या पूर्वीचे लेख :
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग १ :
https://www.maayboli.com/node/86819
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग २ :
https://www.maayboli.com/node/86841
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ३ :
https://www.maayboli.com/node/86863
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ४ :
https://www.maayboli.com/node/86883
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ५ :
https://www.maayboli.com/node/86909
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ६ :
https://www.maayboli.com/node/86938
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ७ :
https://www.maayboli.com/node/86979
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ८ :
https://www.maayboli.com/node/86987
चोकौडी ते अल्मोडा
एकूण अंतर : १०८ किमी
आता यात्रेचे २ च दिवस काय ते बाकी. मग आहे परत तेच ते रूटीन.
आज भरपूर गरम पाण्यानी आरामात आंघोळ केली. पहिली बॅच यात्रा करून सुखरूप चोकौडीला पोहोचली होती. पत्रकार यात्रीच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला उत्सुक होते.
मी सगळे आवरूनच बाहेर पडले. गुजराथी मैत्रिणींचा गरब्याचा प्लॅन बरेच दिवस बाकी होता. आज सगळयांनी गोल करून ठेका धरला. एकूण व्यवस्था, पूर्ण झालेली विश्रांती यामुळे प्रत्येकजण उत्साहात होता. पत्रकारांनीही या गरब्याचे शुटिंग केले बहुतेक. आता आम्ही सरावलो होतो. पत्रकारांना कशात रस असतो हे माहित असल्यामुळे तशी उत्तरे देत होतो. बोलता बोलत मी सहजच म्हणाले, 'हर एक सांस की किंमत वहा जाके पता चलती है". तीच हेडलाईन करून बातमी आली. मजा वाटली.
आज सकाळी तिथे असलेल्या मचाणावरूनही चोकौडीचे दर्शन घेतले : खाली आमची निवास स्थाने दिसतायत :
हा अजून एक :
एक अजून वेगळ्या अॅगलने :
संध्याकाळी आम्हाला सगळ्या मिडियामधे आलेल्या बातम्यांच्या लिंक शेअर केल्या गेल्या. त्याचा हा एक कोलाज :
आज पाताळभुवनेश्वरला जेवण करून अल्मोडाला पोहोचायचे होते.
आज जेवणाचा बेतही वेगळा होता. खास उत्तराखंडचे भट के भटके (म्हणजे उसळ टाईप भाजी), भांगेच्या बीजांची पुदिना घालून चटणी असा बेत होता. मी विचारले असता, "यात्री आलू खा के बोअर हो जाते है, उनको स्वादिष्ट और यहा का लोकल खाना देने के लिये ये सब बनाया है" असे उत्तर मिळाले. यात्रींचा असा विचार पदोपदी आपल्याला या यात्रेत जाणवतो. त्यांना जेवढी म्हणून सेवा करता येईल तेवढी ते करत असतात.
जेवणा आधी पाताळ भुवनेश्वरचे दर्शन घ्यायचे होते. लाईम स्टोनची ही गुहा आहे. पाण्यामुळे इथला खडक झिजून वेगवेगळे आकार निर्माण झाले आहेत व शंकराची पिंडही आहे. ही गुहा जमीनीपासून जवळ पास ९० फूट खोल आहे म्हणून पाताळ भुवनेश्वर. खाली जायला व यायला एकच पायरीवजा जिना आहे. बसून सरकत सरकतच खाली उतरायचे. परत येतानाही तसेच. खाली ऑक्सिजन कमी असतो त्यामुळे फार बोलायचे नाही. फोटो काढायलाही सक्त मनाई आहे.
मस्त बांधलेली रुंद वाट आपल्याला गुहे कडे घेऊन जाते.
पाताळभुवनेश्वर : माहिती :
प्रवेशद्वार :
खाली उतरण्यापेक्षा वर चढणे कठीण वाटले थोडे. कारण सतत डोके सांभाळावे लागते. परवा स्वर्गात होतो आज पाताळातही जाऊन आलो.
