चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिकवावर गॉसिप, नटनट्यांच्या दिसण्याची, व्यसनांची चर्चा चालते तसंच एवढं अवांतर चालवून घेतल्याबद्दल आभार. >>> चालवून घेतलंय हे कसं काय ठरवलं ? Proud
वेगळा धागा असावा असं म्हटल्याने अन्यायग्रस्त असल्यासारखे वाटले का ? माझ्या मते हा विषय चांगला आहे आणि चिकवाच्या चर्चेत हरवून जाईल. सामाजिक आणि राजकीय विषयांवर सौहार्दपूर्ण आणि उमद्या चर्चा इथले आयडीज करू शकतात तसे चिकवाकार करू शकत नाहीत. Happy

सुनिधी, चित्रपट कुठल्या दिशेने जातोय याची सुरवातीला अजिबात कल्पना येत नाही. त्या दोघींच्या दुसर्‍या भेटीत ती परत औषधांचा उल्लेख करते तेव्हा माझ्या डोक्यात घंटी वाजली. हे काहीतरी वेगळे आहे. पण अशी कलाटणी मिळेल याची अजिबात शंका आली नाही.

समुद्रावर घडलेली ही दुसरी मर्डर मिस्ट्री, जी आवडली. पहिलीत एका सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या खुनाचा प्रयत्न आणि इराकचे पिरॅमिड्स वगैरे होते. तीही छान होती. एक तिसरी बघितलेली ज्यात कामावरुन डिसमिस झालेला पोलिस नवरा व भोचक बायको आहे ती कायच्या कायच होती. अतिफालतु. Happy

मराठी चित्रपट मनाचे श्लोक ह्या नावावर बंदी आणली.
चित्रपटाची गोष्ट पण यथातथाच असावी वाटतेय..
कैच्याकय वाद झाला पुण्यात…

उनाड - मराठी – जियो हॉटस्टार
चांगला होता.
तीन मित्र. त्यांची उनाड मैत्री. तिघात जो लीड दाखवला आहे तो प्रेम–आकर्षणाच्या नादात एक कांड करतो. आधी पॉगंडावस्थेतील प्रेमकथा आहे वाटत असताना चित्रपट त्या कांड नंतर वेगळ्या वाटेने जातो. तिघे प्रगल्भ होतात. त्यांना जबाबदारीची जाणीव होते. कुठे ना कुठे आपल्या सर्वांशी हे रिलेट होते असे वाटते.
उत्तरार्धात बोटीवरचे काही सीन आहेत. बंदरावरचे सीन प्रत्यक्ष आयुष्यात खूप अनुभवले आहेत. पण बोटीवरचे मच्छीमारांचे जीवन बघून थोडी नवी माहिती मिळाली, थोडी ज्ञानात भर पडली.
अरे हो, हा देखील कोकणात घडणारा चित्रपट. कोकणात चित्रित झालेले मराठी चित्रपट असा नवीन धागा काढायला हरकत नाही Happy

साधनाने लिहिलेला, “ सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या खुनाचा प्रयत्न आणि इराकचे पिरॅमिड्स वगैरे ” , आठवेना नाव. पाहिलाय असं वाटतं.

तिसरा लिहिलास तो “मर्डर मिस्ट्री“ च नाव होते. भाग १ विनोदी टाईमपास होता. भाग २ फार फार बंडल.

मी शोधुन लिहिते. मलाही आठवत नाहीय.

द जनरल्स डॉटर पाहिला. जुना आहे॑१९९९ चा आणि आता २४ ला जातोय नेफ्लिवरुन.

काहीच माहिती नव्हती त्यामुळे चित्रपट एकदम अंगावर आला. खरी कथा आहे का माहित नाही. शेवटी लिखित स्वरुपात माहिती दिली त्यावरुन खरी कथा आहे असे वाटले. सुरवातीस काही उल्लेख असेल तर मी सुरवातीचे क्रेडिट्स १०-१० सेकंद पळवते त्यामुळे कळले नसणार.

सैन्यात एक स्त्री पुरुषांपेक्षा जास्त चांगली कॅडेट बनतेय याचा पुरुष इतका द्वेष करतात हे बघुन आश्चर्य वाटले. आश्चर्य केवळ यासाठी की हे अमेरिकन मिलिटरीत घडल्याचे दाखवले. अमेरिका उर्फ प्रगत राष्ट्रे व तिथल्या प्रगत लोकांची मानसिकता याबद्दल मी किती गैरसमज करुन घेतलेत हे परत एकदा माझ्या लक्षात आले. चित्रपट सामाजिक मानसिकतेचे प्रतिबिंब आहेत.

