मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नॅशनल बूक अवार्डच्या शॉर्टलिस्टमधले पुस्तक, अल्बेनियामधल्या दोन तरुण मुलांचा घर सोडून पळून जाऊन परदेशात राहण्याचा अनुभव. लेखकाच्या पहिल्या पुस्तकाला मिळालेले पुरस्कार, मूळ फिनिश मधून भाषांतरित पुस्तक आणि लायब्ररीच्या लिबी अ‍ॅप मधे ते अव्हेलेबल असणे एवढ्या सगळ्या गोष्टींमुळे क्रॉसिंग हे पुस्तक 'ऐकले' ( पेंग्विन रॅंडमहाऊस प्रकाशनाचे आहे ही देखील बारकीशी जमेची बाजू. लहानपणापासून पेंग्विन प्रकाशनाची पुस्तके आवडली आहेत )

पुस्तक सुरु होते तेंव्हा नायक इटलीमधे आहे. वाहत्या रस्त्यावर ट्र्कसमोर उडी घेतो तरी कसाबसा वाचतो. हॉस्पिटल, सायकिअ‍ॅट्रिक वॉर्ड असे करत करत बाहेर पडतो. तिथून कथा त्याचे अल्बेनियातले दिवस, त्याच्या आई वडीलांची गोष्ट, त्याच्या वडिलांना त्याला सांगितलेल्या अल्बेनियन बोधकथा / मिथ्स आणि त्याचे इतर देशातले ( इटली, स्पेन, अमेरिका, फिनलंड) अनुभव अशी मागे पुढे करत सरकते.
१९८९-१९९०-१९९१ हा काळ कोसोव्हो , बॉस्निया, अल्बेनिया या देशांमधे फार अंदाधुंदीचा, स्थित्यंतराचा होता. त्या पार्श्वभूमीवर निम्न- मध्यमवर्गीय घरातील दोन मुलं , लहानपणापासून शेजारी राहणारी , १५-१७ वर्षांची असावीत. दोन्ही मुलं त्यांची सेक्शुयल आयडेंटिटी डिस्कव्हर करत आहेत. गरिबीला, आसपासच्या परिस्थितीला कंटाळून दोघे पळून जातात. त्यांचा प्रवास, परदेशात कथानायकाला ट्रांस वूमन, रेफ्यूजी म्हणून आलेले अनुभव यांचे वर्णन आहे.

एल जी बी टी क्यू साहित्य या आधी कधी वाचलेले नव्हते . या निमित्ताने त्याचीही ओळख होईल असे वाटले होते. पण एकूण पुस्तकाने निराशा केली. पुढे मागे सिनेमा , गेलाबाजार एखादी नेटफ्लिक्स मालिका होईल अशा उद्देशाने लिहिलेले पुस्तक वाटले. वेगवेगळे पुरस्कार काय निकषांवर मिळतात त्याच्या अभ्यास करुन लिहिले असावे - उदा एल जी बी टी क्यू अनुभव , रेफ्यूजी अनुभव , आयर्न कर्टन देशातले स्थित्यंतर या सर्वांवर चेकमार्क!

पुस्तक वाचले असते तर अल्बेनियन उच्चार कळले नसते. ऐकताना ते नीट समजतात . पण व्यक्तींची नावे वगळता फारसे अल्बेनियन शब्द नाहीत.

भाषा , मांडणी , पुस्तकातल्या उपमा, अलबेनियन बोधकथांची ओळख ही जमेची बाजू.
https://www.penguinrandomhouse.com/books/568166/crossing-by-pajtim-stato...

मेधाने मागच्या पानावर लिहिलं आहे ते SOURDOUGH पुस्तक वाचलं.
विषयाचं वेगळेपण म्हणून मला खूप आवडलं. या विषयावर कुणी फिक्शन कसं काय लिहू शकतं, असं वाटलं. Biotech Fantasy असं मी त्याचं वर्णन करेन. सूक्ष्मजीवांकडे वेगळ्याच अँगलने पाहिलं आहे.

