या पूर्वीचे लेख :
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग १ :
https://www.maayboli.com/node/86819
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग २ :
https://www.maayboli.com/node/86841
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ३ :
https://www.maayboli.com/node/86863
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ४ :
https://www.maayboli.com/node/86883
धारचुला ते गुंजी
एकूण अंतर : 71 kms
आज पासून विरळ हवेकडे प्रवास होता. आता १२ जणांच्या टेम्पो ट्रॅव्हलरला परवानगी नाही तर जीप मधून प्रवास करावा लागतो. तेही एका जीपमधे फक्त ४जण आणि त्यांचे सामान. आम्ही नाश्ता करून बाहेर पडे पर्यंत गाड्या दारात हजर होत्या. आधी जोडीदार (पति-पत्नी), मग स्त्रिया नंतर उरलेली पुरुष मंडळी अशी व्यवस्था झाली.आमच्या गाडीत आम्ही दोघे, चाचा- चाची( हे येथील स्थानिक कुटुंब होते) व पदमजी आमचे गाईड असे बसलो.
थांबा, थोडी ग्रुपची ओळख करून देते.
आमच्या ग्रुप मधे ३ स्त्रिया जेष्ठ नागरिक होत्या. त्यापैकी एकजण आपल्या पतीराज व भाच्या बरोबर आलेल्या. नैनीताल जवळच रहाणारे कुटुंबीय. या भाच्यामुळे, त्यांच्या मामा, मामीला आम्हीपण तेच म्हणू लागलो व भाच्याला भांजेजी. त्यामुळे दुसरी ज्येष्ठ नागरिक जोडी आपसूकच चाचाजी आणि चाचीजी झाल्या. लोकल पैकीच एक स्टेट बॅंकेच्या अधिकारी पदावरून निवृत्त झाले होते, ते आमचे प्रधानजी झाले. अजून स्वराजजी, आपल्या शहिद मुलाच्या आठवणीत ही यात्रा करत होत्या. नियमीत गिर्यारोहक असल्याने त्यांचा वेषही तसाच होता. त्यांना आम्ही ऑटी म्हणत असू. या व्यतिरिक्त मुंबईहून ३ गुजराथी मैत्रिणी आलेल्या. त्या आमच्या समवयस्क असल्याने आम्ही एकमेकांना नावानेच संबोधत असू. बाकी उरले केरळी काका व ७ तमिळनाडूहून आलेले दक्षिणी काका आणि बंधू. माझे नावे लक्षात न रहाणे हे स्किल आहे, त्यामुळे अगदी सगळ्यांची नावे लक्षात नाहीत.
तर आमच्या गाडीत पदमजी, आम्ही दोघे, चाचा-चाची बसले. मागे मामा-मामी, भांजेजी व प्रधानजी. तिसऱ्या गाडीत गुजराथी मैत्रिणींबरोबर ऑटी बसल्या. शेवटच्या २ गाड्या दक्षिणी मित्रांसाठी राहिल्या. आमच्या बरोबर सामानही चढले. गरम कपड्या व्यतिरिक्त जास्तीचे सामान धारचुलाला ठेवायची सोय होती. त्याप्रमाणे ज्यांच्या २/२ बॅगा होत्या, त्यातली एक बॅग जे सामान वर लागणार नाही अशी, इथेच ठेवून, आम्ही निघालो होतो. आज कसे सगळे वेळेवर चालले होते.
