मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

A Grave For Two (Anne Holt),> मस्त परिचय ललिता-प्रीति. वाचलं पाहिजे.

आईसलँड सारख्या चिमुकल्या देशातून अनेक थ्रिलर्स प्रकाशित होतात. >>>

हो, मी त्यापैकी Reykjavík Noir Trilogy पण विकत घेऊन ठेवली आहे. (SNARE, TRAP आणि CAGE) ही तीनही पुस्तकं आपल्याला आवडावीत (आणि त्यांच्यावर एकत्र काहीतरी लिहिता यावं) अशी माझी फार इच्छा आहे. Proud

मला आणखी एक कौतुक वाटलं, की ही सगळी पुस्तकं आधी त्यांच्या त्यांच्या स्थानिक भाषांत प्रकाशित झालेली आहेत. आणि मग ती इंग्लिशमध्ये आली आहेत.

फ्री लायब्ररीच्या अ‍ॅपवर उपलब्ध आहे आणि छोटेखानी आहे म्हणून Cait Flanders ने लिहिलेले The Year of Less पुस्तक ऐकले. बर्‍यापैकी सुखवस्तू कुटुंबातून आलेली मुलगी. नोकरीच्या पहिल्या काही वर्षातच $२०,०००-$३०,००० कर्ज , २०-३० पाउंड अतिरिक्त वजन आणि दारुचे व्यसन असे सर्व झाल्यावर वेगवेगळ्या कारणांनी स्वतःशीच एकेक वर्षाचे चॅलेंज घेऊन वजन आटोक्यात आणणे, कर्जमुक्ती, व्यसन मुक्ती मॅनेज करते. त्याबद्दल ब्लॉग लिहिते. त्यातल्या काही भागांचं पुस्तक आहे. वॉल स्ट्रीट जर्नलचे बेस्ट सेलर वगैरे जाहिरात पण वाचली.

माझ्या मध्यमवर्गीय विचारसरणीला तरी नवीन काही सापडलं नाही. अंथरूण पाहून पाय पसरावे , गरजांवर नियत्रंण ठेवावे, पैसे आहेत किंवा क्रेडिट लिमिट आहे म्हणून वाटेल त्या गोष्टींवर खर्च करू नये , जाहिरातींना भूलून कॉस्मेटिक्स ./ स्किन केअर वगैरेंवर खर्च करताना विचार करावा , वेगवेगळ्या छंदांसाठी पैसे खर्च करताना आपली कुवत काय हे ओळखून त्यानुसार खर्च करावा इत्यादी गोष्टींकरता ब्लॉग पोस्ट लिहिणार्‍या / वाचणार्‍या लोकांना ठीक आहे .

हे पुस्तक 'घेतलं' म्हणून असेल कदाचित, पण त्या अ‍ॅप ने Andrew Sean Greer यांचं Less हे पुस्तक दाखवलं.
प्रेमभंगातून सावरणारा, पन्नाशीला टेकलेला किंचित लेखक आर्थर लेस वर्षभर अराउंड द वर्ल्ड प्रवास करतो अशा अर्थाची ओळख होती म्हणून ते ऐकायला घेतलं,

