या पूर्वीचे लेख :
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग १ :
https://www.maayboli.com/node/86819
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग २ :
https://www.maayboli.com/node/86841
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ३ :
https://www.maayboli.com/node/86863
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ४ :
https://www.maayboli.com/node/86883
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ५ :
https://www.maayboli.com/node/86909
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ६ :
https://www.maayboli.com/node/86938
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ७ :
https://www.maayboli.com/node/86979
बुधी ते चोकौडी
एकूण अंतर : १६० किमी
बुधीला आजही नेहमी प्रमाणेच ४.३०ला आवरून झाले. रात्री पित्तशमनाची गोळी घेऊन लवकर झोपल्या मुळे झोप पूर्ण झाली होती. तसेच विरळहवेतून बाहेर येऊनही भरपूर वेळ झाला होता. सकाळ एकदम ताजीतवानी झाली. आवरुन आजूबाजूला फेरफटका मारून परत आलो. आज धारचुलाला आधी ठेवलेले सामान घेऊन दिदीहाटला जेवण व चोकौडीला मुक्काम होता. प्रवास बराच होता. म्हणून भरपेट नाश्ता करून निघालो. धारचुलाला साधारण ११च्या सुमारास पोहोचलो. मागून दुसऱ्या बॅचच्या गाड्या पोहोचणार होत्या. त्यांना सोडून व आम्हाला घेऊन गाड्या निघणार होत्या. आज पासून परत १२जणांच्या टेम्पो ट्रॅव्हलर्समधून प्रवास. दुसऱ्या बॅचचा आज धारचुलाला मुक्काम होता. त्यांची पहिली गाडी बरोबर १२च्या सुमारास आली. पण दुसरी यायची लक्षणे दिसेनात. तोवर लोकांनी आपापले सामान ताब्यात घेतले. ज्यांनी बुधीला थंडीमुळे आंघोळी टाळल्या होत्या त्यांच्या आंघोळी झाल्या. १ वाजून गेला. पोटात भुकेने कावळे ओरडायला लागले. पण जेवण दिदीहाटला सांगितले असल्याने तिथेच होणार होते. हळूहळू इतके दिवस न आठवलेल्या खाऊच्या पुड्या बाहेर पडल्या. काहींनी तिथली ताजी, रसदार, गोड प्लमची फळे आणली. सगळ्यांनी सगळ्या पुड्यांवर ताव मारला तरी गाडी येईचना! शेवटी २ नंतर कधीतरी दुसरी गाडी आली. या गाडीत गाडी लागणारे अनेक जण / जणी होत्या त्यामुळे थांबत थांबत गाडी हाकावी लागत होती असे कळाले. यांचे पुढच्या वळणाच्या रस्त्यावर कसे होणार असे वाटले. धारचुलापुढे तर रस्ते लहान होत जातात आणि एकही सरळ रस्ता नाही.
बुधी गाव : परतताना :
त्या सगळ्यांबरोबर, "कसे दर्शन झाले?", 'गौरीकुंडाला गेला होतात का?" अशी नेहमीची प्रश्णोत्तरे झाली. मग मात्र सगळे जण पटापट गाडीत बसले. सामान चढवले गेले. आम्ही एकदाचे निघालो. गाडीत बसल्यावर कळाले खरी मेख कुठे होती ती. चालकाचे चालवणे थोडे रफ होते. वळण जवळ आल्यावर कचकन ब्रेक दाबणे वगैरे चालू होते. मधे आठवणीने मालपाला थांबून १९९८ च्या बॅचला श्रद्दांजली वाहिली. आता मालपाला रस्त्याचे एक वळण आहे. बाकी कुणी सांगितले नाही तर इथे कधी एक गाव होते याची कुठलीही खुण नाही. दोनदा इथे मोथे ठे भूस्खलन झाले असे म्हणतात. हिमालयात रस्ते सतत बदलतात हेच काय ती स्थिरता. तवाघाटचे ही असेच दिसते. पूर्वी म्हणे खूप मोठे बाजाराचे ठिकाण होते. आता मात्र एक सिंगल रोड, बाकी काहीही नाही :(.
