मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्रिटिश कोन्सिल पुण्याचा अनुभव ही चांगला होता
मी पण चर्चिल आणि दुसऱ्या महायुद्धावरची बरीच पुस्तके वाचली

आणि वरती उल्लेख झालाय नाझी भस्मासुरचा
कानिटकर यांनी भाषांतर केले न केले हा मुद्दा वेगळा पण एका वयात त्या पुस्तकाने जबरदस्त मोहिनी घातली होती आणि हिटलर अगदी आवडायला वगैरे लागला होता
पण त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाबद्दल अमाप कुतूहल निर्माण झालं आणि मग झपाटून अनेक पुस्तके वाचली
शिरर च्या राईज अँड फॉल च्या ठोकळ्याला पण हात घातला पूर्ण नाही करू शकलो
पण आजमितीला माझ्याकडे हजारभर इबुक्स आहेत दुसऱ्या महायुद्धावर आणि केवळ हौस म्हणून मी युजीन स्लेज या अमेरिकन सैनिकाच्या विथ द ओल्ड ब्रीड चे भाषांतर करायला घेतलं आहे
ते छापून येईल न येईल माहिती नाही पण मला ते जबरदस्त आवडलं आणि मित्रांना वाचायला म्हणून एकेक chapter अनुवाद करत गेलो

या सगळ्यात नाझी भस्मासुरचा चा मोठा वाटा होता हे कबूल करावेच लागेल

अवांतर :
-- गाडगीळांचा टॉम सॉयर - चंदु चक्रपाणी
-- लिटिल विमेन वर आधारित एक हिंदी सिरीयल यायची अमोल पालेकर यांची. "कच्ची धूप". भाग्यश्री पटवर्धन, पूर्णिमा पटवर्धन, शाल्मली पालेकर या बहिणी दाखवलेल्या, आणि आशुतोष गोवारीकर भाग्यश्री हिचा हिरो. रविवारी सकाळी बघितल्याचे आठवतेय.

पुमग्र मधील प्रेमळ काकू हा एक स्वतंत्र विषय आहे. Lol
सध्या भालचंद्र नेमाडेंचं 'हिंदू' वाचायचा प्रयत्न करत आहे.

भा रा भागवतांनी वॉल्टर स्कॉटच्या केनिलवर्थ कादंबरीचे 'किल्ल्यातील कारस्थान' या नावाने भाषांतर केले होते ते कोणी वाचले आहे का? ते पुस्तक शोधायचा/मिळवायचा खूप प्रयत्न केला पण मिळाले नाही.

गाडगीळांची टॉम सॉयर चे रुपांतर चांगले होते. बंडखोर बंडू किंवा ... चंदू बहुधा. नाव आठवत नाही नक्की.>>> धाडसी चंदू! मस्त होते Happy

पुणे मराठी ग्रंथालयाचा माझा अनुभव फार उत्तम आहे. मला हवी ती जुनी पुस्तकं हवा तितका वेळ वाचत बसू देतात. नगर वाचन मंदिर व गोखले हॉल यांचेही अनुभव उत्तम आहेत. भारत इतिहास संशोधन मंदिरातल्या काकू मात्र...त्यांनी मला रडवलं आहे. Why do you hate me? असं मी त्यांना विचारलं होतं.

.त्यांनी मला रडवलं आहे. Why do you hate me? असं मी त्यांना विचारलं होतं. >> काय सांगता काय मास्तर ?

दादारच्या मुंम नि मुंबईमधल्या ब्रिटीश काँसिल बद्दल लिहिलेले एकदमच चपखल आहे. तसेच कफ परेडला टाटांची एक लायब्ररी होती. (टाटांच्या एंप्लोञींसाठी) तिथे अमाप खजिना होता इंग्लिश क्लासिक्स नि करंट फिक्शन्सचा. एक पारसी बावा पुस्तके देत असे. आपण जे घेउ ते बघून तो बावा कबूतरासारखे घाशातल्या घशात 'हं' सारखे काही तरी करत. तुम्ही अर्थ लावून घ्या त्या हॅ चा काही हवा तो. एकदा धीर धरून मी त्याला 'तुम्ही काही रेकमेंड कराल का? ' असे विचारले मग दर वेळी तो अजून काही अधिक सुचवत असे. मग काही दिवसांनी ते घेतले के ते मग अजून काही त्यावर. एकदम लूप मधे जायचो मी. माझी लिस्ट बाजूलाच राहायची. वरचा फिजिक्स च्या उल्लेख वाचून मला एकदम रेसनिक हॅलिडे आठवले. ते दोन ठोकळे वाचणे हे IIT-JEE ची तयारी करण्याची पहिली स्टेप मानली जात असे आमच्या काळात. बर त्यातला मजकूर एकदम आजच्या टीन अजर्स च्या चॅटसारखा एकदम त्रोटक. पारशी बावांचे हं समजायची तयारी तिथूनच झाली Wink