परत येताना हा एक सुंदर फोटो मिळाला :
जेवणे झाल्यावर न रेंगाळता प्रवासाला लागलो. रस्ता सुंदर होताच. मधे काही अगदी छोटी पिवळी फळे ऑटीजींना दिसली. काफलपेक्षाही लहान. मग ती चाखण्यासाठी गाडी थांबवणे आले. आमच्या गाईड बरोबर एक दोघांनी जाऊन ती फळे तोडून आणली. मस्त तुरट गोडसर होती. पुढे काफल खाणेही झाले.संध्याकाळी आम्ही अल्मोडाला पोहोचलो. बऱ्याच जणांना बाल मिठई खरेदी करायची होती. लगोलग आमचा मोर्चा खेमसिंह यांच्या दुकानाकडे वळला. पुण्यात जसे चितळे तसे हे अल्मोडाचे खेमसिंह अशी माहिती मिळाली. रोज ताजी मिठाई बनवतात व मिठाई लवकर संपतेही. हे ऐकून बाकरवडीची आठवण झालीच.
मिठाईचे दुकान :
मार्केट फार लांब नसल्याने चालतच निघालो. मिठाई घेऊन पुढे एक स्वेटरचे दुकान दिसले. आमच्या बरोबरच्या दक्षिणी काकांना त्यांच्या नातवंडांसाठी स्वेटर घ्यायचे होते. त्यांना खरेदी करायला मदत केली. मग शंतनूनेही एक स्वेटर घेतला. मला एक जॅकेट आवडले होते. पण माप लहान होते. नवरा बरोबर असल्याने, आपले माप काढायच्या आत त्याच्या स्वेटरवर विषय वळवला. मला अजून कार्डिगन्स बघायचे होते. पण ८ वाजले, दुकान बंद करायची वेळ झाली होती. ८.१५पर्यंत सगळीकडे सामसूम झाली. शंतनू, कामिनी अश्या काही जणांना मोमोज खायचे होते. कामिनी व बाकीचे आमची वाट पहात होते. मामीजी आणि चाचीजीपण आम्हाला येऊन मिळाल्या. मी नको नको म्हणत एक मोमो खाल्ला आणि चक्क मला आवडला. शेगाव कचोरी सारखे कसलेतरी चवदार सारण भरले होते. परत विश्रांती गृहावर जाऊन जेवायचे होते म्हणून फार न खाता निघालो. उशीर व्हायला नको म्हणून शेअर रिक्षा केली. पण ६ जणच मावत होते. शेवटी उरलेल्यांचे सामान बरोबर घेऊन आम्ही रिक्षेने निघालो. शंतनू, काका आणि अजून कोणीतरी असे चालत आले.
उद्या कांचीधाम करून काठगोदामला आम्हाला सोडणार होते. आज केलेली खरेदी एकमेकांना दाखवून जेवणे उरकली. उद्याच शेवटचा दिवस म्हणून थोडी हुरहूर वाटत होती. सगळ्यांबरोबर वेळ मस्त गेला. थोडे गुंजीतील मतभेद वगळता यात्रा सुखरुप पार पडली होती. आजचा दिवस इथेच संपला.
क्रमश:
पुढील भाग :
https://www.maayboli.com/node/87015
छानच!
छानच!
छान
छान
आदीकैलासचे असे लांबूनच दर्शन होते का?
मला वाटले जसे।कैलास पर्वताच्या जवळ जातात तसा ट्रेक आहे.
आदीकैलासचे असे लांबूनच दर्शन
आदीकैलासचे असे लांबूनच दर्शन होते का?
मला वाटले जसे।कैलास पर्वताच्या जवळ जातात तसा ट्रेक आहे. >> कैलास पर्वताच्या अगदी पायथ्याशी जाता येत नाहीच. (जाणकारांनी प्रकाश टाकावा) तसेच काहीसे इथेही आहे. जर गौरी कुंडला जाऊ शकलात तर तिथे मात्र पायथा दिसतो. पण तरी थोडा लांब आहे. आम्हाला सक्त सूचना होत्या की विरळ हवेत फार थांबायचे नाही. त्यामुळे गौरीकुंड पाहून पायथ्याचे दर्शन लांबूनच घेऊन लोकं निघाली. बाकी कुणी तिथवर जात असतील तर बघायला हवे.
वावे, झकासराव, प्रतिसादांबद्दल आभारी आहे