कोविड १९ : आव्हान Omicron चे

Submitted by कुमार१ on 2 December, 2021 - 09:07

शेवटचे अद्यतन : ३१/१२/२०२१
मागचा धागा इथे : https://www.maayboli.com/node/78680?page=19
……..
चालू महासाथीचा मागचा धागा काढताना मनोमन अशी इच्छा व्यक्त केली होती की, तो शेवटचा धागा ठरावा आणि लवकरच आजार पूर्ण गाडला जावा. दुर्दैवाने तसे काही होण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून Omicron नावाच्या करोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराने तोंड वर काढले आहे. त्याचे नाव ग्रीक वर्णमालेच्या पंधराव्या अक्षरानुसार दिलेले आहे.
( Omicron च्या उच्चाराबाबत भाषातज्ञांमध्ये मध्ये मतभेद आहेत. खुद्द ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार सुद्धा त्याचे चार उच्चार असून त्यावर एकमत नाही ! इंग्लिश उच्चारानुसार बऱ्याच ठिकाणी "OH-my-kraan असे दिलेले दिसते).

हळूहळू Omicron चा जगभर प्रसार होत आहे. सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या काही रुग्णांच्याबाबत डॉक्टरांची निरीक्षणे अशी होती :
१. ज्या लसवंतांना नवा संसर्ग झाला आहे त्यांची लक्षणे सौम्य आहेत. अशांवर घरीच उपचार चालू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
२. असे अधिकतर रुग्ण तरुण वयातील आहेत
३. जे बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यापैकी 90 टक्के बिगर लसवाले आहेत.

अलीकडील बातमीनुसार त्यांच्याकडील रुग्णसंख्येचा आलेख आता कळसबिंदू पार होऊन होऊन खाली खाली येत आहे. एकंदरीत विचार करता हा आजार सौम्य होण्याकडे झुकत आहे.
विषाणूचा Omicron व आधीचा डेल्टा प्रकार यांची पाश्चिमात्य देशांतील एकंदरीत तुलना खालील चित्रातून चांगली समजेल.

omic and delta.jpg

सार्स 2 च्या भावी उत्क्रांतीबद्दल वैज्ञानिकांचे अंदाज :
१. एक तर तो सामान्य सर्दीच्या विषाणूप्रमाणे सौम्य होईल किंवा इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे घातकही राहील.
२. विषाणूच्या उत्क्रांतीगणिक तो सौम्य होतो ही एक समजूत आहे. पण काहींच्या मते ते मिथक आहे. वास्तव अधिक गुंतागुंतीचे असते.
३. या विषाणूचे प्राणिजन्य साठे वाढतेच आहेत. मिंक व हरणाच्या एका जातीत त्याचे सातत्यपूर्ण वास्तव्य आणि भ्रमण चालू आहे. त्यातून नवी उत्परिवर्तने होण्याचा संभव राहतो. ही आपल्या दृष्टीने डोकेदुखी ठरते.
नव्या घडामोडींची भर जशी माहिती मिळेल तशी घालत राहू.

* जशी Omi बाधितांची संख्या वाढते आहे तशी काही उपयुक्त माहिती मिळते आहे. यामुळे बाधित असलेल्या काही रुग्णांमध्ये खालील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे दिसून आली आहेत:

* मळमळ
* भूक खूप मंदावणे
* रात्री प्रचंड घाम येणे, अगदी शरीर निथळून निघेल इतका.
या रुग्णांमध्ये वास व चव संवेदनेवर परिणाम झालेला नव्हता.

उपचारांच्या आघाडीवर अद्यापही रामबाण असे विषाणूविरोधी औषध मिळालेले नाही. संशोधन चालू आहे.
१. Molnupiravir या तोंडातून घ्यायच्या औषधाला मध्यंतरी इंग्लंडने आणि नुकतीच अमेरिकी औषध प्रशासनानेही आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे. वय 18 वर्षावरील लोकांसाठी ते वापरायचे आहे. पाठोपाठ भारतीय औषध प्रशासनानेही याला आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे.
गरोदर स्त्रियांसाठी त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्यात यावा. त्याचे संभाव्य दुष्परिणाम जुलाब, मळमळ व चक्कर येणे असे आहेत.

