आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ७

Submitted by निकु on 26 July, 2025 - 09:51

या पूर्वीचे लेख :
आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग १ :
https://www.maayboli.com/node/86819

आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग २ :
https://www.maayboli.com/node/86841

आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ३ :
https://www.maayboli.com/node/86863

आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ४ :
https://www.maayboli.com/node/86883

आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ५ :
https://www.maayboli.com/node/86909

आदि कैलास : एक संस्मरणीय प्रवास : भाग ६ :
https://www.maayboli.com/node/86938

गुंजी ते जोलिंगकाँग
एकूण अंतर : २५ kms

कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम्।
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानीसहितं नमामि।।

ज्याची कांती कापूरासारखी धवल आहे, जो करुणावतार असून सर्व संसाराचे मूळ आहे,ज्याने गळ्यात भुजंग धारण केला आहे, जो नेहमी माझ्या हृदयकमलात निवास करतो, त्या भवानीसहित महादेवांना, मी नमन करते.

हा श्लोक म्हणताना नेहमी एखाद्या हिमशिखरावर शिवपार्वती बसले आहेत असे वाटते. अगदी अश्याच सदाशिवाच्या रहिवासाची आज भेट होणार.
इथे महादेव त्यांच्या कुटुंबियांसमवेत वास करतात अशी श्रद्धा आहे.

तो शुभ्रधवल पर्वत, त्याच्या समोर असणारी दोन जलकुंडे: पार्वती सरोवर आणि गौरीकुंड. सगळे वातावरणच रोमांचकारी! लोहकण जरी असेल तरी चुंबक आकर्षून घेते, त्याप्रमाणेच, इथे ओंकाराचा अनाहत नाद तुमच्या अंतरमनात उमटल्याशिवाय रहाणार नाही.

ओम नम: शिवाय |

प्रथम थोडे आदि कैलासा विषयी जाणून घेऊ. आदि कैलास यालाच छोटा कैलास असेही म्हणतात. एकूण ५ कैलास आहेत. बडा कैलास (कैलास मानसरोवर- तिबेट), आदि कैलास (उत्तराखंड), मणिमहेश(चंबा, हिमाचल प्रदेश), किन्नौर कैलास(हिमाचल प्रदेश) व श्रीखंडी कैलास (परत एकदा हिमाचल प्रदेश). यापैकी आदि कैलास आणि बडा कैलासचा मार्ग गुंजीपर्यंत सारखा आहे. तिथून पुढे दोन मार्ग आहेत. एक कुट्टी मार्गे जोलिंगकाँगला जातो. इथे आदिकैलास पर्वत आहे. तर दुसरा मार्ग नाभीढांग मार्गे, ओम पर्वतावरून, लिपूलेख पासला जातो. इथून पुढे बडा कैलास आहे.

चला, आपण आदिकैलासला जाऊया!

आज सकाळी ४.३०लाच आम्ही आंघोळ करून तयार झालो. थंडीचा त्रास होणाऱ्यांनी आंघोळीची गोळी घेणे पसंत केले. कालच्या पेक्षाही आज खूप थंडी असणार आहे असे सांगितले होतेच. त्यामुळे थर्मल्स व कपडे, जॅकेट मिळून ४ लेयर केले. आमच्याकडे जॅकेट व्यतिरिक्त गरम असे कपडे नव्हतेच. गुंजीत थर्मल घेतलेले, तेच कामी येत होते. सगळेजण साधारण अशीच तयारी करुन आले व ५.३०ला नाश्ता करून आम्ही गुंजी सोडले.

