कोविड १९ : आव्हान Omicron चे

Submitted by कुमार१ on 2 December, 2021 - 09:07

शेवटचे अद्यतन : ३१/१२/२०२१
मागचा धागा इथे : https://www.maayboli.com/node/78680?page=19
……..
चालू महासाथीचा मागचा धागा काढताना मनोमन अशी इच्छा व्यक्त केली होती की, तो शेवटचा धागा ठरावा आणि लवकरच आजार पूर्ण गाडला जावा. दुर्दैवाने तसे काही होण्याची चिन्हे नाहीत.
गेल्या काही आठवड्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेतून Omicron नावाच्या करोना विषाणूच्या नव्या उपप्रकाराने तोंड वर काढले आहे. त्याचे नाव ग्रीक वर्णमालेच्या पंधराव्या अक्षरानुसार दिलेले आहे.
( Omicron च्या उच्चाराबाबत भाषातज्ञांमध्ये मध्ये मतभेद आहेत. खुद्द ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार सुद्धा त्याचे चार उच्चार असून त्यावर एकमत नाही ! इंग्लिश उच्चारानुसार बऱ्याच ठिकाणी "OH-my-kraan असे दिलेले दिसते).

हळूहळू Omicron चा जगभर प्रसार होत आहे. सुरुवातीस दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या काही रुग्णांच्याबाबत डॉक्टरांची निरीक्षणे अशी होती :
१. ज्या लसवंतांना नवा संसर्ग झाला आहे त्यांची लक्षणे सौम्य आहेत. अशांवर घरीच उपचार चालू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
२. असे अधिकतर रुग्ण तरुण वयातील आहेत
३. जे बाधित रुग्णालयात दाखल झाले आहेत त्यापैकी 90 टक्के बिगर लसवाले आहेत.

अलीकडील बातमीनुसार त्यांच्याकडील रुग्णसंख्येचा आलेख आता कळसबिंदू पार होऊन होऊन खाली खाली येत आहे. एकंदरीत विचार करता हा आजार सौम्य होण्याकडे झुकत आहे.
विषाणूचा Omicron व आधीचा डेल्टा प्रकार यांची पाश्चिमात्य देशांतील एकंदरीत तुलना खालील चित्रातून चांगली समजेल.

omic and delta.jpg

सार्स 2 च्या भावी उत्क्रांतीबद्दल वैज्ञानिकांचे अंदाज :
१. एक तर तो सामान्य सर्दीच्या विषाणूप्रमाणे सौम्य होईल किंवा इन्फ्लूएंजाच्या विषाणू प्रमाणे घातकही राहील.
२. विषाणूच्या उत्क्रांतीगणिक तो सौम्य होतो ही एक समजूत आहे. पण काहींच्या मते ते मिथक आहे. वास्तव अधिक गुंतागुंतीचे असते.
३. या विषाणूचे प्राणिजन्य साठे वाढतेच आहेत. मिंक व हरणाच्या एका जातीत त्याचे सातत्यपूर्ण वास्तव्य आणि भ्रमण चालू आहे. त्यातून नवी उत्परिवर्तने होण्याचा संभव राहतो. ही आपल्या दृष्टीने डोकेदुखी ठरते.
नव्या घडामोडींची भर जशी माहिती मिळेल तशी घालत राहू.

* जशी Omi बाधितांची संख्या वाढते आहे तशी काही उपयुक्त माहिती मिळते आहे. यामुळे बाधित असलेल्या काही रुग्णांमध्ये खालील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे दिसून आली आहेत:

* मळमळ
* भूक खूप मंदावणे
* रात्री प्रचंड घाम येणे, अगदी शरीर निथळून निघेल इतका.
या रुग्णांमध्ये वास व चव संवेदनेवर परिणाम झालेला नव्हता.

