या पूर्वीचे लेख :
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग १ :
https://www.maayboli.com/node/86819
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग २ :
https://www.maayboli.com/node/86841
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ३ :
https://www.maayboli.com/node/86863
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ४ :
https://www.maayboli.com/node/86883
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ५ :
https://www.maayboli.com/node/86909
गुंजी ते नाभीढांग
एकूण अंतर : 20 kms
आजचा प्रवास खूप नव्हता पण महत्वाचा होता. पहिले म्हणजे ओम पर्वत पहायची उत्सुकता होतीच. पण आदिकैलासची रंगीत तालीमही होणार होती आज. आज कितपत थंडी वाजतेय, त्रास होतोय त्यावर उद्याची तयारी करता येणार होती.
ओम पर्वत पहिल्यांदा माझ्या आयुष्यात आला तो म्हणजे पुण्यात "सिप्ला कॅन्सर केअर सेंटर" मधे. आई बरोबर तिथे रहात असताना एक दिवस रुग्णांसाठी कैलास मानसरोवरचा स्लाईड शो चा कार्यक्र्म होता. निळ्याशार आभाळाच्या पडद्यावर उठून दिसणारा ओम अगदी ठळकपणे लक्षात आहे माझ्या. बाकीही फोटो सुंदर होते एवढेच आठवते. आई आणि मी दोघींनाही आवडला होता तो फोटो म्हणून असेल कदाचित. तेंव्हा वाटले ही नव्हते की एक दिवस आपण प्रत्यक्ष पाहू हा पर्वत.
तर चला मंडळी ! पटापट तयार व्हा! आज गरम कपडे पुरेसे घाला. आपण अजून उंचावर जाणार आहोत. हवा विरळ असणार आहे तेंव्हा कमी बोलणे. सावकाश चालणे आणि पाणी पित रहाणे महत्वाचे. काळजी घ्या, फार वेळ डोक्यावरची टोपी काढून फिरु नका. नाहीतर डोके दुखीचा त्रास होऊ शकतो. काही वाटले तर लगेच सांगा. अश्या सगळ्या सूचना काल आम्हाला दिल्या होत्या.
आज सकाळी लवकरात लवकर म्हणजे ६ च्या आत निघायचे असे ठरले होते. जसा उशीर होतो तसे ओम् भोवती ढगांचा पडदा विणला जातो. दर्शन होण्याची शक्यता कमी होते. रात्री काहीजणींना खूप थंडी वाजत होती त्यामुळे त्यांची झोप झाली नव्हती. थंडीमुळे काहींनी आंघोळ न करण्याचे ठरवले. मी दात घासायला नळ चालू केला तर जणू वाहता बर्फ हातावर आला. कसे बसे तोंड धुतले. तेवढ्याने हात बधीर झाला. आता आंघोळीचे पाणी बाहेरून आणायचे होते. पण न करणे काही पटेना. बादली घेऊन सरळ बाहेर गेले. मस्त चूल पेटलेली. मला तिथल्या माणसाने पाणी काढून दिले आणि थंड पाण्याचा पाईप भर घालण्या साठी सोडला. म्हणजे आता १०/१५ मिनिटेतरी कुणाला गरमपाणी मिळणार नव्हते. मी योग्य वेळेत पोहोचले. माझी आंघोळ होईस्तोवर रुम मधेच इतरजणींनी प्यायचे गरम पाणी व चहा आणला होता. गरम पाणी प्यायल्याने बरे वाटले. इतरांची मुखमार्जनाची सोय झाली. सकाळपासूनच पाऊस लागला होता. तश्याही थंडीत सगळे यात्री ५.३०ला आवरून तयार होते. इतक्या पहाटे सुद्धा उपमा, पोहे आणि दलियाचा गरम गरम नाश्ता तयार होता. शिवाशिवाय ३ प्रकारचा चहा- एक नॉर्मल सगळे घातलेला, दुसरा बिन साखरेचा व तिसरा तिथला स्थानिक बिनदुधाचा काळा चहा. मस्त लागतो हा. थोडी लवंग व दालचिनी असते बहुतेक. खूपच प्रेमाने हे लोक करतात. अगदी आंघोळीचे पाणी, प्यायचे गरमपाणी हे सुद्धा तुमच्या खोलीत आणून देतात. "यात्री आहेत ना, त्यांना सवय नसते, त्रास व्हायला नको", हा भाव! इतर टूरिस्ट कंपन्यांबरोबर हे अनुभवायला मिळेल का? काय माहीत. मी मात्र आपण सगळे आपले आपण करायचे ठरवले होते. जोवर खूपच त्रास होत नाही तोवर कुणाला काही करायला सांगायचे नाही आणि आपल्याला त्रास होईल असेही काही करायचे नाही.