सकाळी ५.३०लाही छान उजाडले होते. आमच्या गाडीने गुंजीचे पहिले चढाचे वळण घेतले व चालकाने गाडी बाजूला घेतली. खिडकीतून पहातो तो बाकीच्या गाड्या खालीच थांबलेल्या. आमच्या दक्षिणी बंधुंची गाडी बंद पडली होती. कालही ओम पर्वताहून परत येताना त्यांची गाडी बंद पडलेली, बुधीहून गुंजीला येतानाही वाटेत काहीतरी अडचण आलेली. आज आता इजा बिजा, तिजा झाले. परत त्यांना मागील दोन वेळेसारखे इतर गाडीत ॲडजस्ट करुन यावे लागणार अशी चिन्हे दिसू लागली. आम्ही टेकडीवर होतो. त्यामुळे खाली काय चालले ते कळत नव्हते. पण सगळेजण गाडीतून खाली उतरुन चर्चा करताना दिसत होते.
Khali gadi band padli astana.jpg

थोड्यावेळाने काहीतरी मार्ग निघाला असावा. सगळ्या गाड्या वेगाने निघाल्या.

आजचा रस्ता कालच्या पेक्षा थोडा लांबचा होता. मधे कुट्टी गावात चेकपोस्ट आहे. तिथे बराच वेळ गेला. पण हवा खूप छान होती. आम्ही थांबलो तिथे एक विस्तीर्ण पठार होते, अगदी हिरवेगार. पलिकडे दरी, दरीतून खळाळत वहाणारी नदी, समोर मोठाले डोंगर. अगदी नयनरम्य दृश्य होते. वेळ कसा गेला ते कळालेच नाही. कुट्टी गाव हे खरंतर कुंती गाव. येथे पांडवकिला म्हणून काही अवशेष दाखवले जातात. तसेच ५शिखरांचा पांडव पर्वतही रस्त्यात दिसतो. "पांडवांनी वसवलेले हे गाव" असे सांगतात.

या मार्गावरील शेवटचे गाव : कुट्टी
5_shevatche gav kutti.jpg

आदि कैलासचा रस्ता खूप छान बनवलाय. त्यामुळे बाजूचे नजारे बघत; मजा लुटत आपण पुढे जातो. इथेच चालकाने आम्हाला उदाची झुडूपे दाखवली. निखाऱ्यावर उदा सारखीच ही झुडूपे वाळवून टाकतात. त्याचा वास छान येतो. आम्ही गाडी बाजूला घेऊन थोडी पाने हाताळली. खरोखर छान सुगंध होता.
नदीची साथ :
3_Nadichi sath.jpg

उदाची झुडुपे :
Udachi zudupe.jpg

थोडे पुढे गेल्यावर परत एकदा गाडी थांबली. आता समोर कैलास शिखर दिसू लागले होते. बाजूला पार्वती मुकुट आणि अजून काही शिखरे दिसत होती. कैलासचे प्रथम दर्शन छान झाले. आकाश स्वच्छ होते. पहिल्या दर्शनात पर्वत जणू आपलीच वाट पहात बसलाय असे वाटले. काल गेलेल्या यात्रींना पाऊस लागला होता. पण आज जणू आमच्यासाठीच सूर्यदेवांचे आगमन झाले होते.

प्रथम दर्शन :
adi kailas pratham darshan.jpg

बाहू पसरून बोलावणारा आदिकैलासः
adikailas bahu pasrun bolavtoy.jpg

दर्शन घेऊन लगेच गाडीत बसलो व पहाता पहाता जोलिंगकाँगला पोहोचलो देखील. घोडेवाल्यांची गर्दी होतीच. गाड्या लावून बाजूने कॅम्पमधे जावे लागते. नेहमी प्रमाणे जयकारा, चहा, सरबत, गरमपाणी झाले आणि लगेचच आम्ही पार्वती सरोवराकडे मार्गस्थ झालो. काल पर्यंत "गौरीकुंडला कुणी जाणार का?" असे विचारल्यावर सगळेच नाही म्हणत होते. अर्थात, काही मोजके अपवाद वगळून. पण आज गाईडनी पुन्हा विचारल्यावर सगळ्यांनीच जाण्यास पसंती दर्शवली.मनातून सगळ्यांना जायचे होतेच. माझ्यासाठी घोडा करणार हे निश्चित झाल्यावरच मी गौरीकुंड दर्शनही पक्के केले. शंतनूचे मात्र आधीपासूनच चालत जायचे ठरले होते. रस्त्यात लोकं वेळ लागतो एवढंच सांगत असले तरी इथे हवा चांगलीच विरळ होते. त्यामुळे काळजी घेणे चांगले.