साचि कौल चं हे पुस्तक कोणी वाचलेले आहे का इथे? भन्नाट आहे. स्त्रीमुक्तीवादिच आहे ती. इतक्या खुसखुशित शैलीत स्वत: ब्राउन असण्यामुळे होणारे भेदभाचव् , शरीरयष्टि सुदृढपणाकडे झुकत असल्याने होणाऱ्या फजिती, भारतिय लग्नांचा भलाथोरला घाट व त्यातुन होणारा गोंधळ वगैरे खुप विनोदी शैलीत लिहीते.
ऑनलाइन ट्रोलिन्ग, डेट रेप यांविषयी मात्र तिने खुप माहिति दिलेली आहे. हे गंभिर विषय तितक्याच गंभिरतेने हाताळले आहेत.

दुसरे महायुद्ध किंवा इतर लढायी़ंविषयी त्या वेळच्या सैनिक, पत्रकारांचे लेखन वाचून मग दुसरीकडे वळले पाहिजे. ऐतिहासिक दस्तऐवज पाहून लिहिणारेही पाहायला हवेत. मग इतर आधारित. यांचे लेखन रसभरीत आणि आवडणारे नसेलही पण वाचले पाहिजे.

जुन्या ग्रंथालयातले अनुभव यावर एक वेगळा किस्सा लेख झालाच पाहिजे >>> हो, हो, असा धागाच हवा खरं तर !

'वाचू आनंदे' ग्रूपमध्ये 'ग्रंथालयातली दु:खे' Biggrin

एका वाचनलयात -
"लेखकांच्या याद्या आहेत तशा विषयांच्या असत्या तर बरं झालं असतं."
"अहो आमची दु:ख तुम्हाला माहीत नाहीत." तुटकपणे उत्तर आलं.( वाचनालयात काम केल्यामुळे भाषा प्रगल्भ होत असावी हा विचार मनात आला.)
तेवढ्यात दोन कन्यका येऊन पुस्तक विचारू लागल्यावर जो काही बोलण्यात गोडवा आणि आपुलकी आली ते ऐकून दु:खावर कुणी येऊन अधुनमधून फुंकर घालतात म्हणूनच ही नोकरी ओढत असावेत हे जाणवले.

खी खी खी
अशी लोकं वारंवार येत नाहीत,एरवी नॉर्मल लोकांशी व्यवहार करावे लागतात हेच ते न कळणारं दुःख असावं.

Amul's India: Based on 50 Years of Amul Advertising by daCunha Communications

नाव वाचूनच हे पुस्तक वाचावंसं वाटलं. अमूलच्या जाहिरातींचा प्रवास, त्यामागचा विचार, असं सगळं कुणीतरी आतल्या माणसाने लिहिलेलं वाचायला मिळेल अशी अपेक्षा होती.

पण हा लेखसंग्रह निघाला. तरी म्हटलं हरकत नाही, कारण विषयात इंटरेस्ट होताच. अनुक्रमणिकेत चांगली चांगली नावं दिसली. पण एकूणात हे कॉफी टेबल बुक निघालं. दाकुन्हा मंडळींनीही त्यात लिहिलं आहे, पण ते फार काही इनसाईट प्रकारचं नाही.

अमूलच्या बर्‍याच जुन्या जुन्या जाहिराती पुस्तकात आहेत. त्या बघायला मजा येते. त्यातल्या काही पाहिल्याच्या आठवत होत्या. पण त्यामुळेच हे पुस्तक किंडल रीडरच्या काळ्या-पांढर्‍या स्क्रीनवर वाचण्यात मजा नाही हे पण लक्षात आलं.
मग मी जिथे जिथे त्या जाहिराती आल्या तिथे फोन अ‍ॅपमध्ये त्या रंगीत स्क्रीनवर पाहिल्या.

कोणतंही पान उघडायचं, जरा चाळायचं इतपतच कंटेंट आहे पुस्तकाचा. तसंच अपेक्षित असावं त्यांना, माझ्याच फार अपेक्षा होत्या Lol

ललिता, तुमची पुस्तकांची निवड आणि परीक्षण दोन्ही छान आणि हटके असतात.
तुम्ही कोणती इबुक साईट वापरता सांगू शकाल का?