हळूहळू आभाळ स्वच्छ झाले. ६.३०च्या सुमारास, नाभीढांगचीही हवा चांगली झाल्याची खात्री आमच्या गाईडने केली. आता निघायला काही अडचण नव्हती. सगळेजण तय्यार होते. लगेच आपापल्या गाडीत बसले. हवा खरच छान होती. रस्ता कच्चा होता मधे मधे; पण रुंद होता. निसर्गाचे सुंदर आणि वेगळे दर्शन होत होते. इथे फार झाडे नाहीत पण तरिही उघडे डोंगर बाजूने बाहणारी कालीनदी बघायला छान वाटत होते. रौद्ररुपही किती सुंदर असावे ना! मस्त वाटत होते. मला नेहमी प्रश्ण पडायचा की कालिका देवी हे उग्ररुप आहे. स्वामी परमहंसांना त्यात प्रेमळ, प्रसंन्न भाव कसा दिसत असेल. जणू त्याचेच उत्तर इथला कालापानीचा निसर्ग देत होता.रौद्र तरिही सुंदर, विलोभनीय!
कालापानीचे डोंगर : बर्फ वितळले की डोंगर कसा खरवडून निघतो
अशीच हिमशिखरे :
आम्ही लवकरच कालापानी चेक पोस्टला पोहोचलो. चेकपोस्टला परमिटचा कागद दाखवणे, गाडी व गाडीवानाची माहिती नोंदवणे असे काम असे. ते गाडीचा ड्रायव्हरच पार पाडत असे. आमच्या ड्रायव्हरचे विशेष कौशल्य असे की सगळ्यात आधी जरी पोहोचलो तरी त्याचे काम सगळ्यात शेवटी होत असे. हे सगळे होई पर्यंत आम्ही खाली उतरलो. ही व्यास व्हॅली. महर्षी व्यासांनी इथे तपश्चर्या केली. उंच पर्वतावर एक गुहा दिसते म्हणजे एक गोल भोक दिसते. ती व्यासगुहा. इथे नाग पर्वतही दिसतो बरंका! म्हणजे पर्वताचा आकार शेषनागाच्या फण्या सारखा दिसतो म्हणून नाग पर्वत. तसा गुंजीलाही आपल्याला गणेश पर्वत दिसतो. आमची नोंदणी होइस्तोवर मागून दोघे नवरा बायको गाडीतून आले. गाडी गुजरातची वाटत होती म्हणून चौकशी केली तर ते दोघे खरच गुजरातहून गाडी चालवत आले होते. गुंजीत होम स्टेला थांबले होते. मागून असेच काहीजण मध्यप्रदेशहून आले. ढगाळ हवेने व्यास गुहा व नाग पर्वताचे दर्शन झाले नाही पण आजूबाजूचा निसर्ग व पर्यटक पहाण्यात चांगला वेळ गेला. कालापानी दर्शन येताना करायचे होते. ड्रायव्हर आल्यावर पटापट गाडीत बसलो. ओम पर्वताचे दर्शन चुकायला नको.
"तो बघा ओम पर्वत!" अचानक आमची गाडी एका वळणावर थांबली. आकाश निरभ्र नसले तरी ओम पर्वताचे स्पष्ट दर्शन झाले. आम्ही चटचट फोटो काढले. वर परत दर्शन नीट झाले नाहीतर फोटो चूकायला नको. इथून मात्र जे निघालो ते थेट नाभिढांगला जाऊनच थांबलो.
