आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास

Submitted by निकु on 9 June, 2025 - 10:49

ओम नम: शिवाय !

सर्व प्रथम मला नमूद केले पाहिजे की या यात्रेचे मूळ / बीज हे येथील अनया, पराग आणि केदारच्या कैलास मानस सरोवर यात्रेबाबत येथे केलेल्या लिखाणात आहे. या यात्रेची प्रेरणा मला यांनी केलेल्या लिखाणातूनच मिळाली. तेंव्हा सर्वप्रथम त्यांचे अनेक धन्यवाद!

आदिकैलास यात्रा करायची असे गेले काही वर्षे मनात होते. २०१४ला जेंव्हा प्रथम कैलास मानसरोवर यात्रे विषयी वाचले तेंव्हापासून कैलास मानसरोवर यात्रा करायची मनात आहे. नंतर अशीच माहीती मिळवत असताना, KMVN आदि कैलास यात्रा पण नेते असे कळाले. दरम्यान कोव्हिडमुळे सगळेच थांबले होते.

मला ही यात्रा मे महिन्यात करायची होती. पण कधी उशीरा चेक केल्यामुळे तर कधी अपडेटस् उशीरा आल्याने यात्रा चुकत होती.

यंदा मात्र मी अगदी फेब्रुवारीपासूनच KMVN साईटवर लक्ष ठेवून होते. पण KMVN काही यात्रा सुरु करेना. अश्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात यात्रा सुरु झाल्याचे वाचले आणि लगेच तयारी सुरु केली.

मध्यंतरी वाशीला उत्तराखंड भवन आहे तिथे भेट देऊन झाली. तिथे KMVN चे ऑफिस आहे पण ज्या मॅडम बघत होत्या त्या आता इथे काम करत नाहीत असे कळाले. तिथेच पुण्याच्या नेगीजींचा नंबर मिळाला. सध्या ते पुणे आणि मुंबई अशी दोन्ही ऑफिसेस संभाळतात.

आता KMVN विषयी थोडे: लोकांनी कुणाकडून गेलात असे विचारल्यावर मी "के एम व्ही एन" सांगत असे. हे नाव ऐकल्यावर लोकंचे क्लू लेस चेहरे आणि रिस्पॉन्स पाहिल्यावर मला खरंतर आश्चर्य वाटायचे. पण अशा सगळ्यांसाठी थोडक्यात माहिती देत आहे.

KMVN - Kumaon Mandal Vikas Nigam Limited ही महाराष्ट्राच्या MTDC सरखी उत्तराखंड सरकारची संस्था आहे. कुमाऊ मधील बरेच ट्रेक्स, यात्रा ही संस्था दरवर्षी नेत असते. उत्तराखंडाचे दोन भाग आहेत. एक गढवाल आणि दुसरा कुमाऊ. आपली चारधाम यात्रा गढवाल मधे येते तर कैलास मानसरोवर, आदि कैलास अश्या यात्रा कुमाऊ भागात येतात. गढवाल भागातील यात्रा व ट्रेक GMVN तर्फे चालवले जातात तर कुमाऊ मधील KMVN तर्फे. KMVN रेस्ट हाऊसेस ची लोकेशन्स खुप सुंदर आहेत आणि पर्यटकांमधे प्रसिद्धही आहेत जसे भीमताल, नैनीताल, सातताल हे लेक व्ह्यू साठी तर चोकौडी पक्षी निरीक्षणासाठी, मुन्सियारी ट्रेक्ससाठी. सगळ्या पर्यटन स्थळी त्यांची रेस्ट हाऊसेस आहेत आणि उत्तम स्थितीत आहेत. तुम्हाला अगदी रेस्ट हाऊस मधे बसून लोकेशन दिसत रहाते. अगदी ओम पर्वत, आदि कैलासचे दर्शनही तुम्ही रेस्ट हाऊसच्या आवारात बसून घेऊ शकता. अर्थात उंचीवरची ठिकाणे निसेन हटस् (याला पर्यायी मराठी शब्द कुणाला माहिती असेल तर सुचवा) स्वरुपाची आहेत. पण आता पक्के बांधकामही होऊ लागले आहे. यात्रेकरूंची विषेश काळजी सगळीकडे घेतली जाते.

अश्या या KMVN बद्दल अनेक वर्षे ऐकून होते. अखेरीस त्यांच्या बरोबर यात्रेला जायचा योग आला.

