युक्ती सुचवा/ युक्ती सांगा- २

Submitted by पूनम on 15 June, 2011 - 03:25

स्वयंपाकघरातल्या अनेक युक्त्या आपण http://www.maayboli.com/node/6359 पाहिल्यात. अनेक अडचणींवर मात करायलाही ह्याच धाग्यावर शिकलो. अशाच युक्त्या एकमेकांना ह्या पुढेही सांगत राहू, आता इथे ह्या नव्या धाग्यावर.

इथे काही विचारण्याआधी, मात्र हा आधीचा धागा पहायला विसरू नका.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रॅडी, मी बरेचदा स्टफ्ड बन्स केले आहेत. करायला आणि खायला अतिशय सोपे शिवाय सर्व्ह करायला देखिल सोपे. स्टफिंग साठी मटकीच्या मोडाची उसळ, भरपुर कांदा घालुन केलेली बटाट्याची भाजी, असे कोणतीही सेमी ड्राय भाजी वापरता येईल. छान कोथिंबीर, पुदीना घालुन. भाजी थोडी आधी करता येईल. मग पुर्ण थंड झाल्यावर बन्स तयार करणे आणि भाजणे. एका सर्विंग ट्रे मध्ये हे बन्स अर्धे कापुन ठेवायचे. भाजीत थोडी रंगसंगती केली तर मस्त दिसते. उ.दा. बटाच्याची हळद आणि थोडी हिरवी मिरची घातलेली भाजी, त्याच बन मध्ये टोमॅटो घालुन केलेली दुसरी भाजी. सोबत एखादी चटणी देता येईल.

प्रॅडी , कचोरी करायची ठरवलीसच तर यूट्यूबवरच्या " मंजूलाज किचन " वरच्या खस्ता कचोरीची सुद्धा ट्रायल घे . आधी करून ठेवता येईल आणि लागते सुद्धा मस्तच . बाकी चॉईसेस मधले दहीवडेच सोप्पे वाटताहेत . ते सुद्धा आधी करून ठेवता येतील . Happy

प्रॅडी, चकल्या पाठव. गरम - गार, चटण्या, भाज्या काही प्रकार बरोबर द्यावे लागत नाहीत. सुट्सुटीत आणि सगळ्यांना आवडतात. सांडणं लवंडणं नाही.

काल माझ्या मैत्रिणीने नवर्‍याच्या ऑफिसमध्ये अश्याच कार्यक्रमाला इंडोचायनीज भेळ करुन नेली. सगळ्यांना प्रचंड आवडली. कुणालाच माहित न्हवती.तिने भाज्या (कोबी, गाजर) बारीक चिरलेल्या/खिसलेल्या अश्या विकत आणल्या आणि केली त्यामूळे पटकन झाली.
अर्थात तुझ्याकडे 'टेस्ट ऑफ ईंडिया" अस असल्याने कितपत उपयोगी असेल माहीत नाही.

काहीतरी तिखटच द्यायचं असतं का? जादूची मलईबर्फी कर किंवा कलाकंद. Proud रंगीत सेलोफेन पेपरमधे टॉफीसारखा गुंडाळून दे.

भाजणीची छोटी छोटी थालीपीठे हा पण ऑप्शन आहे. अगदी पुरीएवढी करायची.बरोबर दही/चटणी.
छोट्या पेपर बोल्स मधे कॉर्न भेळ..हा प्रकार पण सगळ्यांना आवडतो.
लाजोचे बन फुल्ल पण सॉगी होणार नाहीत.
अळू मिळत असेल अळूवडी/कोथिंबीर वडी
चक्क चिवडा वर कांदा/टोमॅटो/कोथिंबीर

काल मी घरी बाकरवडी बनवली...
मैदा आणी बेसन स्टफ मळताना [मोहन] गरम तेल एवजी थंड तेल वापरलय.. तरी पण बर्या पैकी खुसखुशीत झाल्यात....

गरम तेल वा थंड तेल वापर तर कोणता फरक पडतो?

बाकरवडीवरून आठवले... गेल्या आठवड्यात घरी बाकरवडीचे एक पाकिट भेटीदाखल आले. त्या बाकरवड्या मला काही फार आवडल्या नाहीत. त्या आता तशाच लोळत पडणार हे लक्षात आल्यावर त्या चक्क मिक्सरमध्ये बारीक केल्या आणि तो 'मसाला' पीठ पेरून ज्या भाज्या करतो त्या भाज्यांना बेसनाऐवजी वापरला. कांदा, दुधी, काकडीच्या भाजीला बाकरवडीचा मसाला मस्त लागला व त्यामुळे बाकरवड्याही संपल्या. (असेच चकलीच्या भुग्याचेही करता येईल... अर्थात तो शिल्लक रहात असला तर!!)