सानफ्रांसिस्को मधे राहणारा गे आर्थर लेस , त्याच्यापेक्षा १५-२० वर्षे लहान असणारा त्याचा बॉयफ्रेंड, त्या बॉयफ्रेंडशी त्याचे ८-९ वर्षांचे नाते , त्या आधी आर्थर जेमतेम विशीत असताना पन्नाशीच्या एका प्रसिद्ध कविबरोबरचे त्याचे रिलेशनशिप, त्या कवीच्या इतर समकालीन ' रशियन रिव्हर स्कूल ऑफ आर्टीस्ट्स' मधल्या इतरांशी असलेली लेस ची इंटरॅक्ष्न ; बॉयफ्रेंडचे दुसर्‍याशी माणसाशी होणारे लग्न अव्हॉइड करण्याच्या नादात लेस न्यू यॉर्क, मेक्सिको सिटी , इटली, बर्लिन, पॅरिस, मोरोक्को, भारत आणि जपान असे वर्षभर फिरायचा प्लॅन करतो. त्या प्रवासातले त्याचे अनुभव असे पुस्तक आहे. पूर्ण ऐकल्यावर मला तरी ते ' मिल्स अँड बून* ' कसे फॉर्म्युलाबरहुकुम लिहिलेले असत** तसे वाटले. एखाद्या विद्यापीठात क्रिएटिव्ह राइटिंग मधे मास्टर्स करणार्‍या विद्यार्थ्यांना गृहपाठ म्हणून वेगवेगळे विषय द्यावेत ( लव्ह, प्रवासात लगेज हरवणे, नुकत्याच भेटलेल्या एखाद्या व्यक्तीबद्दल क्षणिक पण तीव्र आकर्षण ) आणि त्या सर्वांचं एकत्र पुस्तक करावं असं वाटत होतं मला.
मग सहज गूगल केले तर ते न्यू यॉर्क टाइम्सचे नोटेबल पुस्तक आणि पुलिट्झर विनिंग पुस्तक आहे असे कळले. :फेसपाम:

*काही काही मिल्स अ‍ॅण्ड बून मधे अगदी ग्राफिक पॉर्न म्हणता येईल अशी वर्णने असायची. त्या धर्तीचे काही नाही पुस्तकात.
** शेवटचे मिल्स अ‍ॅंड बून धर्तीचे पुस्तक बहुतेक १९८० साली वाचलेले. अलिकडची पुस्तके पण फॉर्म्युलेइक असतात की नाही कल्पना नाही.
अवांतर - lgbtq गृपमधे चर्चा करताना असे लक्षात आले होते की फिलाडेल्फिया सिनेमा वगळता गे लिटरेचर / सिनेमा काही वाचलेलं / पाहिलेलं नाही. हे पुस्तक वाचल्यामुळे तो एक बकेट लिस्ट आयटेम पूर्ण झाला

मी ते year of less ऐकायला सुरुवात केली होती पण अजिबात पकड घेतली नाही म्हणून थोडं ऐकून सोडून दिलं.

मला अशी year of अमुक तमुक पुस्तकं आवडतात त्यात year of magical thinking सर्वात महान आहे. Shonda rhimes चं year of saying yes पण आवडलं होतं. ही दोन्ही वाचली होती, ऐकली नव्हती.

Andrew Sean Greer यांचं Less >>>

हे माझ्या विशलिस्टीत आहे; आता प्रश्न पडलाय हे वाचावं की नाही :माझा-पण-फेसपामः

लायब्ररी अ‍ॅपमधे दिसले म्हणून वाचलेले अजून एक पुस्तक
Hillbilly Elegy: A Memoir of a Family and Culture in Crisis is a memoir by J. D. Vance

पेन्सिल्व्हेनियाच्या शहरी भागातले लोकच नव्हे तर नॉर्थ इस्ट मधल्या इतर राज्यातल्या शहरी भागातले लोक देखील केंटकी, वेस्ट व्हर्जिनिया, ओहायोचा काही भाग इथल्या लोकांना हिलबिली म्हणतात, त्यांची टिंगल करतात . धार्मिक विचारांचा पगडा, अगदी लहान वयात लग्न , अनेक लग्ने किंवा लग्नाशिवाय रिलेशनशिप, अनेक सावत्र भावंडे , कझिन्सशी लग्न या सगळ्या गोष्टींवरुन त्यांची भरपूर थट्टा होते हे ऐकून / वाचून होते. तिथल्या राज्यांमधे गरिबी, दारू / अंमली पदार्थांच्या व्यसनाने वेढलेले लोक, शिक्षणाचा अभाव, मॅन्युफॅक्चरिंग किंवा खाणीमधल्या नोकर्‍यांची उतरती कळा असे सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे पण वाचले होते. त्या सर्व पार्श्वभूमीवर हिलबिली फॅमिलीतला मुलगा येल लॉ स्कूल पर्यंत पोचतो याची गोष्ट म्हणून 'वाचायला' घेतले. लेखकाने स्वतःच वाचलेले रेकॉर्डिंग आहे.