2. Paxlovid या नव्या गोळीस आपत्कालीन मान्यता मिळाली आहे. हे २ औषधांचे मिश्रण असून त्या बद्दल अजून काही माहिती:
हे औषध फक्त खालील रुग्णांसाठी वापरायचे आहे :
१. rt-pcr चाचणी होकारात्मक आलेली.
२. ज्यांचा आजार गंभीर होण्याचा धोका आहे त्यांनी.
रोग निदान झाल्यावर हे औषध लगेच चालू करायचे आहे.
संभाव्य दुष्परिणाम :
चव-संवेदना कमी होणे, जुलाब, रक्‍तदाबवाढ आणि स्नायूदुखी.

नव्या लसी
भारतात नुकतीच दोन नव्या लसीना आपात्कालीन वापराची मान्यता मिळाली आहे. त्या लसी याप्रमाणे :

१. Corbevax : ही प्रोटीन सबयुनिट प्रकारातील स्वदेशी निर्माण झालेली आहे.
२. Covovax : यात नॅनोकणांचा वापर केलेला आहे.

आता भारतात सध्या एकूण आठ लसीना वापरासाठी मान्यता मिळालेली आहे.

नेहमीचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच त्रिसूत्री अजून बराच काळ चालू ठेवणे हे आपले एक महत्त्वाचे लढण्याचे अस्त्र असेल.
एकंदरीत जगभरात हा संसर्ग वाढत असल्यामुळे विविध प्रशासनांनी लोकांवर काही प्रमाणात संचार निर्बंध लावले आहेत. नाताळच्या दिवशी जगभरात मिळून ६००० विमान उड्डाणे रद्द केली गेली.
…….
लसीकरण : नवे संशोधन
डीएनए प्रकारची लस भारतात लवकरच उपलब्ध होईल असे अलीकडील बातमीवरून दिसते. त्या प्रकाराची शास्त्रीय माहिती :
१. सध्या जगभरात या प्रकारातील बारा लसी प्रयोगाधीन आहेत. त्यातली पहिली ( ZyCoV-D) भारतात उपलब्ध होईल.
२. ही लस सुईविरहित उपकरणाने दाबतंत्राचा वापर करून त्वचेखाली दिली जाते. हे पारंपरिक इंजेक्शन नसल्यामुळे संबंधित व्यक्तीस वेदना खूप कमी होते.
३. भारतातील लस तिच्या प्रयोगादरम्यान २८,००० लोकांवर वापरण्यात आली. त्यादरम्यान विषाणूचा डेल्टा प्रकार जोरात होता. त्या वातावरणात लसीने 67% परिणामकारकता दाखवली आहे.
४. तिचे उत्पादन तंत्रज्ञान सोपे आहे.
५. आरएनए लसींच्यापेक्षा ही लस अधिक टिकाऊ स्वरूपाची आहे.
६. मात्र तिचा पुरेसा परिणाम दिसून येण्यासाठी किमान तीन डोस द्यावे लागतील असे दिसते.
...................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेमंत
या प्रश्नाला एकच असे उत्तर नाही. ज्या त्या वेळच्या सामूहिक प्रतिकारशक्तीवर ते अवलंबून राहील .
आता बर्‍यापैकी प्रतिबंधात्मक उपाय झाले आहेत आणि होत आहेत.
त्यामुळे नवा प्रकार लवकर आटोक्यात यावा अशी अपेक्षा आहे.

कर्नाटकात मिळालेल्या दोन केसेस पैकी एक द.आफ्रिकेतून आला होता. द.आफ्रिकेतून निघताना केलेली टेस्ट निगेटिव्ह. इथे पॉझिटिव्ह.
हा निगेटिव्ह होऊन परत गेला.