आज भारतासकट कित्येक देशात स्त्रिया थेट रणभुमीवर नेणार्‍या पोस्टवर कार्यरत होताहेत. युद्धात त्या जर शत्रुच्या हाती लागल्या तर स्त्री म्हणुन वेगळीच विटंबना त्यांच्या नशिबी येईल जिचे व्रण आजन्म राहतील हे हा चित्रपट अधोरेखित करतो.

जेव्हा भारतात स्त्रियांना सैन्यात प्रवेश नव्हता तेव्हा सैन्यातील एक वरिष्ठ पदावरील अधिकारी म्हणाले होते की सैन्यात स्त्रियांना युद्ध करायला घेता येणार नाही कारण पुढे जाऊन त्याचे सोशल इश्यु होऊ शकतात. या वाक्याची आठवण चित्रपट पाहताना झाली.

सैन्यात एक स्त्री पुरुषांपेक्षा जास्त चांगली कॅडेट बनतेय याचा पुरुष इतका द्वेष करतात >>> एक वेबसिरीज होती जिओसिनेमा वर. नाव आठवत नाही. निम्रत कौर आहे नायिका.

एक वेबसिरीज होती जिओसिनेमा वर. नाव आठवत नाही. निम्रत कौर आहे नायिका.
>>> द टेस्ट केस. चांगली होती ती वेबसिरीज पण तिथे फक्त इंटर्नल इश्यूज दाखवले होते.

या वर्षी सीमेजवळ खऱ्या स्त्री सैनिक पाहिल्या तेव्हा त्यांचा अभिमान आणि काळजी एकाच वेळी वाटली होती.
त्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने केलेल्या प्रपोगंडामध्ये एक लेडी आय ए एफ पायलट ताब्यात आहे याचा गजर चालवला होता आणि सोमिवर त्यांच्या अजूनही येणाऱ्या कमेंट्स पाहिल्या तर काळजी वाटतेच.

साधनाच्या रेकोवरून धडक पाहिला व पूर्ण केला. आवडला.

अतिशय संयत हाताळणी आहे त्यामुळे जास्त आवडला. त्यातला जातीपातीचा भाग गृहित न धरताही कलाकृती म्हणून सुद्धा व्यवस्थित मांडणी असलेला वाटला. कितीही प्रक्षोभक आणि भडक करता आला असता पण मग इतका नेमका पोचला नसता असेही वाटले. संवेदनशील मनाची कथा आहे.

सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जगणाऱ्यांची व जग चांगले असू शकते आपण आपलं शिकून मोठे होऊ याविचारांचा थोडा भाबडा व प्रामाणिक नायक आणि नायिका आहेत. तृप्ती दिमरीला अगदी सटल मेकप आहे, कुणीही ग्लॅमरस दाखवलं नाही.

संवादही प्रवचनासारखे न वाटता योग्य अनुषंगाने आलेले वाटतात. आवेश नसूनही डोळ्यात पाणी येणाऱ्या घटना आहेत. माहितीपट पण जरा व्यावसायिक असं म्हटलं तरी चालेल. माझा आता कसल्याही समानतेच्या काल्पनिक नंदनवनावर किंवा "असं कुठं असतं का, मी तर कधी केलं नाही, पाहिलं नाही" - इत्यादी वर विश्वास नाही. People are generally mean and insecure, they can do anything for anything असं हल्ली वाटतं. त्यामुळे ह्या वर माझा सहज विश्वास बसला, अर्थात हाताळणी अतिरंजित नाही हे ही मोठं कारण आहे. अति केले की कथा न पोचता आपण प्रेक्षकांना दूर लोटतो हे दिग्दर्शकाला माहिती असावे. शेवट जरा अकस्मात वाटला पण अजून वेगळे काय घडायला हवे होते ते कळाले नाही.

कुणी कुणासोबत गुपचूप पळून गेले नाही आणि जीव घेणे सहज शक्य आणि फेअर वाटत असताना अगदी शेवटच्या क्षणी हिंसेला आवर घालणारा नायक पाहून प्रगल्भ अप्रोच वाटला. शांतचित्ताने वागण्यात जी ताकद आहे ती हिंसेत नाही. हिंसेने ह्या लूपमधून बाहेर पडता येत नाही. कुठेतरी सर्वांनीच याकडे आधी माणुसकी म्हणून पाहण्याची गरज आहे असे विचार आले. चांगले आणि नवीन विचार देणारा सिनेमा यशस्वीच म्हणायला हवा.