केंटकीमधून ओहायो मधे जाऊन राहिलेले मातुल आजी आजोबा, त्यांची भांडणे, आजोबांचे दारूचे व्यसन, आजीचा भांडकुदळपणा , आईचे अनेक नवरे / बॉय फ्रेंड्स, हिलबिली अ‍ॅटिट्यूड मु़ळे तिची सर्वांशी होणारी भांडणे, तिचे ड्र्ग्जच्या आहारी जाणे या सर्वांचे अगदी अंगावर काटा आणणारे वर्णन बर्‍यापैकी तटस्थपणे केलेले आहे.

हिलबिली एलिजी असं नाव असलं तरी लेखकाची आईसुद्धा ओहायो मध्ये लहानाची मोठी झालेली आहे. पण तरिही त्याच्या आणि त्याच्या बहिणीच्या , इतर नातेवाईकांच्या आयुष्यावर हिलबिली कल्चरचा किती परिणाम झाला ते वाचून थक्क व्हायला होतं .
हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावर बरीच उलट सुलट चर्चा झाली . त्याने राजकीय फायद्यासाठी हे पुस्तक लिहिलं; सगळेच हिलबिली असे नसतात; तो केंटकीमधे फक्त पणजी- पणजोबा , आजीची भावंडं याच्याकडे सुट्टीपुरता गेलाय. त्याला तिथली काय माहिती? असेही बर्‍याच लोकांनी लिहिलंय.

राजकीय भाष्य थोडं थोडं आहे - फूड स्टँप प्रोग्रॅमचा गैर वापर, फॅमिली सर्व्हिसेस डिपार्टमेंटच्या इनइफेक्टीव्ह पॉलिसी , पे डे लोन्स चे फायदे आणि तोटे , ओबामाबद्दल लोकांना वाटणारी असूया , काँस्पिरसी थियरीवर विश्वास ठेवणारी जनता, मिडियाची लयाला चाललेली विश्वासार्हता अशा अनेक गोष्टींबद्दल मोघम लिहिलेलं आहे.

या देशात अनेक वर्षे राहून देखील समाजाच्या या स्तराशी तोंडओळख सुद्धा नसल्याने बर्‍याच गोष्टी मला धक्कादायक वाटल्या प्रथमदर्शनी तरी. पण थोडा विचार केल्यावर असं वाटलं की ग्रोसरी स्टोअर, गॅस स्टेशन, टोल बूथ, लँडस्केपिंग बिझनेस अशा ठिकाणी काम करणार्‍यांची परिस्थिती सर्वच राज्यांमधे अशा प्रकारचीच असणार. कुठल्याही पक्षाचे सरकार आले तरी जोपर्यंत लोक स्वत:ची परिस्थिती सुधारण्याची अकाउंटेबिलिटी घेत नाहीत तोवर मूलगामी सुधारणा होणे कठीणच !

या पुस्तकावर नेटफ्लिक्स सिनेमा बनवत आहे. येत्या नोव्हेंबर मधे रिलीज होणार आहे बहुतेक.

ट्रंपचा व्होटर बेस इतका होमोजीनस नाहीये अमा. भरपूर पैसे कमावणार्‍यांपासून ते फूड स्टॅम्पवर जगणार्‍यांपर्यंत सर्व आहेत त्यात. सर्व राज्यात आहेत, कॅथलिक्स आहेत, प्रॉटेस्टंट्स आहेत, नॉमिनल का होईना कृष्ण्वर्णीय आहेत, भारतीय देखील भरपूर आहेत .

डेमोक्रॅटिक व्होटर बेस देखील तसाच विविधतेने नटलेला आहे .