सगळे काही नीट चालू आहे असे वाटत असतानाच, आपापल्या गाडीतून लोकं उतरु लागले.गाड्या निघण्याची चिन्हे काही दिसेनात. पदमजी सांगायला आले की आमचे दक्षिणी मित्र नाराज आहेत, निघायला तयार नाहीत. कारण काय तर त्यांना गाडी आवडली नाही. आमची इनोव्हासारखी गाडी होती तर इतरांच्या जीप होत्या. पण यांच्या जीपमधे मागचा भाग ताडपत्री लावून सामानवाहू टेंपोसारखा बनवला होता. त्यात गॅस सिलिंडर्स यांच्या सामानाबरोबर असणार होते. अजूनही काही सामान के एम व्ही एन चे यांच्या बरोबर असणार होते. माल वाहतूक गाड्या दिल्या म्हणून ते लोक नाराज होते. पुढचा जीपचा बसायचा भाग खरतर इतर जीप सारखाच चांगला होता. पण मागची बाजू त्यांना आवडली नव्हती. इतरांसारखीच जीप आम्हाला का नाही आणि सामान न्यायचे होते तर त्याची पूर्व कल्पना तरी द्यायला हवी होती असे त्यांचे म्हणणे. आमचे पदमजी आचारे का बिचारे झाले. लवकर निघणे गरजेचे होते नंतर २ पर्यंत रस्ता बंद असणार होता कामासाठी. शेवटी इतर २ गाड्यांना निघायला सांगितले. बुधीला सगळे जमले कीच पुढे जायचे असे ठरले. आमची गाडी पदमजींसाठी थांबली.
नवीन गाड्यांसाठी प्रयत्न सुरु होते. पण सिझन असल्याने सगळ्या स्थानिक गाड्या बाहेर गेलेल्या. या लोकांना आम्ही म्हटले आमची गाडी घ्या. आम्ही तुमच्या गाडीत बसतो. पण परत वर गेल्यावर ह्याच गाड्या आपल्याला ४ दिवस वापऱाव्या लागतील असे त्यांना वाटत होते. आळीपाळीने सगळे जण वापरु ह्या गाड्या असे म्हटले तरी त्यांना पटत नव्हते. सगळ्यांनी पैसे भरले आहेत मग या मालवाहतुकीच्या गाड्यांबरोबर कुणीही का ॲडजस्ट करायचे असा त्यांचा मुद्दा होता. त्यांचे म्हणणे पटत असले तरी दुसरी गाडी मिळत नव्हती. वेळ असाच चालला होता.वाटेत मालपा, छियालेख ह्या जागा उशीर झाला तर दिसणार नव्हत्या. यांना नवीन गाड्या मिळायला २ वाजतील असे सांगण्यात आले. शेवटी पदमजींबरोबर बोलून त्यांच्या ऐवेजी केरळी काकांना घेऊन आम्हीही निघालो. १०.३० वाजून गेलेले तोवर पण नशीबाने रस्ता चालू मिळाला.
गाडी अर्ध्या रस्त्यात आल्यावर ड्रायव्हरने विचारले, "इनर लाईन परमिटचे प्रिंट आणले आहे ना?" थोड्याच वेळापूर्वीच; "झाले आता सुरळीत!" म्हणून सुटकेचा श्वास सोडला होता. ड्रायव्हरने परत अडकवला. काल रात्रीच आम्हाला मेसेज आलेला. आम्ही दोघांनी कालच डाऊनलोड करुन ठेवले होते परमिट. पण हा म्हणे प्रिंट पाहिजे. त्याला म्हटले बुधी पर्यत तर लागत नाही ना? तिथ पर्यंत चल मग पाहू. आम्हा कुणालाच परमिटच्या प्रती दिल्या नव्हत्या त्यामुळे जे होईल ते सगळ्यांचे होईल असे सांगितले त्याला. मागे चाचा-चाचींची चुळबूळ सुरु झाली. त्यांनी काही मेसेज पाहिला नव्हता. मग प्रवासातच त्यांचे मोबाईल घेऊन इंटरनेट आणि रेंज यांच्याशी झटापटी सुरु झाल्या. शेवटी एकदाचे त्यांचे काम झाले.
आमचा ड्रायव्हर पोरगेलाच होता २६/२७ वर्षाचा. गुड्डू त्याचे नाव. पण गाडी सफाईने चालवत होता. लहान रस्ते, वेडी वाकडी वळणे सगळे सांभाळत होता. फक्त सतत असमाधानी. आता तुमच्याकडे परमिट नाहीतर कसे जाणार? बुधीला सगळे येईस्तोवर थांबायचेच कशाला? अशी सारखी काहीतरी तक्रार चालू होती.