उपचारांच्या आघाडीवर अद्यापही रामबाण असे विषाणूविरोधी औषध मिळालेले नाही. संशोधन चालू आहे.
१. Molnupiravir या तोंडातून घ्यायच्या औषधाला मध्यंतरी इंग्लंडने आणि नुकतीच अमेरिकी औषध प्रशासनानेही आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे. वय 18 वर्षावरील लोकांसाठी ते वापरायचे आहे. पाठोपाठ भारतीय औषध प्रशासनानेही याला आपात्कालीन वापराची मान्यता दिली आहे.
गरोदर स्त्रियांसाठी त्याचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्यात यावा. त्याचे संभाव्य दुष्परिणाम जुलाब, मळमळ व चक्कर येणे असे आहेत.

2. Paxlovid या नव्या गोळीस आपत्कालीन मान्यता मिळाली आहे. हे २ औषधांचे मिश्रण असून त्या बद्दल अजून काही माहिती:
हे औषध फक्त खालील रुग्णांसाठी वापरायचे आहे :
१. rt-pcr चाचणी होकारात्मक आलेली.
२. ज्यांचा आजार गंभीर होण्याचा धोका आहे त्यांनी.
रोग निदान झाल्यावर हे औषध लगेच चालू करायचे आहे.
संभाव्य दुष्परिणाम :
चव-संवेदना कमी होणे, जुलाब, रक्‍तदाबवाढ आणि स्नायूदुखी.

नव्या लसी
भारतात नुकतीच दोन नव्या लसीना आपात्कालीन वापराची मान्यता मिळाली आहे. त्या लसी याप्रमाणे :

१. Corbevax : ही प्रोटीन सबयुनिट प्रकारातील स्वदेशी निर्माण झालेली आहे.
२. Covovax : यात नॅनोकणांचा वापर केलेला आहे.

आता भारतात सध्या एकूण आठ लसीना वापरासाठी मान्यता मिळालेली आहे.

नेहमीचे प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच त्रिसूत्री अजून बराच काळ चालू ठेवणे हे आपले एक महत्त्वाचे लढण्याचे अस्त्र असेल.
एकंदरीत जगभरात हा संसर्ग वाढत असल्यामुळे विविध प्रशासनांनी लोकांवर काही प्रमाणात संचार निर्बंध लावले आहेत. नाताळच्या दिवशी जगभरात मिळून ६००० विमान उड्डाणे रद्द केली गेली.
…….
लसीकरण : नवे संशोधन
डीएनए प्रकारची लस भारतात लवकरच उपलब्ध होईल असे अलीकडील बातमीवरून दिसते. त्या प्रकाराची शास्त्रीय माहिती :
१. सध्या जगभरात या प्रकारातील बारा लसी प्रयोगाधीन आहेत. त्यातली पहिली ( ZyCoV-D) भारतात उपलब्ध होईल.
२. ही लस सुईविरहित उपकरणाने दाबतंत्राचा वापर करून त्वचेखाली दिली जाते. हे पारंपरिक इंजेक्शन नसल्यामुळे संबंधित व्यक्तीस वेदना खूप कमी होते.
३. भारतातील लस तिच्या प्रयोगादरम्यान २८,००० लोकांवर वापरण्यात आली. त्यादरम्यान विषाणूचा डेल्टा प्रकार जोरात होता. त्या वातावरणात लसीने 67% परिणामकारकता दाखवली आहे.
४. तिचे उत्पादन तंत्रज्ञान सोपे आहे.
५. आरएनए लसींच्यापेक्षा ही लस अधिक टिकाऊ स्वरूपाची आहे.
६. मात्र तिचा पुरेसा परिणाम दिसून येण्यासाठी किमान तीन डोस द्यावे लागतील असे दिसते.
...................................................

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑमिक्रॉन नेचर्स व्हॅक्सिन इ म्हणायला ठीक आहे पण अल्फा, डेल्टा सर्व व्हेरियंट्स अजूनही आहेत. कुठला मिळणार याची चॉईस असल्यासारखे का हे लेख लिहीतात लोकं??????!!!!!!!!!