आम्ही ६ जणांनी घोडा ठरवला. घोडेवाला आपल्याला पार्वती सरोवर व गौरीकुंड दोन्हीकडे घेऊन जातो. त्यांचे तसे पॅकेज आहे. आपल्याला गौरीकुंड नको असेल तरी पैसे पूर्ण लागतात. त्यांना दिवसातून एकदाच काय ती फेरी मिळते.

घोडेवाले सोडून बाकीचे चालत निघाले. घोडा केल्याने चालणाऱ्यांपेक्षा त्रास कमी होतो. परंतू नुकतीच घडलेली एक घटना आल्या आल्या आम्हाला कळाली होती. २ दिवसांपूर्वीच, गौरीकुंडाच्या मार्गावर एक महिला घोड्यावरून पडून त्यांचा मृत्यू झाला होता. लोक सांगत होते, "वरून दगड आला म्हणून घोडा बॅलन्स करायला गेला आणि महिलेने घोड्याला पक्कं पकडले नसल्याने त्या पडल्या." प्रत्यक्षात आपण जेंव्हा घोड्यावर बसतो तेंव्हा खरी परिस्थिती कळते. लगाम घोडेवाल्याच्या हातात आणि आपल्याला पकडायला असे काही नसतेच. घोड्याचे खोगीर असते त्याला एक छोटासा उंचवटा असतो त्यात बोटे कशी बशी खुपसायची. ही आजिबात पक्की पकड नसते. त्यामुळे वरील परिस्थिती आली तर नवख्या माणसाला काही करणे अवघडच आहे. असो. आपण आता पुढे जाऊया.

प्रथम पार्वती सरोवराचे दर्शन घेतात. पार्वती सरोवरापर्यंत छान मोठा मार्ग आहे त्यामुळे घोडे व पादचारी नीट चालू शकतात. चालत अर्धा ते पाऊण तासाचा छोटासा चढ चढून आपण जातो. घोडा असेल तर साधारण २० मिनिटे. पार्वती सरोवराजवळ शंकराचे एक मंदिर आहे. हा सगळा परिसर अगदी मोकळा असल्याने आदिकैलासचे दर्शन सतत होत असते. घोडा मंदिरापासुन थोडा दूर थांबवतात. ५मिनिटे चालून आपल्याला मंदिरात जाता येते. मी पोहोचले तेंव्हा फक्त आम्ही घोडेवाले यात्री व काही तुरळक यात्री मंदिरात होते. खूप शांत आणि प्रसंन्न वाटत होते. आम्ही दर्शन घेऊन लगेच मंदिराच्या मागच्या बाजूला गेलो तिथून पार्वती सरोवर आणि आदि कैलास असे छान दर्शन होत होते. थोडा वेळ तिथे थांबून मंदिरात येऊन बसले. तोवर चालणारी माणसे यायला लागली होती. थोड्याच वेळात भरपूर गर्दी झाली. ध्यान लावणारे, शंकराचा जयजयकार करणारे.. भरपूर लोक. त्यात आजकाल मोबाईलवर मोठ्याने भजन लावून चालायची काय फॅशन आलीय देव जाणे. नुसता गोंधळ! त्यापेक्षा अश्या ठिकाणी स्वत: बरोबर थोडा वेळ बसावं. आपण या कोलाहलाकडे साफ दुर्लक्ष करून शांत बसावं, तिथली एनर्जी जेवढी आत मुरवता येईल तेवढी मुरवावी आणि चार्ज व्हावं. खुप प्रसंन्न वाटतं. मनाची पाटी कोरी होते. इथे सगळीकडे एक वेगळेच भारलेले वातावरण वाटले.