रस्त्यावरून जाताना समोरून गाडी आली की लांबूनच पहायचे व गाडी बाजूला घ्यायची. ह्या लोकांना जेंव्हा गाडी जाईल असे वाटायचे तेंव्हाही अगदी कट टू कट दोन्ही गाड्या बसायच्या. अंदाज जरा जरी चुकला की आहेच खाली वाहणारी काली नदी आपल्याला पोटात घ्यायला. पण ह्यांना बरोबर माहित असते. त्यामुळे असे काही होत नाही. जिथे रिस्की आहे, तिथे ही लोकं सद्धा गाडी दामटत नाहीत. पण आमच्या चाचीजींना काही चालकावर भरवसा दिसत नव्हता. त्यांचे आपले प्रत्येक वळणाला अरी.. आई गं असले उद्गारवाचक स्वसंवाद चाललेला. नाही म्हटले तरी ती जबरदस्त वळणे बघून भीती सगळ्यानाच थोडी थोडी वाटत होती. पण निसर्ग मन आकर्षून घेत होता. त्यांना आड वळणाने मग स्पष्टच बोललो तेंव्हा बाई शांत झाल्या.
मधे एका ठिकाणी रस्त्याचे काम चाललेले. तिथे छोटासा थांबा घेत आम्ही बुधीला पोहोचलो. फार उशीर झाला नव्हता. स्त्रिया व पुरुषांना विश्रांती साठी निसेन हटस उघडल्या होत्या. आम्ही जरावेळ बाहेरच टंगळ मंगळ केली. परमिटच्या प्रती कुणालाच मिळालेल्या नव्हत्या. पण मेसेजेस आलेले होते. त्यावरून ज्यांच्या मोबाईलला इंटरनेट आहे त्यांची मदत घेऊन परमिट डाऊनलोड करण्यात आले. यात आमच्या मामीजींनी त्यांचा मोबाईलच आणला नव्हता. सकाळी निघायच्या गडबडीत घरीच विसरला होता. त्यामुळे त्यांच्या परमिटचे काय असा प्रश्ण उभा राहिला. शेवटी आमचे गाईड पदमजी येतील तेंव्हा बघू म्हणून तो विषय तिथेच थांबला.
बुधीला आज माल्टाच्या ज्यूसने स्वागत झाले
कर्मचारीही कामात एकदम वाकबगार चुणचुणीत होते
जेवणाला वेळ होता तोवर हे छोटेसे गाव किती लांब आहे हे पहायचे ठरले. आम्ही दोघे मस्त रमत गमत छियालेकची चढण सुरु होते तिथवर जाऊन आलो. पूर्वी येथूनच घोडे केले जात म्हणे. आता ३६ वळणांचा सर्पाकार रस्ता डोंगर चढत होता.परत मागे आलो व जेथून आलो त्या दिशेने थोडे चाललो. थोड्याच अंतरावर एक झरा होता. थेट रस्त्यावरच येत होता. पूर्वी पाऊलवाट असताना याच्या खालूनच चालत लोक येत अशी ऑटींनी माहीती पुरवली. त्या पूर्वी ३वेळा चालत आलेल्या होत्या. बुधी कॅम्पमधूनही बर्फाच्छादित शिखरे दिसत होती. बर्फाचे हे पहिले दर्शन.
बुधीपासून आता होमस्टे सुरु झालेत. अश्याच एका होम स्टे बाहेर काढलेला मालकाचा फोटो :
हा मुलगा पहा किती गोड आहे
इथेच बाजूला कुक्कुटपालन जोरात सुरु होते.
बुधी कॅम्पमधून दिसणारे नेपाळचे डोंगर
यथावकाश बाजूच्या गावातून गाड्या कश्याबश्या मिळवून आमचे गाईड व दक्षिणी मित्रही आले. तोवर आमचे जेवणे होऊन वामकुक्षी घेणे चालू होते. त्यांना फार उशीर झाला नाही हे बघून् सगळ्यांना हायसे वाटले. पटापट जेवणे उरकून आम्ही गुंजीची वाट धरली.