तुम्ही कोणती इबुक साईट वापरता >>>

किंडल स्टोअर सतत धुंडाळत असते. पुस्तकांचे सारांश वाचते. कधी किंडल-ए.आय.मुळे काही पुस्तकं सुचवली जातात.
एखादं पुस्तक चांगलं वाटलं तर गुडरीड्सवरचे त्याचे रिव्ह्यूजही वाचते. गुडरीड्सवरचे रिव्ह्यूज आणि रेटिंग्ज जास्त क्रिटिकल असतात. पण ते मला उपयोगी वाटतं.

हा धागा आहेच.

शिवाय लोकसत्ता-बुकमार्क (दर शनिवारी) आणि म.टा.-दखल इंग्रजी पुस्तकांची (शनिवारी/रविवारी) हे न चुकता वाचते. त्यातून बर्‍याच चांगल्या चांगल्या पुस्तकांबद्दल समजतं.

शशि थरूर नेहमी चर्चेत येतात म्हणून त्यांची काही पुस्तकं मिळवली. ती वाचणार आहे. पहिलं पुस्तक अकराव्या वर्षी प्रकाशित झालंय. बाब्बौ! एकूण स्टोरीटेलर आहे हे नक्की.

-----
अमुल प्रकरणाला नंतळ फारच कलाटणी मिळाली म्हणतात. कुरिअनचं आणि अमूलचं बिघडलं.
अमुलच्या मोठ्या जाहिराती आणि हिंदिइंग्रजी शब्दांच्या कोलांट्यांवरचे जोक म्हणणे म्हणजे हाहाहा.

Don't Worry, He Won't Get Far on Foot (John Callahan)

जॉन कॅलाहान हा अमेरिकेतला (पोर्टलंड) एक प्रसिद्ध कार्टूनिस्ट. अगदी लहान वयातच दत्तक घेतला गेलेला, त्याबद्दल कल्पना असलेला, दत्तक आई-वडिलांनी सर्व कर्तव्य निभावून मोठा केलेला, घरात लहान भावंडं असलेला.

तरूण वयात त्याला दारूचं भयंकर व्यसन लागलं. त्यापायी २१व्या वर्षी एका भीषण अपघातातून तो मरता मरता वाचला. पण कमरेपासून खाली पूर्ण अपंग झाला. अपघाताच्या वेळी तो इतका नशेत होता की अपघाताची त्याच्या मनात कोणतीही स्मृती नव्हती.

त्यानंतरचे उपचार, रिहॅबिलिटेशन, तरीही पुढची ७-८ वर्षं दारूचं अतोनात व्यसन सुरूच राहणे, मग एक दिवस अचानक साक्षात्कार झाल्यासारखं अल्कॉहॉलिक्स अ‍ॅनॉनिमसला फोन, व्यसन सोडण्याचे प्रयत्न, त्यातून आपल्या हातात चित्र काढायची कला असल्याची जाणीव, आणि मग झपाटल्यासारखी कार्टून्स काढून ती विविध पब्लिकेशन्समध्ये प्रकाशित करणे .... हा सगळा प्रवास त्याने स्वतःच्या शब्दांत लिहिला आहे.

इतका ड्रामा असूनही अगदी प्रांजळ निवेदन, हलकीफुलकी सोपी भाषा, खुसखुशीतपणा यामुळे पुस्तक खूप इंटरेस्टिंग आहे. अगदी पटापट वाचून झालं.
व्हीलचेअरवरचं आयुष्य, त्यातल्या अडचणी, रोजची दैनंदिन कर्मं उरकतानाचे प्रश्न - हे अगदी सविस्तर लिहिलेलं आहे. ते खूप चित्रदर्शी आहे. एका टप्प्यावर त्यानं आपल्या जन्मदात्यांचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला होता. त्याबद्दलही सविस्तर लिहिलं आहे.

पुस्तकात त्याची बरीच कार्टून्स दिलेली आहेत. ती खूप मार्मिक आणि भेदक आहेत. चित्रांची शैलीही वेगळीच आहे. अपघातामुळे त्याला हातात जेमतेम पेन-पेन्सिल धरता यायचं. एका हाताने ते धरून, तो हात दुसर्‍या हाताने धरून तो चित्रं काढायचा. हे लक्षात घेतलं तर ती चित्रं सॉलिड आहेत.
पुस्तकाचं शीर्षक आहे, ते देखील त्याचं एक प्रसिद्ध चित्र आहे.

