मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सविता दामोदर परान्जपे हे नाटक पुस्तकरुपात आहे हे मध्यन्तरी वाचल होत. ऑनलाईन कुठे मिळेल हे पुस्तक? बुकगन्गा वर सर्च करुन बघितल, नाही मिळाल तिथे. Uhoh

सविता दामोदर परान्जपे हे नाटक पुस्तकरुपात आहे हे मध्यन्तरी वाचल होत. ऑनलाईन कुठे मिळेल हे पुस्तक? बुकगन्गा वर सर्च करुन बघितल, नाही मिळाल तिथे
>>>
सुलू, माझ्या माहितीनुसार पूर्वी पॉप्युलर प्रकाशनातर्फे नाटकांची पुस्तकं प्रकाशित केली जायची. त्यांच्या वेबसाईटवर काही माहिती मिळते का पहा.

सुलू, माझ्या माहितीनुसार पूर्वी पॉप्युलर प्रकाशनातर्फे नाटकांची पुस्तकं प्रकाशित केली जायची. त्यांच्या वेबसाईटवर काही माहिती मिळते का पहा. >>> ओके. धन्स लप्रि. Happy

Romancing with Life - Dev Anand महाभिकार वेळ वाया गेला (पैसे पण )

४३८ डेज (https://www.goodreads.com/book/show/25111328-438-days)

अल्वारेंगा सल्वाडोर हा मेक्सिकन मासेमार नेहेमीप्रमाणे किनार्‍यापासून १००मैलावर आत मासेमारीसाठी त्याच्या कोर्डोबा नावाच्या सहकार्‍याबरोबर गेला. १०-१२ तासात परत यायचे असल्याने बोटीत फारसे खाण्याचे सामान नव्हते. बोटही साधीच. फायबर ग्लासचे साधे होडकेच ते - त्याला केबिन नाही, आडोसा नाही. लाइफ जॅकेट नाहीत, रेडिओ साधाच पण किमान वॉटरप्रूफ. पण रिचार्ज करायची सोय बोटीवर नाही. एक जीपीएस पण तो वॉटरप्रूफ नाही. मेक्सिकोच्या वायव्य किनार्‍यावर (पॅसिफिक समुद्रात) मात्र त्या दिवशी एक मोठे वादळ आले. तशी वादळे इथे नेहेमीचीच. अटलांटीक समुद्रावर कॅरेबिअन बेटांवर साधे वारे वाहू लागतात आणि अनेक मैलांच्या प्रवासानंतर आणी मेक्सिकोची दक्षिण चिंचोळी पट्टी ओलांडून ते पॅसिफिकवर येतात तेव्हा त्यांची अति थंड हवेची वादळे झालेली असतात.
अल्वारेंगा आणि कोर्डोबा अशा एका वादळात अडकले, लाटांच्या तडाख्यात सर्व सामान-टूल किट-खाणे वाहून गेले. रेडिओ डिस्चार्ज झाला आणि जीपीएस पाण्यात जाउन वाया गेला. आणि सर्वात दुर्दैवी प्रकार घडला जेव्हा मोटर निकामी झाली. आता अल्वारेंगा आणि कोर्डॉबाकडे वल्ही नाहीत, शिडे नाहीत. बोट पुढे ढकलायला काहिही साधन नाही. ते समुद्राच्या प्रवाहांच्या अधीन 'भरकटू' लागले.
आणि ४३८ दिवसांनी अल्वारेंगा ९००० मैल (१४५०० किमी) दूर पॅसिफिक समुद्रातील मार्शल बेटांवर धडकला. या प्रवासात कोर्दोबा मेला मात्र अल्वारेंगाने हार पत्करली नाही.
बरोबर आडोसा नाही, पाणी नाही, मासे पकडायला गळ/हार्पून वा इतर हत्यारे नाहीत. प्युअर प्ले सब्सिस्टन्स हंटिंगच्या जोरावर अल्वारेंगाने हा अभूतपूर्व प्रवास पार पाडला. या साहसी सुटकेची कहाणी या पुस्तकात आहे. ७५% टक्के पुस्तक वीसएक फूट लांबीच्या होडक्यावर घडते तरी थरार टिकवून ठेवण्यात लेखक जोनाथन फ्रँकलीन यशस्वी ठरला आहे. याच लेखकाचे "३३ मेन" हे चिलीमधील खाणीतून यशस्वीरित्या सुटका केलेल्या खाणकामगारांवरील पुस्तकही वाचनीय आहे.

सेपियन्स फेम युवाल हरारी यांचे २१ लेसन्स फॉर द २१स्ट सेंच्युरी हे पुस्तक कालच प्रकाशीत झाले आहे, ते आताच मिळाले. वाचायला सुरुवात करणार आहे.

हिलबिली एलिजी (hillbilly eligy) हे अनेक महिन्यांपासून वाचायच्या यादीत असलेले पुस्तक नुकतेच वाचले. 2016च्या अमेरिकन निवडणुकांच्या रणधुमाळीत इकॉनॉमिस्ट साप्ताहिकात या पुस्तकाचे परीक्षण आले होते तेव्हापासून हे वाचायचे डोक्यात होते.
अमेरिका म्हटले की बाहेरच्यांना विशेषतः भारतीयांना पूर्व किनारा (न्यूयॉर्क व आजूबाजूचा परिसर), सिलिकॉन व्हॅली आणि फ्लोरिडा, ह्यूस्तान, डॅलस वगैरेच डोळ्यासमोर येते आणि तिथे काम करणारी बहुतकरून आयटी मधली माणसे. मुख्य म्हणजे अमेरिकेत सर्व श्रीमंत वा किमान खायची प्यायची भ्राअंत नसलेले असतात असाही एक समज असतो. आणि काळे लोक काळे असल्यामुळे गरीब असणारच असा एक आत्मविश्वास.