कसली डोकेबाज माणसं आहात तुम्ही सगळी... मांडी ठोकून हा झल्ला वाचून काढला. साष्टांग नमस्कार... युक्त्याच युक्त्या...
माझ्याकडे काही होत्याचं नव्हतं झालं की इथे येईन म्हणते... Happy
(मला इथे पडीकच रहावं लागेल मग)

आज माझा एक लंच फ्रेंड सांगत होता की, त्याला साबुदाणे वडे प्रचंड आवडतात, पण ते तळलेले असतात त्यामुळे तो मनसोक्त खाऊ शकत नाही. तर त्याच्या आईने साबुदाणे वडे अप्पे पात्रात करून पाहिले, ते म्हणे सुंदर झाले होते. मी कल्पना करू शकले नाही, पण गरजूंनी प्रयोग करून पहावा.. Happy

अरूंधती, चकलीचा भुगा केला कि हाताने किंवा कपड्याने दाबून त्यातले तेल काढून टाकायचे आणि मग वापरायचा. आपल्याला कल्पना नसते एवढे तेल आत जिरलेले असते.

दाद, तबला समजून थालिपिठं थापायची, मस्त होतील...

>>साबुदाणे वडे अप्पे पात्रात करून पाहिले, ते म्हणे सुंदर झाले होते.
असे हराभरा कबाब पन बनवता येतात!! छान होतात. Happy

दही भल्ल्यांची कृती आहे का माबोवर? मी शोधली इथे पण सापडली नाही. त्यातही उडीदडाळ +मूगडाळ मिश्रणाला भिजवून वाटून त्यात काय काय चवीसाठी घालून + इनो सॉल्ट घालून त्याचे वडे इडलीपात्रात वाफवतात. तोही चांगला ऑप्शन आहे. आणि वरतून दहीवड्यासारखे दही तयार करून घालतात. त्याचे दहीवडा चाटही करु शकतो.

माझ्या नवर्याने २किलो कांदे आणुन ठेवले आहेत ते काही लवकर संपणार नाहीत तर ते टिकतील यासाठी काय करु?
पुर्या,भजे, झुणका, थालीपीठ, याव्यतिरिक्त अजुन काय काय करता येइल हे पण सांगा. खुप मोठे कांदे आहेत. १ वेळेस १ पुर्ण पण लागत नाही. आम्ही काही रोज कांदा पाहिजेच असे काही खात नाही. तर ते कसे टिकवु आणि अजुन काय काय पदार्थ करता येतील ते पण सांगा.

अरुंधती, आमच्याकडे दही भल्ल्यांसाठी फक्त उडिदडाळच वापरतात. डाळ भिजवून वाटतात, वाटताना त्यात आलं, हिरव्या मिरच्या घालतात. पण भल्ले वफवत नाहीत, तर दहीवड्यांच्या वड्यासारखेच तळतात. त्यात ड्रायफ्रुटस पण घालतात तळताना. भल्ला पापडी चाट पण करता येतं याचं.

यादिवसात श्राद्धाचे जेवण करतात ना, त्यात माझ्या सासरी दही-भल्ले मस्ट असतात. छोले-भटूरे, चावल की खीर + दही भल्ले असा मेन्यु असतो.

निर्मयी, कांदेपोहे/कांदा भजी करून खाणे. Happy तसेही नाही संपले तर कांद्याची भाजी बेसन घालून करायची. मस्त होते. कांदा लसूण मसाला पण करून ठेवता येइल. किंवा कांदा टोमॅटोची किंवा कांदाखोबर्‍याचे वाटण घालून ग्रेव्ही बनवून त्याचे कितीतरी विविध प्रकार करता येतील. (उसळ वगैरे)

आणि दोन किलो कांदेतसे पंधरा दिवसभर टिकायला हरकत नाही. शक्यतो हवा लागेल अशा ठिकाणी कांदे ठेवावेत.

@ निर्नयी -

ऊन असेल तर कांद्याचे उभे पातळ काप करून उन्हात वाळवता येतिल मग ते बिर्याणी, पुलाव इ मधे किंवा ग्रेव्ही मधे वापरता येतिल.

ऊन नसेल तर बेकिंग ट्रेवर पसरून त्यावर थोडा ऑईल स्प्रे मारुन लो टेंप ला बेक कर. आणि छोट्या छोट्या सेसि बॅग्ज मधे स्टोअर कर. बिर्याणी, पुलाव, फ्राईड राईस मधे किंवा ग्रेव्हीमधे, भाज्यांवरती घालुन वापर.

निर्मयी कांदा अगदी व्यवस्थित फ्रोझन होतो. कांदा पातळ कापून घ्या. ट्रे मध्ये पातळ लेअर मध्ये पसरुन फ्रोझन करा. आणि मग तो झिपलॉकच्या बॅग मध्ये घालुन परत फ्रीझर मध्ये ठेवा. अगदी व्यवस्थित टिकतो. डायरेक्ट खायला (कोशिंबीर्,सॅलड) मध्ये वापरता येणार नाही. परंतु बाकी सगळीकडे वापरता येतो.

