ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका

Submitted by फारएण्ड on 26 June, 2014 - 12:02

पावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. "प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे. कथांमधल्या ठराविक घटनांमधे लोक स्वतंत्र विचार न करता आधीच्या तसल्या(१) कथा वाचून तशीच वाक्ये पुन्हा बोलतात. त्यालाही वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. त्यामुळे त्याचाही येथे समावेश करण्यात आलेला आहे.

तर एकूण या उपमा(२) व ठोकळेबाजपणापासून समाजाला वाचवणे गरजेचे आहे. परत परत येणार्‍या त्याच त्याच उपमा म्हणजे जणू परत परत येणारी...<येथे आम्ही उपमा देण्यापासून स्वतःला आवरले आहे. Be the change you want to see in the world असे एक थोर माणून म्हणून गेला आहे>.

तर यानिमित्ताने मराठी साहित्यात वादळाप्रमाणे तुफान बोकाळलेल्या काही उपमांवर व ठोकळेबाजपणावर काही काळाकरिता तरी बंदी घालावी अशी मागणी आम्ही मराठी पद्य व गद्य लेखन परिषदेस करत आहो. काही ठळक उदाहरणे. वाचकांनी अजून द्यावीत ही विनंती:

१. "आज एक माणूस रागावलंय हं!" हे वाक्य कोणीही कोणालाही उद्देशून म्हणायला कोणत्याही माध्यमात बंदी हवी. पुढच्या शतकात मराठीची स्टाईल बदलेपर्यंत. लेखकांना योग्य पर्याय सापडला नाही तर ती रागावलेली व्यक्ती तशीच रागावलेली राहूदेत.

२. "अगं वेडाबाई.." ने चालू होणारी वाक्ये नवर्‍याने बायकोला किंवा प्रियकराने प्रेयसीला म्हणायला बंदी. विशेषतः आख्खी कथा तिने त्याच्याबद्दल काहीतरी 'लेम' गैरसमज करून घेतल्यामुळे घडल्यावर खुलासा करताना.

३. सध्याच्या सीझन मधे हा मुद्दा तर फारच लौकर तुंबलेल्या पाण्याच्या पाईप्स प्रमाणे साफ करायला हवा:

- पावसाला प्रियकराची उपमा द्यायला पुढची काही वर्षे बंदी. "जस्ट फ्रेण्ड" नावाची म्हंटले तर चालू, म्हंटले तर निरूपद्रवी उपमा काही दिवस चालेल. उलट पुढची काही वर्षे पावसाला प्रेयसीची उपमा देणे बंधनकारक राहू द्यावे.
- मी/ती धरित्री, तो आकाश/पाऊस्/ढग या उपमेला त्याहीपेक्षा जास्त वर्षे बंदी.
- ध्ररतीला हिरवा शालू वगैरे नेसवायला मनाई आहे. तिला मॉडर्न होउ दे जरा. पाचू, मोती वगैरे वैचारिक बँकेच्या लॉकर मधेच राहूदेत काही दिवस.

४. "कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे फुलपाखरासारखी" उडून जायला बंदी. एवढी त्या सृष्टीची हौस असेल तर कोष, सुरवंट वगैरे दुर्लक्षित उपमा वापराव्यात.

५. कथेचा नायक, नायिका कॉलेजमधे असेल तर त्याला कमाल एकाच विषयात प्रावीण्य देता येइल. ते नक्की कोणत्या विषयात प्रावीण्य द्यायचे आहे ते ठरवावे. कोणत्यही विषयातील नोट्स वगैरे एकमेकांना द्यायला सक्त मनाई.

६. कोणावरही 'मनोमन' प्रेम करायला बंदी.

७. "मी स्वप्नात तर नाही ना?" असे कोणीही कोणालाही विचारायला बंदी.

८. भारतातली बरीचशी जनता चहा पीत असताना नायक व नायिका जरा भिजले की तिने "तो फ्रेश हो, मी तोवर छानपैकी कॉफी करते" असे म्हणणे टाळावे.

९. ती मनस्वी, स्वच्छंद, तर तो प्रॅक्टिकल असेल, तर दोघांना वेळीच सावध करून जस्ट फ्रेण्डच राहू द्यावे

१०. "तिने निळ्या रंगाची झिरझिरीत...." पासून सुरू होणारे वाक्य पुढे कितीही संस्कृतीप्रधान असले तरी टाळावे.

