लष्कराच्या भाकऱ्या....

Submitted by कुमार१ on 30 June, 2020 - 22:35

समाजात वावरताना आपल्याला अनेक अनुभव येत असतात- काही भले तर काही बुरे. दोन्ही प्रकारचे अनुभव आपल्याला बरेच काही शिकवून जातात. त्यातूनच आपला व्यक्तिमत्व विकास घडत असतो. चांगले अनुभव आपल्याला उल्हसित करतात, तर कटू अनुभव उदास करून जातात. या दोन प्रकारच्या अनुभवांची जर तुलना केली, तर आपल्या लक्षात येईल की चांगल्या अनुभवांची स्मृती ही अल्पकाळ राहते. याउलट, कटू अनुभव मात्र दीर्घकाळ मनात खोलवर दडून राहतात.

हा लघुलेख साहित्य आणि वृत्तमाध्यम क्षेत्रातील अशा काही अनुभवांचा आहे. या प्रांतांत लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. त्यांचा एकमेकांशी वरचेवर संबंध येतो. त्यातून या प्रत्येकाच्या खात्यावर बरेच अनुभव जमा होतात. एक वाचक या नात्याने मलाही काही भलेबुरे अनुभव आले. त्यापैकी काही या लेखात लिहितो.
...........
मध्यंतरी एक आरोग्य आणि व्यायामविषयक पुस्तक वाचले. ते चांगले आहे आणि महाराष्ट्रातील एका नामवंत प्रकाशनसंस्थेने प्रकशित केले आहे. पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टे दिलेली आहेत. त्यातील एकात आपल्या शरीराला लागणारी जीवनसत्वे आणि खनिजे दररोज किती लागतात याचा तक्ता आहे. मी तो वाचू लागलो आणि एकदम दाताखाली खडा लागावा अशी एक चूक आढळली. म्हटले ठीक आहे, एखादा मुद्रणदोष असेल. तक्ता पुढे वाचू लागलो. पुन्हा एक घोडचूक दिसली. संपूर्ण दोन पानी तक्ता वाचल्यावर लक्षात आले, की त्यात तब्बल १० तपशिलाच्या चुका होत्या. आरोग्यविषयक पुस्तकात तर त्या अक्षम्य ठरतात. त्या पाहून अस्वस्थ झालो. मग माझ्याकडचे अधिकृत वैद्यकीय संदर्भ पाहून एकवार खात्री केली. अलीकडे वाचनविश्वात उपयुक्त पुस्तकांची चालती आहे. हे पुस्तक त्याच प्रकारातले. तेव्हा त्याच्या पुढील आवृत्त्या निघण्याची शक्यताही खूप. म्हणून असा विचार केला, की आपण त्या चुका बघून स्वस्थ बसण्याऐवजी संबंधित लेखकाला कळवाव्यात. त्या पुढील आवृत्तीत सुधारणे आवश्यक होते.

मग पुस्तकाच्या पहिल्या पानाची मागची बाजू लेखकाच्या पत्त्यासाठी पाहिली. पण तो काही तिथे दिलेला नव्हता. त्यामुळे निराशा झाली. छापील पुस्तकात नियमानुसार फक्त प्रकाशकाचा पत्ता छापणे बंधनकारक आहे; लेखकाचा नाही. लेखकाने प्रकाशकाकडे आग्रह धरल्यास तो छापला जातो, अन्यथा नाही. आता मला नाईलाजाने प्रकाशकाचा पत्ता पाहणे आले. तिथे त्यांच्या टपाल पत्त्याबरोबरच तब्बल ३ इ-मेलचे पत्ते दिलेले होते. त्यापैकी एक खास वाचकांच्या सूचनांसाठी होता. म्हटले वा ! अगदी शिस्तबद्ध संस्था दिसतेय. मला हुरूप आला. मग त्या पुस्तकातील सर्व चुका आणि त्यांची योग्य दुरुस्ती असा मजकूर तयार केला. त्यासोबत योग्य तो वैद्यकीय संदर्भ जोडून त्या प्रकाशकाला इ-मेलने पाठवला. या पत्राची त्यांचेकडून दखल घेतली जावी ही अपेक्षा होती. त्यांच्या उत्तराची वाट पाहू लागलो.