मी अमेरिकेतल्या वास्तव्यात पूर्ण काळ ईस्ट नाही आणि वेस्ट नाही अश्या मधल्या ज्यांना फ्लाय ओवर स्टेटस म्हणतात अश्या राज्यात होतो. मिडवेस्ट (उत्तर मध्य राज्यात जास्त करुन). माझ्या कामांनिमिताने अनेक छोट्या छोट्या गावातून हिंडलो, किमान गाडी चालवत कंट्रीसाईड हिंडलो. आणि मला नेहेमी या गावातून, छोट्या शहरातून गरिबी, decadence उतरती कळा दिसत राहिली. तिथले बहुसंख्य तरुण तरुणी वर चढण्याचे अमेरिकन स्वप्न कधी साकारू शकतील असे वाटले नाही. आणि मी बघितलेला भाग हा त्यातल्या त्यात बरा आहे, आणि जवळपास कोकेशिअन (व्हाइट) लोकसंख्येचा आहे. जसे दक्षिणेकडे सरकू लागता तसे ही गरिबी बकाली अधिकाधिक तीव्र होते, त्यात कृष्णवर्णीय वाढतात.

ही नक्की कुठली अमेरिका आहे? हे युरोपिअन वंशाचे व्हाइट अमेरिकन ज्यांना जगातल्या सर्वात बलाढ्य आणि संपन्न देशात हवे ते शिक्षण घेण्याची, हवा तो धंदा, नोंकरी करण्याची संधी आहे ते पिढ्यान दर पिढ्या गरीब गर्दुल्ले का होत आहेत?
हिलबिली एलिजी या आत्मचरित्रात जे डी व्हान्स हा तिशीतला तरुण या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतो. तो स्वतः अपलेशिअन पर्वतरांगात, पायथ्याशी वसलेल्या स्कॉटिश आयरिश वंशाच्या लोकांमध्ये जन्मला, वाढला. तोदेखील गर्दुल्ला, गुड फॉर नथिंग व्हायचा पण त्याऐवजी हायसकूल मधून बाहेर पडल्यावर चार वर्षे मरिन्स आणि मग प्रथम ओहायोस्टेट मधून पदवीधर आणि मग येलमधून वकील झाला.
सोशल कॅपिटल, कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमीमुळे आणि माझं काही चुकत नाहीये पण इतर सर्वांचे चूक आहे, सरकार माझ्यासाठी काही करत नाहीये, मला मदत मिळाली पाहिजे पण त्याऐवजी काळ्या लोकांना, देशाबाहेरून येणाऱयांना मदत मिळते आहे या समाजांमुळे या समाजाचे अधःपतन त्वरेने होत आहे याचे चित्र या पुस्तकातून दिसते.
मी पुस्तकातील सर्वच तर्कांशी व निष्कर्षांशी सहमत नाही. मात्र या समाजाचे आत राहून केलेले चित्रणाने माझ्या काही प्रश्नांना तरी उत्तर दिले.

A History of Canada in Ten Maps: Epic Stories of Charting a Mysterious Land : Adam Shoalts

कॅनडा, रशिया हे अवाढव्य खंडप्राय देश आहेत. यांच्या उत्तर सीमा (आणि स्कँडिनेव्हिया व अलास्का मिळाल्यामुळे अमेरिकासुद्धा) उत्तर धृवाला बिलगलेल्या आहेत आणि या देशांची नावे घेतली टोकाची थंडी, आर्क्टिक समुद्र, टुंड्रा अन पोलर बेअर चटकन आठवतात.
पण उण्यापुर्‍या ३०० वर्षापुर्वीपर्यंत कॅनडाच्या आजच्या भुभागाच्या जेमतेम १०% भुभागाचे सर्वेक्षण झाले होते अन जुजबी माहिती होती. कॅनडाच्या पूर्व किनार्‍याला प्रथम फ्रेन्च आणि मग इंग्रजांनी वस्ती केली. त्यानंतर १००एक वर्ष पश्चिमेला नेमके काय आहे, पॅसिफिक समुद्र आहे का नदी आहे का सलग जमीनच आहे हेदेखील माहिती नव्हते. पश्चिमेला कुठेतरी समुद्र असेल व तिथून चीनला जाण्यासाठी मार्ग मिळेल या आशेवर अनेक युरोपियन देश होते. ही तेव्हा प्रगत समाजाला असलेली या उत्तरधृवीय भुगोलाची स्थिती होती.