१९८९-१९९०-१९९१ हा काळ कोसोव्हो , बॉस्निया, अल्बेनिया या देशांमधे फार अंदाधुंदीचा, स्थित्यंतराचा होता. >>>

त्याच काळावर आधारित Rose Of Sarajevo हे पुस्तक नुकतंच वाचलं.
सारायेवोतल्या घरांच्या भिंतींवर बाँबगोळ्यांनी भगदाडं पडायची ती नंतर लाल रंगाच्या रेझिनने भरली जायची, दुरून ते गुलाबाच्या फुलांसारखं दिसायचं - असा या शीर्षकाचा संदर्भ नेटवर समजला. त्यामुळे पुस्तकाबद्दल खूप अपेक्षा होत्या. पण कादंबरी म्हणून माझा पूर्ण भ्रमनिरासच झाला. Sad

डॉ. नारळीकरांनी लिहिलेलं व्हायरस नावाचं पुस्तक वाचलं. ते टीआयआरएफ मध्ये असताना संचालक पदाच्या निवडीवरून झालेल्या नाट्याबद्द्ल त्यांनी मोघम लिहिलं होतं. त्याबद्दल सविस्तर त्यांनी ह्या कादंबरीत कथेचा भाग म्हणून लिहिलं आहे असं एक मित्र म्हणाला होता. त्यामुळेही हे पुस्तक वाचायची उत्सुकता होती. १९९६ साली ह्या पुस्तकाची पहिली आवृत्ती आली. भारतात तेव्हा इंटरनेट घरोघरी पोहोचलेलं नव्हतं. त्यामुळे नेटवर्क, इंटरनेट वगैरेंबद्दलची वर्णनं एकदम बेसिक स्वरूपातली आहेत. एकंदरीत कथा चांगली आहे फक्त मी वर म्हटलेला भाग त्या कथेत नसता तरी काही फरक पडला नसता असं वाटलं.

The whisper network

#metoo चळवळीच्या थीमवरील कादंबरी आहे. पार्ट फेमिनिस्ट डॉग व्हीसल, पार्ट सस्पेन्स थ्रिलर.
Texas मधील एक मोठं कॉर्पोरेट ऑफिस, तिथे काम करणारे स्त्रीपुरुष, sexual harassment च्या दबक्या आवाजातील चर्चा (whispers- hence the name), आणि त्यात काहीतरी अघटित घडल्यावर पोलिसांचं इंव्हॉल्व्ह होणं.

मला विषयाच्या वेगळेपणासाठी आवडलं. Writing finesse मध्ये सुधारणेला खूप वाव आहे पण. नवोदित लेखिका आहे, काहीकाही पार्ट्स अगदीच जमले नाहीयेत पण ओव्हरऑल या विषयावर लिखाण, चर्चा व्हायला हव्यात म्हणून वेलकम addition आहे. रेटिंग 3.5/5

अच्युत गोडबोल्यांचं मुसाफिर वाचलं.
पुस्तकं जुनेच आहे.
छान आहे.
एकदा वाचण्यासारखे नक्कीच आहे.
फक्त त्याचं शहाद्याला जाऊन आदिवास्यांसाठी काम करणं ते वाचायला मला फारच बोर झालं म्हणून मी ते प्रकरण चक्क स्किप (!)केलं...
मी ह्याआधी वाचलेलं छावा एकूण एक ओळ वाचली होती.
पण ह्यात मी ते प्रकरण नाही वाचलं.
अवांतर : नॉन आयटी लोकांना कितपत कळलं असेल असा एक विचार आला. प्रोजेक्ट्स, मिटींग्स, प्रेसेंटेशन, डेडलाईन्स इ. टर्म्स कश्या कळल्या असतील असा प्रश्न पडला.