११. कथेत कोणत्याही प्रसंगात एका वेळी एकालाच "स्वर्गसुखात नाहता" येइल. या सर्व प्रसंगांमधे पाहिजे तर पुढची काही वर्षे "तेथे दोन फुले एकमेकांवर आपटली" हे दुसर्‍या एका उपमासृष्टीतील वाक्य वापरावे.

असो. इतर अनेक लिस्ट वाल्या कायद्यांतील तरतूदींप्रमाणे ही लिस्ट "एक्झ्हॉस्टिव्ह" नाही. पण येथील वाचक सहकार्य करून ती जास्तीत जास्त वाढवतील अशी आशा आहे.

(१) तसल्या म्हणजे तसा प्रसंग असलेल्या इतर कथा. "तसल्या" म्हंटल्यावर जे डोळ्यासमोर येते तसल्या नाहीत.
(२) खाण्याच्या उपम्याबद्दल आम्हाला काही राग नाही. मात्र तो ही ठोकळेबाज नसावा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते कोंड्याचा मांडा होत असतंय काय संसारात अजून?

ती अजून शून्यात नजर लावून बसते काय?

वरकरणी हसतात का आताशा?

ओठावर हासू पण डोळ्यात आसू?

आकाशाला गवसणी घालायची महत्त्वाकांक्षा?

हे भारीच आहे आख्ह प्रकरण...

खोलीत चंद्रप्रकाश भरुन राहिला होता असं एक वाक्य वाचालेल आठवतयं... गालावर रक्तिमा (?) चढला..... आरक्त झाले .....
आरक्तची फोड माहित आहे का कोणाला?

खारुताई,

तुम्ही म्हणता तशी एक प्रेमकथा मी लिहिलेली होती. पण त्यात नंदिनी यांचा संदर्भ होता. म्हणून कोणीतरी प्रशासकांकडे माझी तक्रार केली. ती कथा उडवली गेली आणि मला तंबी मिळाली. जर नंदिनी यांनी परवानगी दिली तर परत टाकेन. सोबत चेतन सुभाष गुगळे यांचाही अप्रत्यक्ष उल्लेख होता. मात्र त्यांनी आक्षेप घेतला नाही.

आ.न.,
-गा.पै.

४००!

पण हि अशी विशेषण असल्याशिवाय लेखकाची कादंबरी ५०० पानांवरून ५० पानांवर येईल त्याच काय ???>>
बर हे ना उलट हे, कमी वेळेत वाचुन होइल, बरिच झाडं वाचतिल (कागद कमी लागतील कादंबरीला), किंमत पण थोडीफार कमी असेल. Wink Light 1

कुणीच येणार नव्हतं तरी तिने/त्याने वाट बघितलेली नको. (त्यांना मायबोलीवर आयडी काढून द्या. कुणी येणारं असेल तरी विसर पडेल)>>>>>>>>>>धम्माल आहे............:हहगलो: Rofl
Rofl

भारी...
(सारखं सारखं 'भारी' कमेंट मारण्यावरही बंदी घाला हवी तर.. Wink )

सिरियसली, ह्या सगळ्याची फार जरूरी वाटते.

एवढे सगळे नियम पाळून प्रेमकथा लिहीली तर कशी होईलः

हापिसातली ४ ची वेळ.
तो: चल जरा चहा पिउ.
ती: चल.
दिवस संपत आल्यामुळे कपडे पार चुरगाळले होते. थकल्यामुळे मुरगाळलेले पाय ओढावेत तसे ते दोघे किचनमधे गेले.
चहा कोमट होता, अर्धा पिउन होइपर्यंत गारढोण झाला.
किचन इनडोअर असल्यामुळे धुंद वगैरे हवा नसून कोंदट वातावरण बनलेले होते.
बाहेर वीज कडाडली, ती न घाबरता तिकडे तुच्छतेने पहात राहीली.
"आय लव्ह यू" तो तेवढ्यात खेकसला.
"ठीक आहे", ती म्हणाली.