अश्या परिस्थितीत फ्रेन्च व इंग्लिश साहसवीरांनी कॅनडाचा हा अनचार्टेड- टेरा इन्कॉग्निटा भुभाग कसा पादाक्रांत केला, त्याचे कसे सर्वेक्षण केले याचा इतिहास या पुस्तकात अ‍ॅडम शोल्ट्सने अत्यंत रंजकतेने मांडला आहे. पुस्तकाची सुरुवात वायकिंग - म्हणजे आजच्या स्कँडिनेवियात
(नॉर्वे-स्वीडन- आइसलँड-ग्रीनलँड) राहणार्‍या ७व्या ते १२व्या शतकातल्या दर्यावर्दी लोकांंनी कॅनडात केलेल्या सफरींनी होते. हे साहसी लोक दहाव्या शतकात ग्रीनलँडमधून कॅनडाच्या उत्तरपूर्व किनार्‍याला धडकले. यांच्या सफरींच्या लोककथा आइसलँडिक परंपरेत होत्या पण त्याचे पुरातत्वशास्त्रीय पुरावे १९६०च्या आसपास मिळाले. तिथून थेट पुढचा टप्पा सुरू होतो १६व्या शतकात. 'फर'च्या व्यापारामुळे कॅनडाच्या पश्चिमेला घुसत घुसत शेवटी पॅसिफिक आणि उत्तर तसेच उत्तर पश्चिमेला आर्क्टिक समुद्र/हडसन बे पर्यंत स्वार्‍या झाल्या. मुळच्या युरोपियन तसेच कॅनेडियन (म्हणजे वंशाने युरोपियन पण जन्म/वाढलेले कॅनडात - यातल्या अनेकांच्या आया मूळ फर्स्ट नेशन लोकांपैकी होत्या) आणि त्यांना मदत करणार्‍या नेटिव्ह (फर्स्ट नेशन) इंडियन लोकांनी अतिशय खडतर प्रवास केले. शब्दशः हाडात घुसणारी थंडी, रौद्र प्रवाह असलेल्या (रॅपिड्स) धबधबे/कातळभिंतीमधून वाहणार्‍या नद्यांतून प्रवास, ग्रिझली अस्वलांसारखी श्वापदे व अश्या अमानवी हवामानाच्या ठिकाणी महिनोन महिने एकटे राहणे हे या पुस्तकातल्या सर्व पात्रांचे आयुष्य आहे. उपासमारीने मरणाला टेकणे वा मरणे हे दखलही घेतली जात नाही इतके सामान्य आहे. भुकेमुळे व एकटे राहण्यामुळे माणूस काय होऊ शकतो याचे एक उदाहरण वेन्डिन्गो सायकॉसिस (https://en.wikipedia.org/wiki/Wendigo#Wendigo_psychosis).

या सर्व प्रवासांत युरोपिअन व फर्स्ट नेशन (नेटिव्ह इंडीयन) लोकांचे संबंध बहुतकरून एकमेकांना सहाय्य करणारे दिसतात. अनेक मूळ फ्रेन्च लोकांनी फर्स्ट नेशन स्त्रीयांशी लग्ने केली, त्यांची मुले ही कॅनेडियन वाढली. पुढे अनेक इंग्रजांनीही हा कित्ता गिरवलेला दिसतो. याच भुभागाच्या दक्षिणेला असणार्‍या अमेरिकेत मात्र मूळ नागरिकांशी अत्यंत क्रुर, लबाड व्यवहार करून त्यांना नष्ट करण्याच्या (एक्सटर्मिनेट) कटांचा/योजनांचा इतिहास प्रामुख्याने दिसतो. १८१२च्या अमेरिका - कॅनडा युद्धात कॅनडाच्या सैन्यात अनेक फर्स्ट नेशन सैनिकांच्या पलटणी लढल्या तर अमेरिकन जनरलांनी 'गोर्‍या लोकांना अभय दिले जाईल मात्र जर गोरा इंडियनबरोबर लढताना दिसला तर त्याचे हाल होतील' अशी थेटच धमकी दिली होती. हे युद्ध अमेरिकेने कॅनडा गिळंकृत करायला सुरू केले. ब्रिटन नेपोलिओनिक युद्धात युरोपात गुंतलेला होता आणि त्यामुळे किरकोळ सैन्य / लोकसंख्या असलेला कॅनडा काही दिवसातच व किरकोळीत सर होईल असा विचार करून अमेरिकेने मुख्यत्वे ग्रेटलेक्स परिसरात युद्ध छेडले. पण कॅनडाच्या 'मॉटले' सैन्याने निकराची लढत दिली. दोन्ही बाजुंची प्रचंड हानी झाली, आणि जेव्हा युरोपात नेपोलियन हारला तेव्हा उत्तर अमेरिका खंडातही तह झाला.
लुईस आणि क्लार्कच्या अटलांटिक ते पॅसिफिक सफरीची जगभर पाहिले continental crossing अशी जाहिरात केली गेली, आजही त्यांचे नावच पुढे येते. मात्र त्यांच्या सफरीच्या 2वर्षे आधी अलेक्सझांदर मेकेंझीने लुईस क्लार्कपाशी उपलब्ध साधन सामुग्री आणि मनुष्यबळाच्या एक चतुर्थांश पेक्षाही कमी संसाधने हाताशी असताना उत्तर अमेरिकेतील पाहिले अटलांटिक ते पॅसिफिक भूमार्गाने क्रॉसिंग केले. लुईस आणि क्लार्कने मेकेंझीच्या प्रवासाचे संदर्भ आणि coordinates त्यांच्या प्रवासात वापरले. मेकेंझीच्या सफरीमुळे लुईस आणि क्लार्कला पॅसिफिक नेमका किती अक्षांश रेखांशावर भेटणार याचा अंदाज होता.
राष्ट्रांच्या दूरगामी 'व्यक्तिमत्वांची' मुळे इतिहासात दिसतात आणि मूल्यव्यवस्थेचा भाग होतात की काय कोण जाणे!