अव्हेलेबल पुस्तकांमधे काहीच इंटरेस्टिंग दिसेना म्हणून लाइफ चेंजिंग मॅजिक ऑफ टाइडिइंग अप - मरि कोंडो चे पुस्तक ऐकायला घेतले . पण ते काही पूर्ण करायला जमत नाही Happy
१. सर्व धर्मांचा त्याग करून फक्त मलाच शरण जा हा टोन अगदी ओतप्रोत भरलेला आहे. माझी पद्धत अंगिकारल्यास केस गळायचे थांबतीलच ... अशा धर्तीचे दावे आहेत.
२. सामान फेका आणि डिक्लटर करा म्हणजे खरूज झाल्यावर मलम लावायचे उपाय आहेत. होऊच नये म्हणून काय करावे याबद्दल बाई काहीच बोलत नाही.
३. ऑफिसातून आल्यावर ऑफिसचे बुटं आणि पर्स यांना ' थँक यू , यू डिड गूड टुडे' म्हणायचे ! आणि हे असलेच सर्व वस्तूंना ? गड्या आपला पसारा बरा

यू ट्यूबवर त्यांचे कपड्यांना घड्या कशा घालायच्या याचे व्हिडिओ आहेत. त्यातले काही आवडलेले मला. टी शर्ट्स वगैरे स्टॅक न करता ठेवायची कल्पना छान आहे. पण पुस्तक महाबोर !

The kite runner - Khaled hosseini वाचलं. चांगलं वेगवान आहे. अफगाणिस्तान परिस्थितीवर कादंबरी.

Koh i noor - William darlymple - कोहिनूर हिरा याचा मागोवा. वाचतोय. छान वाटतंय.

The god of small things - arundhati roy. पुरस्कार मिळालेलं. अमेरिकेत वाखाणलेलं. इतर ठिकाणी 'केविलवाणं' म्हटलेलं. केरळा सिरिअन क्रिश्चन कुटुंब, लालबावटा कॉम्युनिझम,केरळमधील अस्पृश्यता यावर कादंबरी म्हणून अवॉर्ड मिळालं असेल. तिचे वैयक्तिक चरित्र कादंबरीत दिसते थोडे. विकिवर लेखिकेचा परिचय वाचला. भारत सरकारविरुद्ध भूमिका घेतल्याने चर्चेत.

सर्व नविन परिचय मस्त. ललिता, Scandinavian thrillers वाचले नाही आहेत कधी. मस्त वाटते आहे ओळख. कधीतरी वाचेन. पराग, मी सध्या काईट रनर ऐकते आहे, ऑडिबलवर. मध्ये a thousand splendid suns वाचलं...खूप दिवस त्याचं गारूड होतं मनावर.
and mountains echoed वाचेन का माहिती नाही...बराच फाफट पसारा आहे, असं एकंदरीत reviews वरून वाटलेलंच.

ते मेरी कोंडोचं पुस्तक मी २-३ वर्षापूर्वी वाचायला घेतलेलं... डोकं गरगरलेलं ताईंची फिलॉसॉफी ऐकून...आणि जेवढं वाचलं तेवढ्या पुस्तकात तेच ते आळवून लिहीलेलं...अत्यंत बोअर होऊन सोडून दिल्याचं आठवतंय.

ऑफिसातून आल्यावर ऑफिसचे बुटं आणि पर्स यांना ' थँक यू , यू डिड गूड टुडे' म्हणायचे ! आणि हे असलेच सर्व वस्तूंना ? गड्या आपला पसारा बरा >>>

Biggrin सिरियसली! पण अनेकांना या टाइपचा अप्रोच आवडतो, पटतो...