दूरवर दिसणारा ओम पर्वत :
रस्त्यातून पहिले दर्शन घेणारे यात्री :
ढग वाऱ्याला घेऊन ओम पर्वताशी लपाछपीचा खेळ खेळत होते. गाडी थोडी अलिकडेच थांबते. १०/१५ मिनिटे छोटेसे अंतर चालून व एक छोटासा चढ चडून नाभीढांग कॅम्पला आपण पोहोचतो. मधे एक छानसे प्रवेशद्वार केले आहे. तिथून आत गेल्यावर आम्हाला एक नाशिकचे कुटुंब भेटले जे माझ्या सासऱ्यांना ओळखत होते. पूर्वीचे नाशिक आधीच लहान व त्यात आमचा फोटो स्टुडिओ सर्वात जुना असल्याने गावात रहात असणाऱ्या लोकांना बऱ्यापैकी तो माहित असतो. त्यातून सासरे म्हणजे जगन्मित्र व्यक्तिमत्व! त्यामुळे गावात रहाणारे कुणी भेटले तर हमखास सासऱ्यांना ओळखणारे असतात. आम्हाला मात्र त्यांची पुण्याई, आशिर्वाद लाभल्या सारखे वाटते. इतक्या उंचावर नाशिकपासून लांब वडीलांची आठवण निघणे हा शंतनूसाठी शुभ शकुनच होता.
प्रवेश द्वारातून ओम पर्वत :
नाभी कॅम्प :
आम्ही पूर्ण पॅक होऊन गेलो होतो. विरळहवेचा त्रास आजिबात जाणवत नव्हता. इथेही गरम पाणी, चहा, ज्यूस इत्यादीनी जोरदार स्वागत झाले. इथले काका पण एकदम उत्साही होते. चहापान करतानाच समोर ओम पर्वताचे दर्शन झाले. लोकांचे परत फोटो सेशन सुरु झाले. कुणी त्या ओमला डोक्यावर घेतला तर कुणी ओंजळीत. जे काही प्रकार करता येतील ते सर्व करुन झाले. मला हे असले प्रकार बालीशपणा वाटतो. मी निवांत एक बाक पकडला व समोरचा ओम पर्वत बाजूचा आसमंत याचा आस्वाद घेत बसले. असे शांत बसले की वातावरण आपल्या आत आत झिरपल्याचा भास होतो. जणू असेच बसून राहिलो तर आपणही त्या सौंदर्याचे निराकार, निश्चल स्वरुप होऊन जाऊ.
उत्साही काका : यांची टोपी घेऊन नंतर अनेकांनी फोटो काढले :
ओम पर्वत नाभीकॅम्पमधून :
कितीही फोटो काढले तरी मन भरत नव्हते :
इथेच बाजूच्या पर्वतावर नंदी आणि सिंहाचे चेहरे बर्फावर दिसत होते. निळ्या रेषेवर पहा. काही लोक दुसर्या चेहर्याला माणसाचा म्हणजे शिवाचा चेहरा म्हणत होते. नंदी मात्र अगदी स्पष्ट दिसतो आहे.
इथेही सैन्यतळ आहे व सैन्याची दोन मंदिरेही आहेत. छोटीशी पण सुंदर! इथे जायला छोटेसे टेकाड परत चढावे लागते. आता आम्ही वातावरणात स्थिरावलो असल्याने सहज वर चढून गेलो. सैन्यातील काही लोकांनी अडवले पण मंदिरात जात आहोत म्हटल्यावर जाऊ दिले. वरून खालच्या नाभीढांग व आयटीबीच्या कॅम्पचे विहंगम दृश्य दिसत होते. आम्ही गेलो तेंव्हा मंदिराची सफाई नुकतीच झाली होती. काही भजने म्हणून परत खाली आलो व समोर दिसणाऱ्या ओम शी परत एकदा एकाकार होण्याचा प्रयत्न केला. वेगळीच शांतता आहे इथे. पिऊन घ्यावी तेवढी कमीच. इथूनच पुढे लिपूलेख पास ला कैलास मानसरोवर यात्रेकरु जातात. सैन्याचे जवान इथून पुढे यात्रींना घेऊन जातात. अवघ्या ५० किमी.वर मानस सरोवर आहे. अगदी आदि कैलासच्या यात्रींनाही भारताच्या बाजूने म्हणे कैलास दर्शन करता येते. जवान घेऊन जातात. आम्ही गेलो होतो तेंव्हा तिथे बर्फ होते. त्यामुळे ती संधी काही मिळाली नाही.