चॅम्प्लेन, बेलिन, पीटर पाँड, अलेक्झांडर मेकेन्झी, डेव्हिड थॉम्प्सन, जनरल ड्रमाँड, कर्नल ड्रमाँड, आणि अनेक क्री, डीन, इनुइट, अँग्लोंक्विन जमातींचे सरदार आणि साहसवीरांची ही कहाणी नक्कीच वाचनीय आहे.

मस्त परीचय.

याच भुभागाच्या पश्चिमेला असणार्‍या अमेरिकेत >>> म्हणजे अलास्कामध्ये का? पण अलास्का १९व्या शतकात अमेरीकेला मिळाला ना?

@माधव, चूक दर्शविल्याबद्दल धन्यवाद. दक्षिणेला म्हणायचे होते- लोअर 48 स्टेट्स.
अलास्काचा स्वतंत्र उल्लेख येत नाही कारण पुस्तक ते स्वतंत्र अस्तित्व यायच्या आधी संपते. अलास्का आणि उत्तर समुद्राशी जमिनीवर पोचण्याआधी समुद्रीमार्गे रशिया, अमेरिका, ब्रिटन इत्यादींची जहाजे पोचली होती.
अजून एक महत्वाचे राहिले होते ते ऍड केले वरच्या पोस्टमध्ये

ध्रुव भटांचे 'तत्वमसि' बर्‍याच रेकमेंडेशन्समुळे विकत घेतले. ते बेहद्द आवडले >>
+१

ऊषप्रभा पागेंचं "एकांडे शिलेदार" हे पुस्तक वाचलं. Alpine म्हणजे एकट्यानी गिर्यारोहण करणार्या गिर्यारोहकांची माहिती आहे ह्यात. छान आहे. जगात किती किती धाडसी लोकं आहेत !!

द ब्लड टेलिग्राम -बांगला मुक्तिसंग्रामातल्या अमेरिकेच्या भारतविरोधी कारवायांचा अप्रकाशित अन्वयार्थ -गॅरी बास ( अनुवाद- दिलीप चावरे)

इथे ब्लड म्हणजे ढाक्यातले अमेरिकेचे वाणिज्यदूत आर्चर ब्लड.

बांग्लादेश मुक्तिसंग्रामाकडे आपण बहुतेक भारतीय भारत पाक संबंधांच्या दृष्टिकोनातूनच पाहतो. आंतरराष्ट्रीय राजकारणातली गुंतागुंत, निक्सन किसिंजर यांचा भारत-नेहरू-इंदिरा द्वेष हे पैलू आपल्यापर्यंत पोचलेले असतात.
पण त्याशिवाय जगातल्या भयानक नरसंहारांच्या भीषणतेच्या तुलनेचा त्या वेळच्या पूर्व पाकिस्तानात चाललेला संहार, भारतासमोर उभा ठाकलेला निर्वासितांचा humanitarian सवाल, अमेरिका-युरोपच्या बाहेरच्या एखाद्या देशाने प्रथमच अन्य देशाच्या बाबतीत केला निर्णायक हस्तक्षेप असे अनेक पैलू या घटनेला आहेत.

अनुवादित पुस्तकं वाचताना त्यातला खटकणारा कृत्रिमपणा - शब्दाला शब्द ठेवणं ( डीफनिंग सायलेन्स = कानठळ्या बसवणारी शांतता) दुर्लक्षित करून मजकुराचं बोट धरून पुढे चालायला मला अजून जमत नाही. हे शब्द कोणत्या इंग्रजी शब्दांसाठी वापरलेत असले खेळ डोक्यात सुरू होतात. त्यामुळे आणि मध्ये आलेल्या अन्य मोठ्या व्यवधानांमुळे आणि अडचणींमुळे हे पुस्तक अगदी थोडंच वाचून परत करावं लागतंय.
पण पुढे मूळ पुस्तक वाचायचा प्रयत्न असेल.

भरत - मूळ इंग्रजीतच वाचा. मी तेच वाचले आहे. त्यातही म्हणे अमेरिकेत आणि भारतात प्रकाशित केलेल्या आवृत्तीत फरक आहे. जबरी पुस्तक आहे ते. निक्सन-किसींजर चे राजकारण, पाक च्या काड्या वगैरेंना इंदिरा गांधी व एकूणच भारतीय लष्कर कसे पुरून उरले ही माहिती परदेशी आणि तटस्थ लेखकाच्या शब्दांतून वाचायला जबरी वाटते.

टण्या - ते कॅनडातील वेस्टवर्ड क्रॉसिंग बद्दल मधे जेव्हा वाचले तेव्हा मलाही असेच वाटले होते - की कॅनेडियन लोकांनी लुईस-क्लार्क च्या आधीच केलेले असताना त्याची इतकी जाहिरात होत नाही. कदाचित कॅनडा मधे त्या मार्गावर राहणार्‍यांमधे होत असेल. कल्पना नाही.

मात्र गोरे आणि स्थानिक्/नेटिव्ह यातील संबंधांत एकाच खंडातील वेगळ्या भागांत इतका प्रचंड फरक असावा? अमेरिकेत इतका हिंसाचार आणि वरती कॅनडात इतका सलोखा? तेच ब्रिटिश आणि फ्रेंच धोरण आणि साधारण तितकेच कमी पुढारलेले नेटिव्ह्ज. यावरून अशी शंका येते की अमेरिकेन इतिहासात जितके खुलेपणाने लिहीलेले आहे तितके कॅनेडियन इतिहासात नसावे.