यावर एक महिना उलटला पण त्यांचा काही प्रतिसाद आला नाही. मग मी आधीचीच मेल पुन्हा एकदा स्मरणपत्र म्हणून पाठवली आणि याखेपेस तिच्या दोन प्रती त्यांच्या इतर दोन मेलपत्त्यांवरही पाठवल्या. माझ्या दोन्हीही मेल्स व्यवस्थित ‘पाठवल्या गेल्या’ या सदरात दिसत होत्या. याही घटनेला काही महिने उलटले. कालांतराने मी त्यांच्या उत्तराची अपेक्षा सोडली. आता यापुढची पायरी होती ती म्हणजे त्यांचा फोन क्रमांक मिळवून बोलणे. परंतु याबाबतीतले माझे आधीचे अन्य काही अनुभव तापदायक होते. तरीही आता हिय्या करून फोन केला. तो घेणाऱ्या व्यक्तीने “साहेब बाहेरगावी गेलेत” असे सांगितले. त्यानंतर काही दिवसांनी फोन उचलला गेलाच नाही. मग मी नाद सोडला.

वरील एकतर्फी पत्रव्यवहारानंतर मनात काही प्रश्न आले:
१. ज्या नामांकित प्रकाशनाने त्यांचे ३ इ-मेलचे पत्ते जाहीर केलेले आहेत, ते प्रशासक माझ्या पत्रास उत्तर का देत नाहीत?
२. मुळात त्या संस्थेला येणाऱ्या मेल्स नक्की वाचल्या जातात का?

३. जर प्रकाशकाला फक्त आर्थिक व्यवसायातच रस असेल तर मग वाचकांचे हितासाठी पुस्तकात लेखकाचा पत्ता प्रकाशित केलेला बरा नाही का? खरे तर लेखक त्याच्या मजकुराबद्दल छपाई दरम्यानच अधिक संवेदनशील असायला हवा !
……..
असेच कधीकधी काही अभ्यासाच्या पुस्तकात काही मुद्रणदोष तर कधी घोडचुका सापडल्या होत्या. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. मग संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवल्यावर परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत. त्यांचे पत्रोत्तर सौजन्यपूर्ण असायचे.
.......
आता एका नामवंत मराठी दैनिकाचे दोन अनुभव.

एकदा त्यांच्या छापील अंकात “सेफ्टी टँक (म्हणजे safety) मध्ये पडून बालकाचा मृत्यू“ अशी बातमी आली होती. या संदर्भात अनेक सुशिक्षितही “सेफ्टी” हा चुकीचा उच्चार करतात खरा शब्द सेप्टिक (septic) हा आहे. निदान वृत्तपत्राने तरी याबाबतीत दक्ष पाहिजे. या बातमीत त्या चुकीने संपूर्ण अर्थहानी होते. एकतर ती बातमीही दुखःद आणि त्यात ही चूक. वाचल्यावर बराच अस्वस्थ झालो आणि मग त्यांना इ-मेल केली. दुसऱ्याच दिवशी त्यांच्या सहसंपादकांचे दिलगिरीचे उत्तर आले आणि भविष्यात यासंबंधी काळजी घेण्याचे आश्वासन त्यांनी त्यात दिले.

आता याच दैनिकाचा दोन महिन्यांपूर्वीचा एक अनुभव.