तर दुसरा स्थानिक डॉक्टर आहे. No foreign travel history.
म्हणजे ओमायक्रॉन भारतात कधीच पोचला आहे.

दोघेही पूर्ण लसीकरण झालेले होते आणि
आता निगेटिव्ह झालेत.

I really wonder if anything that is comforting has ever been said by the WHO fraternity except protecting their hind

I really wonder if anything that is comforting has ever been said by the WHO fraternity except protecting their hind
I Agree

>>>>>>>>>I really wonder if anything that is comforting has ever been said by the WHO fraternity except protecting their hind

हाहाहा खरे आहे.

सॉरी माझा प्रश्न इथेच विचारते आहे, लहान मुलांना ह्यापासुन किती धोका आहे कारण त्यांचं लसीकरण झालेलं नाहीये?
ओमिक्रोन आला नसता तर मुलीला भारतात घेऊन जायचा विचार होता पण आता जरा काळजी वाटते आहे. वय 11 वर्षे. इथे 12च्या पुढे लस उपलब्ध आहे.

युनिसेफच्या माहितीनुसार तरी या प्रकाराचा मुलांना अधिक धोका आहे का, याबाबत अद्याप काही समजलेले नाही. बिगर लस वाल्यांना धोका अधिक आहे एवढीच माहिती मिळते.

https://www.unicef.org/coronavirus/what-we-know-about-omicron-variant

अजुन एक प्रश्न
इन्फेक्शन
१) विषाणू चा शरीरात प्रवेश.
२) शरीरातील विशिष्ट भागातील पेशी ल चिकटने( हे विषाणू नुसार विशिष्ट भाग वेगळा असतो का? हा पहिला प्रश्न.
३) आणि विषाणू ला प्रवेश सहज मिळाला,त्यांनी त्याच्या कॉप्या बनवायला सुरुवात केली हे सर्व मान्य.
पण रोग निर्माण करण्याची क्षमता ही कशावर अवलंबून असते ?
जास्त प्रजा विषाणू नी वाढवली की रोग तीव्र असतो की असे काही नाही?

कालपासून सतत सांगताहेत मास्क, डबल मास्क व फिजीकल डिस्टसिंग. आपल्या इथे किती जण व्यवस्थित योग्य तर्हेने मास्क घालताहेत ... शास्त्रापुरता घालतात म्हणजेच पोलिसांनी पकडू नये म्हणून कानावर लटकलेला असतो . गणपतीपासून ते दिवाळीपर्यंत बाजारात प्रचंड गर्दी होती कुठे डिस्टसिंग पाळल्या गेलं ? तरी आपल्याकडे परिस्थीती बरी होती इतर देशांच्या तुलनेत. तर ह्या दोन्ही गोष्टींनी खरंच संरक्षण मिळतंय का? मुलांना धोका आहे म्हटलं होतं पण तसंही काही घडलं नाही. ...

त्रिसूत्रीमधील कुठल्याच एका गोष्टीचा पूर्ण प्रभाव पडत नाही. परंतु त्या सर्वांचा अंशतः प्रभाव एकत्रित केल्यास बऱ्यापैकी फायदा होतो.
अर्थात यावरही सुरुवातीपासूनच तज्ञांमध्ये एकमत नाही.

भारतासारख्या देशात सार्वजनिक ठिकाणी खोकताना आणि शिंकताना पटकन नाकातोंडापुढे रुमाल धरावा याचे भान बहुसंख्य लोकांना नाही. त्यासाठी मला त्रिसूत्री आवश्यक वाटते.

दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहिला ना आपल्याकडे? तेव्हाही दक्षता घेतल्या गेली नव्हती, परिणामी जास्त फटका बसला.
तिसरी लाट येण्याची शक्यता होती पण आली नाही याचा अर्थ त्रिसूत्रीत तथ्य नाही असा होत नाही.
ओमायक्रॉनची लाट आली तर तीव्रता कमी करण्यास त्रिसूत्री मदत करू शकेल.

