित वृत्तपत्रातील फ्रंटपेजवरील निदान पहिली ओळ तरी नीट असावी अशी अपेक्षा करणे अवास्तव आहे का? लोढा बिल्डर्सची १६ ऑक्टोबरची ही जाहिरात पहा…

https://epaper.loksatta.com/3259218/loksatta-mumbai/16-10-2021#page/1/1

"आयुष्य फार छोट आहे. त्यात तडजोड का?”

ह्रस्व-दीर्घ जसे बाद झाले आहेत तसे अनुस्वार देखील ऐच्छिक आहेत का? छोट आणि छोटं दोन्ही सारखंच? (मराठी) वाचकांनी समजून वाचावं अशी अपेक्षा असते. इंग्रजीत अशा आणि इतक्या ढोबळ चुका दिसत नाहीत.

दुसरे म्हणजे पेपरमध्ये येणारी भाषा फार पटकन खाली झिरपते. मराठी विकीवर नुकताच प्रसारित झालेला संदेश पहा...

ज्ञानसंप्पन आणि माहितीसमृद्ध समाज घडवण्यासाठी वाचन संस्कृतीचा विकास व प्रसार आवश्यक आहे. वाचन संस्कृतीचा विकास व प्रसार होण्याचे उद्देशाने भारत रत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ह्याचा जन्मदिवस हा महाराष्ट्र सरकार २०१५ पासून वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. मराठी भाषा विभाग मंत्रालयाच्या आव्हाना प्रमाणे मराठी विकिपीडिया २०१५ पासून १५ ऑक्टोबरला जोडून दरवर्षी वाचन प्रेरणा सप्ताहाचे आयोजन करीत असतो.

१) "ज्ञानसंप्पन" हा शब्द "ज्ञानसंपन्न" असा हवा होता.
२) "प्रसार होण्याचे उद्देशाने" असे न म्हणता आपण "प्रसार होण्याच्या उद्देशाने" असे म्हणतो.
३) "सरकार साजरा करतो" असे न म्हणता आपण "सरकार साजरा करते" असे म्हणतो.
४) "मंत्रालयाच्या आव्हाना प्रमाणे" मंत्रालय काही वेळा आव्हान देत असले तरी इथे मात्र तो शब्द "आवाहनाप्रमाणे" असा वाचावा.
५) "आव्हाना प्रमाणे", "भारत रत्न" असे शब्द हिंदीप्रमाणे तोडून नव्हे तर जोडून लिहिण्याची प्रथा आहे. ती त्रासदायक वाटत असेल आणि सुटे सुटे शब्द वाचायला सर्वांना सोपे वाटत असतील तर मी तसेही वाचण्याची सवय लावून घेईन. पण तशी काही ठाम भूमिका या विषयातील तज्ञांनी घेतली पाहिजे.
६) "अब्दुल कलाम ह्याचा" असे न म्हणता "अब्दुल कलाम ह्यांचा" असे आपण आदरार्थी बहुवचन वापरतो.

संदेश देण्याघेण्याकरता भाषा हे एक माध्यम आहे आणि माध्यमाने म्हणजेच साधनाने साध्य होण्याचा प्रयत्न करू नये हे ठीक. पण वाचन संस्कृतीचा विकास व प्रसार व्हावा असे खरोखरच वाटत असेल तर भाषेचे प्रमाणीकरण करावे लागेल. तीन-चार वाक्ये समजून घेऊन वाचता येतील. अशी आणखी किती वाक्ये फेरफार करीत वाचणार?

तिसरा मुद्दा आहे तो गंभीरतेचा. सव्वा कोटीचे फ्लॅट विकण्याची जाहिरात मराठी पेपरमध्ये फ्रंटपेजवर देण्याइतका पैसा असेल तर त्या बिल्डरला जाहिरातीचे प्रुफ तपासण्यासाठी येणारा वाढीव खर्च नक्कीच परवडू शकतो. पण अनेकांना असा खर्च अनावश्यक वाटतो. आणि असा आग्रह धरणारी लोकं हास्यास्पद वाटतात. पैसे वाचवायचेच असतील तर फ्रंट पेजवरील जाहिरातीचा मजकूर आधी इथे कॉपी-पेस्ट करावा. मी व इतर काही स्वयंसेवक हे काम विनामूल्य करून देऊ.

७) "आव्हाना प्रमाणे" - इथे "आवाहनाप्रमाणे" असे पाहिजे. ह्यात आव्हान काहीच नाही, आवाहन आहे.

ता. क. "गंभीरतेचा" - इथे "गांभीर्याचा" असे पाहिजे. 'गंभीरता' हा हिंदी शब्द आहे.

जाहिरात क्षेत्रात मराठी कॉपिरायटर्स ठेवत नसावेत. आजकाल अनुवादक तरी ठेवतात का याबद्दल शंका आहे. गुगल ट्रान्सलेट वापरत असतील

छापील लोकसत्तेच्या बातम्यांची शीर्षकही आजकाल मुद्दाम खळबळजनक आणि टीकात्मक करतात.
आजच्या मुंबई वृत्तांन्तात बातमीचं मोठ्या अक्षरांतल शीर्षक आहे - मुंबईतील चाचण्यांच्या संख्येत घट.
म्हणजे चाचण्या कमी झाल्याने रुग्णांच्या कमी झाली असा निष्कर्ष काढला आहे.
काल बाधितांचे प्रमाणही ( positivity rate) कमी झाले याकडे दुर्लक्ष.

मुळात यातून 'काहीतरी लिहून टाका, पान भरले पाहिजे.शुद्ध अशुद्ध, व्याकरण,योग्य शब्द योग्य जागी वापरणे याची चिंता नको, लोक वाचणारच आहेत' असा काही विचार दिसतोय तो जास्त धोकादायक आहे.
फ्रेंच किंवा जर्मन लोक 'आय मेड हिम अवेअर' मी त्याला जाणीव करून दिली अश्या अर्थाने बरेचदा 'आय वॉर्नड हिम'वापरतात ज्याचा अर्थ बराच आक्रमक होऊ शकतो.

थोडं इकडे तिकडे चालतं म्हणत म्हणत हे थोडं बरंच वाढून अर्थाचा अनर्थ होऊ नये म्हणजे झालं.

Chicken murg and sweet potato sabzi: Romy Gill’s easy curry recipes for students
https://twitter.com/guardian/status/1450455031266807820

ट्विट अजूनही तसेच आहे, पण त्यांच्या वेबसाईटवर सुधारणा केली आहे.

सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो तेव्हाच ही चिकन मुर्गची बातमी वाचली आणि पाण्याची वॉटर बॉटल काढून आधी दोन घोट पाणी घेतलं. गार्डिअनच्या नातलगांची ही आयडियाची कल्पना मला फारच आवडली असल्याकारणाच्या रीझनने मी या सेलिब्रेशनचा एक उत्सव साजरा करणार आहे.
https://twitter.com/ksinamdar/status/1451048024243798021

Lol Lol Lol

Lol
हे अशुद्धच नाही तर अगम्य व अतार्किक आहे, बातमी वरवर वाचली पूर्ण वाचण्याचे बळ नाही , नवी उंची गाठली आहे. Lol

गुगल किंवा तत्सम ट्रान्सलेट वापरून लिहिलंय.
एकेक वाक्य गुगल ट्रान्सलेटमध्ये कॉपी पेस्ट करून मिळणारं इंग्लिश ट्रान्सलेशन कळतंय.
प्रसूतिच्या कळा - लेबर - श्रम

भयाण! Lol

Pages