फक्त ठराविक जातीत जन्मल्यामुळे कसलेही कर्तृत्व नसताना आयुष्यभर कळतनकळत मिळालेल्या प्रिव्हिलेजसची जाणीव आल्यापासून प्रो - आरक्षण झाले आहे. यातील अनेक लेयर्स व पिढ्यानुपिढ्या शापित राहणं- तेही कुठल्यातरी भ्रामक अट्टाहासमुळे हे लक्षात यायला मोठं व्हावं लागलं पण आलं लक्षात. कुठल्या घरात, रंगात, देशात, गावात, लिंगात, जातीत, भाषेत, आर्थिक परिस्थितीत जन्म घेणं आपल्या हातातच नाही - ज्या गोष्टींवर आपला कंट्रोल नाही त्याचा अभिमान का करावा, श्रेय का घ्यावे- आणि न्यूनगंड तरी का बाळगावा?!

जातीच्या उतरंडी सोबत, स्त्री वेष घालून नृत्य करण्याचा व्यवसाय असणारा नायकाचा बाबा, आपल्यावरच्या अन्यायाची जाणीव आहे पण बाबांच्या अशा असण्याची लाजही वाटणारा नायक, हे स्विकारल्यानंतरच त्याला पुढचा लढा लढण्याचा आत्मविश्वास येतो हे एक उठून दिसणारे वेगळेपण. शिकल्याशिवाय आपण या दुष्टचक्रातून बाहेर पडणार नाही असे वाटणारी ठाम आईही आहे. आजन्म गरिबी- अन्याय सोसूनही हित कळणारी- विवेक असणारी धमक असलेली आई बघून जीव थंड झाला. अशा आईचा मुलगा कशाला बिघडेल!

कॅरेक्टर एस्टाब्लिशमेंट एकदम चांगली आहे. थोडा वेळ असलेली पात्रही स्वतःचा असा एक कंगोरा घेऊन येतात. स्त्री पुरुष भेद आणि कुठलीही स्त्री म्हणजे घरचा मान आणि मग तिने भाऊ - वडील यांच्या मानाला धक्का लागू नये असे वागत राहायचे, पूर्णपणे ताब्यात जायचं. भाऊ - वडील - काकांनी मात्र काहीही केले तरी मान अबाधित राहतो अशा पुरुषसत्ताक कल्पनाही अधोरेखित केल्या आहेत. पण जे आहे त्याला भडक न करता फक्त ठळक केलं आहे ते फार आवडलं. नक्की पाहून पाहा. शेवट साधा आणि सकारात्मक आहे, तोही खूप काही सिद्ध करायला जात नाही. सहज वाटतो. विचार बदलेपर्यंतचा लढा विचार बदलल्याने संपला इतका सहज आहे.

सर, प्राइम व्हिडियो. दिग्दर्शन रोहेना गेरा - अभिनेते तिलोत्तमा शोम , विवेक गोंबर. २०१८ साली बनलेला चित्रपट. भारतात २०२० मध्ये चित्रपटगृहांत दाखवला गेला होता. चित्रपट सुरू होतो तेव्हा रत्ना एका बसने मुंबईकडे येत असते. हाताता सामानाची बॅग. मुंबईतल्या गर्दीला सरावलेली आहे. इथे ती एका टॉवरमध्ये जाते. सेक्युरिटी विचारतो, तू इतक्यात आलीस. त्यावर ती म्हणते - फोन करून बोलावलं.
ती ज्यांच्याकडे हाउसमेड म्हणून काम करते तो अश्विन आणि त्याची लिव्ह इन गर्लफ्रेंड सबीना हे लग्न करायला गेलेले असतात.ते ऐनवेळी मोडतं आणि अश्विन परत येतो. आल्यावर काही दिवस तो हरवलेला वागत असतो. तेव्हा रत्ना त्याला स्वतःची स्टोरी सांगते. मी एकोणि साव्या वर्षी विधवा झाले. गावात विधवा होणं म्हणजे तुमचं आयुष्य संपतं. पण मी आज इथे येऊन सर्व्हंट म्हणून का होईना काम करते आहे. पैसे कमावते आहे. बस. तुम्हांला एवढंच सांगायचं होतं. रत्ना आपल्या बहिणीला शिकवत असते. रत्नाला स्वतःला फॅशन डिझायनर व्हायचं असतं.या दोघांची कथा पुढे फुलत जाते आणि - वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन - उसे इक खूबसूरत मोड देकर छोडना अच्छा - अशी संपते.
रत्नाने हाउसमेडची बॉडी लँग्वेज, अ‍ॅटिट्यूड अगदी व्यवस्थित पकडला आहे. बड्या घरांमध्ये त्यांचं जगणं अगदी तपशीलवार दाखवलं आहे. ती अगदी कृश पण काटक आहे. ब्लाइंड्स गुंडाळतानाही तिला ताकद लावायला लागते. घरात शिरल्याबरोबर चपला काढायच्या आणि हातात उचलून सर्व्हंट्स रूममध्ये नेऊन ठेवायच्या. मालक आला की उठून उभं राहायचं. बड्या घरातली कामं,त्यांचं जेवण हे सगळं तिने शिकून घेतलं आहे. फुलदाणीत ठेवायला फुलांचे देठ कापताना ती तिरके कापते. अश्विनच्या आईकडच्या पार्टीत रत्ना स्टार्टर घेऊन फिरत असते, दोघा तिघांच्या प्रत्येक घोळक्याशी काहे सेकंद उभं राहायचं. तोंडाने विचारायचं नाही. त्यांना वाटलं तर ते पीस घेणार. नको असला तर आणि घेतला तरी तिच्याकडे पाहतही नाहीत.