मी ह्याआधी वाचलेलं छावा एकूण एक ओळ वाचली होती.
पण ह्यात मी ते प्रकरण नाही वाचलं.
अवांतर : नॉन आयटी लोकांना कितपत कळलं असेल असा एक विचार आला. प्रोजेक्ट्स, मिटींग्स, प्रेसेंटेशन, डेडलाईन्स इ. टर्म्स कश्या कळल्या असतील असा प्रश्न पडला.>>>
छावा संभाजी महाराजांबद्दल आहे ना, त्यात कसले प्रोजेक्ट्स, मिटींग्स, प्रेसेंटेशन, डेडलाईन्स इ.???
बोर्डरुम म्हणायचं आहे का?

सध्या एस एच भैरप्पा यांची तंतू ही कादंबरी संपवली. तसे तर मला अनुवादित पुस्तके वाचायला आवडतात खास करून परदेशी पुस्तके जसे की डॉन ब्राऊन,सिडने शेल्टन, जेम्स हेडली, अगोथा ख्रिस्ती, शेरलॉक होम्स वगैरे....
वाचनालयात जायला वेळ नसतो म्हणून जास्त पाने असलेली पुस्तके आणते आणि वाचून त्याचा फडशा पडते...
तंतू खरचं एक चांगली कादंबरी आहे . थोडीशी सामाजिक थोडीशी कौटुंबिक प्रकारात मोडणारी आहे. फ्लो खूप छान आहे, मुख्य म्हणजे इंदिरा गांधींनी देशावर आणीबाणी का लादली याचे कारण मला त्यात समजले.

नुकतेच राधिका टिपरे यांचे उत्तरपूर्वेचे इंद्रधनु हे पुस्तक वाचले. सप्तभगिनींची निसर्गरम्य भटकंती यावर खूप सुंदर लिखाण केले आहे. त्यातील काही प्रवास हा एकट्याने केलाय. काही अपरिचित जागा, तिथला अनाघ्रात निसर्ग याविषयी छान माहिती दिली आहे. ब्रह्मपुत्रा नद याविषयी बरीच रंजक माहिती दिली आहे. यारलुंग साँगपो ग्रँड कॅनियान ही पृथ्वीवरील सगळ्यात मोठी घळ आहे ही नवीन माहिती मला यात मिळाली.

अवांतर : नॉन आयटी लोकांना कितपत कळलं असेल असा एक विचार आला. प्रोजेक्ट्स, मिटींग्स, प्रेसेंटेशन, डेडलाईन्स इ. टर्म्स कश्या कळल्या असतील असा प्रश्न पडला.>>???? म्हणजे???

अग्निपंख , तुमचा काहीतरी गोंधळ होतोय.
मी मुसाफिर बद्दलच विचारतीये.
त्यांच्या आयटी तल्या कारकिर्दीबद्दल जे लिहिलंय ते नॉन आयटी लोक्स ना कितपत कळलं असेल कारण त्यात आयटी रेलटेड बऱ्याच टर्म्स आहेत असं विचारायचं होतं.
तसंच मुसाफिर मधलं एक प्रकरण स्किप केलं पण ह्या आधी वाचलेल्या छावामध्ये मी असं काही स्किप वगैरे केलं नव्हतं असं मला म्हणायचं होतं.

Me_rucha,
आयटीमध्ये नसलेले लोक आयटीमधल्या लोकांइतके नसले तरी थोडेफार हुशार असतात. तेही projects, deadlines, meetings असे शब्द वापरतात. शाळेत शिकवतात त्यांना या शब्दांचे अर्थ.

>>>प्रोजेक्ट्स, मिटींग्स, प्रेसेंटेशन, डेडलाईन्स इ. टर्म्स कश्या कळल्या असतील असा प्रश्न पडला
खूप दिवसांनी मायबोलीवरची कॉमेंट वाचून ऍनालॉग लॉल झालं.

चिनूक्स, इतरही सर्व, मला हे म्हणायचे होते की एखादा डॉक्टरही कधी कधी आऊट अँड आऊट मेडिकल टर्म्स वापरत असेल तर नॉन मेडिकल बॅकग्राऊंड असणाऱ्यांना ते कळू शकणार नाही.
त्या अर्थाने मी लिहिलं होतं.
इथे कुणालाही कमी लेखायचा उद्देश नव्हतं एवढेच क्लिअर करायचे होते.

