मी वाचलेले पुस्तक - २

Submitted by वरदा on 12 February, 2013 - 09:20

आधीच्या धाग्यावर दोन हजार प्रतिसादांची मर्यादा ओलांडल्यामुळे हा नवा धागा सुरू करत आहे. Happy

इथे आपण नुकत्याच वाचलेल्या पुस्तकाबद्दल लिहा. शक्य असल्यास नवीन पुस्तकासाठी नवीन लेखनाचा धागा चालू करा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान परिचय सनव!
'प्रिय जी. ए.' हे सुनीता देशपांड्यांचं पुस्तक नुकतंच स्टोरीटेलवर ऐकलं. पत्रं असल्यामुळे असेल, पण ऐकण्यापेक्षा वाचायला हवं होतं असं वाटलं. अर्थात, अरुणा ढेरे यांनी या पुस्तकाचं वाचन केल्यामुळे सुनीताबाईंच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाला न्याय मिळतो, असंही वाटलं.

जी. ए. आणि सुनीताबाई, दोघेही वयाच्या पन्नाशीच्या आसपास असताना त्यांची ही पत्रमैत्री झाली. ही मैत्री सुनीताबाईंसाठी किती मोलाची होती, हे 'आहे मनोहर तरी' वाचून ठाऊक होतं. ही पत्रं ऐकतानाही तेच जाणवलं. जी. एं.बद्दलचा प्रचंड आदर सुनीताबाईंच्या मनात असल्याने त्या स्वतःकडे खूप लहानपण घेऊन लिहीत होत्या असं दिसतं. पूर्वी किंवा नुकतीच वाचलेली पुस्तकं, दोघांच्या कॉमन ओळखीची आणि जिव्हाळ्याची माधव आचवलांसारखी माणसं, गांधीवाद, कम्युनिझम, मृत्यू, एकंदर जीवनाचा अर्थ असे साधारणपणे या पत्रांचे विषय आहेत. सुरुवातीला जरा जपून लिहिलेली, औपचारिकता असलेली पत्रं पुढे पुढे अधिकाधिक मोकळी होत जातात. शेवटचं चाळिसावं पत्र संपलं आणि एक हुरहुर, उत्सुकता लागून राहिली की यानंतर सुनीताबाईंंनी पत्रं लिहिलीच नसतील की जी. एं. कडून ती कुठे हरवल्यामुळे पुस्तकात घेता आली नसतील?
जी. एंनी सुनीताबाईंंना लिहिलेल्या पत्रांचंही पुस्तक आहे. तेही वाचलं पाहिजे.

वावे,तुम्ही मंगला गोडबोले/अरुणा ढेरे यांचे "सुनीताबाई" हे पुस्तक वाचले असेलही.जर नसेल वाचले तर जरूर वाचा.
जानेवारी का फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातील लोकसत्तेच्या चतुरंग पुरवणीतील सुभाष अवचट यांचा सुनीताबाईंवरचा लेख अतिशय वाचनीय आहे.
'प्रिय जी. ए...हे वाचायचे आहे अजून.

Srd, सुनीताबाईंचं 'मनातलं अवकाश' हे पुस्तक छान आहे. 'सोयरे सकळ' हे मी वाचलेलं नाही. त्यांंनी लेखिका म्हणूनखूप काही लिहिलं नसलं , तरी त्यांचं वाचन खूप होतं, तीक्ष्ण बुद्धिमत्ता होती, चांगलं-वाईटाची जाण स्पष्ट होती, स्वभावात सडेतोडपणा होता. त्यामुळे त्यांच्या लिखाणात बोटचेपेपणा दिसत नाही. मला आवडतं त्यांचं लेखन.
देवकीताई, हो, सुभाष अवचटांचा लेख वाचला, आवडला. छान आहेत त्यांचे आत्तापर्यंतचे सगळे लेख त्या सदरातले Happy
मंगला गोडबोले/ अरुणा ढेऱ्यांचं पुस्तक नाही वाचलेलं अजून.

<< मुंबईत घडणारं कथानक म्हणून Murder In Old Bombay बद्दल उत्सुकता वाटली. मुखपृष्ठावर राजाबाई घड्याळ टॉवरचं चित्र आहे!
1890 च्या आसपास दोन पारसी तरुण स्त्रियांचा मुंबईच्या राजाबाई घड्याळ टॉवरवरून पडून मृत्यू होतो. >>

ही सत्य घटना आहे. यात अर्देशीर गोदरेज (ज्यांनी गोदरेज कंपनी सुरू केली) यांची पत्नी बचुबाई आणि पिरोजबाई या दोघींनी राजाबाई टॉवरवरून उडी मारली होती.