नाभीतील मंदिरे :
मंदिराकडे जाताना वरून दिसणारे कॅम्पचे दृश्य :
आजही आमटी, भात, भाजी, पोळी, सॅलेड, पापड असे सगळे व्यवस्थित जेवण होते. जेवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. अजून कालापानी बाकी होते. कालापानीला कालिकेचे देऊळ आहे. त्याबरोबर महादेवही आहेत. देवीच्या पायापासून नदीचा जन्म होतो म्हणून तिला काली नदी हे नाव मिळाले आहे. पुजारी विनंती केल्यावर हे उगमस्थान दाखवतात व नदीचे पाणीही भरुन देतात. जागृत देवता आहे असे कळाले.
कालापानी माहिती फलक :
कालीमाता मंदिर :
कालीमाता :
आत्ता हवा अगदी छान होती. व्यास गुहा व नाग पर्वत अगदी स्पष्ट दिसत होते. तिथे असणाऱ्या जवानाने दुर्बिणीतून व्यास गुहेचे दर्शन घडवले. गुहेच्या दारात आपल्या जवानांनी भगवा फडकवला आहे तो दुर्बिणीतूनच दिसतो. एवढ्या उंचीवर जाणाऱ्या जवानांचे कौतुक वाटल्याशिवाय रहात नाही. फार गर्दी नसेल तर दुर्बिण काढतो असे म्हणाले. आमचा मात्र छान योग जुळून आला.
बघा व्यासगुहा दिसतेय का ते. अगदी शिखराच्या जवळ एक गोल भोकासारखे दिसतेय ना तीच ती. व्यास महर्षींची गुहा :
मंदिराचे आवार प्रशस्त आहे. इतरांचे दर्शन होईस्तोवर आजूबाजुला फिरत असतानाच पाऊस आला. मग एका शेडमधे बसून घेतले. इथेही काही महाराष्ट्रीयन मंडळी भेटली. पुण्याचेही काही लोक होते. ते काल आदि कैलास करुन आले होते. त्यामुळे 'दर्शन कसे झाले?" , "गौरीकुंडला किती त्रास होतो ?" अशी माहितीची घेवाण झाली. पाऊस कमी झाल्यावर गुंजीला परत आलो.
आज गुंजीतूनही सुंदर हिमशिखरांचे दर्शन झाले. उन्हात न्हाऊन निघालेली शिखरे : कुणी म्हणतात अन्नपूर्णा रांगेतील आहेत तर कुणी म्हणतात आपी पर्वतातील आहेत. दिसत मात्र सुंदर होती.
आल्या आल्या गरमा गरम चहा आणि भजी तयार होते. काहींना आज त्रास झाला ते विश्रांतीला गेले. मी आधी सकाळपासून घातलेले २ लेयर कमी केले. मग मला बरे वाटले. एवढे कपडे अंगावर घालून त्यांच्या वजनानेच दडपायला होते. सिंगल लेयरमधे आल्यावर मोकळे वाटले. मग परत गुंजीला फेरफटका मारून आले. आज कॅम्प अगदी माणसांनी फुलला होता. सगळे बुकिंग फुल झालेले दिसत होते. आजूबाजूचे होम स्टे सुद्धा माणसांनी गजबजले होते. तिथे मला नवी मुंबईहून आलेला एक मराठी ग्रुप भेटला. ते आदिकैलास, ओम पर्वत करून पंचचुली बेस ट्रेक करणार होते. त्यांच्यातल्या काकू माझ्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या. पण ट्रेकिंगबाबत खूप उत्साही आणि ॲक्टिव होत्या. असे तंदुरुस्त लोक पाहिले की मलाही काही दिवस वाटते की आपणही करु शकतो. परत आल्यावर रोजच्या धावपळीत हे सगळे परत मागे पडते. असो.
आज आता आरामाचा दिवस होता. उद्या पहाटे ५.३० ला निघायचेच होते. उद्या काही परत गुंजीला यायचे नाही. म्हणून आत्ताच वृक्षारोपण करुन घ्यायचे ठरले. पिथौरागडहून रोपे आणलेली होतीच. इथे पर्यटकांच्या हस्ते त्यांची आठवण म्हणून झाड लावले जाते. व अश्या प्रकारे यादों का जंगल म्हणून झाडे वाढविण्याची कल्पना श्री. गुरुनानींची आहे. आपण रोप लावल्या नंतर त्याची संपूर्ण काळजी कुमाऊ मंडल घेते. त्यांनी हा प्रयोग नाभी मधेही केला. परंतू तिथे जास्त काळ बर्फ असल्याने रोपांची काळजी घेता येत नाही. म्हणून सध्या फक्त गुंजीतच रोपे लावली जातात. खरंच मी परत कधी गेलेच तर या रोपांना भेट द्यायला नक्की आवडेल. असा छान झाडांनी झाकलेल्या कॅम्पला भेट देणे किती सुखावह असेल! फक्त नवीन बनणाऱ्या होम स्टे व त्यांच्या संख्येमुळे या प्रयत्नांना खिळ बसायला नको म्हणजे झाले.