सर्वत्र करोनाचे थैमान. त्यावरील बातम्यांचा महापूर. जबाबदार वृत्त माध्यमांनी या विषाणूचा उच्चार ‘रोना’ असा योग्य छापलेला होता. पण प्रस्तुत वृत्तपत्रात तो सातत्याने “कोरोना” असा चुकीचा येत आहे. मी प्रथम शब्दकोशातून खात्री करून घेतली की तो ‘करोना’ ( UK /kəˈrəʊ.nə/ US /kəˈroʊ.nə/) हाच आहे. (अगदी तंतोतंत उच्चार मराठीत छापता येणार नाही, पण पहिले अक्षर खात्रीने ‘क’ च आहे). मग या वृत्तपत्रास इ-मेल केली. प्रतिसाद आला नाही. आठवड्याने पुन्हा ती पाठवली, पण आज अखेर त्यांचे काहीही उत्तर नाही. आणि अर्थातच “को” च छापणे चालू आहे.

गमतीचा भाग म्हणजे काल याच दैनिकात एका नामवंत कवींची कविता छापली आहे. त्यात कवींनी योग्य असा ‘करोना’ हा उच्चार लिहिलेला आहे. परंतु या दैनिकाचा अंकात इतरत्र ‘को’चा खाक्या चालू आहे. बरोबर आहे म्हणा, कवीच्या प्रतिभेत त्यांना संपादकीय हात घालता येणार नाही ! बाकी अन्य काही दृश्यमाध्यमे देखील ‘को’चीच री ओढत आहेत. त्यांचे तर सोडूनच देऊ.

बस, आता मी इतपत प्रयत्न करून स्वस्थ बसतो. फोनबिन जाऊदे, मरूदे हे धोरण.

लष्कराच्या भाकऱ्या भाजाव्यात पण.....
जोपर्यंत आपला हात दुखत नाही, तोपर्यंतच !
..........................................................................................

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिन्द्य, +११
.....................
हे पाहा :
"वसंत गुर्जर हे साठोत्तरी पिढीतील एक महत्त्वाचे (avant-grade) कवी आहेत."

(https://www.aksharnama.com/client/article_detail/5453)

लेखनाला जोर येण्यासाठी जर परभाषेतील शब्द वापरायचा असेल तर तो काळजीपूर्वक वापरावा. वरील कंसातील मूळ शब्द फ्रेंच असून त्याचे स्पेलिंग avant-garde आहे.
इंग्लिश मध्ये garde चा अर्थ ‘गार्ड’ असा होतो.

बऱ्याचदा हे नीट समजून न घेतल्याने तिथे लोक grade करून टाकतात !

काय चाललंय काय Happy
मला वाटतं स्वतःच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना बातम्या टाईप करायला बसवत असावेत.

स्वतःच्या शाळेत जाणाऱ्या स्वतःच्या मुलांना

मुलं कदाचित व्यवस्थित लिहितील यापेक्षा.

IMG-20210925-WA0009.jpg

एका दिवसात ७१ कोटी मग आत्तापर्यंत एकूण फक्त ८४ कोटी कसे, असा प्रश्न कसा नाही पडत ?

कार्यकत्र्यांनी हे खरेच चूक आहे का ? कार्यकर्ता चे स्त्रिलिंग कार्यकत्री असे दस्तूरखुद्द चिनूक्स यांनीच सांगि तले होते.

हे शमिता आणी राकेश कशाला तडमडले इथे ? ओह, जाहिरात आहे !

संपादन : माझीही लिहिण्यात चूक झाली असावी. आता चिनूक्स यांनीच प्रकट होउन स्पष्ट करावे !

कर्तृ - मूळ शब्द आहे. पुल्लिंगी प्र एकवचनी रूप कर्ता आणि स्त्रीलिंगी (कर्तृ+ई) कर्त्री असं होतं. तसंच नेतृ - नेता आणि नेत्री होतात. आपल्याला अभिनेता आणि अभिनेत्री हे शब्द परिचयाचे आहेतच.