पार्वती सरोवराकडे जाणारा मार्ग :
4_Parvati sarovarakade jatana.jpg

पार्वती सरोवर :
Parvati sarovar.jpg

नितळ पाणी:
PS2.jpg

हा अजून एक :
PS3.jpg

पार्वतीसरोवरात उतरुन ते तीर्थ बाटलीत भरून घेतले.
Pani bhartana.jpg

इथून परत काही आदि कैलासचे फोटो घेतले: उन्हातला आदि कैलास :
unhatala kailas.jpg

ह्या फोटोत मला उगाच गणेशाचे मुख असल्याचा भास होतो :
hy photot ganeshache mukh aslyacha bhas hoto mala.jpg

आता गौरी कुंडाचा मार्ग चालायचा. खालून गौरी कुंडाचा मार्ग तसा लहान दिसतो पण प्रत्यक्षात बऱ्यापैकी चालायचे असते. माझी घोड्यावर बसायची पहिलीच वेळ. घोडा वाकला की थोडे आपल्याला बॅलन्स करायचे असते. तसेच चढावर जाताना पुढे वाकायचे व उतारावर मागे. ही सगळी सर्कसच वाटत होती. आता आम्ही पार्वती सरोवराकडूनच मागे न जाता, एका टेकडीकडे चालू लागलो. टेकडीपेक्षा उंचवटा म्हणूया. मधेच चिखलाचा भाग लागला व घोड्याचे पाय मधून अधून सटकु लागले. पण आजूबाजूला भरपूर जमीन होती. घोडेवाला कौशल्याने घोड्याला नेत होता. तो उंचवटा पार करून एक पाणथळ जागा लागली. तीला भीम की खेती किंवा पर्वती मां की खेती म्हणतात. इथे दरवर्षी आपोआप धान्य उगवतं. आत्ता, ते धान्य, आम्हाला गवतासारखे दिसत होते. त्यात घोडा सरळ त्या पाण्याकडे जाऊन वाकून पाणी पिऊ लागला. माझी बॅलन्स करताना नुसती त्रेधा उडत होती. आता परत बरंच चालायचे मग एकदाचे गौरी कुंडाच्या मार्गाला लागतो आपण. एवढे अंतर चालताना, पायी चालणाऱ्यांची वाट लागली असणार हे नक्की.

यापुढे एक पाऊल वाट गौरी कुंडाकडे जाते. पायी आणि घोड्याने जाणारे एकामागोमागच चालतात. ओव्हरटेक करायला जागा नाही. खालच्या दगडावरून मधूनच घोड्याचा पाय सरकल्या सारखा वाटे पण आता मी थोडी सावरले होते. त्या थंडीतही मगाशी मला घाम फुटला होता. पण आता जरा स्थिरावले होते.

आमच्या पुढे एक बाई व तिच्या पुढे तिचा ६एक वर्षाचा मुलगा असे २ घोडे होते. ती बाई स्वत: घाबरली होती, त्यामुळे दर दोन मिनिटानी घोडा कुठेही थांबवायची मग मुलाला विचारचे की त्रास होतोय का, भीती वाटत नाहीना. त्याचे वडील माझ्या मागे. मग ते मागून त्यांच्याशी मोठ्याने बोलणार.. एकूण मजाच होती. एकदा तर एका वळणावर त्यांनी परत जायचे सांगून तेवढ्याश्या जागेत घोडा १८०अंशात फिरवायला लावला तेंव्हा घोडेवाल्याची खरच दया आली. अशा रितीने मजल दर मजल करत आम्ही घोडेवाले गौरी कुंडाच्या जवळ पोहोचलो. इथे घोडे सोडायचे आणि शेवटचा चढ चालून जायचा. इथे मुंबईत असतो तर अगदी ५/१० मिनिटाचे अंतर पण तिथे कापताना भरपूर वेळ द्यावा लागतो. १६००० फूट उंचीवर तो शेवटचा चढ म्हणजे तुमच्या फिटनेसची परिक्षा आहे.