२ वर्षांपूर्वी या पुस्तकावर सिनेमा आला आहे. प्राइमवर आहे. तो पण नंतर पाहिला. Joaquin Phoenix नं ती भूमिका केली आहे. सिनेमाही तितकाच आवडला. त्याच्या आयुष्याचं नेमकं मर्म पकडलं आहे.

नक्की वाचावं असं पुस्तक.

--------------------------

किंडलवर मी एक बघितलं. ज्या पुस्तकांवर सिनेमे निघालेत त्याच्या कव्हर्सवर त्या सिनेमातल्या कलाकारांचेच फोटो दिसतात. Uhoh मूळ कव्हर गायब असतं. हे मला फार काही पटलं नाही. अगदी 'शाळा'च्या कव्हरवरही त्या सिनेमातल्या दोन्ही मुलांचेच फोटो आहेत.

दोन्ही पुस्तकांबद्दल छान माहिती ललिता.

आजकाल काही प्रिन्ट पुस्तकांवरही ते पाहिले. House of Lies वर डॉन चीडल वगैरेंचे फोटो आहेत. या पुस्तकावर बनवलेल्या एचबीओ वरच्या सिरीयलमधल्या कलाकारांचे

I too had a dream he वर्गीस कुरियन यांचे पुस्तक जरूर वाचा.अमूल प्रकल्पाबाबत सुरेख माहिती आहे.

खालिद हुसैनीचं "And the mountains echoed" वाचलं. बर्‍याच दिवसांपासून वाचायचं होतं. ह्याच लेखकाच्या पहिल्या दोन पुस्तकांइतकं नाही आवडलं. सुमारे ६० वर्ष इतक्या मोठ्या कालावधीत घडणारी कथा अफगाणीस्तान, पॅरीस, सॅन फ्रँसिस्को आणि ग्रीस अश्या विविधं ठिकाणी घडते. दुसर्‍या महायुद्धापासून ते तालिबानोत्तर कालावधी एव्हड्या सगळ्या राजकीय कालखंडाचे संदर्भ येत रहातात. मुख्य कथानक चांगलं आहे पण अधेमधे नवीन नवीन पात्र येतात आणि त्यांची उपकथानकं सुरू होतात. त्यांचा मुख्य कथेही संबंध काय हे कळायला बरीच पानं खर्ची पडतात. काही धागे चांगले गुंफले आहेत पण काही उपकथानकं इतकी सविस्तर नसती तर काहीही फरक पडला नसता असं वाटतं. पुस्तकाच्या उत्तरार्धात सुरू झालेलं एक कथानक वाचता वाचता मला चक्क झोपच लागली आणि ते संपल्यावर "बरं मग?" असा प्रश्न पडला. विशेषतः ग्रीसमध्ये घडलेले प्रसंग तर केवळ पानं भरायला लिहिले आहेत की काय असं वाटलं. काईट रनरमध्ये अफगाणिस्तानातल्या निसर्गाचंही बरच वर्णन आहे. तसं ह्यात फारसं नाहीये. नेहमी प्रमा़णे पात्र आणि त्यांच्यातले संबंध छान फुलवले आहेत. लहान बहीण भावाचं गाणं आणि पुस्तकाचं नाव ज्यावरून स्फुरलं त्या कवितेबद्दल लेखकाने थोडक्यात लिहिलं आहे, ते वाचायला चांगलं वाटलं.
एकंदरीत खालीद हुसैनीचं पण डॅन ब्राऊन सारखं होणार की काय असं वाटलं.

Don't Worry, He Won't Get Far on Foot (John Callahan)
वाचावे वाटतेय. धन्यवाद.

A Grave For Two (Anne Holt)

चांगल्या इंग्लिश थ्रिलर्सची मी फॅन आहे. किंडलवर साहजिक तशी पुस्तकं धुंडाळली जातातच. या कॅटेगरीत ’नॉर्डिक थ्रिलर्स’ किंवा ’स्कँडेनेव्हिया थ्रिलर्स’ असा एक प्रकार सतत दिसतो. बरीच आधी न ऐकलेली पुस्तकं त्यात कळली. लक्षात घेण्याजोगी गोष्ट म्हणजे यात बर्‍याच स्त्री-लेखिका आहेत. त्यात हे एक पुस्तक सारांशावरून चांगलं वाटलं म्हणून घेतलं.