सामान्य लोकांनी जास्त खोलात जावू नये.

एक तर सामान्य लोक किंवा virology शी कसलाच संबंध नसलेल्या लोकांस त्या मधले काहीच समजत नसते
त्यांचे सर्व ज्ञान ऐकीव असते कोणी तरी व्यक्त केलेली मत हेच त्यांचे ज्ञान असते.
जसे व्हायरस स्वतः मध्ये बदल करून त्याचे अस्तित्व टिकवत असतो त्या प्रमाणे मानवी शरीरातील रक्षक यंत्रणा पण update होत असणार.
हा निसर्ग नियम आहे.
सामान्य लोकांनी delta,gama,ह्यांच्या नादाला न लागता फक्त स्वतः कसे सुरक्षित राहू इतकाच मर्यादित विचार करून वर्तन करावे.

परिचितांच्या घरातील सर्वांना (बहुतेक आमिक्रोन वाला) कोव्हिड झाला आहे. सर्वांना सौम्य लक्षणं आहेत. पण घरातल्या आजोबांची rapid antigen test positive आणि RT PCR negative आली आहे. असं होऊ शकतं का?

जिज्ञासा

RAटेस्टमध्ये २% आभासी पॉझिटिवची शक्यता तशीही असते.
जेव्हा या चाचण्या शिबिरात किंवा अन्यत्र व्यापक प्रमाणावर केल्या जातात तेव्हा ही टक्केवारी अजून वाढते.

आजकाल या चाचण्यांचे बरेच संच धडाधड बाजारात आले आहेत. त्यातले योग्य प्रमाणीकरण केलेले किती हे पहावे लागेल.
हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे

home test kit किती विश्वासार्ह मानायचे ?

धन्यवाद कुमार सर! लक्षणं दिसत आहेत आणि RAT positive (घरीच दोनदा केली) पण RT PCR (एकदा केली) मात्र निगेटिव्ह आली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने लक्षणांवर उपचार सुरू आहेत. घरात सर्वजण पॉझिटिव्ह असताना एकाच व्यक्तीची चाचणी निगेटिव्ह येते हे मला जरा वेगळे वाटले. विशेषतः सारखीच लक्षणे दिसत असताना.

वर उल्लेख केलेल्या माझ्या ऑफिसातल्या कलीगची अँटिजेंन टेस्ट निगेटिव्ह आलेली. त्यामुळे आम्ही निर्धास्त होतो. पण RT PCR पॉझिटिव्ह आली तेव्हा आमचं धाब दणाणले . दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सगळ्यांना लक्षण दिसू लागली.

हा जो काही विषाणू आहे तो इतका उत्क्रांत झालाय का की एका दिवसात 5 जणांना पॉझिटिव्ह करून सोडतो ?

लागण झाली की लगेच लक्षण .
असे काही नक्कीच घडत नाही.
त्या मुलीची टेस्ट positive आली की लगेच पाच सहा तासात बाकी लोकांत लक्षण दिसू लागली जरा विचित्र वाटत आहे .
मग मूळ source ती मुलगी नक्कीच नसणार.

Swab नाकातून आणि घस्यातून घेण्याचे पण tech आहे.
नक्की कोणत्या भागातून तो collect करायचं हे माहीत हवं..
Unskil लोकांमुळे अनेक टेस्ट चुकीच्या आल्या असण्याची शक्यता पण जास्त आहे.

जाई

तो इतका उत्क्रांत झालाय का की एका दिवसात 5 जणांना पॉझिटिव्ह करून सोडतो ?
होय, हे मागच्या पानावरुन >>>>

३. शरीरात गेल्यावर त्याची मुख्य वाढ वरच्या श्वसनमार्गातच होते. फुफ्फुसांत त्याचा शिरकाव अत्यल्प असून त्यांना इजा करण्याची क्षमता खूप कमी आहे. त्यामुळे नाकातोंडावाटे त्याचा प्रसार अधिक होणार
Submitted by कुमार१ on 6 January, 2022 - 19:19

>>> वेगवान प्रसार व लाट

स्वस्ति
home test kit किती विश्वासार्ह मानायचे ?
>>>
त्याची विश्वासार्हता साधारण ८०% च्या आसपास आहे.
पण याचे एकच उत्तर नाही.
चाचणी संच उत्पादक/ नमुना लक्षणाच्या कितव्या दिवशी घेतला/ कुठून व कोणी घेतला... इ. बऱ्याच घटकांचा परिणाम होतो.