हिलिबिली एलिजी इंटरेस्टिंग दिसते. वाचतो.

फारेंड, अमेरिकेत गुलामगिरी होती. कॅनडात नव्हती. अनेक गुलाम पळून कॅनडात स्थायिक झाले. कॅनडा आणि अमेरिका या दोन देशांची वाटचाल स्वतंत्र वेगवेगळ्या दिशांनी झाली असे मला वाटते. कॅनडा इंग्लंडच्या झेंड्याखालील कॉमनवेल्थ देश राहिला + फ्रेन्च अलिजिअन्स असलेला क्वेबेक. तसेच धर्माचा अमेरिकन जनमानसावर जितका प्रभाव आहे तेव्हडा प्रभाव कॅनडातील जनतेवर आहे का नाही माहिती नाही. अमेरिकेतला कॉन्झर्वेटिझमध्ये प्रोटेस्टंट इव्हँजेलिकल ख्रिश्चन धर्म अविभाज्य भाग आहे. धर्माचा इतका पगडा असलेला दुसरा पाश्चिमात्य लोकशाही देश दुसरा दिसत नाही. आयर्लंड एक उदाहरण आहे पण अमेरिकेतले धर्माचे राजकारण/सुप्रिम कोर्ट यात असलेले स्थान थोडे एकमेवाद्वितीयच आहे. या धर्माच्या पगड्याचा सुरुवातीला गुलामगिरीस समर्थन, नेटिव्ह अमेरिकन लोकांना कमी लेखण्यासाठी समर्थन यात मोठा हात आहे.
कॅनडात इनुइट/फर्स्ट नेशन्स लोकांवर अत्याचार झाले आहेत व त्याबद्दल काँपेन्सेशन वगैरे वाद आहेतच. अमेरिकेत मात्र थोड्याफार लिबरल वर्तुळे वगळता हा विषय संपवल्यात जमा आहे.

माझा याबाबत काही फार अभ्यास नाही तेव्हा अधिक बोलता येणार नाही. ही सर्व मते कॅनडाबद्दलच्या अत्यंत तुटपुंज्या माहितीवर आधारीत आहेत. अधिक पुस्तके वाचली तर लिहीन.

सध्या समग्र काझुओ ईशिगुरो वाचायला घेतले आहे
साताठ वर्शां पूर्वी 'अ पेल व्यू ऑफ हिल्स' वाचले होते... पण पुस्तक संपल्यावर शंभर प्रश्न ऊभे राहिले.. आता पुन्हा सुरूवात 'अ पेल व्यू ऑफ हिल्स' केली..
पुस्तक संपल्यावर पडलेल्या प्रश्नांची संख्या १०० वरून ५० वर आली पण क्लोजर मिळत नाही.
ईशिगुरो वाचणारे कोणी आहेत का ईथे?

हिलबिली एलिजी वाचनीय आहे.. कॉकेशियस वंशाच्या लोकांमधील गरीबी अणि बरेच काही जवळून बघितल्यने बर्‍याच गोष्टी पटल्या.

अरे बापरे, रैनाशी बोलणे कसे जमावायचे? ती मागच्या कैक वर्षात मला मायबोलीवर दिसलेली नाही.
स्लार्टी, रैना सारख्या मायबोलीवरून हरवलेल्या पाऊलखुणा अधूनमधून आठवत राहतात.
काही पाऊलखुणा वरचेवर दिसत असूनही नुसत्या अंगणातूनच माघारी फिरून जातात तेही एक खेदाचे कारण आहेच.

@स्वाती2, मला हिलबिली एलिजी वाचताना काही वेळा तुमची आठवण आली कारण तुमच्या काही माबो लेखात तुम्ही इंडियाना (बहुतेक कमिन्सवाल्या कोलंबस गावाच्या आसपासच्या) गोष्टींचा उल्लेख केला आहे. या पुस्तकातला भाग बहुतकरून तिथला वा जवळपासचा आहे.