इतक्यावेळ घोड्यावर असल्याने, उतरल्यावर मी नेहमी सारखे चालायला लागले आणि ५ पावलातच श्वास फुलला. मग आठवले अगदी हळूहळू चालायचे. दर २ पावलांना थांबायचे. श्वास सोडला की जणू बाहेर थांबून वाकुल्या दाखवायचा मग त्याला ओढून आत घ्यायचे. असा श्वासाचा खेळ खेळतच खरंतर इथे चालायचे. गौरीकुंडला आपण अजून १००० फूट उंची गाठत असतो व चढ चढत असतो. त्यामुळे जास्तच कस लागतो. चालत येणाऱ्या लोकांना अगदी सलाम करावासा वाटला. आता अगदी २ पावले उरली असताना दमसास संपला. आपण चढू शकत नाही वाटायला लागले. शंकर नेहमी कठोर परिक्षा घेतो हे वाचले होते. त्याची ही प्रचितीच होती. अगदी सगळ्याचा त्याग करूनच शिवमय होता येते.. अगदी श्वासाचाही त्याग! मगच ते संपूर्ण शुद्ध, निरामय रूप पहायला मिळावे ना!

इथे आल्यावर विचार आला की गण असे का रहात असतील. म्हणजे जे शिवगणांचे वर्णन करतात तसे. एवढ्या थंडीत कोण आंघोळ करेल रोज. शिवाय खायल्या, प्यायला काही नाही. शिवाचे नामस्मरण हेच काय ते जीवन. जिथे श्वासाचाही कस लागतो तिथे बाकी गोष्टीतून मन आपोआपच निवृत्त होत असेल. आणि कदाचित, त्या परम शुद्धतेच्या सान्निध्यात बाकी अशुचिता निघूनही जात असेल. इथे २ पावले टाकणे कठिण पण माझा कल्पनाविलास तरी पहा. मनाबद्दल बहिणाबाई म्हणतात ना "आता होतं भूईवर, गेलंगेलं आभायात"! मी थांबूनच घेतलं. स्वत:ला ढकलायची हीच ती वेळ. देवाचे नामस्मरण केलं आणि ती शेवटची २ पावले पूर्ण केली मात्र, समोरचं दृश्य पाहून हरखून गेले. समोर गौरी कुंड होते. त्याच्या अगदी काठापर्यंत बर्फाचे डोंगर आलेले.आदिकैलासचा पायथा जवळ दिसत होता. आपण आणि ते चरण यांच्या मध्ये गौरीकुंडाचा पूल जणू. त्या गौरीकुंडाच्या बाजूने उभ्या असलेल्या उंच पर्वतासमोर आपण किती खुजे आहोत याची जाणीव झाली. पण कष्टाने इथे पोहोचल्याचा खूप आनंद झाला. तसे गौरी कुंडात पाणी खूप नव्हते पार्वती सरोवरासारखे. बाजूच्या पर्वतांवरून बर्फ वितळून तयार झालेले वाटत होते. वहाते पाणी होते.

2_gaurikunda.jpg

गौरीकुंड आणखी एक फोटो:
GK2.jpg

बर्फामुळे वातावरणातील गंभीरता अजूनच वाढलेली. समोर आदि कैलास. क्षणभर डोळे आपोआप मिटले गेले, जणू समोरचे दृश्य आत बंद केले. एक वेगळीच उर्जा जाणवली, थकवा तर कुठच्या कुठे निघून गेला. नेमके काय वाटले, अनुभवले ते शब्दांत मांडणे कठीण. मन अपार शांतीने भरून गेले आणि त्याबरोबर उर्जेने देखील. कदाचित थंडीच्या दिवसात कुडकुडताना कोवळ्या उन्हात बसावे, असेच काहीतरी.