अँटीजेन पॉझिटिव्ह असेल तर RT PCR शक्यतो पॉझिटिव्ह येतेच.
ओमीक्रोन चा पसरण्याचा वेग जास्त असल्याने त्या एका व्यक्तीला आतापर्यंत झाला असेल असं मानावं. परत वेगळ्या लॅब कडून केल्यास पॉझिटिव्ह येईल.शिवाय व्यक्ती चा व्हायरल लोड बराच जास्त असेल(एकत्र खात पित असल्यास)

नाकात स्वाब करताना लोक ज्या घाबरलेल्या प्रतिक्रिया देतात,किंवा अचानक हालचाल झाली त्यामुळे एखाद्या टेक्निशियन कडून 1 स्वॅब उथळ जागेचा येऊन टेस्ट आभासी निगेटिव्ह येणे शक्य आहे.

(अँटीजेन निगेटिव्ह आली तरी तो स्वतः निगेटिव्ह असल्याचा पुरावा मानला जाऊ नये असं सगळीकडे वाचलं.लक्षणे, उपलब्धी, आजूबाजूची संपर्क हिस्टरी यावरून निर्णय घेऊन rt pcr करावीच अश्या गाईडलाईन्स आहेत.बरेचदा अँटी जेन पॉझिटिव्ह आली तर rt pcr निकाल यायची 24 तास वाट न पाहता पुढचे आयसोलेशन, उपचार लगेच चालू करता येतात म्हणून अँटीजेन आधी केली जाते.)

घरगुती Ag चाचणी >>>

यासंदर्भात काही अभ्यास व निरीक्षणे अशी आहेत :

१. Omi चा संसर्ग झाल्यानंतर शरीरात त्याची नाकापेक्षा घशात वेगाने वाढ होत आहे.
२. घरगुती Ag चाचणीचे संच नाकातील नमुन्यासाठी प्रमाणित केलेले आहेत. त्यामुळे बरेचदा नाकातील नमुन्यापासून केलेली चाचणी निगेटीव्ह येत आहे.

३. अन्य एका अभ्यासात असे दिसले की थुंकीच्या नमुन्याची चाचणी नाकातील नमुन्यापेक्षा अधिक बरोबर येत आहे.
४. सारांश : या चाचणीला मर्यादा आहेतच. लक्षणे दिसत असल्यास प्रथम विलगीकरण हे महत्त्वाचे.

हा पक्ष की तो पक्ष हा इथे मुद्दा नाही. जबाबदारीच्या पदावरील माणसांचा बेजबाबदारपणा हा मुद्दा आहे

https://www.thehindu.com/news/national/karnataka/concerns-over-violation...

एकीकडे शनिवार रविवारी कर्फ्यू आणि दुसरीकडे हजारो लोकांची पदयात्रा??

Sad नवा व्हेरियंट यायचा अशाने.
#समांतरविश्व

झ दा
होय
त्यामुळे विषाणूला वेगाने वाढत उत्परिवर्तन करण्याची संधी जास्त मिळते

वेगात प्रसार झाला की विषाणू उत्परिवर्तित होण्याची शक्यता जास्त असते.