दोघे डेस्क वर परतले! --->>>> Rofl

देवा काय हे ?????/ office मध्ये वाचायला सक्त बंदी आहे असा disclaimer असायला पाहिजे … आवाज न करता मनातल्या मनात हसणं किती अवघड असतं हे घरी बसून वाचणाऱ्याला काय कळणार??:D Lol Lol

"मी आलेच हं तयार होउन"…. हे आत्ताच लग्नाला जायचे आहे अशा तयारीत असण्यार्या नायिकेने म्हणणे …. अजून किती तयार होते बाई …:G Biggrin Biggrin

ते कोंड्याचा मांडा होत असतंय काय संसारात अजून? >>>> आयटीच्या जमान्यात कुठला आलाय कोंड्याचा मांडा अमेय... तो तेव्हा व्हायचा जेव्हा फक्त एका कमवणार्‍याच्या तुटपुंज्या पगारात घरात कमीतकमी ४-५ मुल आणि बाकीची मंडळी अस एकत्र कुटुंब असायच.

काही उपमांनी/उल्लेखांनी थ्रेशोल्ड पार केल्याने त्याही अ‍ॅड करत आहे. डिक्शनरी सारखे हा ही डेटाबेस अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे.

"अहो मिस्/अहो मिस्टर"
गोष्टीत भेटणार्‍या अनोळखी व्यक्तींपैकी पुरूषाने स्त्रीला "किंचितशा" चेष्टेने किंवा स्त्री ने पुरूषाला किंचितशा रागाने असे म्हणायला बंदी.

"मला मेलीला..."
नवर्‍यावर पॅसिव्ह अ‍ॅग्रेसिव्ह राग दाखवताना बायकांच्या तोंडी हे उद्गार निषिद्ध

"ते....आपलं ते हे!"
विनोदी लेखात बायकोने अचानक काहीतरी विचारल्यावर मराठी मध्यमवर्गीय पुरूषाची होणारी गडबड दाखवताना यापुढे वेगळे काहीतरी शब्द वापरावेत.

फा, तुझा व्यासंग दांडगा आहे, सोन्याबापूंच्या भाषेत सांगायचं तर 'दंडवत घ्यावा'. Happy

बर्याच दिवसांत तुझ्या लेखणीखालून सिनेमे सुटले आहेत. किती दिवस तिरंगा पुन्हा पुन्हा वाचायला लावणार आहेस? Wink

ते "झिंगाट" आणि "सैराट" सुद्धा बॅन करा राव आता...
अजिर्ण झालाय आता ह्या शाब्दांच, टिव्ही आणि पेपर वाले कशालाही सैराट आणि झिंगाट म्हणतात्/लिहितात..

आणि लोक्स ३६० डिग्री चेंज म्हणतात ते ही चुकीचे आहे. म्हणजे माणूस परत आहे तिथेच येतो. १८० डिग्री तरी म्हणावे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात... हा ही एक टाकणीय क्लिशे.

घर देता का घर हे पण बॅन करायला हवे. कान किटले.

{{{ आणि लोक्स ३६० डिग्री चेंज म्हणतात ते ही चुकीचे आहे. म्हणजे माणूस परत आहे तिथेच येतो. १८० डिग्री तरी म्हणावे. }}}

वाहतूक बेट / ट्रॅफिक आयलंड (गोल चक्कर) पाशी जेव्हा तुम्ही १८० अंशात फिरून अर्धवर्तूळ पार करता तेव्हा तुम्ही सरळ दिशेत प्रवास करता आणि जेव्हा तुम्ही ३६० अंशात फिरुन एक पूर्ण वर्तूळ पार करता तेव्हा तुमचा प्रवास उलट दिशेत (म्हणजे जिथून आलात पुन्हा तिथेच) होत असतो. असा तो संदर्भ आहे.

लोक्स हा चूकीच्या पद्धतीने अनेकवचनी करण्यात आलेला (आणि बहुदा राखी सावंतमुळे लोकप्रिय झालेला) शब्दही बंदी घालण्यात येणार्‍या शब्दांच्या यादीत टाकला जावा.

गालावरचे तीळ, खळ्या
नेटाने संसार
काळजात कालवाकालव, धस्स
प्राण कंठाशी येणे
निसर्गाकडे दयामाया नसणे
नियतीचे मन

हे सगळं बॅन

Pages