हिंदी संदर्भ चटकन मिळतो : ( मराठीत फरक नसावा)
Submitted by कुमार१ on 25 September, 2021 - 19:01
>>
doctor found doing what ignorant patient does while searching symptoms on internet. by looking at similar symptoms on internet patient concludes himself about his medical condition.

मराठीत फरक नसावा on what basis? proofs? statistics? peer review? science? or you just searched for similarities on internet?
अधोगती.

काय लिहितात Happy
स्वच्छ जलचर काय..
साहसांसाठी आधार काय
डोक्यावर पडलेत

आजच्या लोकसत्तामधील फ्रंटपेजवरील जाहिरात:

https://epaper.loksatta.com/3254827/loksatta-mumbai/11-10-2021#page/1/1

"इंडिया ची
प्राईड।
माझी प्राईड।

ज्या तत्वांवर वी के सी ची स्थापना झाली त्यांचा मी आदर करतो।
‘कठीण परिश्रम करणारे फुटवेअर कठीण परिश्रम
करणाऱ्या प्रत्येक प्रत्येक व्यक्तिसाठी ’।
कोण वी के सी धध्येयांचा आदर करणार नाही?
ती उदात्त, आहेत आणि पवित्रही।
तुमच्यातील बहुतेकांसारखे आणि वी के सी सारखे मी ही ठरवले माझे
आयुष्य कठीण परीश्रमाच्या पायावर आधारावर उभे करीन ।
मी माझी आचारसंहिता वी के सी च्या आचारसंहितेसारखी ठेवली
आहे - कठीण परिश्रम करण्याची आचारसंहिता ।
वी के सी प्राईड प्रमाणे मी ही मान देतो कठीण परिश्रमाला ।
मीपण मान देतो कठीण परिश्रम करणाऱ्याला
आणि जो जो कठीण परिश्रम करतो त्याचा मला अभिमान आहे।
या आधुनिक युगात कठीण परिश्रम ही एक खात्रीची गोष्ट आहे जी
आपल्या आयुष्यात आपला अभिमान जागृत करील।
आणि ते आपल्या इंडिया साठी पण अभिमान जागृत करणारे आहे।
जेव्हा तुम्ही स्वतःसाठी कठीण परिश्रम करता तेव्हा तुम्ही तुमच्या
कुटुंबाच्या अभिमानासाठी काम करीत असता ।
तुम्ही इंडियाच्या उज्वल भविष्यासाठी कठीण परिश्रम करीत असता ।
जेव्हा तुम्ही तुमच्या यशासाठी प्रामाणिकपणे कठीण परिश्रम करीत असता
तेव्हा तुमच्या कुटुंबाच्या यशासाठी प्रामाणिकपणे कठीण परिश्रम करीत
असता आणि इंडियाच्या यशासाठी सुद्धा ।
या प्रगती पथावरील इंडिया चा अभिमान ठेवा
कठीण कठीण परिश्रम करत राहून ।
मला इंडिया चा प्राईड आहे ।
मला कठीण परिश्रमाचा प्राईड आहे ।
इंडिया ची प्राईड।
माझी प्राईड। "