आता छियालेकची झोकदार ३६वळणे घेत गाडी तो डोंगर चढणार होती. रस्त्यात २ चेकपोस्टस् होती. एक छियालेक मग गरब्य्यांग. निघतानाच पदमजींनी सगळ्या परमिटच्या प्रती ड्रायव्हर्सकडे दिल्या होत्या. त्यामुळे निवांत प्रवास चालू होता. छियालेक म्हणजे फूलों की घाटी म्हणून मला जास्त उत्सुकता होती. पण रस्त्याच्या कामामुळे इथली फुले नाहीशी झाली असावीत. तरीही उरलेला निसर्गही सुंदरच होता. निसर्गाचा ऱ्हास झाला आहे पण आपल्या जवानांसाठी आता चांगला रस्ता बनला ही एक जमेची बाजू आहे. २०१६पासून अथक परिश्रम करून हा रस्ता बनवतायत. अजूनही कुठे कुठे काम चालूच आहे.
छियालेकलाही मिलिटरी दिसली व छोटेसे मंदिरही आहे. आम्ही गाडीतून उतरून थोडे आजुबाजूला फिरलो. पुढे गरब्यांगला एक कुरण लागले. भरपूर मेंढ्या रस्त्याच्या बाजूने चरत होत्या. आम्ही गाड्या थांबवल्यावर में में करत वर डोंगरावर निघून गेल्या. तिथे आम्ही काही काळ थांबलो व पुढे निघालो. समोरच्या बाजूला बसण्यासाठी बाकांचीही सोय इथे होती. निसर्ग सुंदरच होता. अगदी सिनेमातील दृष्य पहावे असा.
मेंढरे
कोण फोटो काढतय आमचा
बाजूला असलेली शिंगरे (शिंगरुचे अनेकवचन)
हाच तो बाक, निवांत इथे येऊन बसावे असे वाटावे इतके छान वातावरण आणि आजूबाजूचे दृश्य होते
निसर्गाची विविध रुपे पहात गाडीने एक वळण घेतले व गाडी थांबली. तो पहा गुंजी कॅम्प.आम्हाला वाटले चला आलो. तर नाही, तिथे पोहोचायला वळणा वळणाचा रस्ता कापून आम्ही जवळपास १५ मिनिटांनी कॅम्पवर पोहोचलो. हो, आता टूरिस्ट रेस्ट हाऊस नाही बरं. बुधीपासून पुढे सगळे कॅम्पच. निसेन हटस (आपण यांना तात्पुरते टेंट म्हणूया) असलेले. आता पक्के बांधकामही होत आहे. इथे आल्या आल्या गणेश पर्वताचे दर्शन झाले.
लांबवरुन दिसणारे गुंजी
शोधा बरं गुंजी : समोर गणेश पर्वत दिसतोय
आता ३ दिवस हेच आमचे घर. स्त्रियांना पक्क्या बांधकामाची खोली मिळाली,ॲटॅचड टॉयलेट व बाथरुम असलेली. आम्ही ७ जणी असल्याने एका खोलीत मावून गेलो. पुरुषांना २ हटस् होत्या. संडास, बाथरुम बाहेर.
गुंजी कॅम्प
कॅम्पमधून दिसणारे डोंगर :
आम्ही सामान घेतले व आपापले बिछाने पकडले. गाद्या आणि त्याबरोबर गाद्यांइतकीच जाड २ पांघरुणे. कॅटीन टेंटमधे चहा आणि गरमागरम भजी तयार झाल्याची वर्दी आली. थंडी जाणवत होतीच. गरम चहा, भजीने थंडीची लज्जत वाढली. दरम्यान मी आणि अहो भोवताली चक्कर मारुन आलो. तिथे एका जागेवर बी एस एन एलला रेंज होती. त्यामुळे घरी तुटक तुटक आवाजात पोहोचल्याचे कळवले. धारचुलापासून फक्त भारत संचार निगमला आणि जिओलाच रेंज मिळते. आजूबाजूच्या आयटीबीपी व मिलिटरी कॅम्पमुळे आपण खरोखरच इनर लाईन भागात आलोत याची जाणीव होत होती. पूर्वी मिलीटरी बेस इथे नव्हता परंतू मध्यंतरी चीनबरोबर आलेल्या तणाव ग्रस्त परिस्थिती नंतर गुंजीला आता मिलीटरी आहे. म्हणजे नेमके कधीपासून ते नाही कळाले.