Stranger to History: A Son's Journey through Islamic Lands by Aatish Taseer

ज्येष्ठ पत्रकार तवलीन सिंग यांचा आतिश तसीर मुलगा. आणि ही त्याची आयुष्याची पहिली वीस वर्षे ओळख होती असे म्हणता येईल. कारण तवलीनना हा मुलगा पाकिस्तान पीपल्स पार्टीचे एक राजकारणी सलमान तसीर यांच्यापासून झाला होता. सलमान तसीर विवाहीत होते, त्यांना त्यांच्या पाकिस्तानातील बायकोपासून दोन मुलेही होती, आणि नंतर केलेल्या एका लग्नापासून अजून तीन मुले झाली. ८०च्या दशकात बेनझीर पुनरागमन करायच्या प्रयत्नात होती आणि तेव्हा हा एक भारतीय अनौरस मुलगा राजकीय प्रवासात अडथळा होणार हे जाणून सलमान तसीरांनी आतिश व त्याच्या आईबरोबर संबंध तोडले तेव्हा आतिश दीड-दोन वर्षाचा होता. अ स्ट्रेन्जर टू हिस्टरी हे आतिशने आपल्या बापाचा व बापाच्या धर्माचा शोध घेण्याच्या प्रयत्नाचे प्रवासवर्णन.
इंग्लंडमध्ये जन्माला आल्याने ब्रिटिश नागरीक, वाढला/शिक्षण घेतले दिल्ली आणि मग बहुतेक उटीला बोर्डिंग स्कूल, महाविद्यालयीन शिक्षण इंग्लंड आणि अमेरिकेत. आईने जन्माची कहाणी लपवून न ठेवल्यामुळे, उलट त्याबद्दल खुली चर्चा करून, ओळखीच्या पाकिस्तान्यांना भेटवल्यामुळे आतिश बापाकडून आपण मुस्लिम आहोत हे लहानपणापासून जाणून होता तर आई व आईचे आई-वडिल शीख. घरातले एकूण वातावरण निधर्मी. बापाशी पहिला संबंध आला तो विशीत तोसुद्धा आतिशने पुढाकार घेऊन, बापाकडून प्रतिक्रिया थंड, मोजूनमापून.
इंग्लंडमधील २००७च्या ट्रेन बाँबब्लास्ट नंतर लिहिलेल्या वर्तमानपत्रातील लेख वाचून सलमान तसीरने मुलाला तू पाकिस्तानची व इस्लामची निंदा केली आहेस असे खरमरीत पत्र लिहिले. फारसा धर्म/धार्मिक रुढी न पाळणार्‍या आपल्या बापाला का राग आला, सांस्कृतिक इस्लाम म्हणजे नेमके काय, इस्लामचा आजच्या युवकांवर असलेला पगडा का आणि त्या बरोबरीने आपल्या बापाबरोबरच्या आपल्या संबंधांचा शोध घेण्यासाठी आतिश आठ महिने तुर्कस्तान, सिरिया, इराण व पाकिस्तानमध्ये फिरला, लोकांना भेटला, बाप-भावंडांना भेटला व त्यावर त्याने हे पुस्तक लिहिले.

आतिशची भाषेवरची पकड मजबूत आहे जे बहुभाषिक असलेल्या आतिशकडून अपेक्षित आहे असे म्हणता येईल. त्याने उर्दूतून इंग्रजीत भाषांतर केलेल्या मंटोच्या कथांचा अनुवाद वाचनीय आहे. पण नायपॉलचा उत्तराधिकारी असे या पुस्तकाचे झालेले वर्णन अतिशयोक्त वाटते. नायपॉलचे अमंग द बिलिवर्स व नंतरचे बियाँड बिलिफ तसेच भारतावरच्या पुस्तकांची ट्रीलॉजी ही भेदक, नेमकी आणि अधिक विस्तृत आहे. आतिशचे तुर्कस्तान, इराण व सिरियातले अनुभवकथन व काढलेले निश्कर्ष फारच तोकड्या अनुभवांवर व भेटींवर बेतलेले वाटतात आणि त्यामुळे उथळ होतात. पुस्तकाच्या शेवटी त्याने लिहिले आहे की अनेक प्रसंग या देशातील सरकारे व दमनशाहीमुळे त्यात असलेल्या व्यक्तींना हानी पोहचू नये म्हणून लिहिलेले नाहीत. तसेच त्याने येमेन व जॉर्डनमधील प्रवासांना पुस्तकात पूर्णपणे काट मारलेली आहे. या दोन बाबींंमुळे कदाचित हव्या त्या खुलेपणाने लिहिता आले नसेल. पण त्याचबरोबरीने मला तरी त्याच्या मुलाखत घेण्याच्या, भेटलेल्या लोकांना दुखर्‍या नसांवर बोट ठेवून डिवचण्याच्या व एकुणातच 'क्रिटिकल आय टोवर्ड्स सोसायटी' या गुणांच्या कमतरेतचा हा दोष वाटतो. ज्या सांस्कृतिक वैविध्याच्या व त्यांना जोडणाऱ्या धार्मिक धाग्याच्या शोधावर आतिश आहे त्यासाठी फारच कमी वेळ त्याने दिला असे वाटते. एव्हडे देश फिरण्यापेक्षा भारतात त्याला हेच वैविध्य दिसले असते असे वाटत राहिले. माझ्या जन्मगावी, अगदी मी वाढलो त्या गल्लीत त्याला मध्यमवर्गीय सरकारी नोकरी करणारा (ज्याचे वाडवडील कारकुनीत होते, शिकलेले होते), गरिबीतून 'थोडासा' वर आलेला पण कनिष्ट जातिचा शिक्का असलेला, राजकारणात यश मिळालेला तुलनेने पापभिरू आमदार, चंदन तस्कर व बाया ठेवणारा नगरसेवक, धान्य व्यापारी बोहरी, झोपडपट्टी ते बंगला असा देऊन थेट प्रवास केलेली 'लोअर क्लास' मुलगी अरबाला दिलेली म्हातारी, मूळचे कोरडवाहू शेती असलेल्या दुष्काळी भागातून स्थलांतर केलेल्या मोलकरीण काम करणाऱ्या बायका व त्यांचे बिनकामाचे नवरे, या सगळ्यात फिरणारे नुकतेच सौदीचा पैसा आलेले कडवे ताबलीग हे 200मीटरच्या त्रिज्येत मिळतील. आणि हे भारतातल्या अनेक गावांचे चित्र आहे जिथे आतिष तासीर अधिक प्रभावीपणे लिहू शकला असता.