There's Gunpowder in the Air (Manoranjan Byapari)

या पुस्तकाचा किंडलवरचा सारांश जरा दिशाभूल करणारा आहे. सारांश वाचून मी पुस्तक घेतलं, पण त्यात म्हटलेल्या कथानकावर पुस्तकात मुख्य फोकस नाहीये. ७० च्या दशकातलं एक मोठा तुरुंग, तिथले अंतर्गत व्यवहार कसे चालतात, गार्डस आणि कैद्यांमधलं नातं, नक्षलवादी कैद्यांच्या वेगळ्या कोठड्या, वगैरे भरपूर मालमसाला आहे. डिटेलिंगही आहे. पण माझ्या अपेक्षा वेगळ्या झाल्यामुळे जरासा भ्रमनिरास झाला.
तरी, नेटवर लेखकाची माहिती वाचलेली इंटरेस्टिंग वाटली, म्हणून पुस्तक संपूर्ण वाचलं.

----------

THE ARGUMENT (Victoria Jenkins)

एका चौकोनी कुटुंबाच्या कथेतून मांडलेलं सायकॉलॉजिकल थ्रिलर.
टीनएजर मुलांचं विचित्र वागणं यावर फोकस ठेवून पुस्तकाची सुरुवात होते. आई आणि टीनएजर मुलगी यांच्या दृष्टीकोनातून आळीपाळीने प्रकरणं येतात आणि त्यातून कथा पुढे सरकते. कथेत डायरीचं हुकुमी अस्त्र आहेच, मात्र त्याचा अतिरेक नाहीये. प्लस त्याबद्दलचा एक लहानसा ट्विस्ट आहे, तो मला आवडला.
६०-७० टक्के पुस्तक संपेपर्यंत फॅमिली ड्रामाच आहे मुख्य (किंडलवर वाचताना हे पर्सेंटेज कळतं म्हणून लिहिलं Proud ) त्यानंतर दोन मोठे ट्विस्ट येतात. आणि पुढच्या घटना घडून पुस्तक संपतं.
त्या अर्थाने थ्रिलरपेक्षा हा सायकॉलॉजिकल ड्रामा आहे.
निवेदनात आई आणि मुलीची विचारप्रक्रिया, मनातले उलटसुलट विचार, घालमेल, त्यातून नकळत येणारा फ्लॅशबॅक हे सगळं गुंतवून ठेवणारं आहे. मात्र वडिलांचा दृष्टीकोन फारसा कळत नाही. त्याचं कारण ट्विस्टमध्ये कळतं.
एकंदर पुस्तक एकदा वाचण्यासारखं आहे.

Goat Days (Benyamin)

टवणे सरची पोस्ट वाचून (या धाग्याचं पान ४९) हे पुस्तक विश-लिस्टमध्ये टाकून ठेवलं होतं. नुकतंच ते वाचून संपवलं.