ओह wow..थँक्स उपाशी बोका.
मला वाचतानाही वाटत होतं की हे बहुधा ट्रू स्टोरीवरून प्रेरित आहे पण शोधलं नाही.

ही सत्य घटना आहे. यात अर्देशीर गोदरेज (ज्यांनी गोदरेज कंपनी सुरू केली) यांची पत्नी बचुबाई आणि पिरोजबाई या दोघींनी राजाबाई टॉवरवरून उडी मारली होती.

>>> ओह्ह!

सुभाष अवचट यांचा सुनीताबाईंवरचा लेख वाचला तर वाटतं सुनीताबाई आयुष्यभर फक्त चहा करत होत्या.
*
पिरोजबाई या आर्देशिर यांच्या मावसमावसबहीण होत्या, बचूबाई पत्नी. त्या दोघींवर टॉवरवर विनयभंगाचा प्रयत्न झाला. त्यात त्यांनी त्या गुंडांच्या तावडीतून वाचण्यासाठी उड्या मारल्या.
या तपासपथकातल्या एका अधिकाऱ्याने पुढे बरीच मोठी कामगिरी बजावली. ब्रूईन त्याचं नाव. टिळकांनी तो गेल्यावर मृतयूलेख लिहिला.

चिनूक्स Lol चहाचा उल्लेख बर्याच वेळा झालाय खरा. तुम्ही लिहिलेलं वाचल्यावर मी तो लेख परत जाऊन वाचला! आधी लक्षात नव्हतं आलं.

घाचर गोचर (विवेक शानभाग), अनुवाद : श्रीनाथ पेरूर

एक सर्वसामान्य कुटुंब, जेमतेम खाऊनपिऊन व्यवस्थित राहत असलेलं, फॅमिली बिझिनेसमुळे आर्थिक स्थिती सुधारत जाते. त्याचबरोबर कुटुंबाची नैतिकता नकळत ढासळत जाते... असं कथानक आहे.
प्रथमपुरुषी निवेदन, फ्लॅशबॅकमध्ये येणारी कथा.
निवेदक, त्याची बायको, आधीची प्रेयसी वाटावी अशी एक व्यक्तिरेखा, निवेदकाचे आई-वडील, घटस्फोटित बहीण आणि काका.
काकामुळे बिझिनेस वाढीस लागतो, निवेदकाला काही काम नसतं, बिझिनेसमधून पगार मिळत असतो. त्यामुळे त्याची बायको मात्र नाराज असते. त्यावरून त्यांचे संबंध जरा ताणले गेलेले असतात. बहिणीचं लग्न आणि मुख्यत्वे घटस्फोट हे जरा बटबटीतपणे येतं. पण तसंच अभिप्रेत असावं.
शेवट अधांतरी ठेवलाय. त्याने पुस्तक एकदम उंचीवर जातं. वाचकांच्या मनात 'नेमकं काय झालं असावं?' हा विचार घोळत राहतो.
तसंच, वर्तमानकाळ आणि फ्लॅशबॅकमध्ये मारलेल्या उड्या खूप इंटरेस्टिंगली येतात. त्यामुळे गुंतून जाऊन पुस्तक वाचलं गेलं.
कथानकाच्या अनुषंगाने आलेली काही वाक्यं, विधानं खूप छान आहेत.

हे पुस्तक खूप गाजलं, अनेक भाषांमध्ये त्याची भाषांतरं झाली आहेत, असं वाचलं. अ‍ॅमेझॉन, गुडरीड्सवर वगैरे पुस्तकाचे भरभरून रिव्ह्यूज आहेत. त्यामुळेच कदाचित माझ्या अपेक्षा खूप वाढल्या. त्या मानाने पुस्तक फार ऑसम वगैरे वाटलं नाही, मात्र एकदा वाचण्याजोगं नक्की आहे.

Storytel app वर फक्त audiobooks आहेत का? कि ebooks पण आहेत. जे हे app वापरतात ते सांगू शकतील का? मला ebooks आणि audiobooks दोन्ही आवडेल.

सुभाष अवचट यांच्या खानोलकर यांच्यावर लिहिलेलीस लेखावरून बराच गदारोळ सुरू आहे
मी पूर्ण लेख वाचला नाही, सोशल मीडियावर काही जणांनी स्क्रीनशॉट टाकले आहेत त्यावरून अंदाज येतोय की गरीबी बद्दल लिहलं आहे खानोलकर यांच्या
कुठे आलाय छापून?