नॉन आयटी लोकांना कितपत कळलं असेल असा एक विचार आला. प्रोजेक्ट्स, मिटींग्स, प्रेसेंटेशन, डेडलाईन्स इ. टर्म्स>> हे सर्व फायनांस, मॅन्युफॅक्चरिंग , बँकिंग , फार्मा, पब्लिशिंग अशा कामांमधे पण सगळ्यांना माहिती असतात. त्यात आयटी स्पेसिफिक काय आहे ?
स्क्रम, सी आय सी डी, मायक्रो सर्व्हिसेस, डीप लिंकिग असल्या काही टर्म्स असतील तर त्याचे थोडेसे स्पष्टीकरण लागेल. पण त्याकरता देखील सर्च एंजिन्स आहेतच की

मेधा - त्या टर्म्स आयटीतील लोकांना माहीत आहेत हा ही एक मोठा गैरसमज आहे Wink लखू रिसबुडगिरीने समृद्ध असे हे विश्व आहे Happy

प्रोजेक्ट्स, मिटींग्स, प्रेसेंटेशन, डेडलाईन्स इ. टर्म्स >>>

अहो, ह्या सगळ्या संकल्पना "तुला‌ पाहते रे" किंवा "माझ्या नवऱ्याची बायको" ह्या मालिकांमध्ये इतक्या छान समजावून सांगतात, की 'मुसाफिर'सारखी विद्वज्जड पुस्तकं कोणालाही विनासायास वाचता येतात. आयटीत असायची गरज नाही.

एस् एल् भैरप्पांचं उमा कुलकर्णींंनी अनुवाद केलेलं 'उत्तरकांड' हे पुस्तक वाचून झालं. सीतेच्या नजरेतून लिहिलेली रामायणाची कथा आहे.
ज्यांनी भैरप्पांचं लेखन वाचलं असेल त्यांना ठाऊक असेल, की प्रत्येक व्यक्तिरेखा बारीकसारीक तपशिलांसह, माणूस म्हणून उभी करणे हे भैरप्पांचं वैशिष्ट्य आहे. 'पर्व' या महाभारतावरच्या कादंबरीतही त्यांनी श्रीकृष्णापासून ते शल्यराजापर्यंत सर्वांना असं सुसंगत, सुस्पष्ट व्यक्तिमत्त्व दिलं आहे.
उत्तरकांड या पुस्तकातही त्यांनी सीता, राम, लक्ष्मण, ऊर्मिला, कैकेयी, कौसल्या, रावण, हनुमान अशा सगळ्यांचीच, माणूस म्हणून पटणारी व्यक्तिमत्त्वं उभी केली आहेत.

महाभारतावरची युगांत, व्यासपर्व, व्यासांचे शिल्प (नरहर कुरुंदकर) अशी पुस्तकं मी वाचली आहेत, पण रामायणावरचं कुठलंच पुस्तक कधी वाचलेलं नव्हतं. रामायणातल्या कथा मला फारशा रोचक वाटत नाहीत. (आदर्श पात्रांचा थोडा ओव्हरडोस होतो.) पण ही कादंबरी लिहिताना भैरप्पांनी मात्र हे आदर्शपणाचे मुखवटे दूर करून, आतली खरी माणसं दाखवली आहेत असं वाटलं. चमत्कार, फुलवून फुलवून वाढवलेल्या कथा यांना फाटा देऊन पटतील अशा घटना मांडल्या आहेत. (उदा.अहल्येचा उद्धार केला म्हणजे नेमकं काय केलं असेल) सीतेच्या मनातली तगमग, लोकांंची बडबड जास्त महत्त्वाची मानून गर्भवती पत्नीला सोडून देणाऱ्या रामाबद्दलचा संताप हे सगळं अतिशय प्रभावी भाषेत उतरलं आहे. (जसं 'पर्व'मधे द्रौपदीचं दुःख मांडलं आहे)

लव-कुशांच्या जन्मानंतर काही दिवसांनी कादंबरी सुरू होते आणि अधूनमधून मागच्या आठवणी पुढे येतात, कधी कथा परत चालू काळात येते. कुठेही लिंक तुटत नाही, उलट संगती लागत जाते.