'दुर्दैवाचे दशावतार' किती अवतार धारण करू शकतात ते हे पुस्तक वाचून समजतं. केरळमधला एक गरीब अशिक्षित मजूर. त्याच्या गावातले अनेकजण गल्फमध्ये नोकरी करून थोडेफार पैसे मिळवत असतात. याला जाण्याची संधी मिळते तेव्हा कर्ज काढून, कसेतरी पैसे उभे करून तो जातो. तिथे (रियाध) पोचल्यावर कुणाला भेटायचं, कुठे जायचं काहीही माहिती त्याच्याजवळ नसते.
त्याला न्यायला एक अरब येतो आणि त्याची रवानगी थेट वाळवंटातल्या एका मोठ्या बकर्‍यांच्या farm मध्ये होते. शेकडो बकर्‍यांची देखभाल करायची, त्यांना वाळवंटात फिरवून आणायचं, हे त्याचं काम. बदल्यात त्याला अक्षरश: गुलामासारखी वागणूक मिळते. वाळवंटात पाण्याचं दुर्भिक्ष्य, असलेलं पाणी बकर्‍यांसाठीच वापरायचं या कडक नियमामुळे त्याला अंघोळ, प्रातर्विधींसाठीही पाणी वापरायची मनाई असते. जेमतेम खायला मिळत असतं, कामात बारीकशी कुचराई/चूक झाली तरी चामड्याच्या पट्ट्याने, लाथाबुक्क्यांनी मारहाण होत असते.
ते सगळं वर्णन सुन्न करणारं आहे. तरीही निवेदनात एक साधा हलकेफुलकेपणा आहे. देवावरचा अढळ विश्वास, अशा परिस्थितीतही अरबी भाषा समजून, शिकून घेण्याचा प्रयत्न, वाळवंटाचं, तिथल्या ऋतूंचं वर्णन, बकर्‍यांशी जुळत गेलेलं नातं, परतण्याची कधीही न सोडलेली दुर्दम्य आशा, त्याचं बकर्‍यांमधलंच एक बनत जाणं - हे सगळं वाचून थक्क, हतबल, अवाक, कमाल बरंच काय काय वाटतं.
असा ३ वर्षांहून अधिक काळ तो तिथे काढतो, आणि मग पलायनाची एक संधी मिळते. पुढेही मोठं दिव्य उभं असतं. ते सगळं वर्णनही पोटात खड्डा पाडणारं आहे.
कथानक काल्पनिक म्हणावं तर ते ही नाही. हे सगळं भोगलेली खरीखुरी व्यक्ती लेखकाला भेटली होती.
त्या देशात त्याच्या वाट्याला हे सगळं येतं, यामागे ट्रॅव्हल एजंटने केलेली फसवणूक हे ऑब्व्हियस वाटणारं कारण नसतं, ते कारण पुस्तकाच्या शेवटाकडे उघड केलं आहे. ते वाचूनही हबकायला झालं.

अनन्वित हालअपेष्टांची करूण कहाणी, त्रयस्थपणे, गळे न काढता, काही ठिकाणी हलक्याफुलक्या पद्धतीने सांगितली आहे. त्यामुळे पुस्तक फार आवडलं.

किंडल अनलिमिटेड ची 79 रु ची ऑफर घेतली होती
तीन महिने तुंबळ वाचन झालं
मिळतील ती पुस्तके आधाश्यासारखी वाचून काढली
जवळपास पन्नास च्या वरती तर झालीच
Happy

गोट डेज किंडल वर घेतलं आहे
वाचवेल की नाही माहीत नाही
>>>
पुस्तकाची मांडणी अशी केली आहे, की जोर के धक्के धीरे से लगते हैं! त्याचं मुख्य कारण पुस्तकाची साधी, सोपी, समोर बसून गप्पा मारल्यासारखी भाषा आणि गळे न काढणे.
त्यामुळे नक्की वाचवेल.

दिनेश ठाकूर नावाचा अमेरिकेत स्थायिक असलेला माणूस अमेरिकेतली चांगली नोकरी सोडून रॅनबॅक्षीत जॉइन होतो व तिथून पुढे त्याला आतली भयानक माहिती कळत जाते व तो
ह्या फ्रॉड केस मध्ये एफ्डी ए साठी व्हिसल ब्लोअर म्हणोन काम करतो. >>>> "रोश (roche) विरुद्ध ऍडम" नावाच्या पुस्तकाची आठवण झाली , विषय साधारण असाच ..

निक कटरचे "द ट्रूप" वाचले.
फाटली एकदम.
स्कॉउट-कब मुलांची एक टीम आणि त्यांचा सर असे 6 जण एका बेटावर ट्रिप/सहलीसाठी गेले असतात. तिथे मेनलँड मधून अत्यंत भुकेला माणूस त्यांच्या गाठीशी पडतो, जो अक्षरश: काहीही खात असतो. तो फारच आजारी आहे दिसल्यावर त्या मुलांचे सर त्याच्यावर उपचार करायचे ठरवतात, तर त्या व्यक्तीच्या पोटात मोठा जंत असतो, आणि हे प्रकरण फार काँटॅजियस असते.

"लॉर्ड ऑफ द फ्लायस" मिट्स कोरोनव्हायरस असे वर्णन होऊ शकते.

बापरे
ही सर्व पुस्तकं वाचायची आहेत एक एक करून.

Pages