इतके साधं सरळ निसर्गात काही घडत का?
उत्परीवरीत होतो म्हणजे जास्त रोग कारक होतो.
हे तरी सरळ धोपट पने कोणी सांगू शकत का?
निसर्गात इतके सरळ काहीच घडत नाही.
उत्परीवर्तान है विषाणू चे अस्तित्व टिकण्यासाठी च असावे.
Host चा जीव जावा म्हणून नाही.
Host चा जीव जाण्यासाठी उत्परिवर्तान विषाणू मध्ये होत असतें तर आता जग च विषाणू मुक्त झाले असते.
Host वर च विषाणू चे जीवन आहे.तोच नाही राहिला तर विषाणू तरी कसा राहील

https://maharashtratimes.com/india-news/everyone-will-get-omicron-booste...
कोविडवरील लस पुन्हा पुन्हा बूस्टर डोस म्हणून देण्यात काहीही अर्थ नाही. त्याऐवजी नव्या व्हेरिएंटला प्रतिबंध करू शकेल, अशा नव्या लसची निर्मिती होत असेल आणि ती लस दिली जाणार असेल तर ते अधिक योग्य ठरेल, असे मतही इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमोलॉजीच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. मुलियील यांनी मांडले.

>>कोविडवरील लस पुन्हा पुन्हा बूस्टर डोस म्हणून देण्यात काहीही अर्थ नाही. त्याऐवजी नव्या व्हेरिएंटला प्रतिबंध करू शकेल, अशा नव्या लसची निर्मिती होत असेल आणि ती लस दिली जाणार असेल तर ते अधिक योग्य ठरेल, असे मतही इन्स्टिट्युट ऑफ एपिडेमोलॉजीच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे प्रमुख डॉ. मुलियील यांनी मांडले.>>>
अशा वक्तव्यांचा सामान्य लोकांच्या मनावर काय परिणाम होत असेल याचा विचार केला जातो का? माझ्या मते हे बेता ल, बेलगाम आणि बेजबाबदार वक्तव्य आहे. संपूर्ण जगभर बूस्टर देण्यात येत आहे. भारतात माझ्यासार ख्या अनेकांनी गेल्या २-३ दिवसांत घेतला.... हे डॉ. मुलियाल निर्ण्य घेणार्^याच्या समितीशी का नाही बोलत?? का समितीत घेतले नाही/ऐकले नाही म्हणून बरळताहेत? हे प्रमुख आणि आपले मत ऐकले नसनार म्हणून वीष पेरताहेत.... फार मोठी शोकांतिका आहे ही.

D_dimer टेस्ट म्हणजे काय ती का करतात??
माझ्या माहितीनुसार, D-Dimer हे एक रक्ताची चाचणी असून रक्तातील गुठळ्या मोजण्यासाठी करतात. Corona मुळे रक्तात गुठळ्या होण्याची शक्यता असल्याने डॉक्टर ही टेस्ट सांगतात.
डॉ.कुमार, काही चुकले असल्यास सांगा

बरोबर वि मु
ही रक्तावर केली जाणारी चाचणी आहे.
त्यामध्ये रक्तातील डी डायमर या प्रथिनाचे प्रमाण मोजले जाते.
निरोगी अवस्थेत ते खूप कमी असते.
जेव्हा विविध आजारांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या होण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात चालू होते तेव्हा या प्रथिनाची पातळी बरीच वाढते.
कोविडच्या काही रुग्णांमध्ये असे घडते.

इथे https://www.maayboli.com/node/78680?page=3
या रुग्णांमध्ये केल्या जाणाऱ्या नेहमीच्या प्रयोगशाळा चाचण्याचा तक्ता आहे. तो माझ्या प्रतिसादात पाहता येईल

माझ्या रिपोर्ट मधे ५७७ आले आहेत dr बोले जास्त नाही थोडेच वाडले आहेत आणि ecosipn गोळी दिली आहे
काही समजत नाही आहे नक्की काय करायच

डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागा.
या चाचणीच्या बाबतीत प्रत्येक प्रयोगशाळेची आपापली 'कट ऑफ व्हॅल्यू' असते
प्रत्यक्ष रुग्णतपासणी केलेले डॉक्टरच या रिपोर्टची व्यवस्थित सांगड घालू शकतात.

Pages