यात्रा सुरु झाली आहे कळाल्यावर पहिला नेगीजींना फोन केला. कागदपत्रे, आणि इतर बाबींची माहिती घेतली. परंतू रेल्वे आरक्षण आधीच सुरु झाले असल्याने त्यांनी ते करण्यास सांगितले. यात्रा काठगोदाम ते काठगोदाम अशी होती. मुंबई ते काठगोदाम आपले आपण पोहोचायचे होते.

वेगवेगळ्या वेळा, मग मुक्काम करावा की नाही, केला तर तो दिल्लीत करावा की काठगोदामला. त्यात रेल्वेची तिकीटे कधी उपलब्ध आहेत, वेटिंगची कुठली तिकीटे कन्फर्म होण्याची शक्यता जास्त. विमानाने जायचे की नाही असा बराच खल होत अखेर आम्ही काठगोदामला आदल्या दिवशी पोहोचायचा निर्णय घेतला. मुंबई ते दिल्ली आणि परतीच्या प्रवासाची तिकीटे वेंटिंगवरच होती. परंतू दिल्ली ते काठगोदाम व परतीची तिकीटस् मात्र कन्फर्म मिळाली.

नशीबाने वेटिंगची तिकीटेपण लवकर कन्फर्म झाली. मला आता आदि कैलास यात्रेचे वेध लागले. ऑफिसमधे धोशा लावून सुट्टी पक्की केली. फक्त दिवस मोजणे चालू होते. पुर्वीचे वाचलेले लेख त्यांचे अनुभव यांचे स्मरणरंजन चालू होते. आपणही त्या वाटेवरून जाणार आहोत याचा आनंद होत होता.

पण शेवटी यात्राच होती ती.योग यावा लागतो ना! नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न ! तशी विघ्न आली नाही तरी परिस्थिती मात्र निर्माण झाली.
पहेलगामची धक्कादायक बातमी आली. मन विषण्ण होऊन गेले. सरकार काय करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असताना मॉक ड्रीलची बातमी आली. एकीकडे सरकारने केलेल्या कारवाईबाबत बरे वाटत असताना आपण मात्र काय करावे?अस्थिर परिस्थिती असताना एवढ्या लांबचा आणि बॉर्डरजवळचा प्रवास करावा की नाही अशी आंदोलने सुरु झाली. एक मन म्हणे उत्तराखंड तर सुरक्षित आहे ना, ती नेपाळ आणि तिबेटची बॉर्डर आहे. की लगेच दुसरे म्हणे पण दिल्लीत किंवा प्रवासात कुठे अडकलो तर. कुणी म्हणे १० तारखेला इंडिगोने बरीच उड्डाणे रद्द केलीत तर कुणी म्हणे दिल्लीवर क्षेपणास्त्राचा हल्ला करण्याचा प्रयत्न झाला.
काय करावे ते सुचेना.. सतत तळ्यात मळ्यात होऊ लागले. हे सगळे माझेच चालू होते. नवऱ्याचा मात्र ठाम निश्चय झालेला की काहीही झाले तरी जायचेच. म्हणतात ना बायकांचा जीव जरा जास्तच संसारात गुंतलेला तसा माझा ऑफीसमधे. कुठे अडकलो तर ऑफीसचे काम कसे करणार, सुट्टी फारशी शिल्लक नव्हती. विनाकारण कुठे अडकल्यामुळे रजा टाकावी लागेल हे काही पटत नव्हते. यात्रेचे बुकिंग झाल्यावर माझ्या मनात फुललेल्या गुलाबाच्या जाऊ की नको करत एकेक पाकळ्य झडत होत्या.

आमचे नशीब बलवत्तर होते. ऑपरेशन सिंदूरला तात्पुरती का होईना, स्थगिती मिळाली. मनातील सगळ्या शंकांचे सावट दूर झाले. आता यात्रा निर्धोक होणार असा विश्वास वाटू लागला.
क्रमश:

पुढचा भाग :
https://www.maayboli.com/node/86841

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ॐ नमः शिवाय

आदि कैलास!! सगळं वाचणार आहे. सुरवात छान झाली आहे. मला तो सगळा भाग, यात्रेचे हायलाईट्स, ॐ पर्वत सगळं डोळ्यासमोर आलं. सविस्तर लिहा. तुम्ही आदि कैलासचं दर्शन घेऊन आलात, म्हणून तुम्हाला नमस्कार.
माझ्या लिखाणाचा उल्लेख पहिल्याच परिच्छेदात वाचून आनंद झाला. माझे लेख वाचून आत्तापर्यंत ४-५ जण कैलास यात्रेला जाऊन आले. त्याचं फार कौतुक वाटतं. आदि कैलासला गेलेल्या तुम्ही पहिल्याच बहुतेक.
हर्पेन, आपण जायचंय ना? लक्षात असू दे.