अमिताभ बच्चन यांस,
साष्टांग नमस्कार,
सर्वप्रथम वयाची ऐंशी वर्षे पूर्ण केल्याबद्दल आपले अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपल्याला दीर्घायुष्य व निरामय आरोग्य प्राप्त व्हावे अशी देवाजवळ प्रार्थना करतो.
आजच्या लोकसत्तामध्ये फ्रंटपेजवर आपला वर दिलेला संदेश "वी के सी" या कंपनीने छापला आहे. त्या कंपनीबरोबर असलेल्या प्रेमळ संबंधांमुळे आपण आपला फोटो व संदेश छापायला परवानगी दिली असेल किंवा कदाचित फूल ना फुलाची पाकळी म्हणून काही लाख / कोट रुपये देखील कंपनीकडून आपल्या खात्यात जमा झाले असतील. या सर्वाशी मला काही कर्तव्य नाही. संदेशाच्या उच्च दर्जाबाबतही मला काही म्हणायचे नाही. पण मला यात वापरलेल्या भाषेबद्दल काही शंका आहेत. या शंकांचे निरसन आपण, आपले जाहिरातदार, लोकसत्ताचे संपादक किंवा वाचक करतील अशी आशा आहे.
१) या संदेशात वापरलेली भाषा मराठी आहे का?
२) मराठी भाषेने पूर्णविराम वापरणे सोडून हिंदीसारखा दंड वापरायला कधी सुरुवात केली?
३) शाळेतून प्रमाणलेखन / शुद्धलेखन बाद झालेले असले तरी काही शब्द चुकलेले आहेत हे लाखो वाचकांपैकी कोणीही तुम्हाला सांगत नाही ते तुमच्यावरील प्रेमापोटीच का?
उदाः तत्वांवर व्यक्तिसाठी धध्येयांचा परीश्रमाच्या उज्वल
४) "कठीण" असतो तो प्रश्न किंवा समस्या. परिश्रमांसाठी "कठोर” असे विशेषण वापरले जाते हे जाहिरात लिहिणाऱ्याला सांगायचे असेल तर ते कसे सांगावे? "प्रामाणिक किमतीत" असा देखील उल्लेख आहे. “माफक किमतीत” असे म्हणता आले नसते का? तर "गुणवत्ता साजरी करा” अशी सूचना देखील यात आहे. ती कशी साजरी करायची? दिवाळी साजरी करतात तशी का?
५) "आयुष्य कठीण परीश्रमाच्या पायावर आधारावर उभे करीन ।" यात पायावर किंवा आधारावर या दोनपैकी एकावर आयुष्य उभे करणे शक्य आहे. दोन्ही शब्द वापरायचे असतील तर "आयुष्य कठोर परिश्रमरुपी पायाच्या आधारावर उभे करीन.” अशी काहीतरी शब्दरचना शक्य होती. “पायावर आधारावर” असे वाचायला थोडे कठीण जाते.
६) "परीश्रमाच्या" (चुकीचा) आणि "परिश्रमाचा" (योग्य) असे दोन्ही पद्धतीने लिहून "ह्रस्व-दीर्घाला क्षुल्लक माना" असा संदेश द्यायचा आहे का? भाषा ही गोष्ट "कठीण परिश्रम" करण्याच्या योग्यतेची नाही का? तिथे "सोपे परिश्रम"देखील करावेसे का वाटत नाही?
७) “प्राईड” हा शब्द मराठी आहे का? अभिमान, अस्मिता, गर्व, तेजस्विता, शान अशा काही शब्दांचा विचार झाला का? काही अपरिहार्य कारणामुळे “प्राईड” हा शब्द मराठीत आणावा लागला असेल तर त्याचे लिंगनिदान झाले आहे का? कारण "इंडियाचा प्राईड" आणि "इंडियाची प्राईड" असे दोन्ही पद्धतीने एकाच ओळीत लिहून नक्की काय सुचवायचे आहे?
८) ‘कठीण परिश्रम करणारे फुटवेअर कठीण परिश्रम करणाऱ्या प्रत्येक प्रत्येक व्यक्तिसाठी ’।
फुटवेअर आणि व्यक्ती दोन्ही "कठीण परिश्रम" करत आहेत ही कल्पना अगदी रम्य आहे हे मान्य. पण "प्रत्येक प्रत्येक व्यक्तिसाठी" असे दोनदा दोनदा म्हणण्याची काय गरज? "प्रत्येक व्यक्तिसाठी" पुरेसे आहे. आणि "प्रत्येक व्यक्तीसाठी” असे दीर्घ लिहिले तर मुँह में घी- शक्कर!
९) “ती उदात्त, आहेत आणि पवित्रही” यात उदात्त नंतर आलेला स्वल्पविराम चुकून पडला असावा अशी स्वतःची समजूत घालून घेतली आहे. गुगल इनपुट मेथड वापरलेली आहे का? ती थोडी ओव्हरस्मार्ट आहे असे माझे निरीक्षण आहे.
१०) मराठीत विभक्ती प्रत्यय हे सामान्यरूपाला जोडूनच लिहावे लागतात. आपल्या कॉपीरायटरने "इंडिया साठी", “इंडिया चा", “इंडिया ची" अशी रूपे केली आहेत. यात गंमत म्हणजे वर काही ठिकाणी "इंडियाच्या” असे योग्य रूप देखील वापरले आहे. “च्या” जसा "इंडिया”ला जोडून घेतला आहे तसाच "चा” आणि "ची” देखील जोडून घ्यायला हरकत नव्हती. त्याने काय फरक पडतो? म्हटला तर पडतो! म्हटली तर गंगा नाहीतर वाहते पाणी! इंडियाच्या जागी भारत शब्द देखील चालला असता. अगदी नुसते देश म्हटले असते तरी समजले असतेच.
११) "चेकबरोबर आलेली प्लेट आम्ही फक्त प्रिंटरला लावतो, त्याकडे बघत सुद्धा नाही.” असे पूर्वीचे संपादक म्हणत नसत. पूर्वीचे संपादक तर फ्रंट-पेजवर जाहिरात देखील घेत नसत. असे करणे म्हणजे घरातील भांडी विकायला काढल्यासारखे मानहानीकारक समजले जाई. पैशांसाठी तडजोडी कराव्या लागतात हे कोणीच नाकारणार नाही. पण त्यालादेखील एक मर्यादा हवी की नको? मराठी वृत्तपत्रसृष्टीत जाहिरातदारांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली गेली आहेत का?