गुंजीमधून दिसणारा आजूबाजूचा परिसर
गुंजीमधे येताना रस्त्याच्या कडेला अश्या पताका लावलेल्या आहेत
इथे फिरताना एक झाड पूर्णपणे फुलांनी भरलेले दिसले. : सफरचंदाच्या झाडाला मोहोर आलेला :
चहापानानंतर महिलांचा मोर्चा ऑटींनी आयटीबीपी मंदिराकडे वळवला. मिलिटरी आल्यामुळे ते आत सोडणार नाहीत असे गाईडचे म्हणणे पडले. पण ऑटींना ३ वेळेचा दांडगा अनुभव असल्याने आत्मविस्वास होता आणि आमचा त्यांच्यावर विश्वास. म्हणून त्या पुढे व आम्ही मागून चालू लागलो. आयटीबीपी आवारात प्रवेश करताच त्यांनी अडवले. पण आल्या आल्या ऑटींची एक फेरी इथे झालेली होती. त्यांनी आम्ही आदिकैलास यात्रेकरु, कुमाऊ मंडलबरोबर आलो आहोत, संध्याकाळी भजनाला येतो असे सांगितले होते. त्यामुळे दुपारच्या त्या अधिकाऱ्याशी बोलून आम्हाला लगेच प्रवेश मिळाला. मंदिर छान टुमदार होते. आत उबदार आणि प्रसंन्न वाटत होते. पुजारींचा सप्तशती पाठ चालू होता. तो संपेपर्यंत थांबलो मग काही भजने म्हटली. इथे टाळ, मृदुंग, पेटी अशी भजनाची सगळी साधने होती. मी काही पूजा, भजन यात रममाण होणारी नाही. पण आरती वगैरे झाली होती व जेवायला ८ पर्यंत कॅम्पवर परत या असे सांगितले असल्याने मोजकी भजने झाली. तेवढे बरे वाटले.
आज इतकी थंडी आहे तर उद्या आणि परवा अजून उंचीवर गेल्यावर किती वाजेल असे वाटत असतानाच एकीच्या डोक्यावर टोपी व तोंड झाकायला तशीच एक पट्टी दिसली. तिला विचारले असता : "अगं इथेच दुकानात घेतली" म्हणाली. झाले, कॅम्पवर आल्या आल्या पर्स घेऊन आमची वरात तिकडे निघाली. मधे एक जवान भेटले ते म्हणाले अजून थोडे पुढे मोठे दुकान आहे तिथे सर्वकाही मिळेल. आम्ही तिकडेच चाललो आहोत तुम्हाला सोडतो तिथपर्यंत. असे म्हटल्यावर माझ्याबरोबर अजून एकजण व मी निघालो. बाकीच्यांची खरेदी झाली असल्याने त्या मागे फिरल्या.
गुंजीमधले दुकान\
दुकानदार
माझ्याकडे थर्मलवेअर होते पण पायातले नव्हते. शंतनूकडे जॅकेट सोडल्यास काहीच नव्हते. म्हणून दोघांसाठी थर्मलचा एकेक सेट घेतला. व हातमोजे तिथल्याच अजून एका दुकानातून घेतले. हातमोजे मनासारखे मिळायला जरा वेळ गेला. आम्ही अर्ध्या रस्त्यात असतानाच शंतनू व अजून एक जण आम्हाला पहायला बाहेर पडले ते भेटले. त्यांच्या बरोबर पटापट परत आलो. आज भांजेजींचा वाढदिवस होता. त्या केककटिंगसाठी लोक खोळंबलेले.आम्ही आल्यावर केक कापला फोटो झाले. शंतनूने लगेच कपडे घालून बघितले आणि मापाचे नव्हते. कपडे आणले की बदलायचा रिवाज इतक्या उंचीवरही पार पडला. हात मोज्यांऐवेजी त्याने तिथली पारंपारिक वेण्यांची टोपी घेतली. हे सगळे सामान नंतर खुप कामी आले. हे सगळे होईस्तोवर ८.३० वाजलेले. आम्ही जेवणे उरकली व आपापल्या तंबूत शिरलो. ज्या साठी इथवर आलो होतो ते २ मुख्य दिवस उद्या आणि परवाचे असणार होते. त्या उत्सुकतेतच आजचा दिवस संपला.