पण त्रिसूत्री नीट कशी पाळायची हे कित्येकांना माहीत नाही, किंवा वळत नाही. हनुवटीवर मास्क, तोंड झाकलंय पण नाक नाही, मास्कला मध्यभागी स्पर्श करून नाकावर /हनुवटीवर करणे, रस्त्याने मास्क घालून जाणे आणि मित्र मैत्रिणी ओळखीचे एकत्र येऊन मास्क काढणे, शिंकताना मास्क काढणे, मास्क घातला की सोशल डीस्टन्स न पाळणे,
इतरवेळी हात धुणे/सॅनिटायझर वापरणे पण नेमके जेवायच्या वेळी नाही वगैरे.
मग लाट आली की त्रीसुत्रीचा काय उपयोग, ती पाळूनही आलीच की असेही म्हणतात.

आणि अर्थात त्रिसूत्री ही काही गॅरंटी नाही.
दुचाकीवर हेल्मेट वापरण्यासारखे / सीटबेल्ट लावून एअर बॅग शाबूत आहेत की नाही याची खात्री करून कार चालवणे या सारखा उपाय आहे तो. अपघात न होण्याची, अपघात झालाच तर काहीही इजा न होण्याची गॅरंटी नाही. पण झालाच तर कमी इजा होण्याची, जीव वाचण्याची शक्यता वाढते.

त्रिसुत्री मान्यच आहेत पण हे काटकोरपणे पाळल्या गेलं नाही व रुग्णांची (इतर देशांच्या तुलनेत फ्रान्समध्ये पाचवी असं बातमीत दाखवलं आज) आटोक्यात आहे..... म्हणून शंका कितपत संरक्षण मिळतंय? दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहिल्यानंतर घाबरून खरं तर त्रिसुत्री काटेकोरपणे पाळायला हवी होती पण तसं दिसलं नाही. वाघ म्हटलं तरी खातो वाघोबा म्हटलं तरी खातो अशी लोकांची अवस्था झालीये का?

South आफ्रिका मधून सरळ किंवा via येणार एक पण प्रवासी समाजात आला नाही पाहिजे होता.
इथे फटके खावून सुद्धा भारत सरकार आणि राज्य सरकार सुधारत नाहीत.
एअरपोर्ट वरून सर्व प्रवासी लोकांस उचलून अतिशय सक्ती नी विलागिकरण करणे गरजेचे होते.
पण
मुंबई मध्ये आलेले प्रवासी गायब
दिल्ली मध्ये आलेले प्रवासी गायब
बंगलोर मध्ये आलेले प्रवासी गायब
काय बकवास प्रशासन आणि सरकार आहे.
आता दोन चे कन्फर्म नवीन varriant चे रोगी आहेत त्या मधील एक महाभाग तर positive असून पण दुबई वारी करून परत आला आहे.
का सामान्य लोक नियम पाळतील.
सरकारी यंत्रणा च बकवास आहे.

GlaxoSmithKline ने ओमि. विरोधात Sotrovimab या औषधाचे प्रयोग सुरू केले आहेत

साधारण दोन आठवड्यात काहीतरी निष्कर्ष मिळावेत.

बऱ्याच भारतीयांकडे कोविड विरोधातील संकरित प्रतिकारशक्ती (संसर्गाची अधिक लसीची) असल्यामुळे ओमायक्रोनबद्दल घाबरू नये असे सीएसआयआरच्या प्रमुख वैज्ञानिकांनी सांगितले आहे.
आशादायक विधान.

https://www.republicworld.com/amp

४०+ नागरिकांना तिसरा (बूस्टर) डोस द्या अशी सूचना शास्त्रज्ञांच्या एका गटाने केली आहे. याबाबतचा निर्णय तज्ज्ञ घेतील असं सरकारने लोकसभेत सांगितलं.