'उन्हाळ्याच्या मध्यभागी हॉट पार्किंग च्या जागेत स्वच्छ जलचरांबरोबर स्कुबा डायव्हिंग' केलं.
जलचरांना सांगूनच ठेवलं असेल, माधुरी येणार आहे.आज एरियल ने आंघोळ करून नीट पाठीला साबण लावून स्वच्छ या.

म्हणजे पार्किंग लॉट मध्ये 100 मीटर चा स्विमिंग पूल आहे?फारच बै हे लोक खर्चिक.डुबुक डुबुक करायला 40 फूट पुरेसं असेल.
आणि पार्किंग लॉट मध्ये स्वच्छ मासे पण टाकले?
आणि 'ती माधुरी कसली, ती तर जॅक कॉस्टोच जणू' चे 'माधुरी जॅक कॉस्टो मध्ये खोल जात होती' कसं झालं?
ऐकावं ते नवलच.

जलचरांना सांगूनच ठेवलं असेल, माधुरी येणार आहे.आज एरियल ने आंघोळ करून नीट पाठीला साबण लावून स्वच्छ या.
>>>>
खतरनाक Happy Happy

delete2.jpg

थेट भेट!

बापरे
शी हे फारच घाण आहे.अश्या टायपो कसे करतात हे लोक?

बालगुन्हेगार या शब्दाऐवजी विधीसंघर्षग्रस्त बालक अशी संज्ञा वापरतात असं दिसतंय.
https://maharashtratimes.com/editorial/article/-/articleshow/26005005.cms
पण 'सकाळ' च्या बातमीत 'विधीसंघर्ष बालक' असं परत परत लिहिण्यापेक्षा सदर अल्पवयीन मुलगा वगैरे लिहायला हरकत नव्हती.

हम्म.
वेगळा आहे शब्द.
पण एकीकडे साध्या शब्दात टायपो करायच्या आणि दुसरीकडे मुद्दाम अवघड शब्द वापरायचे हे पेपरांचं धोरण अतिफनी आहे.

Pages