आतिश फॉर्ममध्ये येतो जेव्हा तो त्याच्या व बापाच्या संबंधांवर लिहितो व त्यानुषंगाने तो पाकिस्तानबद्दल व तिथल्या अनुभवांबद्दल लिहितो. ही इज अ‍ॅट होम इन पाकिस्तान. या भागामुळे हे पुस्तक वाचणे वेळेचा अपव्यय नक्कीच करत नाही.
पुस्तकाचे नाव अ स्ट्रेन्जर टू द फादर असे ठेवायला हवे होते - ते अधिक योग्य ठरले असते.

त.टी.: सलमान तसीर यांच्या अंगरक्षकाने २०११मध्ये गोळी घालून त्यांचा खून केला. तेव्हा ते पंजाबचे गवर्नर होते. सलमान तसीरने पाकिस्तानातील ब्लास्फेमी कायद्याविरोधात विधान केले होते आणि त्यामुळे तिथल्या धार्मिक संघटनांनी/पक्षांनी वातावरण तापवले होते. सलमान तसीरचा मुलगा शहाआझचे अतिरेक्यांनी २०११मध्ये अपहरण केले व साडेचार वर्षांनी २०१६मध्ये सोडले. इंग्लंडच्या राजघराण्यातील एक युवतीबरोबर आतिशचे तीन-साडेतीन वर्षे संबंध होते. याबद्दल त्याने केलेल्या लिखाणावरूनही गदारोळ झालेला आहे. सध्या आतिश त्याच्या अमेरिकन नवर्‍याबरोबर राहतो. आतिशची आई तवलीन सिंग या ज्येष्ठ राजकीय पत्रकार आहेत व नेहरू-गांधी परिवाराविरोधात लिहिणार्‍या सुरुवातीच्या मोजक्या पत्रकारांपैकी एक आहेत. आतिश तसीर हिंदी इंग्रजीसोबतच उर्दू आणि संस्कृत भाषांचेही जाणकार आहेत.

अवांतरः मी पुर्वी कधीतरी या पुस्तकाबद्दलही लिहिले होते, आता सापडत नाही. Pakistan: A Hard Country by Anatol Lieven. पाकिस्तानच्या राजकीय व सामाजिक प्रवासावर या पुस्तकाइतके समग्र दुसरे पुस्तक मी अजून वाचलेले नाही. इतर अनेक उत्तम पुस्तके सामाजिक व राजकीय विषयांवर आहेत मात्र ती त्या मर्यादित व पुस्तकाच्या मुख्य विषयकेंद्रित आहेत. अनतोल लीवनचे पुस्तक इंडिया आफ्टर गांधी प्रमाणे पूर्ण प्रवास माडते. नक्कीच वाचनीय.

फणीश्वरनाथ रेणु माझे हिंदीतले सगळ्यात आवडते लेखक Happy

मैला आंचल नामक कादंबरी.
कितने चौराहे, दीर्घतपा, परिकथा इत्यादि कादंबर्‍याही आहेत (मी अजून वाचल्या नाहीयेत या)
त्यांच्या कथा संकलनांची दोनतीन पुस्तके उपलब्ध आहेत. त्यातल्या एका पुस्तकात 'मारे गय गुलफाम' कथा आहे (तीसरी कसम चित्रपटाची मूळ कथा), लाल पान की बेगम, रसप्रिया अशा कथा आहेत ते संकलन मला सगळ्यात आवडते. त्यांच्या संपूर्ण कथासंग्रहाचे पण पुस्तक असणारच (राजकमल हे हिंदीतील प्रकाशक अशी सगळी संकलने व्यवस्थित छापतात, त्याच्या अनेक आवृत्त्या खपतात पण...)

वरदाजी धन्यवाद. मी काही कथा वाचल्या आहेत त्यांच्या. पण पुस्तक उपलब्ध असेल तर ते घेऊन वाचलेले चांगले.

India's Wars: A Military History, 1947-1971 एअर व्हाइस मार्शल अर्जुन सुब्रमण्यम

भारतीय सैन्यदलांच्या स्थापनेपासून (१९४७) ते बांग्लादेश मुक्ती संग्रामापर्यंतच्या प्रमुख लढायांची सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत लिहिलेला इतिहास ही या पुस्तकाची अत्यंत संक्षिप्त ओळख. पण हा इतिहास अत्यंत रंजक (इमेन्सली रिडेबल), माहितीपूर्ण आणि सामरिक बाबींवर फोकस असला तरी राजकीय व सामाजिक अंगाना स्पर्ष करत लिहिलेला आहे.
लेखक स्वतः हवाई दलातील उच्चपदस्थ अधिकारी असले तरी पुस्तकात तिन्ही सैन्यदलांना त्यांच्या योगदानानुसार जागा मिळालेली आहे. भारतीय नौदलाचा युद्धातला सहभाग कमी असल्याने नौदलाच्या लढायांची अर्थातच कमी माहिती आहे आणि लष्कर (भूदल) सर्वात अधिक जागा व्यापते. जिथे हवाई चकमकींचे वर्णन येते तिथे लेखक स्वतः फायटर पायलट असल्याने थोडे तांत्रिक वर्णन जास्त होते असे वाटते. पण एकूणच हवाई चकमकींचा 'अवकाश', तित घडणार्‍या घटना व त्यांची भाषा आपल्या रोजच्या अनुभवांपासून इतकी दूर आहे की अगदी सोप्या भाषेत लिहिले तरी कदाचित सामान्य माणसाला ते समजण्यास अवघड जात असावे.