पहाडात कितीही थंडी असली तरी दुपारचे ऊन बोचतेच. आम्ही थोडावेळ का होईना ए.सी. लावुन घेतला. बरे वाटले. दिदीहाटला भांजेजींना चिडवत होतो, "जाओ, आगे जाओ, माला मिलेगी". गाडीतून उतरतो तो खरच गळ्यात हार घालून स्वागत झाले. श्री. गुरुनानीजी पिथौरागडहून खास आमच्या स्वागताला आले होते. पारंपारिक कुमाऊ संगीत लावले होते. ते ऐकून मामाजी खूपच खुश झाले आणि त्यांनी त्यावर ताल धरला. सगळी यात्रा सुखरुप पार पडल्यामुळे सगळेच आनंदी होते. हळूहळू सगळ्यांना लागण झाली. थोडे थोडे सगळेच नाचले. "हर हर महादेव"चा जल्लोष झाला.
जेवून लगेचच आम्ही चोकौडीला मार्गस्थ झालो. गाडीत बसल्यावर बाहेर असलेले हे लिखाण दिसले आणि चालत्या गाडीतूच फोटो घेतला. जवळच्या सगळ्या ठिकाणांची यादी आहे :
दिदीहाट हे नाव कसे पडले याची बरीच चर्चा झाली. हाट म्हणजे कुमाऊ लोकं घर असे समजतात. त्याप्रमाणे मी दिदीचे घर असा अर्थ काढला. तर अजून कुणी म्हणे इग्रजांनी हे नाव ठेवले असेल. कुणीतरी डिड्डी नावाच्या अधिकार्याने इथे हॉल्ट घेतला असेल. ते हळूहळू दिदीहाट असे झाले. अशी मजा मजा करत आमचा प्रवास चालू होता.
संध्याकाळी ६ च्या सुमारास चौकोडीला पोहोचलो. चोकौडीचे यात्री विश्रामगृह बघून अजूनच छान वाटले. मोठी इमारत त्या समोर मोठी गोलाकार बाग. त्याभोवती सुंदर लाकडी घरे. आमची व्यवस्था या आलीशान घरांत होती. जणूकाही यात्रींचा सगळा शीण निघून जावा म्हणून, श्रमपरिहाराची, शाही व्यवस्था.
प्रत्येक घर लाकडाचे होते. जमीन सुद्धा लाकडाची. बाहेर छोटीशी बाल्कनी आणि आतमध्ये अद्ययावत सुविधांसह खोली. दर्शनी बाजूला संपूर्ण काच बसवलेली जेणेकरुन बाहेरचे दृश्य बसल्याजागी पहाता यावे. चोकौडी पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहेच. पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज ऐकू येत होते सकाळी. काहींची लगबगही पहायला मिळाली.