@वावे अजून १ -२ पॅरा ची भर घाला आणि छानसं पुस्तक परीक्षण लिहून काढा ना Happy

@भास्कराचार्य>> योग्य वेळी योग्य मालिकांची नाव आठवली आहेत तुम्हाला Lol @फारएण्ड Wink Lol Lol

वावे, छान परिचय. 'पर्व'सारखंच हे रामायणावरचं पुस्तक असावं असं वाटतंय.

मी नुकतंच भैरप्पांचं 'सार्थ' वाचलं. (अनुवाद - उमा कुलकर्णी) ८व्या शतकातल्या भारतातलं चित्र डोळ्यांसमोर छान उभं राहतं. हिंदू आणि बौद्ध धर्माच्या काही संकल्पनांची पात्रांकरवी केलेली तुलना चांगली आहे, असं विचारमंथन आणि खुली चर्चा व्हायला हवी असं वाचताना सतत वाटत राहतं.
मात्र तरी एकूण हे पुस्तक मला फारसं आवडलं नाही, त्याचा विषय नॉट माय कप ऑफ टी.

हो, पर्वसारखंच, पण पर्वच्या मानाने लहान आहे पुस्तक. कारण अर्थात महाभारताचा व्याप बराच मोठा आहे.
सार्थ मला आवडलं होतं. भैरप्पांचं मी वाचलेलं ते पहिलंच पुस्तक. त्यातल्या तंत्रविद्येचं वर्णन किळसवाणं आहे, पण एकंदरीत मला आवडलं होतं.

fahrenheit 451 वाचले. dystopian कादंबऱ्यामधील एक मानाची कादंबरी. मला हातावेगळी केल्यावर 'परत तेच तेच' असे वाटले. 1984, lord of the flies, handmaid's tale, brave new world वगैरे वाचलेल्या व हंगर गेम्स व इतर अनेक न वाचलेल्या पण माहिती असलेल्या कादंबऱ्यामधली एक असे वाटत राहिले.

पण आता 70वर्षे झाली आहेत या कादंबरीला तेव्हा त्या दृष्टीनेही पाहायला हवे. काही संकल्पना नक्कीच विचारास प्रवृत्त करतात. टेलिव्हिजन पार्लरची virtual real family आता एक प्रकारे प्रत्यक्षात आली आहेच. जगातला authoritarian प्रभाव वाढतो आहे. डोक्यात पुस्तके भरलेली माणसे मला सर्वात जास्त आवडली. माणूसच पुस्तक झाला आहे. वाचून झाल्यावर पुस्तकातले काही संदर्भ/संकल्पना पुनः पुन्हा घोळत राहतात हे पुस्तकाचे मोठे यश आहे.

पुस्तके जाळणारा fireman, कागद जळण्याचे तापमान f451

न्यू यॉर्क टाइम्सचा बीक रिव्ह्यू पॉडकास्ट मी अधनं मधनं ऐकत असते. त्यात ऐकलेली पुस्तकांची / लेखकांची नावे लक्षात ठेवून त्यांची एक ' टू बी रेड' यादी बनवावी असा विचार दरवेळेस येतो मनात पण त्याची अंमलबजावणी काही होत नाही. मागच्या वर्षाच्या शेवटी टॉप टेन बूक्स ऑफ २०१९ असा एक एपिसोड ऐकला होता. त्यातून टेड चँग यांचे एक्झेलेशन नावाचे पुस्तक लायब्ररीच्या विशलिस्ट वर टाकून ठेवले होते. ते १० दिवसांपूर्वी मिळाले. नेमके त्याच वेळेस माझे ड्रायव्हिंग एकदम बंद पडले त्यामुळे पुस्तके किंवा पॉडकास्ट ऐकायचा हक्काचा वेळ मिळेनासा झाला. त्यामुळे अगदी हळू हळू ऐकणं चालू आहे.
अनेक वर्षात सायंस फिक्शन वाचलं नाहीये याची जाणीव झाली. बर्‍याचशा गोष्टी इतरत्र पूर्वप्रकाशित आहेत. काही गोष्टींनंतर टेड चँग ने त्या कथेची जन्मकथा सांगितली आहे. एकामागे एक सायंस फिक्शन गोष्टी वाचायला विअर्ड वाटेल असं मनात होतं . पण तसं काही होत नाही. प्रत्येक गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे.
नक्की वाचा / ऐका. टीनेजर्सना वाचायला / ऐकायला सुद्धा सेफ आहे.