ते अवचट मागे एकदा कट्टा वर पण आले होते. त्यात सुनीता बाई किंवा पुलं चा उल्लेख नाही अजिबात , फार विशेष वाटलं. त्यांचे सनावळ्यांचे जाम घोळ वाटतात. इतके की फेकतात की काय असे वाटते.

अंधाराच्या पारंब्या ही जयवंत दळवींंची कादंबरी स्टोरीटेलवर संदीप खरेच्या आवाजात ऐकली.
आधी कादंबरीबद्दल. विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ आहे. विलायतेला जाऊन आलेल्या, आधुनिक विचारांच्या एका बॅरिस्टरचा भलामोठा वाडा, वाड्यात राहणारे स्वतः बॅरिस्टर, त्यांचे, मुळातले हुशार आणि सुशिक्षित, पण नंतर डोक्यावर परिणाम होऊन शून्यात गेलेले दोन मोठे भाऊ, बालविधवा झालेली, केशवपन झालेली लाल आलवणातली एक मावशी आणि या वाड्याच्या आऊटहाऊसमध्ये राहणारे कारकून भाऊराव आणि त्यांची नवीन लग्न होऊन आलेली सुंदर बायको राधाक्का या सगळ्यांची ही कथा आहे.
नियतीच्या विचित्र खेळामुळे आयुष्यात एकटे राहिलेले बॅरिस्टर, त्या आणि त्याआधीच्याही काळातल्या असंख्य स्त्रियांच्या नशिबात आलेलं भयंकर आयुष्य जगणाऱ्या मावशीबाई या दोघांच्याही सुकलेल्या मनांना भाऊराव आणि राधाक्काच्या नव्या नवेलीच्या संसारामुळे एक चैतन्य येतं. तोपर्यंत दोघेही आपापलं आयुष्य आपापल्या पद्धतीने घालवत असतात. बॅरिस्टर सुंदर, सुगंधी फुलांची बाग फुलवून आणि मावशीबाई शक्य तितक्या नीरस, कष्टमय जगून. बॅरिस्टर राधाक्कावर प्रेम करतात, पण ते निरागस, निष्पाप प्रेम. त्यात आकर्षण असेल, पण लालसा नसते. मावशीबाई आपल्या आयुष्यात न मिळालेलं सुख राधाक्काच्या आयुष्यात शोधतात. पुढे पुढे काही अकल्पित घटना घडत जातात आणि राधाक्का आणि बॅरिस्टरांच्यातल्या एका अधांतरी क्षणी कादंबरी संपते.
ही सगळी विविध व्यक्तिमत्त्वं जयवंत दळवींंनी अर्थातच नेमकी उभी केली आहेत. गावात बालगंधर्वांची नाटक मंडळी येते, भाऊराव, राधाक्का आणि बॅरिस्टर नाटकाला जातात, नंतर बॅरिस्टरांच्या आमंत्रणावरून स्वतः बालगंधर्व वाड्यात येतात, तो प्रसंग फारच सुंदर झाला आहे. बालगंधर्वांचं 'ग्लॅमर' काय असेल, याची कल्पना त्या प्रसंगातून आपल्याला येते.
आता संदीप खरेच्या अभिवाचनाबद्दल. त्याने ही कादंबरी वाचताना अत्यंत उत्कृष्ट वाचिक अभिनय केला आहे. मुळातलं दर्जेदार लेखन आणि संदीप खरेचं अप्रतिम अभिवाचन, त्यामुळे हा अनुभव अतिशय श्रवणीय झाला आहे. वेगवेगळ्या पात्रांचे संवाद म्हणताना त्याने आवाजात केलेले बदल, वर्णनातल्या भावभावनांना अनुसरून केलेले चढउतार अगदी दाद देण्यासारखे. विशेषतः, एका प्रसंगात तोंडात पाईप असताना बोललेल्या वाक्यातला आवाज तर तंतोतंत उतरला आहे.
एकंदरीत ऑडिओ बुक हा प्रकार मला आवडतोय.
चांगलं अभिवाचन करू शकणाऱ्या कलाकारांनी अशी अधिकाधिक दर्जेदार पुस्तकं वाचावीत आणि आपण ती ऐकावी Happy

अल्फा मराठीवर पिंपळपान नावाची मालिकाही या कादंबरीवर आधारित असल्याच आठवत आहे. राधाक्का म्हणून मृणाल कुलकर्णी , भाऊराव म्हणून प्रसाद ओक , बॅरिस्टर म्हणून अतुल कुलकर्णी आणि मावशी म्हणून भक्ती बर्वे यांच्या भूमिका होत्या

जाई, राय करेक्ट.

पिंपळपान ही मालिका वेगवेगळ्या कथा, कादंबरी यांच्यावर आधारित होती. त्यात ह्या कथेचे नाव अंधाराच्या पारंब्या हेच होतं असं स्मरतंय.