तसच कांदा उन्हात सुकवून तळुनही ठेवता येईल.वरती लाजो ने छान आयडिया दिलीच आहे already.

गुलाब जाम.... जाम गुलाबजाम उरलेत. पाकाचं नको... पण गुलाबजामांचं अजून काही खाण्याजोगं घडवता येईल का? जेवल्यावर स्वीट डिश म्हणून...
आईस्क्रीम बरोबर सर्व्हणे सोडून सांगाल का...

दाद, त्या गुलाबजामांचा पाक निथळून घेऊन तुला कुठलीही पंजाबी पद्धतीची ग्र्व्ही करून त्यात ते गुलाबजाम कोफ्ते म्हणून सोडता येतील. झक्कास लागतात.

दुधी कोफ्ता करी
मलई कोफ्ता करी

इथे समग्र कर्‍या मिळतील : http://www.maayboli.com/node/2548/by_subject/11/257

नका रे त्या गुलाबजाम ला असं वागवु.. कोफ्ते म्हणुन करीत सोडणार त्यांना वा धपाटे करणार.. नको नको,त्यापेक्षा माझ्याकडे पाठवुन द्या. Proud Light 1

रविवारी दुपारी साग्रसंगीत जेवन झाल्यावर, बाकीचे झोपलेत हे बघुन हळुच गुलाबजाम मुरलेल्या पाकाची वाटी फ्रिजबाहेर काढायची आणि गट्टम करायची! अहाहा!

दाद, http://anshu-rajasthanicuisine.blogspot.com/ या ब्लॉगवर गुलाबजामाची राजस्थानातील फेमस करी आहे. बघ, वाच, कर, खा, खिलव आणि कशी झाली होती ते सांग! Proud

स्वीट डिश सोडून सगळं...
ते साजुक तुपाबरोबर धपाटे चागलेच लागतील अंगाला... शंकाच नाही.
चिंगे पुढल्या खेपेला, इथे विचारायची गरजच नाही. तुला पाठवून देते हं... सोप्पच झालं.
इथे तुमच्या युक्त्या वाचून सुरसुरी का काय म्हणतात... चागल्या भाषेत स्फूर्ती... ती वेळीच आल्याने...
मी पुढला उद्योग केला.
जामुनांना पाकातून काढून निथळत ठेवलं थोडा वेळ... त्यांचं "झाल्यावर"....
एका पसरट सर्व्हिंग डिशमधे तळाशी आमरसाचा (डब्यातला), अगदी पात्तंsssळ थर घातला.
थोडा आमरस आणि घट्टं क्रीम असं उगाच जरा सुरीनच ढवळल्यासारखं केलं. ते पांढरं क्रीम आणि आमरस... मस्तच दिसत होतं. तसच गट्टम करावसं वाटत होतं.... मग गुलाबजाम? (असं तुम्ही म्हणाल... मनात नाही. मोठ्यानेच)
तर...ते मधे कापले (सॉरी चिंगी) आणि त्या डीशमधे पालथे ठेवले... त्या सगळ्या पिंडीच्या डोक्यावर ह्या आमरस क्रीमची बारिक अभिषेकाची धार धरली... खूप नाही... अगदी किंचितच.
वरून एव्हरेस्टचा दुधाचा मसाला भुरभुरवला...

नाव ठेवलय.... गुलाब-आम Happy

माझ्या कडे भरपूर धणे [५किलो] आले आहेत्,ते कसे टिकवू शकता येतिल्? धणे पुड इकड्च्या हवामानात फार दिवस टिकत नाहि त्यात किडे होतात.त्यामुळे थोडि थोडि करावि लागते.धण्यां मध्ये पण काळि पाखरे झालि आहेत.आता काय करु??
तूप कढवताना ते कधि कधि अचानक उतु जाते,तूप बनल्या नंतर्,हे कशामुळे होते?
माझ्या कडे दर आठवड्या ला गावाहुन १० किलो लोणि येते[भरपुर म्हशि आहेत्],हे लोणि फ्रिज मध्ये भरणे शक्य नाहि,साजूक तूप करुन शेजारि -पाजारि,कामवालि,सिक्यूरिटि गार्ड सर्वाना देत रहाते , अनाथ आश्रमात वाटले, वॄद्धाश्रमात दिले .पण दरवेळि येणार्‍या लोण्या मुळे भरपुर तुप होते,बाहेर ठेवले कि काहि दिवसांनि त्याला वास येतो ,प्लीज मद्त करा.कसे टिकवू???आणि या तुपाचे काय करु???

Pages