आपण विधवा आहोत , परक्या शहरात, परक्या माणसांत आहोत ही जाणीव सतत जागी असते. अश्विनसमोर जायच्या आधी पदर नीट करते.
अश्विन आणि त्याची आई हे फारच चांगले आहेत. रत्नाच्या शब्दांत भला माणूस. काम सांगताना रिक्वेस्टचा टोन. मग प्रत्येक वेळा - साधं पाणी दिल्यावरही थँक्यू. सगळ्याच मेडना अशी चांगली माणसं मिळतात असं नाही. हे रत्नाच्या मैत्रिणीच्या बाबत दाखवलं आहे.

मुंबईतलं जीवन हे सुद्धा या चित्रपटातलं एक पात्र. म्युनिसिपल मार्केटमधला मासळी आणि मटण बाजार, लोकल ट्रेन्स, बसेस, टॉवर , त्याच्या मागेच समुद्र, रत्नाच्या बहिणीचं लग्नानंतरचं चाळीतलं घर, तिथे टॉयलेट समोरच्या रांगा , गणपती विसर्जनाच्या मिरवणुका आणि त्यातले नाच, ढोल ताशे.
अश्विनच्या आईच्या भूमिकेत दिव्या सेठ आणि रत्नाची मैत्रीण असलेल्या मेडच्या भूमिकेत गीतांजली कुलकर्णी हे ओळखीचे चेहरे दिसले.

चित्रपटाबद्दल लिहायचं म्हणून अख्खी पटकथाच लिहून काढावी असं वाटण्याइतकी ती आवडली. आता पाहिलं तर या चित्रपटाच्या पटकथेला फिल्म फेअर पुरस्कार मिळाला आहे. तिलोत्तमा शोमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा.
नावंच ठेवायची तर रत्नाचे इंग्रजी शब्दांचे उच्चार आणि हिंदी आणि थोडं फार मराठी ग्रामीण महाराष्ट्रातून आलेल्या मुलीचे वाटत नाहीत. थोडे पॉलिश्ड वाटतात. किंवा तिनेच स्वतःला याही बाबतीत पॉलिश केलं असं म्हणू. तिला ब्रेव्ह या शब्दाचा अर्थ माहीत नसतो, पण तुम्हांला सूट होईल असं म्हणते.

यातली एक क्लिप मला इन्स्टाग्रामवर दिसली - रत्ना स्वतः शिवलेला शर्ट अश्विनला वाढदिवसाचं गिफ्ट म्हणून देते. आणि तो घालून तो चक्क ऑफिसला जातो. त्यामुळे इंटरेस्ट वाटला आणि नेहमीप्रमाणे वेटिंग लिस्टवर न टाकता रेंटचे पैसे भरून लगोलग पाहून टाकला.

मी बघितला होता तेंव्हा त्या सिनेमाचे नाव "Is Love Enough? Sir" होते. तो प्रश्न लहान अक्षरात होता आणि सर ठळक मोठ्या अक्षरात.

मलाही आवडला होता तो सिनेमा. तिलोत्तमा शोम त्यात खूप आवडली होती.