मी बसलेले असतानाच मागून मामीजी, प्रधानजी आले. आमच्या वेळेत ५एक मिनिटाचा फरक असेल फारतर. म्हणजे हे लोकं घोड्याच्या वेगाने चढून आले होते. त्यांचे वय ६०च्या पलिकडेच होते. त्यांची ताकद, दमसास बघून आदर वाटला त्यांचा. आता लोकं गौरी कुंडाच्या पाण्याजवळ जायला उतरत होती. आम्हाला इथे फार वेळ थांबायचे नाही हे कटाक्षाने सांगितले होते. मी त्याचे पालन करत परतायचे ठरवले. मनोमन पायी चालणाऱ्यांना शक्ती मिळो ही प्रार्थना केली व मागे वळले. घोड्यांपर्यंत आता सहज आले. एक तर विश्रांती झाली होती आणि आता उतार होता. उंचीही कमी कमी होणार होती. मी चालणार आहे असे घोडेवाल्याला सांगितले. उतरताना खूप छान वाटत होते. सगळे दर्शन छान झाल्याचे समाधान असल्याने पावले सहज पडत होती. थोडा वेळ असेच आनंदविभोर अवस्थेत चालताना घोडेवाल्याने अडवले. आता बसाच घोड्यावर असे म्हणू लागला. "मला काही त्रास होत नाहीये व मी चालू शकतेय", म्हणाले तरी, "तुमची जबाबदारी आहे आमच्यावर तुम्हाला नीट पोहोचवले पाहिजे व पुढे कुठेही घोड्यावर बसायला नीट उंचवटा नाही, म्हणून आता बसाच घोड्यावर " असा युक्तीवाद त्याने केला. मला त्याने घोड्यावर बसवलेच. थोड्याच वेळात मागे राहिलेले कुंडाकडे जाणारे काही लोक भेटले. शंतनूही भेटला, अगदी लालबुंद झाला होता चालून चालून. त्यांना अगदी थोडेच राहिले आहे असा दिलासा देऊन आम्ही पुढे निघालो. घोड्याची १५/२० मिनिटे म्हणजे चालत किमान ३०/४० मिनिटे त्यांना लागणार होती.

खाली आल्यावर रस्त्यामधे एक शिवमंदिर आणि असे विस्तीर्ण पठार लागते :
khali ase vistirna pathar aahe.jpg

घोडेवाल्याने अगदी कॅम्प पर्यंत मला सोडले. इतकावेळ आजिबात न जाणवलेला विरळ हवेचा त्रास आता मला खाली आल्यावर जाणवू लागला. थोडा वेळ शांत बसून गरमपाणी घोट घोट पित राहिले. सगळी घोडे वाली मंडळी आल्यावर आम्ही थोडे जेवून घेतले. खरंतर १.३०वाजत आलेला. पण कुमाऊ मंडलची माणसे आम्ही २/३ जण जमलो की अन्न गरम करून, पोळ्या ताज्या करून आम्हाला गरम गरम वाढत होती.अश्यावेळी, त्यांच्या या प्रेमाने खरोखरंच भरून येतं. मला जेवल्यावर जास्तच मळमळायला लागले. उलटी नाही पण अस्वस्थता. त्यांनी इथे २ तंबू उघडले होतेच. गाद्या आणि चादरी दिल्या व आराम करा म्हणाले. तिथे १८/१९ वर्षाचा मुलगा काम करत होता. तो म्हणाला, "इथे हे असे होतंच; दुर्लक्ष करत काम करत रहायचे". या लोकांच्या कष्टाचे कौतुक करावे तेवढे कमीच.