वृक्षारोपणानंतर मात्र सरळ रुमचा रस्ता धरला. उद्याची तयारी करायची होती. वेळोवेळी ठिकठिकाणचे मॅनेजर गौरीकुंड हा यात्रेचा भाग नाही, उंचावर व अवघड असल्याने रिस्क घेऊ नका. तिथे नेण्याची आमची जबाबदारी नाही. इत्यादी माहितीवजा सूचना देतच होते. त्यामुळे गौरीकुंडला कुणी जाणार नाही असे वाटत होते. लोकं दमलेली असल्याने आज काही आयटीबीपीच्या मंदिरात गेलो नाही. आज जरा लवकर आटोपून आराम केला सगळ्यांनी.
क्रमशः
पुढील भाग :
https://www.maayboli.com/node/86979
हा पण भाग छान झालाय. ओम
हा पण भाग छान झालाय. ॐ पर्वताचं स्पष्ट दर्शन झालं. नशिबवान आहात. आम्हाला यात्रेला जाताना नुसता ढगांचा पडदा दिसला होता. येताना नशिबाने अगदी स्वच्छ हवा होती. ॐ पर्वत बघताना भान हरपलं होतं. निसर्गात असा आकार निर्माण कसा झाला असेल, ह्याचं अजूनही आश्चर्य वाटतं. किती वेळ बघितलं तरी मनाचं समाधान होत नव्हतं.
ॐ नमः: शिवाय
वा वा मस्त !
वा वा मस्त !
आम्हांलाही ॐ पर्वत अर्धवटच दिसला होता. त्यावर सगळ्यांनी "परत इथे यायला कारण हवं ना" असं म्हणूण समजूत घालून घेतली होती
कालापानी आणि नाभीढांग दोन्ही कॅम्प्स मस्त आहेत एकदम. कालापानीला आम्ही सकाळी सकाळी पोचलो. तेव्हा तिथे देवळाच्या परिसरात मस्त छान भजन लावलं होतं. अगदी दिवाळीच्या पहाटे सारखं वातावरण वाटत होतं!
नाभीढांगचा कॅम्प एकदम गुढ वगैरे आहे! तिकडून बॉर्डर अगदी जवळ असल्याने अपोआपच जरा सिरीयस वातावरण असतं की काय असं वाटलं होतं मला. आम्ही नाभीढांगहून लिपुलेख कडे पहाटे ३-४ वाजता निघालो होतो. तेव्हा तर काळोखात सगळं अजूनच गुढ वाटलं होतं.
तुमचे सगळे फोटो मस्त आले आहेत. गुंजीहून (आणि आधी सिरखाहून) दिसणार्या पर्वतरांगा अन्नपूर्णा आहेत असं आम्हांलाही सांगितलं होतं. पुढच्या भागाची वाट बघतो आहे.
धन्यवाद अनया आणि पराग ! ओम
धन्यवाद अनया आणि पराग ! ओम पर्वत आम्हाला अगदी छान बघता आला. पण सतत ढग येत जात होते. त्यामुळे फोटोत पूर्ण दिसत नाहीये. अर्थात आकाश एकदम निरभ्र नव्हतेच. नाहीतर अजून छान फोटो आले असते.
कालापानी कॅम्प अगदी लहानसा वाटला मला. इथे पूर्वी रहात असत वाचून अजूनच आश्चर्य वाटले. पण भरपूर सपाट जागा आहे आजूबाजूला त्यामुळे मस्त वाटते अगदी.
तिथे देवळाच्या परिसरात मस्त छान भजन लावलं होतं. अगदी दिवाळीच्या पहाटे सारखं वातावरण वाटत होतं! >> किती छान!