अवांतर - लस , सिरिंज बनवणार्‍या कंपन्यांचे शेअर्स घेऊन ठेवावेत.

भारताचा आढळलेल्या ५ ओमायक्रोन बाधितांत सध्यातरी लक्षणविरहित अवस्था किंवा सामान्य सर्दी पडसे आणि अंगदुखी यासारखी लक्षणे आहेत.

https://www.google.com/amp/s/www.hindustantimes.com/india-news/weakness-...

या विषयावर काही वाचू नये असे वाटते. बातम्याही पाहू नयेत एवढा वीट आलाय.
अज्ञानात खूप सुख असतं असं वाटू लागलंय....
मरणापेक्षा मरणाची भितीच श्रेष्ठ....
एक दीड वर्षं भरपूर सोसलं बहुतेकांनी...आता नको वाटतं...
रोज रात्री झोपण्यापूर्वी पसायदान ऐकतो...जो जे वांछील आले की पहिले करोना जाऊ दे म्हणतो...

३. जे बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यापैकी 90 टक्के बिगर लसवाले आहेत. >> माझ्या मते हा मुद्दा महत्त्वाचा आहे. लहान मुले, गर्भवती महिला असे अपवाद वगळता, जे लोक संधी असूनही लस घेत नाहीत, त्यांच्याबद्दल अजिबात सहानुभूती नाही.

पहिल्या लाटेच्या वेळी (एक) मास्क वापरायला सांगितला, दुसऱ्या लाटेच्या वेळी दोन (डबल) मास्क वापरा असे सांगितले.
आता तिसरी लाट आली (खरेतर येऊ नये हीच इच्छा) तर तीन मास्क वापरायचे का??? Proud

Zycov-d ही नवी लस डीएनए तंत्रज्ञानावर आधारित असून ती 12 ते 18 या वयोगटासाठी प्रामुख्याने तयार केलेली आहे. ती देताना पारंपरिक सिरींज व सुईची गरज नसते.

एका विशिष्ट उपकरणाने ही लस त्वचेत सोडली जाते.
इथे चित्र पाहता येईल

https://indianexpress.com/article/explained/explained-zydus-cadilas-need...

एक मास्क लावला तरी अस्वस्थ वाटतं.दोन मास्क लावल्यावर तर नॉर्मल श्वास पण घेता येत नाही अगदी लक्ष देवून ठरवून घेवा लागतो.
तीन मास्क लावल्यावर माणूस covid न नाही पण गुदमरून नक्की मरेल.

एक मास्क लावला तरी अस्वस्थ वाटतं.दोन मास्क लावल्यावर तर नॉर्मल श्वास पण घेता येत नाही अगदी लक्ष देवून ठरवून घेवा लागतो.

तरीही नाकावर घट्ट N95 मास्क, संपूर्ण अंगावर PPE kit घालून प्रचंड उकाड्यातही ८ ते १२ तास रुग्णसेवा करणारे सर्व डॉक्टर, नर्सेस आणि इतर स्टाफ, ambulance ड्रायव्हर, स्मशानभूमीतील कर्मचारी इ. यांचे कितीही आभार मानले तरीही ते कमीच आहेत.

वि मु यांच्या प्रतिसादात थोडी भर घालतो.

सर्व स्तरांमधील आरोग्य सेवक आणि संबंधित अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांच्याबद्दल नितांत आदर आहेच.

मास्कबाबत अगदी अगदी वि.मु. आणि कुमारसर!

एका विशिष्ट उपकरणाने ही लस त्वचेत सोडली जाते.
इथे चित्र पाहता येईल...नवीन माहिती!धन्यवाद.

पुण्यातील CSIR-NCL व IISER या संस्था विषाणूच्या नव्या प्रकाराचा सखोल जनुकीय अभ्यास झटून करीत आहेत आणि यासंदर्भात देशासाठी महत्त्वाचे योगदान देत आहेत.
तेथील वैज्ञानिकांना शुभेच्छा व त्यांचे आभार !

Pages