पुस्तकाच्या पहिल्या भागात भारतीय सैन्यदलांच्या उदयापासून पहिल्या व दुसर्‍या महायुद्धातील सहभागाबद्दल संक्षिप्त आढावा आहे. हा भाग उर्वरित पुस्तकासाठी 'पाया' आहे. मराठी लोकांना अभिमान वाटेल अश्या दोन गोष्टी यात येतात. लेखक भारतीय सैन्याचा उगम इंग्रजांनी स्थापन केलेल्या बटालियन्सच्याही मागे जाऊन शिवाजी महाराज व राजा रणजित सिंह या दोन सेनानी/राज्यकर्त्यांच्या सैन्याशी आहे असे मत मांडतात. त्याची कारणेदेखील पुस्तकात तपशीलात दिली आहेत. इतर काही सेनानी उदा. हैदर अलि, टिपु सुलतान हे का नाहीत याचेही स्पष्टिकरण येते. दुसरी अभिमानाची गोष्ट म्हणजे मराठा रेजिमेन्ट्सचा (एम.एल.आय. आणि महार रेजिमेन्ट) पहिल्या/दुसर्‍या महायुद्धातील पराक्रम.

पुस्तकाचा मुख्य भाग हा १९४७/४८चे काश्मिर युद्ध, हैद्राबाद मुक्तिसंग्राम, गोवा मुक्तिसंग्राम, ६२चे चीनयुद्ध, ६५चे पाकिस्तान बरोबरील युद्ध आणि शेवटी ७१चे बांग्लादेश निर्माण करणारे युद्ध यांचा इतिहास मांडते. यात दोन्ही बाजुची सैन्यदले, त्यांची बलस्थाने/कमजोरी, वैयक्तिक पराक्रम, अतुलनीय नेतृत्वाने कंपनी/रेजिमेंट/बटालियन/ब्रिगेड्सकडून असामान्य पराक्रम करवून घेणारे ऑफिसर यांचे सटिप वर्णन आहे. आपल्याला सामान्यपणे माहिती नसलेल्या अनेक गोष्टी कळतात. जिथे आवश्यक आहे तिथेच फक्त राजकीय नेतृत्वासंबंधी टिप्पणी येते.
या पुस्तकात आपल्याला ले.ज. झोरावर चांद बक्षी, ज. सगत सिंग, शैतान सिंग, निर्मलजित सिंग सेखोन, अ‍ॅडमिरल कोहली, एअर चिफ पी सी लाल, फक्त २१वर्षांचा तरुण सेकंड लेफ्टनंट अरुन खेत्रपाल**, अब्दुल हमीद अन अल्बर्ट एक्का सारखे जे.सी.ओ./जवानांची ओळख त्यांच्या रणांगणावरील कर्तुत्वाने होते. त्याचबरोबरीने शत्रुसैन्यातील प्रमुख सेनानी, लढवय्ये, त्यांनी केलेले पराक्रम यांचेही यथायोग्य वर्णन आहे.
सैन्यदलांचे व राजकीय नेतृत्वाचे चुकीचे निर्णय, रणांगणावरील चुका, दूरगामी स्ट्रॅटेजिक निर्णयांचे परिणाम हे देखील स्पष्टपणे मांडले आहे.
पुस्तकाच्या शेवटी एक वाचन यादी दिली आहे ते अत्यंत आवडले. कुठली पुस्तके व का हे दोन्ही त्यासोबत आहे. या व्यतिरिक्त टिपा (इन्डेक्स) आहेच.

प्रत्येक भारतीयाने जरूर वाचावे असे हे पुस्तक आहे.

७१नंतरच्या युद्धांवर दुसरा खंड लिहिणार आहे असे लेखकाने लिहिले आहे त्याच्या प्रतिक्षेत आहे.

** देअर आर नो विक्टर्स इन द वॉर. २१वर्षाचा नुकताच कमिशन मिळालेला अरुण खेत्रपालने ७१च्या युद्धात टँक निकामी झाला असला तरी मुख्य गन काम करत असल्याने अखेरच्या श्वासापर्यंत पाकिस्तानी रणगाड्यांवर हल्ला चालू ठेवला. पाकिस्तानी सैन्य तुकडीचा कमांडर ख्वाजा अब्दुल नासर यांच्या तोफेने अखेर अरुणच्या रणगाड्याचा वेश घेतला. से.ले. अरुणचे वडिल तेव्हा सैन्यात ले. कर्नल होते. ते पुढे ब्रिगेडियर म्हणून निवृत्त झाले.
आता पाकिस्तानात असलेल्या सरगोधा इथे जन्मलेल्या ब्रि. खेत्रपालांनी वयाच्या ८१व्या वर्षी २००१मध्ये पाकिस्तानला आपल्या जन्मगावी भेट दिली. त्या भेटीचा हृद्य प्रसंग इथे वाचा. https://en.wikipedia.org/wiki/Arun_Khetarpal#Legacy

टव णे सर. ह्या धाग्यावरच्या सर्व पोस्टी अतिशय उत्तम आहेत. अजून इतके वाचायला वेळ मिळतो का? नोंद करून घेतली आहे पुस्तकांची. ऑडिओ बुक्स सर्च करते असेच लिहीत वाचत चला. तुमचे अ‍ॅनालिसिस पण वाचायला आवडते.

Pages