The Courier (Kjell Ola Dahl)

१९४२ साली ऑस्लोत झालेली एका तरुण स्त्रीची हत्या, तिच्या नवर्‍यावरच त्या हत्येचा आळ, पण तो त्याच रात्री गायब होतो, त्यांची मुलगी तेव्हा काही महिन्यांची असते.
पुढे तो माणूसही मृत घोषित होतो, मात्र २५ वर्षांनंतर पुन्हा ऑस्लोत अवतरतो, आपल्या मुलीला भेटण्यासाठी, आणि आपल्यावरच्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी...

१९४२ आणि १९६७ सालांमध्ये कथानक आळीपाळीने ऑस्लो-स्टॉकहोम-ऑस्लो अशा पुढेमागे उड्या मारतं. सुरूवातीला आणि शेवटी सध्याच्या काळाचा संदर्भ येतो. त्या कुटुंबाला ओळखणारी, नाझी रेझिस्टन्सशी संबंध असणारी इतर पात्रं कादंबरीत आहेत. १९४२ सालातल्या घटना दुसर्‍या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर घडतात. मात्र ही पार्श्वभूमी गरजेपुरतीच घेतली आहे. एकूण रहस्याची उकल, पात्रांचे दृष्टीकोन खूप बारकाईने येतात. ते समजून घेण्यासाठी ती पार्श्वभूमी उपयोगी ठरते. त्यामुळे वातावरणनिर्मिती जबरदस्त झाली आहे. कादंबरी अगदी गुंगवून ठेवते.

मला रिलेट झालेली आणखी एक मोठी गोष्ट म्हणजे - गेल्या वर्षी आमच्या उत्तर युरोप सहलीदरम्यात ऑस्लोत आम्ही चालत चालत जिथे जिथे फिरलो त्याच सगळ्या जागा, रस्ते, बागा, मॉन्युमेंट्स कादंबरीत येतात. हा निव्वळ योगायोग झाला. (मला आधी याची कल्पना नव्हती.) पण त्यामुळे त्या-त्या ठिकाणी ते-ते प्रसंग घडताना दिसले आणि वाचायला आणखी मजा आली. (आधी हे पुस्तक वाचून मग ऑस्लोत फिरले असते तर कदाचित असं इतकं रिलेट झालं असतं की नाही शंका आहे.)

गुडरीडसवर याचे मिक्स्ड रिव्ह्यूज आहेत. पण मला पुस्तक खूप आवडलं. मूळ नॉर्वेजिअन भाषेतलं पुस्तक आहे. मी किंडलवर इंग्लिश अनुवाद वाचला.
लेखक Nordic Noir मधला अग्रणी मानला जातो असंही नेटवर समजलं. म्हणून त्याची इतर पुस्तकं शोधली. पण त्याचं हेच एक पुस्तक सर्वात जास्त लोकप्रिय आहे असं दिसतं. तरी आणखी एक पुस्तक शॉर्ट-लिस्ट केलं आहे.

लॉकडाऊनच्या काळात वाचलेलं पहिलं पुस्तक असाही एक टॅग मी या पुस्तकाला चिकटवला आहे. Proud

Em and The Big Hoom (Jerry Pinto)

जेरी पिंटो हे पत्रकार म्हणून ठाऊक होते, पण त्यांनी कादंबरीलेखनही केलंय हे किंडलमुळे समजलं.