KMVN चे नेगी खरचच खूप उत्तम service देतात. सरकारी ऑफिस मधला उत्तम अनुभव. पुण्यात j m रोड वर मथुराच्या मागे त्यांचे ऑफिस आहे.
पुढील भागांच्या प्रतीक्षेत.

वाचणार..... मुन्सियारीहून परतीच्या प्रवासात काठगोदामला थांबलो होतो. त्यादिवशी एक गृप यात्रा करून आला होता व दुसऱ्या दिवशी एक गृप निघाला होता. हारतुरे घालून त्यांना निरोप देत होते व आदल्या दिवशी परतलेल्या गृपशी बोलले होते सत्तर वर्षांच्या बायका करून आलेल्या पाह्यल्यावर असं वाटलं ह्या गृप बरोबर चाललं जावं.... यात्रा आहे योग यावा लागतो कदाचित हर्पेन, अनयाबरोबरचा असेल Happy
आम्ही मुन्सियारी ट्रीप KMVN तर्फेच केली होती. पुण्यातल्या ऑफिस मधूनच बुकिंग केलं होतं छान अनुभव होता.

व्वा, सुंदर सुरुवात.
अनया, पराग आणि केदारच्या लेखमाला वाचल्याशिवाय कैलास मानस सरोवर यात्रा पूर्णच होऊ शकत नाही.
माझी सुद्धा फार इच्छा आहे जायची
पुढील भागाच्या प्रतिक्षेत
ॐ नमः शिवाय

मस्त.. पुढचे भाग येऊद्या भरभर.

माझी मानससरोवराची ईच्छापुर्ती होणे शक्य नाही पण आदीकैलास करायचा आहे. कुमाऊ निगमच्या ह्या यात्रेला तरी जाता येईल ही आशा आहे. त्यामुळेच कोणी जाऊन आलेय हे वाचुन बरे वाटले.

वा ! इतक्या उत्स्फूर्त प्रतिसादांबद्दल प्रथम धन्यवाद ! धन्यवाद अनया, पुणेकर, पराग, एस आरडी, मंजूताई, सामो, ऋतूराज, अनिंद्य आणि साधना!
पराग आणि अनया - मला नमस्कार नको हो! तुम्ही चालत जाऊन आलात, आता अगदी लिपूलेख पास पर्यंत रस्ते झाले आहेत. मी हा नमस्कार शिवशंभूना अर्पण करते.
अनया, पराग आणि केदारच्या लेखमाला वाचल्याशिवाय कैलास मानस सरोवर यात्रा पूर्णच होऊ शकत नाही. >> +१११
पण आदीकैलास करायचा आहे > नक्कीच जाऊ शकता साधना ! आता ट्रेकिंग किरकोळ आणि ऑप्शनल आहे.

आहा!

आदिकैलास यात्रा
वाचतोय
पटापट पुढचे भाग येउदेत

अनया आणि harpen केव्हा प्लान आहे?
मी ही येईन शेपूट बनून

छान सुरुवात! पुभाप्र.
निसेन हट हे नाव निसेन नावाच्या व्यक्तीवरून पडलेलं आहे (ज्याने या प्रकारचे तंबू/घरं तयार करण्याचे तंत्र शोधून काढले.) पुण्यात पानशेतच्या पूरग्रस्तांसाठी या प्रकारची घरं तयार केली होती.

चांगली सुरुवात.

झकासराव, मला शेपटीचा गोंडा व्हायला आवडेल..

असं खरंच झालं, की मायबोलीवरचे ८-१० लोकं यात्रेला बरोबर गेले,‌तर काय मजा येईल! दोन-तीन तास गटगला भेटतो, तर एवढ्या गप्पा होतात. तिथे तर विचारायलाच नको.