नाभीढांगचा कॅम्प एकदम गुढ वगैरे आहे >> आम्ही तिथे पोहोचलो तेंव्हा लोकं क्रिकेट खेळत होते. त्यामुळे असेल कदाचित पण एकदम भरपूर वावर असलेला चैतन्यमय वाटला मला तरी. अर्थात विरळ हवेचा त्रास होत नाहीये याचाही आनंद आणि त्यामुळे उत्साह होताच. आम्ही साधारण ३/४ तासच तिथे होतो, ते ही एक कारण असेल.
नशिबवान आहात. >> खरंच आहे अनया! आम्हाला कुठेही पाऊस लागला नाही, कुठलीही नैसर्गिक अडचण प्रवासात आली नाही. सगळी दर्शने अगदी ठरल्या प्रमाणे छान पार पडली. खरोखर देवाचे बोलावणे आले होते असेच वाटले.
आम्ही तिथे पोहोचलो तेंव्हा
आम्ही तिथे पोहोचलो तेंव्हा लोकं क्रिकेट खेळत होते. >>>>> हाहा.. भारी! आम्ही गेलो तेव्हा एकतर दुपारी उशिरा पोचलो. थोड्यावेळाने पाऊस आला, थंडी पडली आणि मग आम्ही पहाटे निघालो. त्यामुळे छान स्वच्छ सूर्यप्रकाश वगैरे फार मिळालं नाही.
इथे पूर्वी रहात असत वाचून अजूनच आश्चर्य वाटले. >>>> तिकडे मागे खोल्या बांधलेल्या आहेत. त्या समोरून दिसत नाहीत. आम्ही येताना लवकर पोचलो आणि थोडावेळ झोपलोही होतो तिथे.
छान झालाय हा ही भाग!
छान झालाय हा ही भाग!
छान लेखमाला !
छान लेखमाला !
ॐ नम: शिवाय
ॐ नम: शिवाय
खूप छान !

आम्ही गेलो होतो तेव्हाही ढगा - धुक्याचा दाट पडदाच होता स्वागताला.
आमच्यातल्या काही उत्साही आणि भाविक मंडळींनी मोठ्याने प्रणवोच्चार करायला सुरुवात केली, त्या उत्साहाची लागण मलाही होऊन मी देखील त्यांना सामील झालो होतो आणि मग झालेले दर्शन असे होते.
त्यावेळी आमच्यासोबत एक जण होते त्यांनी आधीही यात्रा केली होती ते म्हणालेच होते की आमची बॅच नशीबवान होती
मी ह्या निमित्ताने जुने फोटो
मी ह्या निमित्ताने जुने फोटो बघत बसलोय.
मला आदि कैलासला जायंच आहे आणि मला ठरवता येत नाहीये जिथे चालत पार केली ही सगळी अंतरे तिथे आत रस्ता झालाय ते चांगलं की वाईट!
मला आदि कैलासला जायंच आहे आणि
मला आदि कैलासला जायंच आहे आणि मला ठरवता येत नाहीये जिथे चालत पार केली ही सगळी अंतरे तिथे आत रस्ता झालाय ते चांगलं की वाईट! >>>>>> मलाही असंच केदारनाथबद्दल वाटतं..
नंदी व सिंहाचेह चेहरे विलक्षण
नंदी व सिंहाचेह चेहरे विलक्षण आहेत. अद्भुत व सुंदर. अंगावरती काटा आला.
छान...कधी जायला मिळेल कुणास
छान...कधी जायला मिळेल कुणास ठाऊक. तोवर प्रवासवर्णनावरच समाधान मानून घेतो.
धन्यवाद मंजूताई, कुमारजी.,
धन्यवाद मंजूताई, कुमारजी., हर्पेन, अंगारकी, किल्लेदार!
आमच्यातल्या काही उत्साही आणि भाविक मंडळींनी मोठ्याने प्रणवोच्चार करायला सुरुवात केली, त्या उत्साहाची लागण मलाही होऊन मी देखील त्यांना सामील झालो होतो आणि मग झालेले दर्शन असे होते. >> हर्पेन, किती छान अनुभव! ओमचा फोटो तर क्लास आहे नंतरचा.
मला आदि कैलासला जायंच आहे आणि मला ठरवता येत नाहीये जिथे चालत पार केली ही सगळी अंतरे तिथे आत रस्ता झालाय ते चांगलं की वाईट! >> मी म्हणेन चांगले की वाईटपेक्षा, त्याच रस्त्यावर, यावेळी एक नवीन अनुभव मिळेल!