"Is Love Enough? Sir" >> +१. तिलोत्तमा शोम त्या मुळेच माहित झाली होती. सुरेख सिनेमा !

"Is Love Enough? Sir". >>>> खूप मस्त सिनेमा आहे. स्टोरी टेलिंग भारी आहे! मला त्या 'अश्विन'चं काम करणार्‍या अभिनेत्याचं काम ठिकठाकच वाटलं होतं पण तिलोत्तमा शोमने खूप सुंदर काम केलं आहे. नंतर कोटा फॅक्टरीमध्येही तिचं काम खूप आवडलं होतं. तुमचा रिव्ह्यूही आवडला.

सर माझ्याही फेव कॅटेगरीमधे! अगदी काही नसेल बघायला तर पुन्हा पुन्हा मी बघू शकते. तो तिला शिवण मशीन भेट देतो तो सीन फार गोड आहे!तिलोत्तमा चांगली अ‍ॅक्ट्रेस आहे. तिला अजून चांगले रोल मिळायला हवे. अ ति शयोक्ती वाटेल पण इरफान, कोंकणा यांच्या लाईनमधे नेक्स्ट म्हणून मी नक्कीच तिला बघू शकते.

वुमन इन केबिन १० - बघितला. अगदी बेंड ईट लाईक बेकहॅम पासून मी Keira Knightley ची फॅन आहे. आता वय दिसत असलं तरी काम १ नं. केलंय. समहाऊ उच्चभ्रू यॉट्/बोट्/लेकहाऊस वरच्या मर्डर मिस्ट्रीज एवढ्यात खूप पाहिल्या त्यामुळे अगदी वॉव फॅक्टर नाही पण तरी आवडली! लोकेशन्स अमेझिंग घेतले आहेत!

बेंड ईट लाईक बेकहॅम पासून मी Keira Knightley ची फॅन आहे >>> +१ मी पण. तिच्यासाठीच ब्लॅक डव्ज नावाची सीरीज पण पाहिली होती.
वुमन इन केबिन १० >> हो हा चांगला आहे . थोडे क्लीशे आहेत पण लांबण न लावता क्रिस्प केला अहे. त्यामुळे एन्गेज्ड राहतो आपण.

‘सर’ मलाही खूप आवडला होता.

कॅबिन १० लावला, पण एस्ट्रेन्ज्ड एक्स वगैरे फारच स्टीरिओटिपिकल वाटून बंद केला.

सर दहा मिनिटे बघून बंद केलेला. कारण तेव्हा संथ लयीतील बघायचा मूड नव्हता. चित्रपट केव्हाही त्या त्या मूडनुसार बघितले तरच मला मजा येते.
नंतर त्याबद्दल कुठे कुठे वाचले आणि समजले की खूप छान चित्रपट होता. पण एकदा थोडासा बघून सोडलेला चित्रपट पुन्हा चालू करायला एक मुहूर्त यावा लागतो तो अजून सापडला नाहीये. इथली चर्चा वाचून येत्या वीकेंडला येईल असे वाटते. तरी दिवाळी सुरू व्हायच्या आधी बघून घ्यायला हवे. अन्यथा पुन्हा मूड चेंज होईल Happy

सर मलाही खुप आवडला होता. नेहमीच्या "सुंदर" तर नाहीच पण "आकर्षक"/graceful व्याख्येतही रत्ना बसणार नाही. मात्र तो तर handsome. कॅमेरानं त्यांच्यातली chemistry केवळ त्या दोघांच्या अभिनयातून दाखवलीये. तिच्यातला कुठलाही अभिनिवेश नसलेला आत्मसन्मान आणि सहजसमर्पण आणि त्याचं फसव्या,वरवरच्या जगामुळे आलेल्या असुरक्षित मन, किती तरलपणे एकत्र येतं हे पडद्यावर पाहणं हा एक almost poetic अनुभव..

तिसरा लिहिलास तो “मर्डर मिस्ट्री“ च नाव होते. भाग १ विनोदी टाईमपास होता. >>> ही बघायला सुरुवात केलीय. अजून खून व्हायचाय. टाईमपास वाटतेयं
Straight face jokes आवडतायेत.

मी शोधुन लिहिते. >> ‘डेथ ऑन नाईल’ >>>>

येस. हाच. लोकेशन्स मस्त आहेत. हर्क्यूल पारो आवडीचा
आणि गॅल गॅडोट पण आवडते.