बायकांच्या तंबूत तिथल्या पोलीसांची तात्पुरतीची कंट्रोल रुम होती. त्यादिवशी मा. जे. पी. नड्डाजी आदिकैलास आणि जवानांना भेट देणार होते. त्यांचे अपडेटस सतत अधिकारी मिनिटा मिनिटाला घेत होते. आता गुंजीहून निघाले, कुट्टीला पोहोचले. रस्ते रिकामे ठेवा वर शिव मंदिरात कुणाला जाऊ देऊ नका. यात्रींना खाली उतरवा इ. इ. माझ्या नजरेसमोरुन मात्र शंतनूचा चेहरा जाईना. तो सुखरूप खाली येऊ दे म्हणून महादेवाचा जप करत बसले. त्याला फार चढ चढणे कठीण जाते हल्ली. आणि हे कार्य अवघडच होते. दुपारी हिमवृष्टी सुरु झाली तशी यात्रींची सगळ्यांनाच काळजी वाटू लागली. आमचे गाईडसुद्धा त्यांच्या बरोबर होते ही जमेची बाजू होती. ३.३० पर्यंत सगळे खाली आले. त्यांचे जेवण झाल्यावर, गप्पांच्या आवाजाने आम्हाला कळाले. आम्ही सगळेच एकमेकांना भेटलो. सगळे सुखरुप आहेत हे पाहून खूप आनंद झाला. सगळ्यांची जेवणे झाल्यावर ताबडतोब गाईडनी निघायला सांगितले. आम्ही गाडीत बसलो खरे पण नड्डाजींचा ताफा तोवर जवळ आलेला म्हणून मग थांबावे लागले. शंतनूचे हात गारठून गेले होते. गुंजीत घेतलेल्या हातमोज्यांनी त्यांचे काम चोख पार पाडले. माझ्या जवळचे हात मोजे त्याला दिल्यानंतर, चांगला आराम पडला.

चला परतीच्या प्रवासाला :
1_chala partichya margala.jpg

संध्याकाळी ६ पर्यंत आम्ही बुधीला पोहोचलो. गरम गरम चहा पिऊन सगळ्यांना बरे वाटले. इथे कैलास मानसरोवर यात्रेची तयारी सुरु झालेली. त्यामुळे तंबूना नवा रंग देणे, मेन गेटची दुरुस्ती, तंबूंचे छत बदलणे इत्यादी कामे जोरात सुरु होती. त्या रंगाच्या वासाने मला अजूनच मळमळू लागले. शेवटी मी सूप पिउन झोपण्याचा निर्णय घेतला. सगळ्यांना सांगितले की मी झोपतेय आणि मला जेवायला उठवू नका. तंबूत येऊन जे झोपले ते दुसऱ्या दिवशीच ऊठले.

आजचा दिवस एक वेगळा व दुर्मिळ अनुभव देऊन गेला. दिवसभर जणूकाही एका ट्रान्समधेच वावरत होते. ठरलेल्या सगळ्या गोष्टी, महदेवांच्या कृपेने, नीट पार पडल्या होत्या. उद्यापासुन परतीचा प्रवास.

क्रमशः

पुढील भाग :
https://www.maayboli.com/node/86987

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान वर्णन केलेय निकु. मलाही तिथे पोचल्यासारखे वाटले आणि हुडहुडी भरली Happy

निसर्गाच्या इतक्या जवळ असल्यावर आपसुकच मनातली जळमटे स्वच्छ होतात आणि सभोवालचा सत्यं शिवम दिसायला लागतो. खरेच जायला हवे एकदा.

मलाही तिथे पोचल्यासारखे वाटले आणि हुडहुडी भरली Happy >> धन्यवाद साधना! पुढचेही भाग आता लवकर लवकर येतील कारण फोटो कमी आहेत Happy

छानच

मनात फार इच्छा निर्माण होते वाचता वाचता

आजच तिकडे झालेल्या ढगफुटीची बातमी वाचलीय
पंचकैलास बद्दल माहिती आहे
व्हिडीओ पाहिलेत
अद्भुत आहे ते 5 ही ठिकाणी जायला मिळणे