आता अगदी लिपूलेख पास पर्यंत रस्ते झाले आहेत >>>> काय सांगत ?? तो परिसर किती सुंदर आहे! आता रस्त्यांमुळे वाट लागेल. आपल्या सैन्याच्या दृष्टीने तिथे रस्ते असणं चांगलच आहे पण तिथे मर्यादित वहातूक ठेवली पाहिजे.

आदीकैलास यात्रेमध्ये माझं नाव पण धरा कृपया.. तसाही आम्हांला ओमपर्वत पूर्ण दिसला नव्हता!

बादवे परवा लिहायचं राहिलं. माझ्या लेखांचा उल्लेख केल्याबद्दल धन्यवाद. Happy

मला आपलं म्हणा..>>>> मलाही.
खरं तर इच्छा कैलास मानसची आहे पण तत्पूर्वी दमसास चेक करण्यासाठी ही यात्रा उपयोगी ठरावी.

ॐ नमः शिवाय|
छान सुरुवात.
मुंबई ते काठगोदाम किती वेळ लागला वगैरे सविस्तर लिहा सगळं.

अनया आपण जाऊयातच. इfunction at() { [native code] }अरही इतके जण तयार आहेत तर आपली एक स्पेशल बॅचच काढू.

सर्वांचे आभार! इतक्या लोकांना उत्सुकता आहे हे वाचून छान वाटले! लिखाण चालू आहे मंडळी.

वा! मायबोलीकरांचे आदिकैलास गटग.. लिहायलाच किती छान वाटतेय! भन्नाट होईल यात्रा मग!

वावे >> हो त्यामुळेच मराठी पर्यायी शब्द सुचला नाही. तसेच बरेच इंग्रजी शब्द आले आहेत पण प्रयत्न करतेय न वापरण्याचा.

काय सांगत ?? तो परिसर किती सुंदर आहे! आता रस्त्यांमुळे वाट लागेल. आपल्या सैन्याच्या दृष्टीने तिथे रस्ते असणं चांगलच आहे पण तिथे मर्यादित वहातूक ठेवली पाहिजे. >> खरय पराग! रस्ते तर खूपच चांगल्या दर्जाचे झालेत. काही ठिकाणी निसर्गाचा र्‍हास लक्षात येण्याजोगा आहे. पण आम्ही पूर्वीचे सौंदर्य न पाहिल्याने हाही निसर्ग खूप छानच वाटत होता. अगदी लिपूलेख पर्यंत गाडीनेच प्रवास आहे आता. चालणे आजिबात नाही.

खरं तर इच्छा कैलास मानसची आहे पण तत्पूर्वी दमसास चेक करण्यासाठी ही यात्रा उपयोगी ठरावी. >> चालणे नाहीये पण विरळ हवेचे वातावरण कसे काय झेपते ते नक्कीच पाहू शकतो. अर्थात भारताकडून आणि चीन कडून ही चालणे नसल्याने कैलास मानसरोवर यात्रा जरा सुकर होईल असे वाटते. यंदा कुणी जाणार असेल तर माहिती घ्यायला उत्सुक आहे.
मुंबई ते काठगोदाम किती वेळ लागला वगैरे सविस्तर लिहा सगळं. >> आम्हाला खूपच वेळ लागला हर्पेन कारण रेल्वे आरक्षण उशीरा केले. आमचा जवळ जवळ २६ तासाचा प्रवास फक्त दिल्ली मुंबईचा होता. पुढे काठगोदाम ६ तासाचा. पण तरीही दिल्लीत एक थांबा लागतोच. दिल्ली काठगोदाम फक्त २/३ रेल्वे आहेत. त्यापैकी शताब्दीचे तिकीट मिळते सहज. आणि विमानाचा पर्याय आहेच वेळ वाचवायला. वेळे आधी प्लॅनिंग करणे गरजेचे आहे रेल्वेने जाणार असाल तर.

दिल्ली काठगोदाम फक्त २/३ रेल्वे आहेत. त्यापैकी शताब्दीचे तिकीट मिळते सहज. आणि विमानाचा पर्याय आहेच वेळ वाचवायला. वेळे आधी प्लॅनिंग करणे गरजेचे आहे रेल्वेने जाणार असाल तर. >>>

धन्यवाद.

आवडले. जायचे आहेच.

अनया आपण जाऊयातच. इfunction at() { [native code] }अरही इतके जण तयार आहेत तर आपली एक स्पेशल बॅचच काढू. <<<>>>>> मलाही धरा त्यात.