वावे मस्त पोस्ट.

'घाचर घोचर' बद्दल छान लिहिलंय ललिता प्रीती. ह्याचा अर्थ काय, गोचर शब्द माहितेय पण हे दोन्ही माहिती नाहीयेत.

अवचट यांनी एक पुस्तकाचे कवर फोटो करण्याचे काम घेतले आणि मग लेखकाचे आणि त्यांचे फारच बिनसले। मग लेखकाने दुसऱ्याकडून कवर करून घेतले तो लेख पूर्वी वाचलेला.

हो, बॅरिस्टर नाटक याच कादंबरीवर आहे हे लिहायचं राहिलंच. पिंपळपान सीरियल झी 5 वर असेल तर बघायला पाहिजे. चंद्रकांत कुलकर्णींंची होती का?

वावे आठवत नाही कोणाची ती पण पहिलीच कादंबरी व्यंकटेश माडगूळकर यांची होती आणि त्यांची भूमिका, चंद्रकांत कुळकर्णी टीममधल्या समीर पाटीलने केलेली.

'घाचर घोचर' ह्याचा अर्थ काय
>>> सगळा गडबडगुंता, उलटपालट होणे, विस्कळीत होणे असा अर्थ असावा.
एका प्रसंगात निवेदकाच्या बायकोच्या तोंडी हा शब्द येतो. त्या प्रसंगाच्या रेफरन्समध्ये असा अर्थ लागला. आणि तो अधांतरी शेवटालाही सूट होणारा आहे.

न्यू यॉर्क टाइम्स बूक रीव्ह्यू चे इमेल्स, त्यांचं पॉडकास्ट, रँडम हाउस आणि इतर दोन तीन पब्लिशर्सच्या इमेल्स यातून वाचलेली आणि वाचावीशी वाटलेली पुस्तकांची नावे लायब्ररी अ‍ॅपवर होल्ड मधे टाकून ठेवली की ती अकस्मात कधीही ऐकायला मिळतात. ऐकायला / वाचायला मिळेपर्यंत त्या पुस्तकाचं नाव कुठे सापडलं होतं , कोणी आणि का रेकमेंड केलं होतं हेच विसरून जाते कधी कधी.

मागच्या आठवड्यात द ऑथेंटिसिटी प्रोजेक्ट नावाचं पुस्तक अव्हेलेबल असल्याचा मेसेज दिसलं. इतर कुठलं ऑडिओबु़क नसल्याने ते पुस्तक चेक आउट केलं आणि ऐकलं. नंतर परिक्षणं वाचली. फील गूड बूक वर्णन अगदी चपखल आहे. २०१८-२०१९ सालातल्या लंडनमधे घडणारं कथानक ७९-८० वर्षांचा एकेकाळचा प्रसिद्ध चित्रकार ज्युलियन जेसप , आता तो विस्मृतीत गेला आहे. पत्नीच्या निधनानंतर जवळपास १५ वर्षे तो एकलकोंडा , एकाकी झाला आहे. स्वतःबद्दलची खरी माहिती एका वहीत लिहून तो ती वही एका कॅफे मधे सोडून जातो. त्या कॅफेच्या मालकीणीला ती वही मिळते. चाळीशीच्या उंबरठ्यावर असलेली, अविवाहित पण लग्न , संसार, मुलं बाळं यासाठी आसुसलेली मॉनिका त्या वहीत आपली गोष्ट लिहून एका बार मधे सोडून येते. ती वही कोणा कोणाला सापडते, ते सर्व लोक एकमेकांना काय काय मदत करतात, अशी सगळी गोष्ट आहे. मधे मधे मला मॉडर्न बार्बरा कार्टलंड चा भास झाला. एका सीनमधे कोणीतरी म्हणतं सुद्धा, ' हे तर डॅनिएल स्टीलच्या कादंबरीतल्या सारखं झालं' . पण स्टीमी वर्णने वगैरे काही नाही.
ब्रिटिश अ‍ॅक्सेंटमधे नॅरेशन आहे. ते ऐकायला मजा आली. ऑस्ट्रेलियन कॅरक्टरचा अ‍ॅक्सेंट वगैरे पण नीट वठला आहे. हलकेफुलके पुस्तक आहे.

रीव्ह्यू वाचल्यावर कळले की लेखिका स्वतःच्या अ‍ॅडिक्षन आणि रिकव्हरीच्या अनुभवांवर ब्लॉग लिहित होती आणि त्या काळातल्या अनुभवातून तिला या पुस्तकाची कल्पना सुचली.

Pages