'एम अँड द बिग हूम' ही त्यांची कादंबरी म्हणजे त्यांच्या मनोविकारग्रस्त आईची कथा आहे. त्यांच्या आईच्या या विकारांचा स्पॅन खूप मोठा होता. विनाकारण बडबड, फकाफका बिड्या पिणं, गोड खाण्याला धरबंध नसणं (एका चहाच्या कपात ६-७ चमचे साखर) ते नर्वस ब्रेकडाऊन, हॅलुसिनेशन्स, डिप्रेशन अटॅक्स, घरातच आत्महत्येचे अनेकवेळा प्रयत्न, त्यातले काही गंभीर - इथपर्यंत सर्व प्रकारांना त्या कुटुंबाने तोंड दिलं.
जेरी पिंटो आणि त्यांची सख्खी मोठी बहीण दोघांनी आपल्या आईशी मारलेल्या गप्पांमधून प्रामुख्याने सर्व कथा समोर येते. त्यांची आई गप्पीष्ट होती, मोकळ्याढाकळ्या स्वभावाची होती, सेक्ससारख्या अवघड विषयांवरही ती आपल्या मुलांशी खुला संवाद साधायची. त्यांच्या गप्पा आणि लेखकाचं प्रथमपुरूषी निवेदन - या सगळ्यावर आईच्या विकारांचं मळभ आहे, तरी भाषा खुसखुशीत आहे.

Em - म्हणजे मुलांनी आपल्या आईचं ठेवलेलं लाडकं नाव. पुस्तकात आईचं नाव 'इमेल्डा' आहे. बोलता बोलता आईनं काही बेधडक किंवा अचाट विधान केलं की मुलं तिला 'Em!' असं म्हणतात. (आई! काय बोलतेयस तू हे! - अशा अर्थाने).
The Big Hoom - म्हणजे त्यांचे वडील. ते काहीसे अबोल, पण कुटुंबाचा आधार असलेले, कणखर, मुलांनी काही सांगितलं किंवा विचारलं की 'हुं...' असा हुंकार देणारे, म्हणून मुलांनी त्यांचं नाव असं ठेवलेलं असतं. (पुस्तकात त्यांचं नाव ऑगस्टिन).

इमेल्डा आणि ऑगस्टिन यांची बालपणीची पार्श्वभूमी थोडक्यात आणि तुकड्यातुकड्यात येते. मग मुंबईतलं त्यांचं प्रेमप्रकरण (तब्बल १० वर्षं), घरच्यांच्या संमतीने लग्न, मुलांचा जन्म. त्याच्याच आगेमागे इमेल्डाच्या मनोविकारांची सुरूवात होते. अमेरिकन कौन्सुलेटमधली नोकरी आईला सोडावी लागते. आर्थिक आघाडीवर परिस्थिती खाऊनपिऊन जेमतेम सुखी अशी असते.
या सगळ्यात हे कुटुंब मानसिक पातळीवर कसं भरडून निघालं, तरी चौघांचा एकमेकांना किती खंबीर आधार होता, याचे बारीकसारीक तपशील निवेदनातून वाचकांनी जाणून घ्यायचे आहेत आणि ते हेलपाटून टाकणारे आहेत.
पन्नाशीनंतर कधीतरी इमेल्डाचा नैसर्गिक मृत्यू होतो. तेव्हा मुलं विशीत असतात. मृत्यू, त्यानंतरचे २-३ दिवस यांच्या वर्णनावर कादंबरी संपते. ते वर्णन खूप अंतर्मुख करणारं आहे. खूप साधं तरी सुंदर आहे.

कुटुंबावर काय प्रसंग ओढवला, आईचा विकार किती भयानक होता, याबद्दल कुठेही गळा न काढता कुटुंबपद्धतीची, निकटच्या नातेसंबंधांची खणखणीत बैठक स्पष्ट करणारं पुस्तक आहे. भाषा साधीसोपी, पण पकड घेणारी आहे.
विषय गंभीर असला तरी आवर्जून वाचावं असं पुस्तक आहे.

Pages