लाकडी घर :
अशी एकाबाजूची घरांची रांग :
दिवसभर प्रवासाने कंटाळलो होतो. आम्ही पाय मोकळे करायला बाहेर पडलो. आधी आवारातच मचाण आहे त्यावर चढून आजूबाजूचे नजारे बघितले. पण आजूबाजूला बांधकाम बरेच वाटले. पूर्वी बरेच जंगल किंवा झाडे असावीत. आताही हिरवळ होतीच. बाहेर पडल्यावर सरळ चालत गेलो तर एक आश्रम लागला. ऑंटीजी सोडून कुणालाही फार रस नव्हता आत जाण्यात. म्हणून त्यांना सांगून आपण परत फिरू असे ठरले. तोवर शंतनू आणि काही मंडळी आत शिरली होती. आत आरती चालू होती. आम्ही आत जायला लागल्यावर आश्रमातली कुत्री जोरात भुंकू लागली. शंतनु बाहेर आला. त्याला वाटले आम्हाला आत यायचे आहे म्हणून आम्हाला आत घेऊन गेला. आत दरवाज्यात आल्यावर आरती चालू असताना असेच मागे फिरणे बरे वाटेना. मुकाट आत शिरलो. आतले वातावरण खूपच प्रसंन्न होते. बरे झालो आत आलो असेच वाटले. तो धुनीचा खरपूस वास, संथ लयीत आणि शांत आवाजात चाललेली आरती एक चैतन्यमयी अनुभूती देऊन गेली. जणू मी परत आदिकैलासा समोर उभी होते. आरती झाल्यावर थोडावेळ तसेच डोळे मिटून बसले. नंतर तिथल्या महाराजजींबरोबर गप्पा मारून परत निघालो. पू. अडंगगानंदजी महाराजांचा तो आश्रम होता. त्यांचे गीतेवरील भाष्य्यरुपी पुस्तक भारतातील सर्व भाषा तसेच परकीय भाषांतही अनुवादित झाले आहे. इंग्रजी, उर्दू, फ्रेंच, जर्मन अश्या अनेक भाषा. आमच्या गुजराथी भगिनींनी गुजराथी, तर काहींनी हिंदी भाषेतील प्रत घेतली. पैसे विचारले असता, "मला माहित नाही, पुस्तकावर छापली आहे" म्हणाले. पैसे दानपेटीत टाकायचे. पैसे न देता सुद्धा ह्या प्रती आपल्याला घेता येतात.
स्वामीजी :
खुप छान अनुभव घेऊन आम्ही परतलो. इथे बुरांश सरबत, ग्रीन टी, भट(बहुदा काळे सोयाबीन), भांग बीजे अशी लोकल उत्पादने विकायला होती. आम्हीही किरकोळ खरेदी केली. आज आता निवांत झोपायचे होते. उद्या सकाळी उठायची घाई नव्हती. पण तिथुन दिसणारी हिमशिखरे बघायची असतील तर मात्र सूर्योदयापूर्वी उठावे लागणार होते.
आज आम्ही एकदम आरामात होतो. फोनला रेंज सुरु झालेली. रुम मधे अनेक दिवसांनी टिव्ही चालत होता. आधी घरी बोलून घेतले भरपूर. तोवर मामीचा काळजीने फोन आला "तुम्ही कुठे आहात? सुखरूप आहात ना?". मला काही कळेना की ती असे का विचारतेय. मग कळाले की बातम्यात दाखवत होते धारचुला ते गुंजी मार्गावर मोठी लॅण्ड स्लाईड झाली, रस्ता १ दिवसासाठी बंद असणारे म्हणून. त्यांना त्यामुळे काळजी वाटत होती. आम्ही आज सकाळीच त्या रस्त्यावरून आलो होतो व दुपारी हा प्रकार घडला. आम्ही सुखरुप आहोत आता काही काळजी नाही असे सगळे बोलणे झाले. आम्ही तर निघालो पण दुसऱ्या बॅचला १ दिवस धारचुलातच रहावे लागले असे नंतर कळाले.
नंतर टीव्हीवर अमृतसरला ड्रोन हल्ला झाल्याचे कळाले. पण आता कशाचीच चिंता वाटत नव्हती. आपली यात्रा सुखरुप पार पडणार असाच विश्वास पक्का झाला होता. जेवणे करून गप्पा टप्पा करत आज निवांत झोपी गेलो.
क्रमशः
पुढील भाग :
https://www.maayboli.com/node/87011
वाचतेय...
वाचतेय...
अरे वा! धन्यवाद मंजूताई! मला
अरे वा! धन्यवाद मंजूताई! मला वाटले हा धागा आता मागे गेला
आज सलग अनेक भाग वाचले. खूप
आज सलग अनेक भाग वाचले. खूप छान वाटतंय वाचायला.
धन्यवाद वावे!
धन्यवाद वावे!
वाचतोय वाचतोय
वाचतोय वाचतोय
छान चित्रदर्शी लिहिताय
धन्यवाद झकासराव !
धन्यवाद झकासराव !