क्रमशः
पुढील भाग :
https://www.maayboli.com/node/86938
वाचतोय!
वाचतोय!
मला यात्रा करून खूप म्हणजे १४
मला यात्रा करून खूप म्हणजे १४ वर्ष झाली. त्यामुळे आता तो एक बर्याच वर्षांपूर्वी घेतलेला अनुभव आहे, बाकी काही नाही, असं वाटत होतं. पण तुमचं वर्णन वाचून, फोटो बघून अगदी कळकळून आठवण येते आहे. तिथल्या अशा कितीशा लोकांचे चेहरे माझ्या लक्षात असणार? पण इथले फोटो बघताना, आपल्या ओळखीचं कोणी आहे का? असं उगीच डोक्यात आलं.
गुंजीला मिलीटरी बेस आधीपासूनच होता. आयटीबीपीचा त्यातल्या त्यात मोठा कँप. तिथे आमची एक मेडिकल व्हायची. जाताना दोन रात्रींचा मुक्काम असायचा. नंतर कालापानी पार करून नबीढांगला मुक्काम. लिपूलेख पार करून पलिकडे. पुढचे भाग लवकर लवकर लिहा प्लीज.
वाचतेय
वाचतेय
आतापर्यंतचे सगळे भाग एकादमात
आतापर्यंतचे सगळे भाग एकादमात वाचून काढले .
खूप छान लिहिलय तुम्ही निकु . ओघवतं आणि आवश्यक सर्व माहिती दिली आहे .
सगळे फोटोही खूप सुंदर .
मलाही जावेसे वाटते आहे . मायबोली गृप बरोबर ही यात्रा करायला खूप खूप आवडेल.
मीही वाचतेय.
मीही वाचतेय.
. मायबोली गृप बरोबर ही यात्रा करायला खूप खूप आवडेल.>>>> मलाही.
मंजुताईने मागे तिच्या कुमाऊ भागातील खासगी सहलीबद्दल लिहिले होते. त्या भागात दोन तिनदा जाऊन आलेय तरी जायची आस मिटत नाहीय. निदान आता आदि कैलास तरी करावा असे वाटतेय.
धन्यवाद हर्पेन, अनया, मंजूताई
धन्यवाद हर्पेन, अनया, मंजूताई, जयू, साधना ! तुम्ही नियमितपणे इथे अभिप्राय लिहिताय त्यामुळे लिखाणाला हुरुप येतो.
लवकर लवकर लिहा प्लीज. >> प्रयत्न करतेय! पण ऑफिस आणि इतर गोष्टींमुळे वेळ लागतोच आहे
चांगले चालू आहे प्रवासवर्णन
चांगले चालू आहे प्रवासवर्णन
छान सुरुय वाचतोय
छान सुरुय
वाचतोय
वा, मस्त झालाय हा भाग पण.
वा, मस्त झालाय हा भाग पण. गुंजीच्या देवळातलं भजन फारच जोषपूर्ण असतं! तो कॅम्पही सुंदर आहे एकदम. आजुबाजूच्या डोंगरांचे फार वेगवेगळे रंग दिसतात.
धन्यवाद माझेमन, झकासराव, पराग
धन्यवाद माझेमन, झकासराव, पराग !
तो कॅम्पही सुंदर आहे एकदम. >>+११ आता होमस्टे ही सुरु झालेत, आद्ययावत सुविधेसह. तरी देखील पर्य टकांची पहिली पसंती कुमाऊमंडल वाटत होते इतकी गर्दी होती.