नॉर्वेची वर्ल्ड नं. वन स्कीइंग चॅम्पियन कुणाच्याही ध्यानीमनी नसताना एका डोपिंग प्रकरणात अडकते. तिचं करिअर तर पणाला लागतंच, शिवाय काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विंटर ऑलिंपिक्समधल्या नॉर्वेच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह लागतं. तिचे वडील म्हणजे नॉर्वेच्या स्कीइंग फेडरेशनमधलं एक प्रभावी व्यक्तिमत्व असतं. त्यांच्या आपल्या मुलीच्या स्कीइंग-करिअरवर खूप आशा असतात. त्यांची खात्री असते, की आपल्या मुलीला यात गोवलं गेलं आहे. ते एका स्त्री वकिलाकडे ही केस सोपवतात. मात्र कोर्टात लढण्यासाठी नव्हे, तर त्यापूर्वीचा गुपचूप तपास करण्यासाठी.

ही वकील एकेकाळी नावाजलेली, पण आता परागंदा होण्याच्या वाटेवर असलेली. परागंदा होण्याची कारणं त्या स्कीअरच्या वडिलांना माहिती असतात. त्यातून तिला बाहेर काढण्याचा मार्गही त्यांना माहित असतो. गुपचूप तपास करायचा की नाही हे तिचं ठरत नसतं. दरम्यान नॉर्वेच्याच वर्ल्ड नंबर वन पुरुष स्कीअरचा मृत्यू होतो. तो अपघात, आत्महत्या की घातपात, असा प्रश्न उभा राहतो. या दोन्ही प्रकरणांचा आपांपसांत काही संबंध आहे की हा निव्वळ योगायोग आहे, असाही प्रश्न असतो. तळ्यात-मळ्यात करणारी वकील हळूहळू या तपासात ओढली जाते. तिच्या जोडीला एक स्थानिक पत्रकार असतो.

हा तपास अगदी edge of the seat thriller नाही, पण निवेदनाच्या स्टाइलमुळे ते सगळं वाचायला मजा येते. स्कीइंगची बॅकग्राऊंड, त्याची जार्गन, त्यातली आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि कुरघोडी, आपल्याकडे जशी चिल्लीपिल्ली सुद्धा घरात क्रिकेट खेळतात, तशी तिथली मुलं लहान असल्यापासून अगदी सहज स्कीइंग करायला शिकतात ... हे सगळं आपल्याला तसं अपरिचित आहे. वाचताना ती नॉव्हेल्टी वाटते.
शिवाय नॉर्वेतल्या कडक हिवाळ्याचा वातावरणनिर्मितीसाठी खूप छान उपयोग करून घेतला आहे. धीम्या गतीनं सस्पेन्सचा एक-एक पदर उलगडत जातो, त्यात ती बर्फाळ हवा उत्कंठा वाढवायला मदत करते.
२०१८ सालचं प्यॉन्गचॅन्ग विंटर ऑलिंपिक्स, त्यात नॉर्वेला मिळालेली पदकं, टॉप पोझिशन हे प्रत्यक्षातले तपशील कथानकात वापरले आहेत, ते पण मला आवडलं. (मुख्य डोपिंग कथानकाचाही प्रत्यक्षातल्या घटनांशी काही संबंध असेल तर कल्पना नाही.)

यात तीन-चार उपकथानकं आहेत. त्यातलं एक या पुस्तकापुरतं मर्यादित असावं. बाकीची या वकीलीण-तपास-सिरीजला नजरेसमोर ठेवून रचली गेली असावीत असं मानायला जागा आहे. तरी त्यांचा फाफटपसारा वाटत नाही. (हे पुस्तक म्हणजे त्या सिरीजचा पहिला भाग आहे.)

एकूणात स्कीइंगची पार्श्वभूमी, या क्रीडाप्रकाराचं नॉर्वेच्या मातीत भिनलेलं असणे आणि या गोष्टीचा कथानकात करून घेतलेला उपयोग, यामुळे मला हे पुस्तक आवडलं.

उत्तम ओळख प्रिती.

स्कॅनडेनेव्हिएच्या हवामानाचा परिणाम की काय कोण जाणे पण या देशातून उत्तम प्रतीच्या रहस्य/उत्कंठावर्धक कादंबऱ्या प्रकाशित होतात. आईसलँड सारख्या चिमुकल्या देशातून अनेक थ्रिलर्स प्रकाशित होतात.

Pages