'परम सुंदरी' पाहिला. जाह्नवी कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा आणि संजय कपूर.

फारच साधारण आहे. फुटी कौडी सुद्धा न कमावलेला पण करोडो गमावलेला एक श्रीमंत बापाचा उनाड मुलगा. नव्या नव्या स्टार्ट अप बुडवून खुशालचेंडू सारखं हिरो बनून हिंडत असतो. मग कुणीतरी एक सोल मेट शोधायचं ॲप ह्याच्याकडे घेऊन येते. त्यात invest करायला अजून करोडो हवे असतात पण संजय बापू म्हणतात- तू ही ॲप खरोखरच चालते हे दाखवण्यासाठी स्वतःच्या सोल मेटनीला शोधून - पटवून दाखव, तेही एका महिन्यात. आता जगातील कुठल्याही कोपऱ्यात असणारे सोल मेट यांच्या डेटा बेस मधे कसे आले वगैरे विचारू नये म्हणून 'दिल तो पागल है' मधले 'कहीं ना कहीं कुणीतरी एक' आपल्यासाठी 'बनवलं' आहे इ सांगतात. आधीचे बेगडी लॉजिक नव्या नॉनसेन्ससाठी वापरलं आहे.

काही तरी फेस स्कॅन टाईप केले की त्याला केरळच्या छोट्या गावात राहणारी सुंदरी ही त्याची 'सोय' मेट आहे हे कळते व हा बॅग भरून मित्रासोबत तिच्या होम स्टे मधे जाऊन राहतो.

पुढे सुंदरी तिच्या नावासारखीच सुंदर आहे आणि अर्धं गाव तिच्यावर भाळलेले आहे व तिला 'जिंकणे' ही एक जीवघेणी स्पर्धा आहे हे कळते. मला तर काहीच तसं जाणवलं नाही, आपण यडं बघितल्यासारखं बघत राहायचं झालं.

मग तिला आपण आवडावे म्हणून तो आंतरगावीय स्पर्धा जिंकून देण्यासाठी तिच्या 'मंगेतर' सोबत सगळीकडे भाग घेतो. कारण सगळ्या गावाचं दिल जितल्याशिवाय सुंदरी आपली होणार नाही. म्हणजे दोघेही एकाच साईडने. नंतर वाटलं दिल जितायला एवढं बिल्ड अप केले आहे तर 'कल्लरीपयट्टम' खेळतात की काय तर चमचा लिंबू व थैला रेस यांचे फ्युजन निघाले. Happy शेवटी होती म्हणा बोटरेस तरीही.

काहीच नाही पिक्चर मधे, एक ते सोनूचे 'परदेसिया' गाणं सोडून. पण मी ऑलरेडी त्याचा ऐकून ऐकून अतिरेक केला होता. केरळ टुरिझम व्हिडिओ आहे मधे मधे लव्ह स्टोरी. मी बुंदी रायता करेपर्यंत हे प्रेमात पडले. त्यात विकतची बुंदी होती. मला काहीच कळेना, एवढं फाश्ट कसं झालं. दोघांनाही अभिनय येत नाही. सिद्धार्थ फारच लिमिटेड रेंज मधे अभिनय करू शकतो, कधी ओव्हर- कधी अंडर करतो. एकच तरी करत राहायचं, कुठे तरी निशाणा लागला असता. जाह्नवी अभिनयात सारा इतकी बेकार वाटली नाही एवढेच. दिसायला यावेळी मला आवडली. सगळं केरळी पद्धतीचे असल्याने व्हिजुअली अपीलिंग आहे सिनेमा. केरळ साठी पाहायचे तर पाहा, नाही तर यूट्यूब वर केरळाचे व्हिडिओ असतीलच.

वर नेहमीचा रोमान्सचा शिळा फार्म्युला एअरपोर्टवरून चेक इन करताना "अभि न्हाई तर कभी न्हाई" करत पळत परत भर लग्नात लग्न मोडायला येणं. इथे आपली अवस्था मुंबई एअरपोर्टवर चेक इन करेपर्यंत 'हाफहुफ' करणाऱ्या कुत्र्यासारखी होते, मध्यरात्रीची विचित्र वेळ गाठून विमानात सीटवर शाल पांघरलेल्या भिकाऱ्यासारखे मुटकुळे करून कोपरं धरून बसतो, "द्या काय शिळेपाके प्रेट्झल्स असतील तर" आविर्भावात पाकिट झेलतो. यांचं काही तरी वेगळंच चाललेलं असतं. Proud

Pages